महिलांना अडचणीतून सोडविण्यासाठी सज्ज महिलाग्रामीण भागातल्या महिलांसाठी मोफत.महिलांच्या त्या अडचणींच्या दिवसांमधे होणारा त्रास, गैरसोय, कुचंबना आणि कामकरी, कष्टकरी महिलांना त्या दिवसातल्या अस्वच्छतेमुळे जडणारे आजार... ही एक पूर्ण साखळीच असते. अगदी का मला बाईपण दिलंस रे देवा’?.. असं वैतागून म्हणणाऱ्या महिलांसाठी काही तरी करावे असे कायमच अम्रिता सैगल हिला वाटायचं. त्यातूनच तिने आणि तिच्या जगावेगळे काहीतरी करायच्या इच्छेने झपाटलेल्या मैत्रिणींनी इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन्सची कल्पना पुढे आणली. त्यांनी चक्क फेकून दिलेल्या केळ्याच्या घडांपासून सॅनिटरी नॅपकिन्स तयार करायला सुरुवात केली. वापरल्यानंतर हे सॅनिटरी नॅपकिन्स बायोगॅसमध्ये वापरता येतात आणि त्यात फायबर असल्याने महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षितही असतात.
अर्थात जगातील विख्यात अशा मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांची एकच इच्छा असते. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, अॅपल, फेसबुक यासारख्या बलाढ्य कंपनीत नोकरी मिळवणे किंवा करणे. ते स्वप्न बहुतांश विद्यार्थ्यांचे पूर्ण होतेच. पण, इतकी चांगली नोकरी सोडून देणारे फार विरळच. अम्रिता सैगल, ग्रेस केन आणि क्रिस्टीन कागेस्टू या तिन्ही मैत्रिणी त्यातल्याच एक आहेत. हार्डवेअर इंजिनीअर असलेल्या क्रिस्टीनला ओरॅकलमध्ये जॉब लागला तर गुगलसारख्या कंपनीत मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन मॅनेजर या पदापर्यंत अम्रिता पोहोचली होती. काही तरी वेगळे करण्याच्या विचारात ग्रेस होती. तिघींचे विचार जुळत असल्याने त्या सतत एकमेकींशी संपर्कात होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी आणि कामात असल्या तरी त्यांना ओढ होती एकत्र येण्याची. महिलांचे विविध प्रश्न, पर्यावरणाची काळजी आणि सामाजिक कार्याची मानसिकता या तीन प्रमुख बाबींमुळे या तिघी एकदा भेटल्या आणि ठरला पुढच्या प्रवासाचा मार्ग.
अम्रिता मूळची गुजरातमधली. त्यामुळे तिला असं वाटायचं की, भारतातील महिलांसाठी ठोस काही तरी करावं. तिनं बोलून दाखवलं. त्याला ग्रेस आणि क्रिस्टीन या दोघींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काय करावं, कसं करावं हा प्रश्न होताच. भारतासारख्या विकसनशील देशात खासकरुन शहरी झोपडपट्ट्यातील आणि ग्रामीण भागातील महिला मासिक पाळीच्या काळात योग्य ती खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना विविध विकार जडतात आणि त्यातूनच त्यांचा बळी जातो. सॅनिटरी नॅपकीनचा पर्याय असला, तरी तो महागडा आहे. या महिलांना तो परवडणारा नसतो. तर, दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा मोठा गंभीर प्रश्न या नॅपकिन्सने निर्माण केला आहे. नॅपकिन्सची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने प्रदूषणाची समस्या ऐरणीवर आली आहे. हा गुंता सोडवायचा तर काही तरी वेगळे करायचे म्हणून या तिघींनी एमआयटीतच एक प्रोजेक्ट केला होता. त्याचअंतर्गत त्यांनी इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकीनची संकल्पना पुढे आणली होती. याच संकल्पनेला २०१४ मध्ये हार्वर्ड विद्यापीठाचा पुरस्कारही मिळाला होता. याच आपल्या संकल्पनेचे बीजारोपण करण्याचा निर्णय तिघींनी केला आणि त्या भारतात आल्या.
अहमदाबादमध्ये या तिघींना आणखी काही साथीदार मिळाले आणि त्यांनी ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेअंतर्गत सुरु केला नवा प्रकल्प. तो होता ‘साथी’. केळाचे घड काढल्यानंतर केळाचे झाड तोडून इतस्ततः टाकले जाते. या केळाच्या झाडांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हेच फायबर सॅनिटरी नॅपकिनमध्ये वापरण्याची चाचपणी करण्यात आली. ती यशस्वी ठरली. सर्वसाधारण नॅपकिनमध्ये पॉलिमर वापरले जातात. शोषण क्षमता अधिक असलेले हे पॉलिमर मात्र त्वचेला बाधा पोहोचवितात. यावर मात करण्यासाठी केळीच्या झाडातील फायबर प्रभावी ठरले. त्याशिवाय वापर झालेल्या नॅपकीनची विल्हेवाट कशी लावायची यावरही त्यांनी काम सुरु केले. सहा महिन्यात या नॅपकीनची विल्हेवाट लावता येऊ शकते. तसेच, कंपोस्टमध्ये वापरुन बायोगॅसचीही निर्मिती करता येईल, असे त्यांनी सिद्ध करुन दाखविले. या अनोख्या आणि इको फ्रेंडली नॅपकिनचे पेटंट मिळविण्यासाठी तिघींनी अर्जही केला आहे. त्याचबरोबर साथी या उद्योगाद्वारे या नॅपकिनची निर्मिती सुरु करण्यात आली आहे.
