औद्योगीकरणामुळे क्रूड ऑइल आणि अन्य पेट्रोलियम घटकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टाकाऊ घटकांमध्ये या पदार्थांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या पेट्रोलियम घटकांच्या टाकाऊ पदार्थांचे परिसरातील पर्यावरणावर अनेक विपरीत परिणाम होत असतात. तसेच मानवी आरोग्याचे प्रश्नही उद्भवू शकतात.
हे घटक खाऊन परिसराच्या स्वच्छतेत वाढ करणाऱ्या अळिंबीचा शोध लागल्याचा दावा कॅनडा येथील मॉन्टेरियल विद्यापीठातील महम्मद हिजरी यांनी केला आहे. या संशोधनामुळे जमिनीतील मातीचे प्रदूषण कमी करण्यात मदत मिळणार आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या टाकाऊ घटकांमुळे जमिनीच्या प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
या प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी कॅनडामध्ये "प्रदूषित जमिनींची जैविक पद्धतीने सुधारणा' हा प्रकल्प राबविला जात आहे. त्यामध्ये मॉन्टेरियल विद्यापीठ, मॅकगिल विद्यापीठ आणि अनेक संस्थांच्या संशोधकांचा समावेश आहे. प्रदूषण कमी करू शकणाऱ्या संभाव्य अशा अनेक वनस्पती आणि सूक्ष्म जिवांच्या बाबतीत प्रयोग केले जातात. विविध प्रकारच्या जिवाणूंच्या जनुकीय प्रणाली व अन्य घटकांवर संशोधन केले जात आहे.
त्यात विविध वनस्पती आणि सूक्ष्म जिवाच्या साह्याने प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी केलेल्या प्रयोगात पेट्रोलियमचे घटक असलेल्या पेट्री डिशमध्ये अळिंबीचे (स्प्रिंकल मशरूम) स्पोअर्स टाकून दोन आठवडे उबवणीसाठी ठेवले असता पेट्रोलियम आणि त्याचा वास पूर्णपणे नाहीसा झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे अळिंबीचा जमिनीतील क्रूड पेट्रोलियमचे प्रदूषण कमी करण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
वसंत ऋतूमध्ये विलो या रोपांचे कटिंगची लागवड दर 25 सेंटिमीटर अंतरावर केली असता त्याची मुळे चांगल्या प्रकारे पसरून जमिनीतील प्रदूषणासाठी कारणीभूत घटक शोषून घेतात. या कटिंगच्या कांड्या सूक्ष्म जिवाणूंच्या द्रावणात बुडवून लागवड केली जाते.
हंगामाच्या समाप्तीनंतर या रोपाच्या फांद्या आणि पाने जाळली असता जड धातू राखेच्या स्वरूपात वेगळे मिळतात. अशा प्रकारे अति प्रदूषित जमिनीमध्ये काही वेळा हा प्रयोग केल्यावर जमिनीतील प्रदूषण कमी झाल्याचे आढळले आहे.
या प्रकारचा प्रयोग मॉन्टीरियलच्या तेल कंपनीच्या प्रांगणात केली होती. अतिदाट लागवडीनंतर तीन आठवड्यांमध्ये चांगले निष्कर्ष मिळाले आहेत. याबाबत माहिती देताना हिजरी म्हणाले, की निसर्ग त्याचे काम उत्तम प्रकारे करत असतो. विविध प्रकारचे जिवाणू आणि अळिंबी यांच्या वसाहती या परिसरात हिरवळीबरोबरच तयार होतात. त्यातील अधिक उपयुक्त अशा जिवाणूंची ओळख पटल्यास हे कार्य अधिक वेगाने करणे शक्य आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून क...
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमा...
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनी...