मृग बहरात किडी व रोगांचा जास्त प्रादुर्भाव असतो, त्यामुळे व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. हस्त बहर पावसाळ्याच्या शेवटी येत असल्यामुळे बऱ्याच बागांना पुरेसा ताण बसत नाही. त्यामुळे अलीकडे शेतकऱ्यांचा कल हा आंबिया बहराकडे आहे. या बहरात बागेचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
डाळिंब पिकामध्ये कोणताही बहर घ्यावयाचा असेल तर ताण देणे आवश्यक असते. ताण देणे म्हणजेच फळ काढणीनंतर, कमजोर झाडांना विश्रांती देणे. या विश्रांती दरम्यान झाडातील उत्पादक फांद्यांमध्ये अन्नद्रव्यांचे संचयन केले जाते. या संचयनाचा शाखीय वाढीतून ऱ्हास थांबावा म्हणून पाणी अंशतः बंद केले जाते; म्हणजेच बहरानुसार झाड जगविण्याइतकेच पाणी झाडांना पुरविले जाते. हा ताण फळ काढणीनंतर चार महिने इतका असावा, म्हणजे पुढील बहरात योग्य वेळी योग्य छाटणी केल्यास फुलधारणा चांगली होते.
छाटणीचे नियोजन
- आंबिया बहर विचारात घेता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी पूर्ण करावी. बागेची छाटणी धारदार निर्जंतुक कात्रीने करून घ्यावी.
- प्रत्येक झाडाच्या छाटणीनंतर कात्री सोडिअम, हायपोक्लोराईडच्या 2.5 मि.लि. प्रति लिटर या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घ्यावी.
- छाटणी करताना झाडांचा आकार, फांद्यांची घनता विचारात घेऊनच छाटणी करावी.
- पेन्सिल व रिफीलच्या आकाराच्या फांद्या तशाच ठेवून उपफांद्यांचे शेंडे छाटावेत.
- मुख्य खोड तसेच फांदीवरील एक ते दोन इंच लांबीचे एकेरी काटे व साटेफाटे काढून टाकाव्यात.
- छाटणीसाठी रोगट, तेलकट रोगग्रस्त बाग छाटून आलेले मजूर किंवा कात्री निरोगी बागेत वापरू नयेत.
- छाटणी झाल्यानंतर सर्व कचरा लगेचच उचलून बागेच्या बाहेर नेऊन जाळावा.
- छाटणी झालेल्या प्रत्येक फांदीवर छाटलेल्या जागी दहा टक्के बोर्डेक्सची पेस्ट लावावी.
- पानगळ करून घ्यावी.
- आडवी आणि उभी अशा दोन फणाच्या व एक कुळवाची पाळी करावी.
- फवारणीनंतर साधारणतः पाच ते आठ दिवसांत पानगळ होते.
- पानगळ पूर्ण झाल्यावर झाडाजवळची पडलेली रोगट पाने, काड्या, फुले गोळ्या करून जाळून टाकावे.
- एक महिन्यानंतर पुन्हा एक कुळवाची पाळी द्यावी.
- ज्या बागांमध्ये वारंवार रस शोषणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव होत असतो. अशा बागांमध्ये आंबिया बहर उशिरा धरू नये.
- खालीलप्रमाणे शिफारस केलेल्या खतांची मात्रा झाडापासून 30 ते 45 सें.मी. अंतरावर वर्तुळाकार माती उकरून त्यात टाकावी.
- यापैकी नत्राचे मात्रा दोन ते तीन टप्प्यांत पहिली मात्रा 21 ते 30 दिवसांच्या अंतराने विभागून द्यावी.
- सूक्ष्म अन्नद्रव्य (जस्त, लोह, मॅग्नेशिअम, बोरॉन) झाडाच्या वयानुसार 25 ते 50 ग्रॅम प्रति झाड याप्रमाणे शेणखतासोबत मिसळून द्यावे. गांडूळ खत अर्धा ते एक किलो प्रति झाड, तसेच निंबोळी पावडर 500 ग्रॅ. प्रति झाड याप्रमाणे द्यावे.
- खते टाकून झाल्यावर लगेचच मातीने झाकून घ्यावी. बागेला हलके पाणी देऊन नियमितपणे ओलिताचे पाणी चालू करावे.
- फळांना चकाकी येण्यासाठी, फळ काढणीच्या एक महिना आधी कॅल्शिअम नायट्रेट 12.5 किलो प्रति हेक्टरी याप्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा ठिबकमधून सोडावे.
- महिन्यातून एकदा खुरपणी करत राहावी, तसेच मुख्य खोडावर आलेली पानफुटवे (वॉटरशूट) काढत राहावीत.
विरळणीचे नियोजन
पूर्ण फुलधारणेनंतर साधारणपणे 35 ते 50 दिवसांत 100 टक्के फलधारणा होते. म्हणून पूर्ण फलधारणा झाल्यावर फळांची विरळणी करावी. फळांची विरळणी करताना कीडग्रस्त, रोगग्रस्त, विकृत झालेली फळे काढून टाकावीत. फळांच्या एकाच गुच्छामध्ये फळे काढताना लहान आकाराची फळे काढावीत. पूर्ण फलधारणा झाल्यानंतर येणारी फुले काढत राहावीत.
पाण्याचे व्यवस्थापन
आंबिया बहराचा कालावधी पूर्ण उन्हाळ्यात येत असल्याने पाण्याचे नियोजन व ठिबक संचाची देखभाल या बाबी विचारात घेणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिफारस केलेल्या मात्रेनुसार पाणी द्यावे.
- ठिबक सिंचन संयंत्रातील स्क्रीन/ सॅंड फिल्टरची वेळोवेळी योग्य पद्धतीने स्वच्छता करून घ्यावी.
- उपनलिकेची (लॅटरल) एन्डकॅप काढून थोडे पाणी वाया घालवून त्यातील माती, कचरा पाण्याच्या दाबाने काढून स्वच्छ करून घ्यावी.
- महिन्यातून एकदा बागेतील सर्व ड्रीपर्स तपासून पाहावेत. बंद झालेले ड्रीपर्स लगेच बदलून घ्यावेत.
- सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की उन्हाळा सुरू झाल्यावर ससे, कुत्री, उंदीर यांसारखे प्राणी लॅटरल किंवा मायक्रोट्यूब कुरतडून ठेवतात. तसेच काही ठिकाणी ओल्या जागेतील माती उकरून ठिकठिकाणी झाडाभोवती खड्डे करून ठेवतात. त्यामुळे झाडाला योग्य पाणीपुरवठा होत नाही. खड्डे असलेल्या जागी झाडांची मुळे उघडी पडून पाणी साचते. मग अशा ठिकाणी "मर' रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्याकरिता या प्राण्यांचा बागेतील वावर थांबवावा.
- मार्च ते जून महिन्यादरम्यान जर पाण्याचा पुरवठा जास्त केला गेला, तर फळे फुटण्याची दाट शक्यता असते म्हणून पाण्याचा संतुलित पुरवठा करावा.
संपर्क - 0217-2374262
(लेखक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत:अग्रोवन