शेती व हवामान यांच्या परस्पर संबंधांचे शास्त्र. हवामानाच्या शेतीवर परिणाम होतो ही गोष्ट मानवाला पुरातन काळापासून माहीत असली, तरी ह्यासंबंधी पद्धतशीर संशोधन काही प्रगत देशांतून विसाव्या शतकाच्या आरंभालाच सुरू झाले आहे. वनस्पती जमिनीवर व जमिनीपासून काही विशिष्ट उंचीपर्यंतच्या थरातील वातावरणात वाढतात. त्यामुळे जमीन किंवा शेते आणि त्यांवरील पिकांच्या अगर झाडांच्या उंचीपर्यंतचे वातावरण ह्यांचा सूक्ष्म अभ्यास होणे जरूर असते. पिकांच्या उंचीपर्यंतच्या छोट्याशा थरातील वातावरण व त्या थराच्यावरील विस्तीर्ण वातावरण ह्यांत हवामान दृष्ट्या बराच फरक असतो. हा फरक जमिनीची परिस्थिती व तीवरील वनस्पती ह्यांवर अवलंबून असतो. जमिनीत बी पेरल्यापासून तो धान्याची कापणी, मळणी होईपर्यंतच्या कृषिकार्यांतील प्रत्येक अवस्थेत हवामानाचा पिकांवर परिणाम होत असतो. अवेळी होणारी अतिवृष्टी, पावसात पडणारे दीर्घ मुदतीचे खंड, अतिप्रखर अगर अतिशीत तापमान वगैरेंचा पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन शेतीचे उत्पन्न घटण्याची शक्यता असते. ह्या प्रत्यक्ष संबंधांशिवाय हवामानाचा शेतीच्या मशागतीवरही परिणाम होतो. अतिवृष्टीमुळे शेतांची किंवा पिकांची मशागत करता येत नाही, गवत वाढते व त्यामुळे पिके नीट वाढत नाहीत. साधारणपणे असे म्हणता येईल की, पिकांच्या उत्पन्नापैकी ५० टक्के उत्पन्न खते, पिकांच्या जाती व मशागत यांवर, तर बाकीचे ५० टक्के उत्पन्न हवामानावर अवलंबून असते. पिकांच्या वाढीच्या काळात त्यांना किती व केव्हा पाणी द्यावे लागेल, पिकांवर पडणारी कीड व रोग यांच्या वाढीला व नियंत्रणाला अनुकूल असे हवामान कोणते आणि शेतीबरोबरच शेतीला उपयुक्त अशी जनावरे, फळबागा, वने ह्यांवर हवामानाचे काय परिणाम होतात, ह्यांसारख्या प्रश्नांचा अभ्यास आणि संशोधन ह्यांचाही या शास्त्रात समावेश होतो. तसेच अन्नधान्ये, फुले, फळे, कापड, सूत, कातडे, लाकूड यांसारखे सामान जहाजातून नेताना तेथील साठवणीच्या तळघरात हवामान परिस्थिती कशी असावी त्याचाही अभ्यास या शास्त्रात होतो.
भारतात ह्या विषयाचे संशोधन इ. स. १९३२ पासून सुरू झाले. भारतीय वातावरणविज्ञान खात्यात कृषी वातावरणविज्ञान नावाचा एक मोठा स्वतंत्र विभाग आहे. ह्या विभागात पिकांना वेळोवेळी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण, जमिनीपासून पिकांच्या उंचीपर्यंतच्या वातावरणाच्या विविध थरांचे गुणधर्म, जमिनीचे तापमान, जमिनीचा ओलावा; हवेतून, जमिनीतून व वनस्पतींतून होणारे बाष्पीभवन वगैरेंची निरीक्षणे आणि अभ्यास केला जातो. देशात कृषी वातावरणवैज्ञानिक वेधशाळा स्थापन करणे आणि हवामान व पिके यांच्यातील संबंधाचे एका प्रमाणभूत व विशिष्ट पद्धतीने संशोधन करणे, ही कामे या विभागाकडे सोपविलेली आहेत. भारत ह्या कार्यात जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेशी संलग्न आहे. या संघटनेच्या कृषी वातावरणवैज्ञानिक आयोगामार्फत कृषी वातावरणविज्ञानविषयक माहितीची आंतरराष्ट्रीय देवघेव केली जाते. हा आयोग कृषिविज्ञानातील प्रश्नांमध्ये वापरावयाच्या वातावरण वैज्ञानिक पद्धती, तंत्रे व प्रक्रिया यांचे प्रमाणीकरण करण्याचे कार्य करतो.
वातावरणातील बदल हे केव्हाही नियमित, मोजके किंवा सहज वर्तविता येणारे नसतात. कोणत्याही वर्षात हे बदल अनियमितपणे, कमी अधिक प्रमाणात आणि अवेळी घडून आलेले आढळतात. कधी पावसाळ्याची सुरूवात अपेक्षेपेक्षा लवकर होते, तर काही वर्षी अतिवृष्टी होते. केव्हा केव्हा पाऊस अवेळी पडतो, तर कधी तो पडतच नाही. तेव्हा सर्वसाधारण हवामानाबरोबरच वरील प्रकारच्या अनियमित आणि अनिश्चित हवामानाचाही अभ्यास करणे इष्ट आहे.
शेतीच्या दृष्टीने अनिश्चित हवामानाचे खालील प्रकार आहेत : (१) अतिवृष्टी व पूर, (२) अवर्षणे व अल्पवृष्टी, (३) अवेळी पाऊस, (४) शीत तापमान व हिमतुषार (तुहिन), (५) प्रखर तापमान, (६) धुळीची वादळे, सोसाट्याचे वारे, चक्री वादळे, गारांचा पाऊस, तडित्-प्रहार वगैरे. या प्रकारांचे विवेचन खाली थोडक्यात दिले आहे.
पावसाचे मुख्य उपयोग म्हणजे जमिनीला ओलावा देणे, हवेचे तापमान कमी करणे, आर्द्रता वाढविणे, पिकांना पाणी पुरविणे, जमिनीतून व जलाशयांतील पाण्याच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन आणि वनस्पतींद्वारे होणारे बाष्पोत्सर्जन कमी करणे, हे होत. ‘पर्जन्यात् अन्नसंभवः’ ह्या उक्तीप्रमाणे शेतीच्या दृष्टीने हवामानाच्या अनेक आविष्कारांत पावसाचा पहिला क्रमांक लागतो. जिराईत पिके तर निव्वळ पावसावरच वाढतात. बागाईत पिकांना साठवलेल्या पावसाच्या पाण्याचा उपयोग होतो, मग ते पाणी विहिरीचे, तलावाचे, पाटाचे किंवा नदीचे असो. रेताड जमिनीवरील पिकांना नेहमीच बाहेरून पाणी आणून द्यावे लागते.
पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यावर त्यापैकी काही जमिनीच्या पृष्ठभागावरून वाफ होऊन हवेत मिसळते, काही जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते, काही जमिनीत मुरते. थोड्या पाण्याचे वनस्पतींच्या पानांतून बाष्पोत्सर्जन होते आणि उरलेले पाणी जमिनीतून निचरा होऊन जाते. हवेत मिसळलेल्या पाण्याच्या वाफेमुळे हवेची आर्द्रता वाढते आणि बाष्पीभवनाची त्वरा मंदावते. जमिनीतून व वनस्पतींतून होणारे बाष्पीभवन हे सूर्यप्रारण (सूर्यापासून मिळणारी तरंगरूपी ऊर्जा), तापमान, हवेची आर्द्रता आणि वाऱ्यांची गती ह्यांवर अवलंबून असते. उन्हाळ्याच्या कोरड्या व उष्ण हवेत हे बाष्पीभवन प्रतिदिनी ६ ते १२ मिमी. पर्यंत होऊ शकते. गणिताच्या साह्याने सूर्यप्रारण, तापमानादी घटकांवरून बाष्पीभवन किती होईल याचे अंदाज वर्तविण्याचे प्रयत्न अनेक राष्ट्रांत चालू आहेत व ह्याबाबतीत काही ठोकळ अनुमाने उपलब्ध झाली आहेत. त्यांवरून पिकांस पाणी केव्हा व किती द्यावे लागेल हे ठरविले जाते. यासंबंधीचा विचार करताना एकंदर वार्षिक अगर मासिक पाऊस विचारात घेऊन भागत नाही. कारण तो पाऊस एका दिवसात पडेल अगर १५ दिवस थोडा थोडा पडेल. जास्त दिवस थोडा थोडा पडलेला पाऊस शेतीला अधिक उपयोगी पडतो. त्या दृष्टीने विचार करता पर्जन्यमापनासाठी वार्षिक अगर मासिक कालखंड न धरता साप्ताहिक अगर विशिष्ट प्रसंगी त्याहूनही कमी दिवसांची संख्या (उदा., पाच दिवसांची सरासरी) धरणे योग्य ठरते. त्याबरोबरच पावसाचा जोर, त्यात पडणारे खंड, अतिवृष्टी आणि एकसारखा पाऊस ह्यांचाही विचार करावा लागतो; कारण त्यांचा परिणाम शेतीची मशागत, बी रूजणे, पिकांची गाढ, त्यांवर पडणारी कीड व त्यांना होणारे रोग आणि शेवटी शेतीचे उत्पन्न ह्या सर्वांवर होतो. एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साठते, गवत उगवते व त्यामुळे मशागत करता येत नाही. पेरणी झाल्याबरोबर अतिवृष्टी झाली, तर पेरलेले बी वाहून जाते अगर जमिनीत कुजते. सतत पाऊस पडत असताना आभाळ मेघाच्छादित राहिल्यामुळे पिकांना सूर्यप्रकाश मिळत नाही, ती पिवळी पडतात व खुरटतात. हवेत आर्द्रता वाढल्यामुळे व तापमान कमी झाल्यामुळे पिकांवर कीड पडते व ती रोगग्रस्त होतात. पिकांना फुले येण्याच्या वेळी अगर नंतर वृष्टी झाल्यास दाणा भरत नाही अगर भरलेला दाणा काळा पडतो. प्रसंगी तयार दाणे कणसावरच रुजतात. अवर्षण झाल्यास पिकांस द्रवरूपाने जमिनीतून पोषकद्रव्ये मिळत नाहीत. हवा कोरडी होऊन बाष्पीभवन जास्त होते, तापमान वाढते व पिकांची वाढ खुंटते. पेरणीनंतर दीर्घ अवर्षण झाल्यास पुन्हा पेरणी करावी लागते. शेतीची पुष्कळशी कामे पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाळ्याची सुरुवात, अतिवृष्टी, त्यात पडणारे खंड वगैरेंबद्दलची आगाऊ सूचना शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. कृत्रिम रीतीने पाऊस पाडण्याच्या पद्धतींचा ह्या बाबतीत उपयोग होण्याची शक्यता आहे.
बी रूजणे, पिकांची वाढ होणे वगैरे गोष्टी पावसाइतक्याच तापमानावरही अवलंबून असतात. तापमान कमी असल्यास बी रूजण्यास वेळ लागतो व वनस्पतींची वाढही कमी प्रमाणात होते. कोणत्या पिकाला किती तापमान लागते हे पिकाच्या प्रकारावर अवलंबून असते. हिवाळी पिकांना पावसाळी अगर उन्हाळी पिकांपेक्षा कमीच तापमान हवे. हिवाळ्यात तापमान फार खाली म्हणजे हिमांकापर्यंत (पाण्याच्या गोठणबिंदूपर्यंत म्हणजे ०° से. पर्यंत) किंवा त्याच्या जवळपास गेले म्हणजे पिके थंडीने सुकतात व खुरटतात. द्राक्षे, पपई, सफरचंद वगैरेंसारख्या फळझाडांचे आणि फळांचे फारच नुकसान होते. पंजाब, उत्तर प्रदेश व हिमालयाच्या जवळील भागांत हिवाळ्यातील थंडीच्या लाटेमुळे फळबागांचे बरेच नुकसान होते. अशा वेळी थंडीच्या लाटेची आगाऊ सूचना मिळणे आवश्यक असते. झाडांना पाणी देऊन, बागेत धुम्या पेटवून किंवा तीत विमानांच्या पंख्यांनी उष्ण हवा खेळती ठेवून थंडीमुळे पिकांचे व फळझाडांचे होणारे नुकसान टाळता येते. भारतातील शेतकरी अशा स्वरूपाच्या पद्धतींचे अनेकदा अवलंबन करतात.
पाण्याची उपलब्धता, जमिनीचे व त्यावरील हवेचे तापमान आणि त्या तापमानाचा कालावधी पिकांच्या वाढीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. ह्या माहितीवरून कोणत्याही प्रदेशात लावता येणाऱ्या पिकांच्या जाती व प्रकार ठरविता येतात. उसाला साधारणपणे २६º ते ३०º से. तापमान अदमासे ८ महिने लागते, तर भाताला २२º ते २५º से. इतपत तापमान व आर्द्र हवा ४ ते ५ महिने लागते. कापसाला २४º ते २६º से. तापमान लागते आणि त्याच्या संपूर्ण वाढीला १८० ते २०० दिवस लागतात. मक्याला २१º ते २६º से. इतके तापमान लागते आणि पूर्ण पीक १४० ते १६० दिवसांत पदरी पडते. पिके कापणीस आली की, मग त्यांना अधिक तापमान व कोरडी हवा लागते. अशा वातावरणीय मूल घटकांचा विचार केला तर कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, बंगाल हे भाताचे प्रदेश आहेत, तर मध्य प्रदेश, उर्वरित महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश हे ज्वारी, कापूस, गहू वगैरेंचे प्रदेश आहेत, हे स्पष्ट होते. ह्याच गोष्टीमुळे पिकांचीही प्रादेशिक विभागणी झाली आहे. गव्हाला थंड हवा लागत असल्यामुळे तो दक्षिण भारतात फारसा पिकत नाही. सफरचंद, जरदाळू, अलुबुखार वगैरे फळे दक्षिणेस होत नाहीत, तर फणस, नारळ, सुपारी वगैरे उत्तरेकडे पिकत नाहीत.
ज्याप्रमाणे अतिशय थंड हवेने पिकांचे नुकसान होते त्याप्रमाणे अती उष्ण हवेनेही नुकसान होते. जमिनीतून व वनस्पतींच्या पानांतून बाष्पोत्सर्जन फार होते. झाडांस पाण्याची कमतरता भासते, जमिनीचे व हवेचे तापमान वाढल्याने वनस्पती वाळून जातात अगर त्यांची वाढ खुंटते. लहान रोपांच्या बाबतीत हे चांगलेच दिसून येते. जमिनीला पाणी देऊन रोपांवर सावली करून किंवा जमिनीवर पाने पसरून काही अंशी गारवा उत्पन्न करता येतो. दक्षिण भारतात व महाराष्ट्रात मार्च, एप्रिल व मे महिन्यांत आणि तामिळनाडूकडे जुलै-ऑगस्टमध्ये तापमान अत्यधिक प्रमाणात असते. ह्या कालावधीत शेतकी व्यवसायात बहुतेक संपूर्णपणे खंड पडलेला असतो.
दुभत्या जनावरांकडून होणारी दूधनिर्मितीसुद्धा तापमानावर अवलंबून असते. गाई, म्हशी १६º ते २६º से. तापमान असताना इष्टतम दूध देतात. हवेचे तापमान ३०º से. वर आले की दूधनिर्मितीत पावपट घट होते. तापमान ३५ º से. पर्यंत वाढले की दूधनिर्मिती निम्म्यावर येते. यूरोपीय देशांत तापमान ३५º से. च्यावर गेले की जनावरांचे वजन कमी होऊ लागते. त्याचप्रमाणे थंडी वाढली की जनावरे कमी दूध देऊ लागतात.
धुळीची वादळे, सोसाट्याचे वारे, चक्री वादळे वगैरे : धुळीच्या वादळाने शेतात बाहेरील धूळ व रेती येते, जमिनीवर आणि झाडांवर धूलिकणांचा थर बसतो. काही वेळा जमिनीचा कस बाहेरच्या रेतीमुळे बिघडतो. धुळीची वादळे साधारणपणे उन्हाळ्यात होतात. त्यावेळी हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे बाष्पीभवन अधिक होऊन झाडांना अपाय होतो.
सोसाट्याचे वारे जेव्हा अती थंड प्रदेशांवरून येतात तेव्हा हिमतुषार पडण्याचा संभव असतो आणि जेव्हा ते वारे उष्ण प्रदेशांवरून येतात तेव्हा पिके वाळतात. कोरड्या, वेगवान वाऱ्यांमुळे शेतजमिनीतून तेव्हा तसेच वनस्पतींतून बाष्पोत्सर्जन अधिक प्रमाणात होते. जोंधळा, मका, ऊस यांसारखी उंच वाढणारी पिके जमिनीवर लोळतात. उसामधील साखरेचे प्रमाण कमी होते. झाडे उन्मळून पडतात. शेतांभोवती उंच बांध घालून व त्यावर झाडे लावून उग्र वार्यापासून शेताचे संरक्षण करता येते. चक्री वादळे भारताच्या निकटवर्ती समुद्रात पावसाळ्याच्या सुरुवातीस आणि पावसाळ्याच्या अखेरीस निर्माण होतात. किनारपट्टीवर त्यांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर जाणवतो. किनारा ओलांडून ही वादळे जमिनीवर आली की, त्यांपासून पिकांचे आणि मालमत्तेचे अतोनात नुकसान होते. प्रसंगविशेषी प्राणहानीही होते. वादळाबरोबर सोसाट्याचा वारा, वीज व अतिवृष्टी यांसारखे आविष्कार येतात. त्यामुळे झाडे मोडतात, शेतातील पीक जमीनदोस्त होते, तसेच खळ्यामधील धान्य उडून जाते अगर भिजते. वीज पडल्याने झाडे जळतात व प्रसंगी प्राणहानीही होते. गारांच्या वृष्टीने शेतीचे व फलझाडांचे नुकसान होते. पिके कापणीवर आली असताना वरील घटनांबद्दल आगाऊ सूचना मिळाली, तर धान्याची अगोदर कापणी करून व पिके सुरक्षित ठिकाणी ठेवून संभाव्य नुकसान टाळता येते.
सूर्यप्रारणामुळे वनस्पतींत प्रकाशसंश्लेषण (प्रकाशीय ऊर्जेच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड व पाणी यांच्यापासून साधी कार्बोहायड्रेट तयार होण्याची क्रिया) होते. वनस्पतींच्या वाढीला ते अत्यावश्यक असते. सूर्यापासून येणारे लंब अगर तिरपे किरण, आकाशाची निरभ्रता व दिनमान ह्यांवर सूर्यप्रारण ऊर्जा अवलंबून असते. जमिनीच्या व तिच्या नजीकच्या हवेच्या तापमानावर सूर्यप्रारणाचा परिणाम होतो. उन्हाळ्यात जेव्हा वारा नसतो तेव्हा प्रारणामुळे जमिनीचे तापमान बरेच वाढते. बाष्पीभवन अधिक प्रमाणात होते व पिके करपतात. आकाश अभ्राच्छदित असते तेव्हा पिकांना प्रारण कमी मिळते, ती पिवळी पडतात, त्यांची वाढ खुंटते व त्यांवर कीड व रोगजंतू येऊन धाड घालतात. पिके फुलांवर येतात तेव्हाही ढगाळ आभाळ हानिकारक ठरते. जेव्हा जमिनीचे तापमान अधिक होते तेव्हा शेतात पांढरा पदार्थ (उदा. टाकाऊ कापूस, राख, उसाची चिपाडे वगैरे) पसरून ते तापमान कमी करता येते. जमिनीतील ओलावाही अधिक काळ टिकून राहतो. हिवाळ्यात जेव्हा जमिनीचे तापमान कमी असते तेव्हा काळ्या रंगाचे पदार्थ जमिनीवर पसरून ते थोडेसे वाढविता येते. उन्हाळ्यात जमिनीला पाणी देऊन तिचे तापमान कमी करता येते. हिवाळ्यात पाणी दिल्यास जमीन फारशी थंड होत नाही. अर्थात हा परिणाम जमीन जोपर्यंत ओली राहील तोपर्यंतच टिकतो.
निरनिराळ्या हवामानांचे पिकावर होणारे विशिष्ट परिणाम : पिके निरनिराळ्या ठिकाणी व निरनिराळ्या हवामानांत तेथील परिस्थितीशी जुळते घेऊन वाढतात. त्यामुळे सर्वच ठिकाणी लागू पडेल असा हवामानासंबंधी एखादा निष्कर्ष काढणे कठीण असते. उदा., पंजाबमध्ये गहू सहा महिन्यांनी तयार होतो, तर महाराष्ट्रात त्याला साडेतीन महिने पुरतात. जे हवामान हिवाळी पिकांना चांगले असते ते पावसाळी पिकांना वाईट असते. ह्या कारणांमुळे हवामानाच्या दृष्टीने प्रत्येक प्रदेशासाठी प्रत्येक पिकाचा स्वतंत्र अभ्यास होणे जरूर आहे. विशेषतः भारतासारख्या अत्यंत मोठ्या देशात दक्षिण व उत्तर भागात हवामानातील फरक चांगलेच जाणवतात. तेथे अशा संशोधनाची फार जरूरी असून अनेक ठिकाणी असे संशोधनही चालू आहे.
विशिष्ट तापमानात बी ठेवून, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून तज्जन्य वनस्पतींची वाढ थांबविणे, जलद करणे, त्यांना लवकर किंवा उशिरा फुलावर आणणे वगैरे प्रयोगही भारतात काही ठिकाणी चालू आहेत.
बटाट्याचे रोप जेव्हा दोन महिन्यांचे असते त्यावेळी जर तापमान ५º से. च्यावर आणि आर्द्रता ७५ टक्क्यांच्यावर असेल, तर बटाट्याला करपा रोग जडतो. तसेच हिवाळ्यात मळभ, धुके व आर्द्र हवा यांमुळे गव्हाला तांबेरा रोग पछाडतो. पावसाळ्यात ढगाळ हवेमुळे पिकांना कीड लागते.
जंगलात अधिक तापमान, कमी आर्द्रता आणि द्रुतगती वारे आग पसरविण्यास कारणीभूत होतात. तसेच जंगलात २२º ते २८º से. तापमान व ८० टक्के अगर अधिक आर्द्रता असल्यास झाडावर कीड पडण्यास अनुकूल वातावरण निर्माण होते. त्याविरुद्ध प्रतिबंधक उपाय योजणे सोपे व्हावे म्हणून संबंधित खात्यांना हवामानाच्या आगाऊ सूचना मिळणे अगत्याचे ठरते.
हल्ली बऱ्याच ठिकाणी कीड व रोगप्रतिबंधक उपाय म्हणून कमी उंचीवरून उडणार्या विमानातून शेतांवर जंतुनाशक औषधे फवारली जातात. त्यासाठी वैमानिकाला त्यावेळच्या वाऱ्यांची गती आणि दिशा, तापमान व दृश्यमानात यासंबंधी अंदाज देऊन मार्गदर्शन करणे आवश्यक असते. साधारणपणे हवाई फवारणीसाठी सकाळ, संध्याकाळ किंवा रात्रीची वेळ सोईची असते. विमानाच्या सुरक्षिततेसाठी वैमानिकाला शेतावरील अगर जंगलावरील धुक्याबद्दलचीही आगाऊ माहिती देणे आवश्यक असते.
कृषी वातावरणविज्ञानात सर्व पिकांना सर्वत्र लागू पडतील असे व्यापक स्वरूपाचे नियम ठरविणे अशक्य असते. प्रत्येक पिकाचे हवामानाशी वेगळ्या स्वरूपाचे संबंध असतात. त्यामुळे प्रत्येक पिकाच्या बाबतीत स्वतंत्रपणे संशोधन करावे लागते.
संदर्भ : 1. Geiger, R. The Climate Near the Ground, Harvard,1950.
2. Vitkevich, V. I. Agricultural Meteorology, Moscow, 1960.
3. Wang, Jen-Yu, Agricultural Meteorology, Milwaukee, 1963.
लेखक : कृ. म. गद्रे
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/5/2020