कोंबड्यांमधील लकव्यावर - वनौषधींद्वारा उपचार
लेअर कोंबड्यांमध्ये पंखांचा किंवा पायांचा लकवा (पॅरालायसीस) मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजारामुळे पक्ष्याची हालचाल बंद होते. पर्यायाने ते पिण्याच्या पाण्यापर्यंत किंवा खाद्यापर्यंत पोचू शकत नाहीत. खाद्य, पाणी न मिळाल्यामुळे ते अशक्त होते. यात पक्षी दगावू शकतो.
- संसर्गजन्य आजार, "ब' जीवनसत्त्वाची कमतरता, वातावरणातील बदल जसे थंडी वाढणे, इत्यादी कारणामुळे हा आजार दिसतो.
- "ब' जीवनसत्त्वाचा वापर केल्यास यावर उपयोग होतो. "ब' जीवनसत्त्वामुळे पक्ष्यास ताकद मिळते; परंतु प्रत्येक वेळी केवळ "ब' जीवनसत्त्व वापरल्यास आपणास अपेक्षित फरक पडतोच असे नाही. शिवाय या उपचारास खर्चदेखील जास्त येतो. अशा वेळी काही औषधी वनस्पतींचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. या वनस्पती पक्ष्यांच्या नियमित खाद्यात वापरल्यास हा आजार टाळतादेखील येतो.
उपयुक्त वनौषधी
शंखपुष्पी
- मुख्यतः मेंदू व चेतना संस्थेस उत्तेजीत करणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वापराने मज्जासंस्थेच्या संदेशवहनाचे कार्य सुरळीत राहते. यामुळे याचा वापर उपचारामध्ये होतो.
- संपूर्ण वनस्पती औषधीत वापरली जाते.
- मात्रा ः 5-10 ग्रॅम प्रतिदिन प्रति 100 पक्षी या प्रमाणात खाद्यातून द्यावी.
वेखंड
- वचा या नावाने ही वनस्पती परिचित आहे.
- लकवा आजारात मेंदूकडून अवयवांकडे व अवयवांकडून मेंदूकडे जाणारे संदेश यात अडथळा येतो. हे अडथळे दूर केल्यास या आजारावर मात करता येते. नेमके हेच काम ही वनस्पती करते.
- वेखंड खोड औषधीमध्ये वापरले जाते.
- मात्रा : 3-4 ग्रॅम प्रतिदिन प्रति 100 पक्षी या प्रमाणात खाद्यातून द्यावी.
ज्योतिष्मती
- मालकांगुणी या नावाने ही वनस्पती ओळखली जाते.
- संपूर्ण वनस्पती औषधीत वापरतात.
- मात्रा : 10 ग्रॅम प्रतिदिन प्रति 100 पक्षी या प्रमाणात खाद्यातून द्यावी.
ब्राह्मी
- मंडूकपर्णी या नावाने ही वनस्पती ओळखली जाते.
- सर्वत्र मोठ्या प्रमाणात ही वनस्पती आढळते.
- मात्रा : 5-8 ग्रॅम प्रतिदिन प्रति 100 पक्षी या प्रमाणात खाद्यातून द्यावी.
पाण्यातून द्यावयाची मात्रा
या सर्व वनस्पतींचा वापर खाद्यातून करावा; परंतु बाधित पक्षी खाद्य खात नाहीत तेव्हा ही मात्रा पाण्यातून देता येते.
मात्रा :
शंखपुष्पी - 8 ग्रॅम
वेखंड - 5 ग्रॅम
ज्योतिष्मती - 7 ग्रॅम
ब्राह्मी - 5 ग्रॅम
- 100 मिलि पाण्यात वरील प्रमाणात घटक मिसळून उकळावेत.
- हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळल्यानंतर गाळून घ्यावे. 1 ते 2 मिलि प्रति पक्षी असे ड्रॉपरद्वारा मिश्रण पाजावे.
- पक्षी स्वतः होऊन पाणी पिऊ शकत असतील तर 100 मिलि प्रति 100 पक्षी प्रतिदिन या मात्रेत त्यांच्या पिण्याच्या पाण्यात वरील द्रावण मिसळावे.
(लेखक पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.