অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळिंब पीक यशस्वी

आंतरपिकातून मिळवला काटी (जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते यांनी फायदा -
डाळिंब शेतीमध्ये योग्य नियोजन व पपईसारख्या आंतरपिकांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग काटी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते करत आहेत. नव्या प्रयोगासाठी योग्य त्या नियोजनातून त्यांनी खर्चामध्ये बचत साधली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका हा उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. मात्र तालुक्‍याचा दक्षिण भागामध्ये आता उसाबरोबर डाळिंबाखालील क्षेत्र वाढत आहे. हा भाग कमी पाण्याचा, माळरान असल्याने गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये या तालुक्‍यातील अनेक शेतकरी डाळिंब पिकाकडे वळले आहेत. आता या शेतकऱ्यांचे डाळिंब हेच मुख्य पीक बनले आहे. अशा शेतकऱ्यांपैकी एक आहेत काटी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील साहेबराव मोहिते. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 15 एकर शेती होती. सन 2000 पासून शेतीत उतरलेल्या साहेबरावांनी सन 2005 पर्यंत ज्वारी, बाजरी, मका यांसारखी पारंपरिक पिके घेतली. सन 2005 मध्ये त्यांनी दीड एकर क्षेत्रावर भगवा या जातीच्या डाळिंबाची लागवड केली. त्याला सन 2006 मध्ये दीड एकर क्षेत्रातून 15 टन उत्पादन मिळाले. त्याला 41 रुपये प्रति किलो दर मिळाला. मिळालेल्या या यशामुळे डाळिंब पीक आपल्याला जमू शकते, याची खात्री पटली. त्यामुळे हळूहळू सर्व 15 एकर क्षेत्र डाळिंबाखाली आणले.
- 2010 मध्ये चार एकर शेती विकत घेतली. मात्र आता शेतीसाठी पाणी कमी पडू लागल्याने 2011 मध्ये सिंचनासाठी पाच किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनने पाणी आणले. 2012 मध्ये आणखी चार एकर शेती विकत घेतली.

आंतरपीक म्हणून केली पपईची लागवड

नऊ एकर क्षेत्रावर डाळिंबासोबत पपईची लागवड करण्याचा निर्णय घेतला. नेहमीच्या पद्धतीने आंतरपीक न घेता, त्यांनी वेगळी पद्धत अवलंबली आहे. दोन ओळींतील अंतर 12 फूट ठेवून दोन डाळिंब रोपांतील अंतर आठ फूट ठेवले. या आठ फुटांमध्ये चार फुटांवर पपईच्या रोपांची एकरी 415 रोपांची लागवड केली आहे.

  • त्यासाठी ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल असून, सुरवातीच्या काळात पपईसाठी असलेली लॅटरल पपई काढणीनंतर दोन फूट मागे ओढल्यानंतर डाळिंबासाठी दुहेरी ओळ तयार झाली. त्यामुळे लॅटरलच्या खर्चात बचत झाली.
  • सात महिन्यांनंतर पपई काढणी झाल्यानंतर पिकांचे अवशेष रोटाव्हेटरच्या साह्याने मातीमध्ये मिसळून डाळिंबाच्या झाडाला सेंद्रिय खत उपलब्ध झाले.
  • डाळिंबामध्येच पपईची लागवड केल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत झाली. तसेच नुसत्या डाळिंब बागेपेक्षा स्पर्धात्मक वाढीमुळे पपई आंतरपीक असलेल्या ठिकाणी दोन्ही झाडांची वाढ चांगली झाल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.

शेती नियोजनाचा आराखडा ठरतोय फायद्याचा...

आपल्या 23 एकर क्षेत्रासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे लागवड, खत, पाणी, फवारणी, कोणत्या कालावधीमध्ये कोणता रोग, किडीचा प्रादुर्भाव झाला या विषयी नियोजन व माहिती नोंदणीचा आराखडा त्यांनी संगणकावर तयार करून ठेवला आहे. त्यानुसार प्रत्येक बाबींचे नियोजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे साहेबराव यांनी सांगितले.

  • बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला भेटी देऊन माहिती घेतात.
  • माती परीक्षणानुसार व शिफारशीप्रमाणे खताचा वापर करण्याकडे लक्ष असते. रासायनिक खताचा किमान वापर करण्याकडे त्यांचा कल असतो. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, निंबोळी पेंड, गांडूळ खत, लेंडीखत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, कारखान्यात तयार होणारे कंपोस्ट, राख याचे मिश्रण करून डाळिंबाच्या प्रति झाडाला सुमारे 10 किलो याप्रमाणे ते देतात.

पिकांना देतात काटेकोर पाणी 

पाण्याच्या काटेकोर वापराकडे साहेबराव यांचे लक्ष असते. त्यासाठी डाळिंबामध्ये सिंचनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला आहे.

  • पाण्याची कमतरता असलेल्या काळात संरक्षित पाण्यासाठी त्यांच्याकडे सव्वा तीन कोटी लिटर क्षमतेची शेततळी आहेत. त्यामध्ये पाणी साठवून ठेवले जाते.

रोग व कीडनियंत्रण


  • डाळिंबावर किडींमध्ये कोळी, थ्रीप्स, मावा, पांढरी माशी, खोडमाशी, खवलेकीड, तर रोगामध्ये सर्कसपोरा, अल्टरमेरिया ठिपके, फळकूज, जिवाणूजन्य करपा, तेलकट डाग रोग या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
  • पपईवर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होतो.
  • फवारणीसाठी साहेबराव यांच्याकडे एचटीपी पंप व ब्लोअर आहे.

काढणी व पॅकिंग

पपईची लागवड केल्यानंतर साधारणपणे सात महिन्यांनी पपईच्या काढणीस सुरवात केली. फळांची प्रतवारी करून पॅकिंगसाठी कागदी रद्दीचा वापर केला जातो. त्यामुळे वाहतुकीमध्ये साल काळी पडत नाही.

विक्री व उत्पादन

पपईच्या फळांच्या एकूण 15 काढण्या झाल्या असून एकरी सुमारे 50 टन मिळाले आहे. पपईच्या काढलेल्या फळाची विक्री जागेवरच केल्याने वाहतुकीचा खर्च वाचला.

  • पपईला सरासरी प्रति 10 रुपये किलो प्रमाणे दर मिळाला असून, उत्पादन खर्च एकरी 18 ते 20 हजार रुपये झाला.

डाळिंबाचे उत्पादन


  • 2011-12 मध्ये साडेआठ एकरमध्ये 125 टन उत्पादन मिळाले होते. एकरी 14.70 टन सरासरी उत्पादन मिळाले असून, सरासरी दर 65 ते 69 रुपये प्रति किलो मिळाला.
  • गेल्या वर्षी डाळिंबाचे एकरी 10 टन उत्पादन मिळाले असून, 71 रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. एकरी उत्पादन खर्च एक लाख 60 हजार रुपये आला. - यंदा अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उत्पादन घटण्याची शक्‍यता असून, एकरी सात ते नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळणे अपेक्षित आहे.

मिळालेले पुरस्कार 

  • कृषिभूषण स्व. अप्पासाहेब पवार स्मृती पुरस्कार - 2012-13
  • महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार - 2013-14

डाळिंबाची रोपवाटिका - 
सुरवातीला स्वतःसाठी डाळिंबाची चांगली रोपे उपलब्ध करण्याच्या हेतूने रोपवाटिका सुरू केली आहे. डाळिंबाच्या भगवा वाणाचे सुमारे एक लाख ते सव्वा लाख रोपे तयार केली आहेत.
संपर्क - साहेबराव मोहिते, 9850540003

शास्त्रज्ञ काय म्हणतात?

आंतरपिकाची निवड करताना त्याचा मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्‍यक असते. पपईसारख्या वेगाने वाढणाऱ्या पिकाची लागवड डाळिंबामध्ये करणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. तसेच पपईमधील किडींचे डाळिंबामध्ये स्थलांतर होण्याची शक्‍यताही अधिक राहणार आहे.
- डॉ. विनय सुपे,
उद्यान विद्यावेत्ता, कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

लेखक- संदीप नवले

स्त्रोत: अग्रोवन


अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate