जमिनीचा पोत हा शेतीचा मुख्य पाया आहे. पोत चांगला असला तरच उत्पादन चांगले मिळते. मात्र अधिक उत्पादनवाढीच्या आशेने अनेक शेतकरी खताचा बेसुमार वापर करतात. त्यामुळे जमिनीच्या पोतावर परिणाम होत असून जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढत आहे. तसेच पाण्याचा अतिरिक्त वापरही जमिनी क्षारपड करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
याबाबत राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझरने (आरसीएफ) सर्वेक्षण केले असून, त्यात मराठवाड्यातील 12 जिल्ह्यांमध्ये मातीची तपासणी करण्यात आली होती. त्यात मराठवाड्यातील 70 गावांत खारवट जमीन व 60 गावांत क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. या सर्वेक्षणाची गेल्या काही वर्षांतील माती तपासणीशी तुलना केली असता जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. तसेच पिकासाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण खूप कमी होत असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायझरच्या (आरसीएफ) नगर, कोल्हापूर, मुंबई व नागपूर या चार ठिकाणी विभागीय माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमार्फत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे मोफत परीक्षण केले जाते. त्यातील नगर विभागात नगरसह बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, नंदुरबार, धुळे हे बारा जिल्हे येतात.
या बारा जिल्ह्यांतील 55 तालुक्यांत असणाऱ्या गावातील मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी माती घेताना पीक काढल्यानंतर शेतात शेणखत अथवा रासायनिक खत टाकण्यापूर्वी घेतली जाते. एका गावातील चार दिशांतील प्रातिनिधिक नमुने घेऊन तिची तपासणी केली. सलग तीन वर्षे मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली.
2008-09 या वर्षी 14 हजार 250, 2009-10 या वर्षी 14 हजार 700, 2010-11 या वर्षी 14 हजार 60 मातीचे नमुने तपासले. या वर्षी मार्चपासून 6600 नमुने तपासले असून हे परीक्षण येत्या मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या वर्षी आतापर्यंत झालेल्या तपासणीत 70 गावांतील जमिनी अति खारवट तर 60 गावांतील जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाणही अधिक असून सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे आढळले आहे. सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण आवश्यकतेच्या साधारण 45 टक्केच आहे. मातीचा पोत सुधारण्यासाठी व पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संस्था खताच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शन करत आहे.
अलीकडच्या काळात खताच्या किमती वाढत आहेत. त्यांचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी दोन वर्षांतून किमान एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार, जमिनीतील घटकांचा विचार करून पिकांच्या वाढीनुसार खताच्या मात्रा ठरवण्याची गरज आहे. शिवाय 100 टक्के पाण्यात विरघळणारी खते फवारणी किंवा ठिबकमधून द्यावीत. त्यामुळे जमिनीची पोत कायम राहण्यास मदत मिळते. सेंद्रिय पदार्थांचा योग्य वापर केल्यास शेतीसाठी उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढीस लागते असे संस्थेतील तज्ज्ञांनी सांगितले.
शेतकरी केवळ नत्र, स्फुरद, पालाशयुक्त खताचाच वापर करत असल्याचे आढळून येते. मात्र पिकांना जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्याचीही गरज असते. लोह, तांबे, मॅंगेनिज, जस्त, बोरॉन, मॉलिब्डेनम यासारखी अन्नद्रव्ये पिकांना मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होतो. खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न केल्यास त्याची कमतरता भासते. ही कमतरता दूर करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच एकरी दहा ते बारा किलो गंधकाचा वापर करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...