नाडेप खतनिर्मितीबाबत माहिती
नाडेप कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पाणी न साचणाऱ्या उंच ठिकाणी एक टाकी बांधावी. त्यासाठी 12 फूट लांब व 5 फूट रुंद अशी आयताकृती जागा 1 फूट लांब व 1 फूट खोल खोदून घ्यावी. टाकी बांधण्यास साधारणतः 1200 विटा, 80-100 टोपली माती, 20 टोपली वाळू, दगड, एक गोणी सिमेंट एवढी सामग्री लागते.
- खोदलेली जागा दगड-मातीने भरून जमिनीला समांतर करताना धुम्मस करून टणक करावी किंवा खालची जागा सिमेंट कॉंक्रीटने पक्की करावी.
- त्यानंतर 9 इंच रुंदीची भिंत येईल अशा प्रकारे विटांचे दोन थर मातीमध्ये बांधावेत. टाकीत मोकळी हवा खेळती राहावी म्हणून टाकी बांधताना चारही बाजूंच्या भिंतींना प्रत्येक दोन विटांच्या थरांनंतर तिसऱ्या थराची बांधणी करताना दोन विटांमध्ये 4 इंचांची जागा रिकामी सोडून बांधणी करावी. टाकीची उंची 3 फूट ठेवून शेवटचे दोन थर सिमेंटमध्ये बांधावेत.
साहित्य
1500 किलो काडीकचरा, पालापाचोळा, धसकट, सालपटे इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थ, 8-10 टोपली शेणखत, 120 ते 130 टोपली गाळलेली माती, 1500-2000 लिटर पाणी, तसेच गाई-म्हशींचे किंवा इतर जनावरांचे मूत्र 30-35 लिटर, गाईचे शेण 90 ते 100 किलो इत्यादी साहित्य जमवून ठेवावे.
पहिली भराई
- टाकी भरण्यापूर्वी टाकीच्या आतील भिंती व जमीन शेण व माती यांच्या मिश्रणाने ओली करावी. त्यानंतर पहिला 15 सें.मी. जाडीचा थर जमा केलेल्या सेंद्रिय पदार्थांचा टाकावा.
- या थरावर 125 लिटर पाणी व 4 किलो शेण अधिक कंपोस्ट जीवाणू संवर्धन यांचे मिश्रण शिंपडावे. त्यानंतर वाळलेली व गाळलेली साफ माती 50-60 किलो समप्रमाणात टाकून थोडे पाणी शिंपडावे.
- अशा प्रमाणे प्रत्येक वेळी तीन थर देऊन टाक्याच्या वर दीड फूट उंचीपर्यंत टाकी भरावी. साधारणपणे बारा थर आवश्यक असतात.
- शेवटच्या थरावर 7.5 सें.मी. जाडीचा 400 ते 500 किलो स्वच्छ मातीचा थर टाकावा. त्यावर शेण व पाणी यांचे मिश्रण व्यवस्थित लिंपून घ्यावे. हे मिश्रण वाळल्यानंतर त्याला भेगा पडतात. त्या पुन्हा शेण व पाण्याने लिंपाव्यात.
दुसरी भराई
- 15-20 दिवसांनंतर या टाकीतील सामग्री कुजून 8-9 इंच खाली दबली जाते. पहिल्या भराईप्रमाणेच काडीकचरा व इतर वनस्पतिजन्य पदार्थ, शेण व पाण्याचे मिश्रण आणि गाळलेली माती अशा तीन थरांमध्ये टाकीच्या वर दीड फुटापर्यंत पहिल्याप्रमाणे पुन्हा भरून घ्यावे. त्यावर 3 इंच मातीचा थर देऊन शेण व माती यांच्या मिश्रणाने लिपून बंद करावे.
- या पद्धतीने चांगले कंपोस्ट खत तयार होण्यासाठी 90-120 दिवस लागतात.
- या कालावधीत ढिगाराला भेगा पडल्यास शेण, माती व पाण्याचे मिश्रण शिंपावे. त्यामुळे टाकीमध्ये आर्द्रता कायम राहील. उन्हाळ्यात ऊन अधिक असल्यास टाकी गवत किंवा गोणपाटाने झाकून टाकावी.
- या आकाराच्या टाकीमधून जवळपास 3.5 ते 5 टन नाडेप कंपोस्ट मिळते.
- या खतामध्ये साधारणतः 0.5 ते 1.0 टक्का नत्र, 0.5 ते 0.8 टक्का स्फुरद आणि 1.2 ते 1.4 टक्का पालाशाबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात.
संपर्क - 18002330724
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.