गेल्या काही वर्षांपासून भारतातही उद्योग समूहांकडून दूध काढणी यंत्र निर्मिती केली जात आहे. याच्या किमतीत लहान शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आहेत. अगदी तीन जनावरांपासून ते १००० जनावरांच्या गोठ्यामध्ये दूध काढणी यंत्राच्या विविध प्रणाली वापरण्यात येत आहेत. या दूध काढणी यंत्रामध्ये झालेली गुंतवणूक एक - दीड वर्षात जादा नफ्यातून फेडता येते.
दूध काढणी यंत्रणा
१) सिंगल बकेट व डबल बकेट दूध यंत्रणा -
यंत्राची जोडणी करून आपण एका तासात सिंगल बकेट (एक कॅन बकेट) यंत्राद्वारे १० ते १२ गाई / म्हशींचे दूध काढू शकतो. तसेच डबल बकेट (दोन कॅन / बकेट) यंत्राद्वारे १२ ते २४ जनावरांची धार काढू शकतो.
२) फोर बकेट / सिक्स बकेट दूध यंत्र -
फोर बकेट (चार कॅन / बकेट) यंत्राने तासाला ४० ते ५० जनावरांचे दूध काढू शकतो. सिक्स बकेटद्वारे (सहा कॅन / बकेट) तासाला ६० ते ७५ जनावरांची वरीलप्रमाणे पाइप फिटिंग गोठ्यामध्ये बसवून दूध जनावरांच्या जवळ जाऊन काढता येते.
३) मिल्किंग पार्लर (सेमी ऑटोमॅटिक/ऑटोमॅटिक) -
मिल्किंग पार्लरमुळे गोठ्यातील पाइपलाइनचा खर्च वाचू शकतो. जनावरांचा फेरफटका झाल्याने त्यांचा व्यायाम होतो. गोठ्यातून थोड्या अंतरावर दूध काढणी केल्याने "स्तनदाह'सारखे वारंवार होणारे आजार टाळता येतील. मोठ्या गोठ्यामध्ये केव्हाही स्वयंचलित दूध काढणी यंत्रणा (ऑटोमॅटिक मिल्किंग) पार्लरमध्ये बसवण्यापेक्षा प्रथम टप्प्याटप्प्यांनी नियोजन करावे. उदा. प्रथम फोर बकेट, सिक्स बकेट दूध काढणी यंत्रणा बसवून त्या प्रणालीची पूर्ण माहिती झाल्यानंतरच अर्ध स्वयंचलित प्रणाली बसवावी. कारण दूध काढणी यंत्र आणि एकूण प्रणालीमध्ये कोणताही अदलाबदल न करता आपण अर्ध स्वयंचलित प्रणालीकडे वळू शकतो.
अर्ध स्वयंचलित दूध काढणी यंत्राचे फायदे
१) थोडी यंत्रणा व थोड्या मानवी साह्याने ही दूध काढणी प्रणाली वापरण्यास सुलभ आहे.
२) स्वयंचलित यंत्रणेमध्येही मजुरांची संख्या तेवढीच असते जेवढी अर्ध स्वयंचलित प्रणालीमध्ये असते. (सडांना शेल लावण्यासाठी)
३) स्वयंचलित यंत्रणेमध्ये बिघाड आल्यास संपूर्ण दूध काढणी व्यवस्था खोळंबू शकते. पण अर्ध स्वयंचलित यंत्रणेमध्ये अशी शक्यता जवळपास नसते.
४) स्वयंचलित यंत्रणेमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक व्यक्तीची गरज असते.
५) थोडक्यात, स्वयंचलित यंत्रणेमध्ये पुन्हा आपण कोणावर तरी अवलंबून राहण्यापेक्षा, सोपी सुटसुटीत अर्ध स्वयंचलित प्रणाली फायदेशीर होऊ शकेल.
दूध काढणी यंत्राची गरज आणि फायदे
१) अवलंबन - छोट्या गोठ्यामध्ये (दोन-तीन जनावरे) असतील आणि पशुपालक हाताने दूध काढत असतील, तर जनावरांच्या धारा काढणाऱ्या व्यक्तीस स्वत- थांबावे लागते. मध्यम, मोठ्या गोठ्यामध्ये मजुरांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते. शेतकऱ्याला मजुरांच्या सोईने वागावे लागते; परंतु दूध काढणी यंत्र दहा वर्षांच्या मुलापासून घरातील कोणीही व्यक्ती सहज वापर करू शकत असल्याने मजुरांवरील अवलंबन कमी होते.
२) वेळ आणि पैशाची बचत - साधारण गोठ्यामध्ये पाच ते दहा जनावरे असतील तर हाताने दूध काढण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी कालावधीत आपण दूध यंत्राच्या साह्याने दूध काढू शकतो. तसेच मजुरांची असणारी संख्या आपण एकतृतीयांश कमी करून (सरासरी २४,०००/- वार्षिक प्रति मजुरी) आपण पैशाची बचत करून नफ्याचे प्रमाण वाढवू शकतो.
३) दुधाचा दर्जा व प्रमाण - हाताने दूध काढण्याच्या पद्धतीत दुधातील जंतूंचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे भारतातील दुधाची प्रत इतर देशांच्या मानाने कमी आहे. जर प्रत कमी असेल तर साहजिकच दरही कमी होतो. दूध काढणी यंत्राचा वापर केल्याने मानवी हाताचा दुधाला स्पर्श टाळून दुधातील जंतूंचे प्रमाण सर्वांत कमी करून दर्जा वाढवून नफा कमवू शकतो. हाताने दूध काढताना व्यक्ती पहिल्या जनावराकडून शेवटच्या जनावराकडे जाईपर्यंत दूध काढताना कंटाळू शकतो.
बऱ्याच वेळेस १० ते १५ टक्के दूध सडातच राहू शकते. पण दूध काढणी यंत्र अखंडपणे काम करू शकते. प्रत्येक जनावर सहा ते सात मिनिटांतच जास्त प्रमाणात दूध देते, कारण हीच त्यांची "पान्हा वेळ' असते. त्याच काळात कितीही दूध देणारे जनावर असले तरी दूध यंत्र सहा ते आठ मिनिटांत दूध काढते. एकंदरीत हाताने काढण्यापेक्षा दूध काढणी यंत्राद्वारे १० ते १५ टक्के दूध वाढू शकते.
दूध काढणी यंत्राचे प्रकार
१) सिंगल बकेट दूध काढणी यंत्र - ज्यांच्याकडे जनावरांची संख्या तीनपासून १२ पर्यंत आहे, त्यांना हे यंत्र उपयोगी आहे.
२) डबल बकेट दूध काढणी यंत्र - ज्यांच्याकडे जनावरांची संख्या १५ ते ३० पर्यंत आहे, त्यांना हे यंत्र उपयुक्त आहे. पार्लरसाठी हे यंत्र वापरता येते.
३) फोर बकेट / सिक्स बकेट दूध यंत्र - ज्यांच्याकडे ३० पासून ८० पर्यंत जनावरांची संख्या आहे, त्यांना हे यंत्र अत्यंत उपयुक्त आहे. हे यंत्र मिल्किंग पार्लरसाठी सर्वांत किफायतशीर आहे.
४) मिल्किंग पार्लर - ही दूध काढणी यंत्राची प्रणाली असून, यातील यंत्रणा एका जागेवर बसवून जनावरांना दूध काढण्यासाठी दूध काढणी यंत्राजवळ आणले जाते. या पद्धतीमध्ये पाइपलाइनच्या खर्चात बचत करता येते.
५) अर्ध स्वयंचलित (सेमी ऑटोमॅटिक) पार्लर सेंटर - मिल्किंग पार्लर प्रणालीमध्ये प्रथम यंत्र बसवून साधारणपणे एक किंवा दोन महिन्यांनी अर्ध स्वयंचलित प्रणाली बसवावी, म्हणजे यंत्राची हाताळणी सर्वांना सुलभ होऊ शकेल.
दूध काढणी यंत्राचे घटक
पल्सेटर - पल्सेटर हा आलेला व्हॅक्यूम पल्सेशन करून पुढे ऑरबिटर व शेलला पुरवतो.
ऑरबिटर - हा व्हॅक्यूम व दूध दोन्हींचे जंक्शन असून दोघांना वेगवेगळे करून, दूध गोळा करण्याचे काम करतो.
शेल - यामधील रबर लायनर जे सडांना लावले जातात, ते उत्कृष्ट दर्जाचे असतात. यामध्ये व्हॅक्यूमद्वारे सडांना दाबणे - सोडणे क्रिया घडून दूध निघते.
व्हॅक्यूम टॅंक - व्हॅक्यूम टॅंक हा नावाप्रमाणे व्हॅक्यूमचा रिझर्वायरचे काम करतो, याच्या साह्याने आपण नियंत्रित व्हॅक्यूम यंत्रणेला दिला जातो.
कॅन - कॅन, बकेटचा वापर फक्त दूध साठवण्यासाठी होतो.
व्हॅक्यूम पंप - व्हॅक्यूम तयार करणेचे महत्त्वाचे काम करतो.
मोटर - व्हॅक्यूम पंपास ४४० आरपीएमला यांत्रिक ऊर्जेने फिरविण्यासाठी मदत करते.
दूध काढणी यंत्राचे व्यवस्थापन
पंपामधील तेलाची पातळी रोज तपासावी.
दर दोन महिन्यांस संपूर्ण तेल बदलावे.
रोज लायनर, मिल्क ट्यूब, कॅन स्वच्छ ठेवावेत.
आठवड्यातून कोमट पाणी व ब्रशच्या साह्याने लायनर (शेल) व मिल्क ट्यूब स्वच्छ करावी.
स्वच्छ केलेले यंत्राचे सर्व भाग कोरडे करून सावलीत सुकवावेत.
साधारणपणे २५,००० लिटर दूध काढल्यानंतर वर्षानंतर लायनर बदलावेत.