शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर ठरते. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण द्यावी. करडू 25 दिवसांचे असल्यापासून थोडा खुराक सुरू करावा.
1) चांगल्या वजनाची, सशक्त करडं जन्मण्यासाठी शेळीच्या गाभणकाळातच तिचे योग्य व्यवस्थापन करावे. गाभण शेळ्यांना सहज पचणारा चारा, योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. या आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भाच्या वाढीसाठी; तसेच शेळीच्या शरीरातील पोषणूल्यांचा साठा वाढविण्यासाठी होईल.
2) जसजसे व्यायण्याची तारीख जवळजवळ येईल तसतसे चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराकाचा पुरवठा करावा.
3) गाभण शेळीस गाभणकाळाच्या 90 दिवसांनंतर जादा खुराक देण्याची गरज असते. गाभणकाळात जर उत्तम प्रतीचा चारा व खुराक दिला गेला नसल्यास अशक्य व लहान करडं जन्माला येतात किंवा पिलांचा गर्भाशयातच मृत्यू होतो.
4) गाभणकाळाच्या शेवटच्या 3 ते 4 आठवड्यांमध्ये गर्भाशयातील पिलांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच दररोज 250 ते 350 ग्रॅम खुराक द्यावा. विशेषतः जुळे किंवा तिळे देणाऱ्या शेळीची गाभणकाळात जास्तीची काळजी घ्यावी.
5) शेळी व्यायण्यापूर्वी एक महिना अगोदर शेळीस आंत्रविषार लस द्यावी.
6) गाभणकाळातच योग्य ती काळजी घेतल्यामुळे जन्मणारी करडं ही सशक्त, वजनदार, चपळ जन्मतात. या करडांची पुढील वाढही झपाट्याने होते.
1) जन्मानंतर पहिल्या 24 तासांत करडांची विशेष काळजी घ्यावी लागते. या वेळी करडांना जास्त ऊर्जेची गरज असते. तसेच नवीन वातावरणातील बदलाशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते.
2) सर्वसाधारणपणे शेळी व्यायल्यानंतर तिच्या पिलास चाटून स्वच्छ व कोरडे करते. जर असे दिसून आले नाहीतर मात्र अशा करडांना कोरड्या टॉवेलने पुसून स्वच्छ करावे. जर टॉवेल उपलब्ध नसेल तर वाळलेल्या मऊ गवताचा वापर करून करडाचे शरीर कोरडे करावे. करडांचे शरीर कोरडे करताना होणाऱ्या घर्षणामुळे श्वासोच्छवास व्यवस्थित होण्यास मदत होते.
3) जन्मानंतर पहिल्या 20 मिनिटांत पिलू उभे राहून दूध पिण्यासाठी प्रयत्न करतात. जर पिल्ले अशक्त असतील तर त्यांना चिक पिण्यासाठी आपल्या मदतीची गरज असते.
4) करडांची नाळ 2 ते 3 इंच अंतरावर निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने कापून त्यास टिंक्चर आयोडीन किंवा जंतुनाशक लावावे. म्हणजे नाळेमधून जंतुसंसर्ग होणार नाही, करडू आजारी पडून दगावणार नाही.
5) नवजात करडास जन्मल्यानंतर अर्धा ते एक तासामध्ये चिक पाजावा. करडास स्वतःहून व्यवस्थित पिता येत नसल्यास चिक बाटलीत काढून निपल असणाऱ्या बॉटलने थोडा थोडा ठसका न लागता पाजावा. करडाच्या वजनाच्या 10 टक्के चिक दिवसातून 3 ते 4 वेळा विभागून पिण्यास द्यावा. या चिकातून करडाच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी रोगप्रतिकारशक्ती तसेच मोठ्या प्रमाणात जलद वाढीसाठी आवश्यकता असणारी प्रथिने, जीवनसत्त्व, लोह इ. घटक मुबलक प्रमाणात मिळतात.
6) जर करडाच्या आईस चिक नसेल तर दुसऱ्या शेळीचा चिक उपलब्ध असल्यास पाजावा किंवा पाणी 264 मि.लि.+ दूध 575 मि.लि. + एरंडी तेल 2. 5 मि.लि. + 1 अंडे + 10,000 आय यु जीवनसत्व ""अ'' + ऍरोमायसीन 80 मि. ग्रॅम यांचे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा विभागून द्यावे.
7) चिक पाजून झाल्यानंतर त्या करडाचे तोंड कापडाने पुसून घ्यावे किंवा पाण्याने धुऊन घ्यावे. कारण चिकटपणामुळे माश्या बसतात, मुंग्यांचा प्रादुर्भाव होतो.
8) नवजात करडाचे पोट लहान असल्यामुळे त्यांना थोड्या थोड्या अंतराने सतत दूध देणे गरजेचे असते. दूध दिवसातून कमीत कमी चार वेळा द्यावे. नवजात करडांना जर दिवसभर त्यांच्या आईसोबत ठेवल्यास करडं गरजेनुसार दूध पिऊ शकतात.
9) नवजात करडास पाच दिवसांनंतर करडाच्या वजनाच्या 100 टक्के इतके दूध पाजावे किंवा करडास व्यवस्थित पचन होऊन त्या प्रमाणात दूध पाजावे. करडाच्या आईस दूध नसेल तर दुसऱ्या शेळीचे दूध पाजवावे. शेळीचे दूध उपलब्ध नसेल तर गायीचे दूध उपयुक्त ठरते.
10) दुसऱ्या आठवड्यापासून करडे दूध प्यायल्यानंतर आईजवळ थांबत नाही. दूर जाऊन विश्रांती घेतात किंवा खेळतात, बागडतात. त्यामुळे त्यांच्या शरीरांची हालचाल वाढते. परंतु, गरजेच्या प्रमाणात शेळीचे दूध उत्पादनात वाढ होत नाही.
11) शेळीचे दूध उत्पादन कमी असेल तर करडाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि त्यांची तीव्रता जुळ्या/ तिळ्या करडांच्या बाबतीत अधिक जाणवते. अशावेळी उच्चप्रतीचा प्रथिनांचे प्रमाण 20 ते 22 टक्के असलेल्या खुराक करडांना द्यावा. त्यामुळे करडे खाण्याचा प्रयत्न करतात.
12) करडांना पहिल्या आठवड्यात वेगळे पाणी पिण्यासाठी देण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर मात्र लहान भांड्यामध्ये पाणी गरजेनुसार द्यावे.
1) करडे वयाच्या 1 ते 2 आठवड्यांपासून चारा चघळण्यास सुरवात करतात. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरव्या वैरण (लसूणघास, शेवरी, सुबाभूळ) द्यावी. वैरणीच्या लहान पेंढ्या बांधून भिंतीजवळ करडाच्या तोंडाला पोहोचतील अशा उंचीवर अधांतरी लटकून ठेवाव्यात. असा चारा करडं आवडीनं खाऊ लागतात. गरजेनुसार त्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे. त्यामुळे कोटीपोटातील उपयुक्त जीवाणूंची वाढ व विकास होतो.
2) करडांना आईपासून आठ आठवड्यांनी वेगळे करावे. त्यांना उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच थोड्या प्रमाणात पशुखाद्य देण्यास सुरवात करावी.
3) लहान करडांना एकदम जास्त प्रमाणात हिरवा चारा कोवळे गवत खाण्यास देऊ नये. यामुळे हगवण तर लागेलच परंतु करडांना आंत्रविषार होण्याची भीती असते. यासाठी फक्त जास्त कोवळा चारा खाण्यास देऊ नये.
4) करडू 25 दिवसांचे असल्यापासून थोडा थोडा (50 ग्रॅम) खुराक द्यावा. खुराकातील प्रथिने मिळाल्यामुळे करडांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होईल. करडांना चांगल्या प्रतीचा चारा आहारात दिल्यास (लसूणघास, बरसीम) करडांची वाढ झपाट्याने होते. खुराकावरील खर्च कमी करता येतो.
5) करडांच्या वाढत्या वयाबरोबर दैनंदिन आहारातील खुराकाचे प्रमाण 50 टक्केपर्यंत वाढवावे. सर्वसाधारणपणे दोन महिन्यांपर्यंत करडाचे 8 किलो किंवा मूळ वजनाच्या चारपट वजन मिळू शकते.
6) करडांच्या वाढीचा वेग पहिल्या दोन महिन्यांत शेळीच्या दूध उत्पादनाच्या समप्रमाणात असतो. त्यानंतरच्या काळात करडांचे दूध हळूहळू बंद करून खुराक व वैरणीवर जोपासना करावी.
7) पौष्टिक आहार व व्यवस्थापनावर वयाच्या तीन महिन्यांपर्यंत करडाचे वजन 15 किलो अपेक्षित आहे.
8) पहिल्या तीन महिन्यांतील करडांची वाढ पूर्णपणे आहारावर अवलंबून असते. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट करण्यासाठी व जलद वाढीसाठी आहार व्यवस्थापनाची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
9) वयाच्या एक वर्षापर्यंत अपेक्षित असलेल्या वजनापैकी 65 टक्के वजन पहिल्या तीन महिन्यांत मिळते. त्यापैकी सर्वाधिक 43 टक्के वजन पहिल्या, 28 टक्के दुसऱ्या, 29 टक्के तिसऱ्या महिन्यात मिळते.
1) स्वतःच्या करंडाचा अस्वीकार करण्याचे प्रमाण पहिल्यांदा व्यायलेल्या शेळ्यांमध्ये अधिक प्रमाणात दिसते. टाकून दिलेले किंवा आई मेलेल्या करडांचे संगोपन करून वाढवणे थोडे कठीण काम आहे. कारण अनाथ करडांचा दुसऱ्या शेळ्या स्वीकार करत नाहीत.
2) यासाठी ज्या शेळीचे करडू गेले आहे, अशा शेळीच्या अंगावर अनाथ करडाला पाजावे. पाजतेवेळी डोळ्यावर पट्टी बांधावी.
3) शेळी तिच्या करडाला तिच्या वासावरून ओळखते. त्यामुळे अनाथ करडाच्या अंगावर व शेळीच्या नाकावर थोडे तिचेच दूध काढून चोळावे म्हणजे शेळी अनाथ करडाचा स्वीकार करते.
4) हे शक्य नसेल तर दुसऱ्या शेळीचे, गाईचे दूध काढून पाजावे.
( लेखक शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र संकुल, पशु वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
शेळीपासून वेगळे होण्यापूर्वीच्या करडांच्या वजन वाढ...
करडांची वाढ चांगल्या प्रकारे होते की नाही, ते पाहण...