एखाद्या व्यक्तीवर वीज कोसळल्यास एक सेंकदापेक्षा कमी वेळात ती जमिनीत वाहून जाते. वीज मानवी शरीरात साठून राहू शकत नाही. त्यामुळे वीज कोसळलेल्या व्यक्तीला स्पर्श केल्याने आपल्याला शॉक मुळीच बसत नाही. वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण साधारणत: सहा जखमींमागे एक असे आढळते. भारतात वीज कोसळल्यानंतर वेळेवर कृत्रिम श्र्वासोच्छ्वास न मिळणे, हे मृत्यूंची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण आहे.
वीज कोसळल्यानंतर बहुतेकदा व्यक्तीचे हृदय आणि परिणामी श्वासोच्छ्वास बंद पडतो; मात्र, व्यक्ती जिवंत असते. ताबडतोब कृत्रिम श्वासोच्छ्वास दिल्यास व्यक्ती वाचू शकते. बहुतेक वेळा श्वास बंद झाल्यामुळे व्यक्ती मृत झाली, असा गैरसमज होतो. पुढील प्रथमोपचार विशेषतः कृत्रिम श्वासोच्छ्वास त्या व्यक्तीला दिला जात नाही. परिणामी साधारणत: एक तासाच्या कालावधीमध्ये मेंदूचे कार्य बंद पडते. विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींनादेखील मृत समजून अनेकदा रुग्णालयात नेण्यास उशीर होतो. म्हणून वीज कोसळलेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात नेणे व आवश्यकता असल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे, या दोन मुख्य गोष्टी केल्यास, त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.
ग्रामीण भागामध्ये विजा कोसळण्याचे प्रमाण अधिक असून, वैद्यकीय सोयी तुलनेने अत्यंत कमी आहेत. त्यामुळे वीज कोसळल्याने व विजेचा धक्का बसल्यानंतरचे प्रथमोपचार, तसेच कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचे प्रशिक्षण अत्यंत गरजेचे आहे. असे प्रशिक्षण नागरी संरक्षण दल, रेडक्रॉससारख्या अनेक सेवाभावी संस्थांमार्फत दिले जाते.
कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यावा याची माहिती पुढे देत आहे. मात्र योग्य प्रशिक्षित व्यक्तीकडून त्याचे प्रशिक्षण घ्यावे. अर्धवट माहितीवर आधारित प्रयोग करणे रुग्णांच्या दृष्टीने धोक्याचे ठरते.
1) वीज कोसळलेल्या व्यक्तीस सर्वप्रथम नजीकच्या सुरक्षित निवाऱ्याच्या जागी नेऊन पाठीवर झोपवावे. व्यक्तीला मोकळेपणाने श्र्वास घेता येण्यासाठी आसपासची बघ्यांची गर्दी प्रथम दूर करावी. हवेचा मार्ग मोकळा करावा.
2) वीज कोसळलेली बाधित व्यक्ती श्र्वास घेत आहे का, हे पुढील तीन पद्धतींनी तपासावे.
अ) त्या व्यक्तीच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून त्या व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करावा. व्यक्ती काही बोलते आहे का, ते पाहावे.
ब) त्या व्यक्तीच्या छातीशी कान नेऊन छातीची धडधड ऐकू येते का, ते ऐकावे.
क) त्या व्यक्तीच्या नाकाजवळ बोटे नेऊन ती व्यक्ती श्वास घेते आहे का, ही संवेदना तपासावी.
3) व्यक्ती बोलत असल्यास, श्र्वास घेत असल्यास किंवा बेशुद्ध असल्यास तातडीने त्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जावे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाण्या-पिण्यास काहीही देऊ नये.
4) मात्र, वरील तीन (अ,ब,क) तपासणीत व्यक्तीचा श्वासोच्छ्वास थांबल्याची खात्री झाल्यास, वीज कोसळलेल्या बाधित व्यक्तीची परिस्थिती पाहून, कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा प्रथमोपचार देण्याची आवश्यकता आहे, हे निश्चित करावे.
5) सर्वप्रथम मदत करणाऱ्या व्यक्तीने भावनाविवश होऊ नये. कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यास तटस्थपणा, धैर्य व एकाग्रतेची आवश्यकता असते.
6) कृत्रिम श्वासोच्छ्वास देणाऱ्या व्यक्तीने दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवून बसावे. गुडघ्यामध्ये थोडी जागादेखील ठेवावी.
7) वीज कोसळल्याने बाधित व्यक्तीची पाठ गुडघ्यांवर टेकवत बाधित व्यक्तीला थोडे तिरपे करावे. गळ्याभोवतालचे (टाय इ.) कपडे सैल करावेत.
8) त्यानंतर बाधित व्यक्तीचे तोंड उघडून बोटे फिरवून तोंडात काही नाही ना, याची खात्री करावी. च्युइंगगम, पान वगैरे काही असल्यास ते बोटांनी सर्व काढून टाकावे. दातांची कवळी असल्यास तीदेखील काढून ठेवावी. जीभ पटकन तोंडाबाहेर ओढून घ्यावी. मुखाचा मार्ग मोकळा करावा. मान एका बाजूस वळवावी.
9) प्रथम आपला श्र्वास पूर्णपणे भरून घ्यावा. बाधित व्यक्तीची मान थोडी वर उचलत तिरपी करावी. नंतर हाताने त्याच्या नाकपुड्या चिमटीत पकडून बंद कराव्यात. आपल्या मुखावाटे बाधित व्यक्तीच्या मुखामध्ये जोरात फुंकर मारत श्र्वास सोडावा. असे दोन वेळा करावे. असा श्र्वास दोनदा सोडल्याने बाधित व्यक्तीची छाती फुगलेली दिसेल.
10) छाती फुगल्यानंतर पंपिंगची क्रिया करावयाची असते. पंपिंग म्हणजे छातीच्या मध्यभागी हाताच्या तळव्यांच्या टाचेने दाब देणे. यासाठी दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवून हाताच्या तळव्यांच्या टाचेने दाब देणे, यासाठी दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवून हाताच्या टाचेने दाब द्यायचा आहे. हाताची बोटे अडकविताना एका हाताच्या वर मागील बाजूने दूसरा हात अडकवावा, यामुळे एका मागे एक, मात्र एकमेकांवर हाताचे तळवे येतील.
11) बाधित व्यक्तीच्या छातीच्या मध्यावर (दोन्ही स्तनाग्रांना जोडणाऱ्या आभासी रेषेच्या मध्य बिंदूवर) आपल्या हाताच्या तळव्यांनी पंपिंगची क्रिया करावी. दाब देताना एक ते तीसपर्यंत अंक मोजत लाटेप्रमाणे हे पंपिंग करावयाचे आहे.
12) तीस मोजून झाल्यानंतर पुन्हा दोन वेळा आपला श्र्वास बाधित व्यक्तीच्या मुखातून सोडून त्याची छाती हवेने भरावी. पुन्हा एक ते तीस अंक मोजत दाब देण्याची पंपिंग क्रिया करावी.
13) मुखातून दोन वेळा श्र्वास देणे आणि तीस वेळा दाब देणे, ही संपूर्ण क्रिया एका मिनिटात एकंदर तीन वेळा इतक्या वेगाने पूर्ण व्हायला हवी. बाधित व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू झाल्यानंतर मात्र ही क्रिया थांबवावी. तातडीने अशा व्यक्तीला रुग्णालयात न्यावे.
14) बाधित व्यक्तीच्या बरगड्याच्या स्नायूचा वापर करून कृत्रिम श्वासोच्छ्वासची दुसरी ‘होल्डर नेल्सन’ पद्धतदेखील आहे. यात बाधित व्यक्तीला पोटावर झोपवितात व डोके एका कुशीवर करून बाधित व्यक्तीच्या बरगड्या पाठीमागून दाब देतात. नंतर बाधित व्यक्तीच्या हाताचे कोपरे वर करतात. पुन्हा कोपरे खाली करतात. परत आपले हात बरगड्यांवर ठेवून दाब देतात. श्वासोच्छ्वास सुरू होईपर्यंत ही क्रिया पुन्हा-पुन्हा करतात. मात्र, त्यासाठीदेखील योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे.
स्त्रोत: अग्रोवन:
अंतिम सुधारित : 10/7/2020
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...