टेंबुर्णी हा सदाहरित वृक्ष एबेनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायोस्पायरॉस एंब्रियॉप्टेरिस आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया येथील आहे, असे मानतात. डा. पेरेठीना या शास्त्रीय नावानेही तो वृक्ष ओळखला जातो. भारतात तो सर्वत्र आढळतो. खाडीजवळ, तसेच नदी-नाल्याच्या पात्रात हा मध्यम उंचीचा वृक्ष वाढलेला दिसतो टेंबुर्णीचा वृक्ष सु. १० मी. उंच वाढतो. त्याची वाढ सावकाश होते. काही ठिकाणी तो सु. ३५ मी.पर्यंत वाढलेला असून त्याचा घेर सु. २ मी.पर्यंत असल्याचे आढळले आहे. खोडाची साल करडी काळी व गुळगुळीत असते. सालीचे तुकडे होऊन ते गळून पडतात. पाने साधी, मोठी, लांब व चकचकीत असून ती लहान देठाची, एकाआड एक, चिवट व भिन्न आकारांची असतात. फुले एकलिंगी, पांढरी व सुवासिक असतात. नरफुले तीन ते पाचच्या झुबक्यात फांद्यांच्या टोकाला तर मादीफुले एकेकटी येतात. फळ मृदू, मांसल, गोलसर व पिकल्यावर तांबूस-पिवळे होते. त्यात चवळीच्या आकाराच्या पाच ते आठ बिया असतात.
आयुर्वेदामध्ये साल व फळ यांच्या औषधी गुणांचा उल्लेख आहे. साल व फळ स्तंभक आहे. फळे तुरट व थंड असून त्यांचा गर वात व मूत्रदाहावर गुणकारी आहे. बियांचे तेल आमांशावर उपयुक्त आहे. पानांपासून विड्या तयार करतात. टेमरू (तेंडू) व टेंबुर्णी या जातींचे अनेक उपयोग सारखेच आहेत.
लेखक : किशोर कुलकर्णी
स्त्रोत : कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020