विंचू स्वतःची घरटी (बिळे) ही एकाच वेळी प्रचंड उन्हाळा आणि प्रचंड थंडी दोन्ही प्रकारच्या तापमानामध्ये अधिक सुसह्य वातावरण ठेवणारी बनवत असल्याचे इस्रायली संशोधकांना आढळले आहे. चांगल्या वास्तुरचनाकाराप्रमाणे (आर्किटेक्ट) विंचवाच्या घरट्याचे आरेखन असून, विंचवाच्या शरीरासाठी आवश्यक उष्णता आणि योग्य वेळी थंड, आर्द्रतायुक्त वातावरण या घरट्यामध्ये उपलब्ध होते. हे संशोधन मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये ४ जुलै रोजी झालेल्या ‘सोसायटी फॉर एक्सपेरिमेंटल बायोलॉजी’ यांच्या वार्षिक बैठकीमध्ये मांडण्यात आले होते.
नेगेव्ह येथील बेन गुरियन विद्यापीठातील संशोधक डॉ. अमांडा ऍडम्स हे नेगेव्ह येथील वाळवंटी प्रदेशामध्ये जंगली लांब नांगीच्या विंचवाचा (Scorpio maurus palmatus) अभ्यास करत होते. त्यांनी काही विंचू पकडल्यानंतर त्यांच्या घरट्यांची मापे घेण्यासाठी वितळलेल्या ॲल्युमिनिअमच्या साह्याने घरट्याचे साचे तयार केले. त्या साच्यावरून तयार केलेल्या घरट्याचा अभ्यास थ्री डी स्कॅनरच्या साह्याने केला. त्या वेळी विंचवाची घरटी म्हणजे वाळूतील केवळ खड्डे नसून, व्यवस्थितपणे तापमानांचा विचार करून केलेले आरेखन असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.
प्रत्येक घरट्याची सुरवात एका लहान, उभ्या अशा प्रवेशद्वाराने होते. काही सेंटीमीटर खाली गेल्यानंतर आडव्या प्लॅटफॉर्ममध्ये त्याचे रूपांतर होते. हा भाग सूर्यप्रकाश आतपर्यंत येत असल्याने उष्ण असतो. येथे संध्याकाळी शिकारीसाठी बाहेर पडण्यापूर्वी शरीराचे तापमान वाढविण्यासाठी सुरक्षितपणे बसता येते. विंचू हे थंड रक्ताचे असल्याने शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी पर्यावरणावर अवलंबून असतात. त्यानंतर छिद्र एकदम खोलवर जाऊन शेवटच्या टोकाच्या भागात जाते. तिथे अत्यंत थंड आणि आर्द्रतायुक्त वातावरण असते. त्या ठिकाणी दिवसाच्या उष्ण वेळी विंचू विश्रांती घेतो, त्यामुळे त्याच्या शरीरातील पाणी वाचवले जाते.
स्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
महाराष्ट्रात विंचवाचे दोन प्रकार आढळतात - काळा विं...
विंचवाला जिवंत जीवाष्म समजले जाते कारण गेल्या ४०० ...