अद्यापही जगाच्या पाठीवर रानटी मेंढ्यांचे अस्तित्व दिसून येते. तुर्कस्तानलगतच्या पामीर पठारावरील ४,९०० मी. उंचीवर मार्को पोलो या यूरोपीय प्रवाशांना तेराव्या शतकात रानटी मेंढ्यांचे कळप आढळले होते व पुढे त्यांच्याच नावाने ही जात ओ. पोली म्हणून ओळखली जाऊ लागली. य जातीतील नरांची शिंगे मोठी व पसरट असून शिंगांची टोके डोक्यापासून दूर राहतात. इतर रानटी जातींच्या शिंगांच्या अरुंद वळणामुळे टोके डोक्याजवळ राहतात. ओ. कारेलिनी हा याच मेंढ्यांचा एक प्रकार तिएनशान डोंगरांच्या रांगामध्ये आढळून येतो. या दोन्ही प्रकारच्या मेंढ्या आकारमानाने थोराड आहेत; पण अल्ताई पर्वत श्रेणीत आढळणाऱ्या ओ. ॲमॉन या आर्गली मेंढ्या सध्या अस्तित्वात असलेल्या रानटी मेंढ्यांपैकी सर्वांत धिप्पाड असून त्यांची उंची १.३ मी.व वजन १३५ किग्रॅ. असते. यांचा एक प्रकार लडाख व तिबेटमध्ये, दुसरा पूर्व मंगोलियामध्ये व तिसरा गोबीच्या वाळवंटामध्ये आढळून येतो. आर्गली गटातील सर्वात लहान रानटी मेंढ्या अफगाणिस्तान, पंजाब व लडाखमधील डोंगराळ भागामध्ये उरियल, उरिन किंवा शापू म्हणून ओळखल्या जातात. या पर्शियन किंवा आर्मेनियन (ओ. ओरिएंटॅलिस) आणि सार्डिनियन किंवा कॉर्सिकन (ओ. म्युसिमॉन) मेंढ्यांसारख्या दिसतात. याशिवाय तिबेटमध्ये १० ते ५० च्या कळपात आढळणाऱ्या भराल (स्यूडॉइस नेयॉर) या हिमालयातील निळ्या मेंढ्या म्हणून ओळखल्या जातात.
आफ्रिकेमध्ये उत्तरेपासून पूर्वेकडे सूदानपर्यंत पसरलेल्या डोंगरांच्या रांगांमध्ये रानटी मेंढ्यांचा एकच प्रकार उदाद किंवा औदाद (ॲमोट्रॅगस लेरव्हिया) म्हणून ओळखला जातो. या मेंढ्यांना डोळ्याखालील ग्रंथी असत नाहीत व त्यांची शिंगे शेळीप्रमाणे गुळगुळीत असतात.
रशियामधील पूर्व सायबीरियाच्या भागामध्ये व लगतच्या स्टॅनोव्हाय पर्वतराजीमध्ये ओ. बोरीलिस व ओ. निव्हिकोला हे रानटी मेंढ्यांचे दोन प्रकार आढळतात. या मेंढ्यांचे उत्तर अमेरिकेतील डोंगराळ भागात आढळणाऱ्या रानटी मेंढ्यांशी बरेच साम्य आहे. अमेरिकेतील या रानटी मेंढ्यांना मोठ्या शिंगांच्या (बिग हॉर्न) म्हणून ओळखतात. त्यांच्या डोळ्याखाली ग्रंथी नसते, तसेच वयस्क नराच्या शिंगाचा पुढील भाग सपाट असतो. यामुळे आर्गली मेंढ्यांहून त्या निराळ्या आहेत, हे लक्षात येते.
अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या भागातील याच प्रकारातील मेंढ्या रंगाने खाकी असून त्यांच्या पुठ्ठ्याचा रंग पांढरा असतो. स्टिकीन नदीच्या आसपासच्या ब्रिटिश कोलंबियातील मेंढ्यांचा रंग काळा असतो, तर अलास्कामधील याच जातीच्या रानटी मेंढ्या पांढऱ्या असतात व त्या डाल मेंढ्या म्हणून ओळखल्या जातात.
शरीरांची ठेवण, विशेषतः शेपटीची लांबी व तीत साठणारी चरबी, तसेच लोकरीची प्रत यांच्यावर आधारित असे पाळीव मेंढ्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यानुसार खालील प्रमुख वर्ग मानले जातात.
(१) उत्तम प्रतीची तलम लोकर देणाऱ्या मेंढ्या : उदा., मेरिनो, रॅम्ब्युलेट इत्यादी.
(२) मध्यम प्रतीची तलम लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्या मेंढ्यांतही दोन प्रकार आहेत (अ) काळ्या किंवा लांबट तोंडाच्या मेंढ्या उदा., साऊथडाऊन, सफोक, ऑक्सफर्ड इत्यादी. (आ) पांढऱ्या तोंडाच्या डॉर्सेट हॉर्न, रायलँड इत्यादी.
(३) लांब धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्यातील एक प्रकारच्या मेंढ्या लांब व चमकदार लोकर देणाऱ्या आहेत. उदा., कॉटस् वोल्ड, लिंकन इत्यादी. ह्यातील दुसऱ्या प्रकारच्या मेंढ्यांवर चकाकी कमी असते. या प्रकारात बॉर्डर लायसेस्टर, रोमनी मार्श, शेव्हिएट, मेंढ्यांत मोडतात.
(४) लांब व जाड धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्या : ह्यामध्येही दोन प्रकार आहेत (अ) सुधारित मेंढ्या : स्कॉटिश ब्लॅक फेस इत्यादी. (आ) अजूनही आद्य अवस्थेत असलेल्या मेंढ्या; ह्या मेंढ्यांचे तीन उपप्रकार आहेत. (आ. १) पातळ शेपटीच्या मेंढ्या : उदा., नव्हाजो (अमेरिकन), झॅकेल (यूरोप), यूरा (स्पेन), तिबेट (आशिया). (आ.२) चरबीयुक्त शेपटीच्या मेंढ्या : यांचेही परत दोन उपउपप्रकार आहेत. (१) चरबरीत लोकर देणाऱ्या : आशिया खंडातील बऱ्याचशा मेंढ्या. (२) फर देणाऱ्या : काराकुल जातीच्या मेंढ्या. (आ. ३) चरबीयुक्त पुष्ट पुठ्ठ्याच्या मेंढ्या : ह्या मेंढ्याच्या प्रकारात कझक, दुम्बा इ. जातीच्या मेंढ्या मोडतात.
वरील चार मुख्य प्रकारच्या मेंढ्यांच्या जाती आहेत (उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या, मध्यम प्रतीची लोकर देणाऱ्या, लांब धाग्याची लोकर देणाऱ्या व जाड धाग्यांची लोकर देणाऱ्या). ह्याशिवाय लांब धाग्याची लोकर देणाऱ्या मेंढ्यांचा उत्तम प्रतीची लोकर देणाऱ्या मेंढ्यांशी संयोग करून संकरित मेंढ्यांचा एक नवीन वर्गच तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये कॉरिडेल, पोलवर्थ, कोलंबिया, पनामा, कॉरमो इ. जातींच्या मेंढ्या येतात.
काही मेंढ्यांच्या अंगावर लोकर अजिबात नसते. त्यांचा उपयोग फक्त मांस उत्पादनासाठीच होतो. नेल्लोर, बन्नूर ह्या जातींच्या मेंढ्या मांसासाठी म्हणूनच पाळतात. पर्शियन जातीच्या मेंढ्या ह्या प्रकारात मोडतात. काही मेंढ्याचा उपयोग दूध उत्पादनासाठी करतात. ईस्ट फ्रेझियन, पेलविन, झॅकेल या मेंढ्या ह्या प्रकारात मोडतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/27/2020
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची...
अनुसूचित जाती व जमाती विषयक माहिती.
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...