प्रवाहात सारेच पोहतात पण प्रवाहाच्या विरोधात पोहायला मोठे धाडस लागते. तेच या तिघींकडे होते. इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी या विश्वात नवीन संकल्पना आणली. केळाच्या झाडापासून नॅपकिनची निर्मिती असे कुणी सांगितले तर अनेकांना ते फसवेच वाटेल. पण, व्यावसायिकरित्या ते उत्पादन करण्यापर्यंत या तिघींनी ठोस अशी कार्यवाही केली. म्हणूनच केवळ भारतात नाही तर संपूर्ण विश्वातच त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत जे काही स्टार्टअप आले त्यातीलच एक आहे साथी. भारतात सॅनिटरी नॅपकिनची बाजारपेठ फार मोठी आहे. वर्षाकाठी ५६ दशलक्ष नॅपकिन भारतात विकले जातात, असे सांगितले जाते. म्हणजेच मागणी मोठी आहे. हे नॅपकिन वापरल्यानंतर ते इतस्तः टाकले जातात. शहरांमध्ये ते कचऱ्यात पडतात. मात्र, या नॅपकिनचे विघटन होत नाही. त्यामुळे या नॅपकिनचे काय करायचे, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. ही समस्या सोडविण्यासाठीच आम्ही इको फ्रेंडली नॅपकिनला जन्म दिला, असे अम्रिता मोठ्या अभिमानाने सांगते.
भारतात १२ लाख एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळीचे घड काढल्यानंतर ती झाडे तोडली जातात आणि ही झाडे उघड्यावर पडतात. शेतकरी पुन्हा केळीच्या नवीन रोपाची लागवड करतात. हीच फेकलेली झाडे विकत घेतली तर शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळतील. याच झाडांमधील फायबर काढून त्यापासून नॅपकिनची निर्मिती करणे शक्य आहे, असे क्रिस्टीन सांगते. अहमदाबादमध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पात तरुण बोथरा, साराह मॅकमिलन आणि हर्षल पांचाळ या तीन नव्या सहकाऱ्यांचीही मदत लाभली आहे. एकत्रित प्रयत्नातून साथीचा गाडा हाकला जातो आहे. विविध स्वयंसेवी संस्था आणि देणगीदारांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना हे नॅपकिन मोफत पुरविण्याचे काम साथीने सुरु केले आहे. झारखंडमधील आरोग्य फाऊंडेशनच्या माध्यमातून 10 हजार महिलांना त्याचे वाटप झाले आहे.
त्याशिवाय वेबसाईट आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून जी काही मदत मिळेल त्याद्वारे हे वाटप आणखी गतिमान करण्याचे प्रयत्न साथीचे साथीदार करीत आहेत. सहा जणांची ही टीम अहोरात्र मेहनत करीत आहे. एमआयटीचे माजी विद्यार्थी, एमआयटी आणि साथी या तिघांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना इंटर्नशीप करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता, निगा याची माहिती पोहोचवितानाच त्या महिलांपर्यंत हे नॅपकिन पोहोचविण्यासाठी ही टीम झटून काम करते आहे. लवकरच पेटंट मिळेल आणि आमचे उत्पादन संपूर्ण जगभरात उपलब्ध करुन देऊ शकू, असा ठाम विश्वास अम्रिता, ग्रेस आणि क्रिस्टीनला आहे. साथीच्या प्रकल्पात उत्पादन प्रक्रियेतही महिलांनाच संधी देण्यात आली आहे.
भारतभरात जवळपास दीड लाख नॅपकीन वर्षाकाठी जाळले जातात किंवा जमिनीवर कुठे तरी फेकले जातात. हे चित्र बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हळूहळू आता प्रतिसाद वाढतो आहे आणि आम्हाला यश येते आहे, असे अम्रिता सांगते. टाटा सोशल इंटरप्रायजेस, आयआयएम कोलकाता, टाटा ग्रुप यांनीही आता साथीच्या कार्यात हातभार लावण्यास प्रारंभ केला आहे. उजेडाची एक वाट सुरु झाली की अनेक वाटा मिळत जातात. असाच काहीसा प्रकार साथीच्या बाबतीत घडतो आहे. अंधकार दूर करण्यासाठी केवळ प्रयत्नांची पराकाष्टा हवी. ठरवले तर निश्चित होते, असे सांगणारा हा स्टार्टअप सध्या भारतभरात चर्चेचा विषय बनला आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिलांच्या यशोगाथा समाजापुढे आणल्या जात आहेत. उच्चशिक्षीत आणि ध्येयवेड्या अम्रिता, ग्रेस आणि क्रिस्टीन या तिघी आज अनेक तरुणींच्या प्रेरणास्थान बनल्या आहेत.