অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाजीपाला पिकावरील कीड व रोगनियंत्रण

सततच्या पावसानंतर आता दिवस व रात्रीतील तापमानातील तफावत यामुळे टोमॅटो, भेंडी, वांगे व कांद्यावर रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोग व किडीचा प्रादुर्भाव ओळखून त्वरित उपाययोजना कराव्यात. 

टोमॅटो

टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस : 
पानावर प्रथम लहान, तांबूसकाळसर चट्टे दिसतात; नंतर देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडावरसुद्धा पसरतो. तसेच संपूर्ण झाड १०-१५ दिवसांत करपून वाळून जाते. 
उशिरा रोग झाल्यास, फळावर पिवळसर लाल डाग, तसेच गोलाकार वलये दिसून येतात. फळांची पूर्णपणे वाढ होत नाही. 
या रोगाचा प्रसार फुलकिड्यांमार्फत (थ्रिप्स) होतो.

पर्णगुच्छ

टोबॅको लीफकर्ल व्हायरसमुळे पर्णगुच्छ किंवा बोकड्या या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो.

  • पाने बारीक, वाकडीतिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात.
  • झाड खुजे राहून पर्णगुच्छ दिसते.
  • या रोगाचा प्रसार पांढरी माशी या किडीमार्फत होतो.
  • वरील दोन्ही रोग शेतामध्ये कमी प्रमाणात असल्यास, रोगग्रस्त झाडे जाळून टाकवीत, अथवा जमिनीत गाडून टाकावीत.
  • नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट १५ ते २० मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून ८ -१० दिवसांच्या अंतराने फवारावे.

टोमॅटोवरील शेंडे व फळे पोखरणारी अळी

हेलिकोवर्पा आर्मीजेरा या किडीची अळी कोवळी पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरुन आत शिरते व गर खाते. 
नियंत्रणासाठी २० मि.लि. क्विनॉलफॉस प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. एन. पी. व्ही. विषाणूचा २०० मि.लि. प्रति एकर फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्यात.

भेंडीवरील केवडा

हा विषाणूजन्य रोग असून, त्यास यलोव्हेन मोझॅक (केवडा) म्हणतात.

  • पानाच्या शिरा पिवळ्या पडतात. इतर भाग हिरवा दिसतो.
  • या रोगाचा प्रसार पांढरी माशी व तुडतुडे या किडीद्वारा होतो.
  • नियंत्रणासाठी - रोगट झाडे काढून नष्ट करावीत. रस शोषणाऱ्या किडीसाठी आंतरप्रवाही कीडनाशक डायमेथोएट १० मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रीड ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

भुरी रोग

  • हा रोग ईरिसीफी सिचोरासीयारम या बुरशीमुळे होतो.
  • पानावर पांढरे डाग दिसतात व ते पसरत जाऊन संपूर्ण पानावर व झाडावर पांढरी पावडर पसरल्यासारखी दिसते. पाने पिवळी पडतात.

नियंत्रणासाठी - ८०% पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम किंवा डिनोकॅप १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने १५ दिवसांनी करावी.

भेंडीवरील शेंडे व फळे पोखरणारी अळी

  • इरियास विटेल्ला या किडीच्या माद्या पानाच्या बेचक्यात वाढणाऱ्या अंकुरावर, फुलावर व फळावर अंडी घालतात. या किडीची अळी कोवळ्या शेंड्यात शिरून फांद्या व खोड पोखरते. नंतर फळे आल्यावर फळे पोखरून त्यावर उपजीविका करते.
  • फळांची वाढ होत नाही.
  • नियंत्रणासाठी -
  • किडकी फळे मातीत पुरावीत.
  • डेल्टामेथ्रीन ५ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ३ मि. लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • जैविक कीड नियंत्रणाकरिता ट्रायकोकार्ड १० प्रति हेक्टरी वापरावे.

वांगे

वांग्यामधील बोकड्या किंवा पर्णगुच्छ : 
हा रोग अतिसूक्ष्म मायकोप्लाझ्मामुळे होतो.

  • रोगाचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो.
  • पानाची वाढ खुंटते. पाने लहान राहून खुरटल्यासारखी दिसतात.
  • नियंत्रणासाठी - इमिडाक्लोप्रिड ४ मि.लि. किंवा कार्बोसल्फान १० मिलि मि.लि.आणि १० ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. गरजेनुसार पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने घ्यावी.

शेंडे पोखरणारी अळी

  • लुसिनोड्स ओर्बोनालिस ही अळी प्रथमत: कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. नंतर फळे आल्यावर फळात शिरून आतील भाग खाते.
  • नियंत्रणासाठी - किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. सायपरमेथ्रीन ५ मि.लि.किंवा कार्बोसल्फॉन १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

कांदा

कांद्यावरील करपा

  • हा रोग अल्टरनेरिया पोरी बुरशीमुळे होतो.
  • पानावर खोलगट लांबट पांढरे चट्टे पडतात व चट्ट्याचा मधला भाग जांभळट दिसतो, त्यामुळे पाने जळाल्यासारखी दिसतात.

फुलकिडे - ही पिवळसर तपकिरी रंगाची कीड आहे. पानाच्या गाभ्यात राहून रस शोषण करते. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडतात व पाती वाकड्या होतात. तसेच या कीटकामुळे पानावर झालेल्या इजांमधून करपा रोगाचे बिजाणू जाऊन करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.
नियंत्रणासाठी - कांद्यावरील करपा व फुलकिडे यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी, ३० ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ग्रॅम कार्बेन्डाझीम हे बुरशीनाशक व प्रोफेनोफॉस १० मि.लि. किंवा फिप्रोनील १० मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन १ मि.लि. यांपैकी एक आणि चिकट द्रव्य १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. पुढील फवारण्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून कराव्यात. 

संपर्क - डॉ. राजेश राठोड, ७७७३९५२३०७ 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate