অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वानंदला साडी नेसायची आहे

स्वानंदला साडी नेसायची आहे

समलैंगिकतेच्या पलीकडचा एक आयाम आहे तो आहे ट्रान्सजेंडर व्यक्तींचा. मानसिक अवस्था स्त्रीची आणि शरीर पुरुषाचं किंवा याच्याउलट स्थिती असलेल्या व्यक्तींची होणारी कुचंबणा फार गंभीर स्वरूपाची असते आणि त्यातून मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडू शकतं. अशाच एकाची - ’स्वानंद’ची ही कथा. ही कथा कुणाचीही असू शकेल, पण त्यातलं दुःख तेच असेल. ट्रान्सजेंडर व्यक्तींना समजून घेऊन त्यांचा जगण्याचा मार्ग सुकर कसा होईल याविषयीचं विवेचन करणारी ही कथा

भरारी ही संस्था पुण्यामध्ये एचआयव्हीसंक्रमित काम करते, विशेषतः पुरुषांकरता. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काम करणार्‍या किंवा त्यांच्याकडे येणार्‍या बर्‍याच पुरुषांना आपण स्त्री आहोत असं सातत्याने वाटत असतं. पुरुषांच्या शरीरात स्त्रीचं मन अडकलं आहे, अशी यांची भावना असते. त्यामुळे ते त्यांच्या मनाचं समाधान स्त्रीवेश करून, दागदागिने, मेक-अप, इतर सौंदर्य प्रसाधने वापरून व एवढेच नव्हे तर बोलण्यात, चालण्यात स्त्रियांसारखे हावभाव करून स्त्रियांप्रमाणे समाजात उघडपणे वावरत असतात. बरेचदा काहीजण फक्त एकांतात, आपल्या मित्र परिवारात समाजास कळणार नाही याची काळजी घेऊन आपल्या स्त्रीमनाचं समाधान करून घेत असतात. त्यांचे नावही ते स्त्रीरूपी लावतात. त्यांच्या या स्त्री भावनेची कल्पना घरच्यांना कधी असते तर कधी नसते. जे समाजात उघडपणे स्त्री म्हणून जगतात त्यांना तृतीयपंथी किंवा हिजडा म्हणून ओळखले जाते व जे समाजात उघडपणे स्त्री म्हणून वावरत नाहीत, परंतु एकांतात आपल्या इच्छा पूर्ण करतात त्यांना कोती म्हणून संबोधले जाते.

आज संस्थेचे बरेच कार्यकर्ते फिल्डमध्ये गेले होते व काऊन्सेलरखेरीज दोनच कार्यकर्त्या चतुरा आणि रूबिना (जन्मतः पुरूष) संस्थेत आल्या होत्या. त्यांच्याशी संस्थेच्या झालेल्या व राहिलेल्या कामकाजाविषयी चर्चा चालू होती. तेवढ्यात एक मध्यमवयीन महिला तेथे आली. कष्टातून आयुष्य उभे केल्यावर आलेला एक कणखरपणा या महिलेत दिसत होता. मध्यम बांध्याची, काळी-सावळी, गळ्यात मंगळसूत्र, कानात कळकटलेले टॉप्स, दोन्ही हातात काचेच्या बांगड्या, एका हातात घड्याळ व अंगावर नॉयलॉनची साडी परिधान केलेली ही महिला चिंतातूर पण खंबीर वाटत होती. महिलेकडे बघून एकंदर तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असावी असं वाटत होतं.

दारातूनच महिलेने आपली ओळख करून दिली, ‘‘मी स्वानंदची आई.’’ व तिने संस्थेतील काही मुलांची चौकशी केली. ‘‘सुनीलने मला भेटायला बोलावलं होतं. कुठे आहे तो?’’ बाई विचारत होती.
‘‘सुनील मुंबईला गेला आहे. दोन दिवसाने येईल. तो आल्यावर तुम्हाला कळवतो.’’ चतुराने त्यांना सांगितलं.
तसं, ‘‘असं करू नका रे पोरांनो. माझ्यापासून काही लपवू नका. तुमच्याकडे खूप आशा ठेवून आले आहे. मला सगळं कळलंय. मुंबईला त्याला पाहिलं होतं तेव्हा का नाही कळवलं मला?’’ आई गहिवरून विचारत होती.
स्वानंदबद्दल थोडीशी कल्पना असल्यामुळे काऊन्सेलरने त्याच्या आईला जवळ बोलावलं व पाणी प्यायला देऊन त्यांची चौकशी केली.

काऊन्सेलर- आधी तुम्ही शांत व्हा बघू आणि काय झालं ते सांगा.
आई - स्वानंद घर सोडून निघून गेलाय. क्लासला जातो म्हणाला आणि परत आलाच नाही.
काऊन्सेलर- घरी काही भांडण झाली होती का?
आई - नाही हो, कुणाला वेळ आहे. त्याचे वडील लकव्याने अंथरूणावर पडलेले होते. पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्यांना बरं करण्याकरता, तेव्हा आता कुठे ते कामावर जायला लागले आहेत. ते तर आधीच खंगलेत. माझा सगळा वेळ त्यांचं करण्यातच जातो. त्यात दुकानही मलाच बघावं लागतं. कुणाला वेळ आहे भांडण करायला.
काऊन्सेलर- तरी पण काही तरी झालं असणार. ही पोरं सांगत होती, की त्याला घरात मारहाण केली जायची. आठ दिवस जेवायलाही दिलं नव्हतं.
आई- मी पण ऐकलंय. त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं आहे, की आम्ही त्याच्याशी वाईट वागतो. त्याला वडील मारतात. पण आम्ही का करणार असं? काय कमी आहे पैशाची आमच्याकडे. त्यानं आम्हाला सांगायचं होतं ना. ‘ते तर नैसर्गिक आहे.’ आम्ही दोघं इथपर्यंत बरोबर आलो होतो. तो क्लासला जातो म्हणून गेला. मी दुकानात गेले. मला काय माहीत हा असं करेन. तरी माझ्या मुलीने मला कल्पना दिली होती, की तो क्लासच्या वेळा पाळत नाही. तेव्हाच मी लक्ष घालायला हवं होतं. मी त्याच्याबरोबर क्लासपर्यंत जायला हवं होतं. दोन महिने झालेत अजून त्याचा एक फोनही आलेला नाही. त्याचे वडील पण रोज विचारत असतात. काय उत्तर देणार मी त्यांना.
काऊन्सेलर- तो तर जॉब करत होता ना?

आई- ‘‘कसला जॉब, एक महिना केला असेल. त्याने फिटरचा कोर्स केला आहे, पण आम्ही त्याच्याकडून कुठलीच अपेक्षा करत नाही. तुम्ही विचारत होता ना, त्याला मारलं होतं का? हो, मागच्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला दोन-तीन थापडा दिल्या होत्या. पण का? तो कधीच वेळेत घरी यायचा नाही. त्याचा भाऊ जेलमध्ये (त्याला गुंतवलं आहे), वडिलांची तब्येत ही अशी, सध्याचे दिवस कसे आहेत. कुणी बदला घेण्याकरता काही केलं तर? कुणाचं काही सांगता येतं का? बर्‍याच वेळा त्याची बहीण एकटीच असते घरात. त्याने घरी वेळेत यावं एवढीच आमची अपेक्षा. आमचं काही चुकलं का यात?’’ तुम्हीच सांगा.
काऊन्सेलर- तुमची मनःस्थिती मी समजू शकते.
आई- नाही म्हणायला मीच कधीतरी त्याला बोलायचे, ‘‘काय हे शेळपटासारखं वागणं तुझं, तू पुरूष आहेस, जरा खंबीर वागत जा. उद्या तुझ्यावर घराची, कुटुंबाची, मुलांची जबाबदारी असेन. घरात दोन गाड्या पडल्यात. तुला साध्या त्या चालवतादेखील येत नाहीत. तुझा उपयोग काय? कधी आणिबाणीच्या परिस्थितीत तू आमच्याकरता काही करू पण शकणार नाहीस. असं मी त्याला टोकायचे. पण मला काय माहीत, त्यावेळेस मला माहीतही नव्हतं की हा असा आहे. त्याने मला सांगायला पाहिजे होतं. मला माहीत आहे, हे तर नैसर्गिक आहे.’’

‘‘ही सगळी संपत्ती कुणाकरता? दोघा भावांकरता दोन घरं बांधली आहेत. दुकानाचे गाळे आहेत. नुसता दुकानाचा गाळा बघितला असता तरी चाललं असतं आम्हाला. चार महिन्यांपूर्वीच बँकेचं खातं उघडायला लावलं होतं त्याला. त्याच्या खात्यात पैसे जमा करत होते. तुम्हीच सांगा काय कमी केलं होतं त्याला?’’
‘‘काय गरज होती त्याला साडी नेसून पैशाकरता भीक मागायची? मला सगळं कळलंय. ऐकवत नाही ते. हृदय फाटून येतं. त्यापेक्षा आपण मेलेलं बरं. असला मुलगा नसलेला बरा. माणूस मेल्यावर तरी धाय मोकलून रडता येतं; पण जिवंत गायब असलेल्या माणसाकरता तेही करता येत नाही! मी शांत झोपूही शकत नाही.’’
काऊन्सेलर- मी तुमच्या भावना समजू शकते- तुम्ही तुमचं मन शांत करा. मग मी तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजावून सांगते, मग आपण काय पर्याय सापडतो का ते पाहू यात. त्याआधी तुम्ही ‘ते नैसर्गिक असतं’ असं म्हणालात म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला, ते मला सांगाल का?
आई- मी ऐकून आहे की पुरूष-पुरूष संबंध नैसर्गिक असतात.
काऊन्सेलर- हो, अगदी बरोबर, याला समलिंगी संबंध म्हणतात. जे पुरूषा-पुरूषामध्ये व स्त्री-स्त्रीमध्येही असतात. पण तुम्हाला ते मनापासून पटतंय ना? कारण त्याचा तुमचा तुमच्या मुलाशी असणार्‍या नात्यावर परिणाम होणार आहे.
आई- आता पोरगं घराबाहेर साडी नेसून फिरण्यापेक्षा ते बरं.
काऊन्सेलर- म्हणजे तुम्ही तडजोड म्हणून या गोष्टीचा स्वीकार करत आहात. तुमचंही यात खूप काही चुकतंय असं नाही. सामाजिक चौकटी बाहेरच आयुष्य जगणार्‍यांचा स्वीकार करायला माणसाला खूप मोठं धैर्य लागतं. नाईलाजानं का होईना तुम्ही एवढं तरी स्वीकारलं ते ही काही कमी नाही.
आता तुमच्या मुलाला स्वतःबद्दल जे काही वाटतं त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते, म्हणजे तुमचं नेमकं कुठं चुकतंय तुम्हाला लक्षात येईल.

तुमचा मुलगा फक्त समलैंगिक आहे असं नाही. तर त्याला स्वतःला आपण स्त्री आहोत, असं वाटत आहे. त्याच्यातील स्त्री पुरूषाच्या शरीरात अडकली आहे, अशी त्याच्या मनाची धारणा आहे. म्हणजे तो मानसिकरित्या स्त्री आहे. त्याला आपण स्त्रीसारखे जगावे वाटते. या स्थितीला मानसिक लिंगभावात (सायकॉलॉजिकल जेंडर) बदल असणे असे समजले जाते. यालाच इंग्रजीत ट्रान्स जेंडर असे म्हटले जाते. आणि जेव्हा ही ट्रान्स जेंडरची भावना निर्माण होते तेव्हा साहजिकच स्त्रीसारखं दिसावं असं वाटणं ओघानं आलंच. त्याकरता स्त्रियांप्रमाणे वेशभूषा-केशभूषा करणे, स्त्रियांची कामे करण्यात जास्त रूची असणे व आपण समाजात स्त्रीसारखं जगावं म्हणून साडी नेसणे इत्यादी लक्षणं दिसतात. पोषाखावरून व्यक्ती स्त्री आहे की पुरूष हे लगेच निदर्शनास येते. या त्यांच्या स्थितीला सामाजिक लिंगभाव स्त्री आहे (सोशल जेंडर) म्हणून समजले जाते. यालाच इंग्रजीत ट्रान्सवेस्टाईट असे म्हटले जाते. आणि याच कारणामुळेच तो पुरूषांची कामेही करायला तयार नाही. उदा. मोटारसायकल चालवणे, क्रिकेट खेळणे वगैरे.

आई- तुम्ही ते कामाचं म्हटला त्यावरून आठवलं. माझा स्वानंद एकदम शांत व नम्र मुलगा आहे, त्याचं कामही इतकं व्यवस्थित असतं आणि त्याला स्वच्छता फार लागते. मला जमलं नाही तर तोच घर साफ करायचा. मी थकली असेल तर तो स्वयंपाक करायचा, मला चहा करून द्यायचा. मी घरी आले की माझी पापी घ्यायचा आणि विचारायचा, ‘‘आई तू कशी आहेस?’’ असा मुलगा मला फोन न करता कसा राहू शकेल हेच मला कळत नाही.

काऊन्सेलर- याचं उत्तर तुम्ही मघाशीच दिलं आहे. तुम्ही त्याला पुरुषार्थावरून उणं-दुणं बोलायचा, त्याला दूषणं द्यायचा, प्रसंगी मारहाणपण करायचा. त्यामुळे अशी मुलं घरापासून दूर जाऊ लागतात. घरात त्यांना कोणी समजून घेणार नाही असं वाटू लागतं. आजूबाजूचे लोक, मित्रमंडळीही त्यांना चिडवत असतात. उपहासाने त्याच्याशी वागतात. तेव्हा त्यांची खूप घुसमट होत असते. एकीकडे त्यांचे मन स्त्रीसारखे राहण्याकरता बंडाळी करत असतं, तर दुसरीकडे त्यांना समजून घेईल असं कोणी त्यांना दिसत नसतं. या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षणातलं लक्ष उडू लागतं. ते घराबाहेर जास्त वेळ काढू लागतात. आपल्यासारखं कोणी आहे का? याचा शोध घेतात व त्याच्यासारख्या मुलांबरोबर रहायला लागतात. अशा मैत्रीतूनच त्यांना समलिंगीसंबंध ठेवणारे पुरूषही भेटू लागतात.
इथे हे पण लक्षात घ्या, की स्त्रियांनी-पुरूषांनी कसे वागायचे, कुठली कामे करायची, स्त्रीत्व-पुरूषत्व म्हणजे काय या सर्व गोष्टी समाजाने ठरवलेल्या आहेत. ज्याला आपण लिंगभाव (जेंडर) म्हणतो. मूल जन्माला घालणे ही गोष्ट सोडली तर स्त्रीत्वात-पुरूषत्वात विशेष असा काहीही फरक नाही. समाजाने ठरवलेले लिंगभावाचे मापदंड प्रत्येक व्यक्तीत कमी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे स्त्रीत्वाचे म्हणून ओळखले जाणारे गुण पुरूषातही असतात व पुरूषत्वाचे म्हणून ओळखले जाणारे गुण स्त्रीमध्येही असतात. एखाद्या व्यक्तीला असे का वाटत असावे याचे खास असे कारण नाही, एवढे नक्की की मानवी प्राण्यांत स्त्री व पुरूष देहांमध्ये स्त्रीत्व व पुरूषत्वाच्या निर्देशकांचे (जेंडर नॉर्मचे) प्रमाण कमी प्रमाणात असलेली व्यक्तिमत्वे असतात. कारण आयडियल स्त्री व आयडियल पुरूष किंवा पुरूषत्व व स्त्रीत्वाची व्याख्या करताना वापरण्यात येणारे मोजदंड (जेंडर नॉर्म) हे समाजाने ठरवलेले आहेत, याची अनेक उदाहरणे ही आपल्याला ऐतिहासिक काळापासून देता येतील. उदा. झाशीची राणी, मदर इंडियात पुरूषच जास्त आहेत. (संजीव कपूरच्या पाककृती तर टीव्हीमुळे अगदी प्रसिद्ध झाल्या आहेत.) आता तर अनेक मुली मोटार सायकल चालवत आहेत. ट्रक, रेल्वे चालवणार्‍या महिलाही आहेत. मानसिक पातळीवरही उदाहरणच द्यायचे झाले तर रडणे ही स्त्री-पुरूषांच्या बाबतीतील आयुष्यातील भावनात्मक आंदोलने प्रकट करणारी एक प्रतिक्रिया. पण घरातील लहान मुलगा जेव्हा रडतो तेव्हा आपण त्याला काय बाईसारखा रडतो असं बोलून पुरूषांनी रडायचे नसते असा त्याच्यावर संस्कार करतो. प्रत्यक्षात मात्र दाटून आलेल्या भावनांना रडून वाट मोकळी करून देण्याची गरज स्त्री व पुरूष दोघांचीही असते. लहान मुलांच्या बाबतीत बघितलं तर मुलं जवळ जवळ सहा-सात वर्षांची होईपर्यंत मुलगा किंवा मुलगी तेवढ्याच मोठ्याने भोकाड पसरतात. बरेचदा आपण लहान मुलींनाही सांगतो. तू ब्रेव्ह मुलगी आहेस ना मग असं पडल्यावर रडायचं नाही, असे आपणच पुरूषत्वाच्या व स्त्रीत्वाच्या गुणधर्मांचे त्यांच्यावर संस्कार केलेले असतात. अनेक स्त्रियांना चटकन रडू येत नाही, तर अनेक पुरूषांच्या डोळ्यांत चटकन पाणी तरळू शकते म्हणून त्यांना आपण दोष देऊ शकत नाही, समाजाने ठरवलेल्या अशा या अनेक मोजदंडांच्यावर आधारित स्त्री व पुरूष स्वतःचे पुरूषत्व व स्त्रीत्व सिद्ध करण्याचा खटाटोप करत असतात. या स्त्री-पुरूष प्रकृतीमध्ये ज्या प्रकृतीच्या व्यक्ती संख्येने जास्त प्रमाणात दिसतात त्यांनाच सर्वमान्यता मिळते व ज्यांचे प्रमाण कमी आहे त्यांना लवकर स्वीकारले जात नाही. कारण त्यांना स्वीकारताना अनेक सामाजिक संकल्पनांना आव्हान केले जाते. त्यामुळे इथे हेही लक्षात घ्यायला हवे, की पुरूषांनी घरकाम, स्वयंपाक करणे यात कुठलाही कमीपणा नाही. फक्त एखाद्या व्यक्तीस हे करत असताना त्यांचा मानसिक लिंगभाव स्वतः पुरूष आहे की स्त्री आहे यावर त्याच्या आयुष्यातील इतर सर्व घडामोडी अवलंबून असतात.

बरं मघाशी तुम्ही म्हणाला होता, की ‘‘ते तर नैसर्गिक आहे. त्याने मला सांगायचं होतं.’’ आता तुम्हीच मला सांगा की उद्या त्याने आपला जोडीदार पुरूष म्हणून निवडला व त्याच्याशी लग्न करायचे ठरवले तर तुम्हाला ते मान्य असेल.
आई- काही तरीच काय, समाजात आमची काय इज्जत राहील? असं कुठं झालंय का?
काऊन्सेलर- आणि नेमकं हेच तुमच्या मुलाने ओळखले आहे की तुमची त्यांच्या लैंगिकतेबद्दलची स्वीकृती वरवरची आहे व तो घरातून पळून गेला आहे. तुम्ही त्याला सांगा असं का नाही होऊ शकत. जेव्हा आपण समलैंगिकता नैसर्गिक आहे म्हणतो मग अशा व्यक्तिंमधले लग्न का नाही मान्य करू शकत आपण? शेवटी लग्न म्हणजे काय? दोन व्यक्तींनी लैंगिक सुखाकरता जोडीदार म्हणून आणि एकमेकांबरोबर सहजीवन जगण्यासाठी सामाजिकरित्या घेतलेली परवानगी. मग ती स्त्री-स्त्री किंवा पुरूष पुरूष जोडीदाराला का नसावी? ज्या देशांमध्ये समलैंगिकतेला कायद्याने परवानगी आहे उदा. कॅनडा, स्विडन इत्यादी त्या देशात असे विवाह केलेले जोडीदारही आहेत व अनेकांनी मुलं दत्तक घेऊन त्यांना नातवंडही झाली आहेत. आणि आपल्या भारतातही अशी परवानगी नसतानाही अशा काही व्यक्ती आहेत ज्या स्त्री-स्त्री किंवा पुरूष पुरूष जोडीदार म्हणून २५ वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे तरी जोडीदार म्हणून एकत्र राहात आहेत. मला कळतंय तुम्हाला हे सर्व जास्त होत आहे, पण मला तुम्हाला सर्व माहिती स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. तुमच्यासारखे फारच कमी पालक आमच्याकडे येतात.
आता अशा मुलांच्या बाबतीतील आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःला स्त्री म्हणून समजणारे काही पुरूष पुढे जाऊन स्वतःचे पुरूष लिंग काढून घेतात व स्तनही वाढवतात. याला लैंगिकदृष्ट्या केलेले लिंग परिवर्तन म्हणतात, ज्याला इंग्रजीत ट्रान्ससेक्शुअल म्हटले जाते. हे ऐकून स्वानंदची आई ढसाढसा रडू लागली व म्हणाली,
आई- ‘‘हे काय भयानक ऐकतेय मी. त्या पेक्षा त्याचं लग्न लावून दिलं तर सुधारेल तरी तो.’’
काऊन्सेलर- अशा पुरूषांच्या आयुष्यात जे काही घडतं ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि अशा मुलांचं लग्न लावून पालक आणखी एक मोठी चूक करतात. अशी अनेक मुलं स्त्री बरोबर संबंध ठेवू इच्छित नाहीत. तिच्या बरोबर ते लैंगिक आनंद मिळवू शकत नाहीत. फार झालं तर एक मूल होऊ देण्याकरता ते नाखुशीने बायकोबरोबर संबंध ठेवतात. काही वेळेस ते स्त्रीबरोबर लैंगिक संबंधही ठेवू शकत नाहीत. आणि यात दोघांचीही घुसमटच होत असते व सामाजिक चालीरीती सांभाळण्यात दोघांचाही बळी पडतो. जास्त करून अशा बायकोच्या आयुष्याचे खूप मोठे नुकसान होत असते. असा नवरा बाहेर जाऊन त्याचे लैंगिक सुख मिळवतच असतो, पण बायकोला मात्र खूप काही गमवावं लागतं. काहीजण आपापल्या परीने काही तडजोडीही करतात.
आई- पण आमच्या घरात तर असं कुणीच नाही. यावर काही औषध इलाज तर असेलचना?
काऊन्सेलर- आई आधी एक गोष्ट नीट लक्षात घ्या, हा काही आजार नाही. यात अनुवंशिकतेचाही काही प्रश्‍न नाही. अशी मुलं सर्व जाती धर्मात, सर्व देशात, सर्व आर्थिक परिस्थितीत आहेत. मला तुम्हीच सांगा आपल्यासारख्या ज्या देशात मुलगा व्हावा म्हणून गरोदरपणाची बाळाची लिंग तपासणी करून मुलीचा गर्भ असेल तर मोठ्या संख्येने गर्भपात होत आहे. जेथे स्त्रीला येवढे दुय्यम स्थान दिले जाते. अशा आपल्या पितृसत्ताक समाजात माणूस म्हणून जगताना पुरूषाला मिळणारे सर्व फायदे नाकारून एखाद्या मुलीला स्त्री म्हणून जगताना समाजात मिळणारी घृणास्पद वागणूक, अवहेलना सोसण्यास हौस मजा वाटत असेल का? कोण आपलं आयुष्य हौस म्हणून एवढं पणाला लावेल? या उलट समाज स्वीकारत नाही. आई-वडील समजून घेत नाहीत त्यामुळे होणारी त्यांची घुसमट यामुळे ही मुलं चिंता, स्वतःबद्दलची अस्विकृती, मानसिक ताणतणाव यातून नैराश्याकडे जातात व बरेचदा यांच्या मनात आत्महत्येचाही विचार घोळू लागतो किंवा करतात. ही या अवस्थेतून जाणार्‍या एका २२ वर्षाच्या मुलीने शेवटी मृत्युला जवळ केलेले माहीत आहे मला. तिने दागिने घालावेत, स्त्रियांचे कपडे घालावेत म्हणून आई-वडील तिला मारहाण करत असत. अनेकदा त्यांनी तिला चटकेही दिले होते. मैत्रिणी तिला जवळ करत नव्हत्या. तिला ससूनमध्ये मानसिक उपचारही सुरू केले होते, पण काही महिन्यातच तिने गळफास लावून घेतला. तुम्हाला वाटत असेल, की असा प्रकार मुलांमध्येच होत असेल, पण तसे नाही. काही मुलींनाही आपण स्त्री नसून पुरूष आहोत असे वाटत असते.
आई- मग आता मी काय करू. तुम्हीच काही तरी सुचवा मला. मला माझा मुलगा परत हवा आहे. कसाही असला तरी.
काऊन्सेलर- तो घरी राहून त्याची स्त्रीत्वाची भावना इथं काम करणार्‍या कोत्यांप्रमाणे जगला तर चालेल ना ते तुम्हाला? तशी तुम्ही खात्री देत असाल तर मी स्वानंदशी एकदा बोलून बघेन. पण घरी राहून कोत्यांप्रमाणे जगायचं की हिजड्यांच्या गटात राहायचं हा निर्णय सर्वस्वी त्याचा असेल. आणि एक गोष्ट अशा मुलांच्या आया त्यांना जास्त लवकर स्वीकारतात पण वडील आणि भाऊ जवळजवळ स्वीकारतच नाहीत. स्वानंद जर घरी आला तर याबाबतही तुम्हाला योग्य काळजी घ्यावी लागेल. आणि तुमचा स्वानंदला आधार आहे हे त्याला तुमच्या वागण्या-बोलण्यातून जाणवले पाहिजे, तरच तो घरात टिकेल.
आई- हो, त्याला समजून घ्यायचा मी नक्की प्रयत्न करेन, पण आधी त्याला घरी यायला सांगा. असे सांगून स्वानंदची आई निघून गेली.

बरेच निरोप पाठवल्यावर एक दिवस स्वानंद ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याने साडी नेसली होती.
कौन्सलरने त्याच्याशी सरळ विषयालाच हात घातला. तुझी आई आली होती. तुझ्याशिवाय तिला जेवण जात नाही. तुझी खूप काळजी वाटते. एक फोन तर करायचा होता तिला तू.
स्वानंद- काही सांगू नका मला. नुसतं घालून पाडून बोलतात मला घरात. माझी लहान बहीणही मारते मला. सारखी काही ना काही कारणावरून भांडण करतात माझ्याशी. बहिणतर माझ्या पाळतीवरच असते जणू. मग गेलो मी पळून आणि केलं एका हिजड्याला गुरू. आता मला माझ्या मनासारखं तरी राहता येतं.
काऊन्सेलर- पण तुला भीक मागावी लागते हेही खरंय ना. आणि शरीर विक्रयाचा धंदाही करावा लागत असेल तुला.
स्वानंद- मग आता साडी नेसल्यावर मला कोण काम देणार?
काऊन्सेलर- अगदी बरोबर बोलत आहेस तू. पण आता मी काय सांगते ते तू नीट ऐक. मग तू ठरव तुला कसं आयुष्य जगायचं ते. मी तुझ्या आईबरोबर तुझ्यातल्या स्त्रीत्वाबद्दल सर्व काही बोलले आहे. काही गोष्टी पटायला जरा अवघड असल्या तरी त्यांनी तुला आहे तसा स्वीकारायचं ठरवलं आहे.
स्वानंद - काय! तुम्ही आईला सर्व सांगितलं.
काऊन्सेलर- होय, कारण त्यांच्या शंका दूर करणं महत्त्वाचं होतं. आणि अनेकदा माणसाच्या हातून अनेक गोष्टी माहीत नसल्यामुळे, गैरसमजामुळे त्यांच्या हातून चुका होत असतात. त्यात त्यांची काही चूक आहे असं मला नाही वाटत. त्यांच्यापर्यंत योग्य माहितीच पोहचत नाही. आता तुलाही अशाच काही गोष्टी मला सांगायच्यात त्या नीट ऐक.
तू घरात राहून इतर कोत्यांसारखं आपली स्त्रीत्वाची हौस भागवू शकतो. तू या मुलांच्या संपर्कात असल्यामुळे ते कसं जगतात हे तुला माहीतच आहे. तू घरात राहिलास तुझ्या घरी दुकानाचा गाळा आहेच. तो तू चालवू शकतोस. तू चांगला पैसा कमवू लागलास. आर्थिकदृष्ट्या चांगला स्थिर झालास, घरच्यांचा भक्कम आधार झालास तर घरातील तुला आपोआप स्वीकारायला लागतील. तुझं काम करून उरलेला वेळ तू तुझ्या मित्रांबरोबर घालवू शकशील. एकदा घरच्यांनी तुला पूर्णपणे स्वीकारलं तर काही दिवसांनी तर तू साडी नेसूनही दुकानावर बसू लागशील. तुला भीक मागत फिरावं लागणार नाही. त्यातून पैसे ते किती कमावणार तू. त्यातही तुला कमाईतले अर्धे पैसे गुरूला द्यावे लागतीलच. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जगावे लागेल ते वेगळंच. सर्व नाती तुटतील तुझी. तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे असं ती सांगत होती.
स्वानंद- पण ते माझं मुलीशी लग्न लावून देतील त्याचं काय?
काऊन्सेलर- त्याहीबद्दल मी तुझ्या आईबरोबर बोलले आहे. तुला सुधरवायला म्हणून ते तुझं मुलीशी लग्न लावणार नाहीत याची मी तुला खात्री देते, पण तुझं मुलाशी लग्न लावायचं म्हटलं तर ते मात्र पेलणार त्यांना नाही हा, आणि नाहीतरी तुम्ही पोरं स्वतःच्या गटात किंवा मंदिरात जाऊन लग्न लावताचकी, लग्नावरून आणखी एक गोष्ट सांगायची आहे, की तू हिजड्यांमध्ये राहा नाहीतर कोत्यांबरोबर, जेव्हापण दुसर्‍या पुरूषाशी तुझा संबंध येईल तेव्हा कंडोम वापरायला तू विसरू नकोस. नाहीतर एचआयव्ही आणि गुप्तरोगाची लागण होण्याचा धोका तुला आहेच समज. तुमच्यासारख्या पुरूषांवर हिंसाचार होणं, जबरदस्तीने लैंगिक संबंध होणं, यांसारख्या गोष्टीही घडतात, हेही तू ऐकून असशीलच. त्याकरता असे प्रसंग कसे टाळायचे हे ही तुला शिकले पाहिजे.
स्वानंद- पण मला माझं पुरूष लिंग काढून टाकायचं आहे.
काऊन्सेलर- बरं झालं बोललास ते. तुला तेही करता येईल. हिजड्यांमध्ये राहून त्यांच्यामध्ये काही पुरूष लिंग तर तू कापून टाकशील. स्तन वाढवण्याकरता गोळ्याही घेशील किंवा सिलिकॉनचे स्तन बसवून घेशील हे मला मान्य आहे, पण तू जर चांगला पैसा कमावलास तर तुला अशा प्रकारचे उत्कृष्ट ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांकडून हे लिंग बदलाचे ऑपरेशन करून घेता येईल. याला सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी म्हणतात. त्यात ते तुला प्रथम स्त्री संप्रेरके देऊन तुझं शरीर स्त्रीसारखे दिसेल असे बदल घडवून आणतील. त्यात तुझे स्तनही वाढतील. त्यानंतर तुझ्या लिंगाचे ऑपरेशन करतील. त्यावेळेस स्त्रियांना असतो तसा योनीमार्गही तयार करतील. यामुळे तुझ्याबरोबर शरीरसुख घेणारी व्यक्ती गुदमार्गाने सुख घेण्याऐवजी पुढून म्हणजे योनी मार्गातून लैंगिकसुख घेऊ शकेल आणि तुलाही देऊ शकेल. पण या ऑपरेशनकरता खर्च खूप असल्यामुळे सर्वसाधारण हिजडा समाजातील मुलं असे ऑपरेशन करून घेऊ शकत नाहीत. सिलिकॉनचे स्तन बसल्यामुळे अनेकदा त्याना स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप वाटते. हिजड्यांच्या आयुष्यात थोडे वय झाल्यावर कमाई थंडावते. घरातच राहून चेल्यांच्या कमाईवर जगावे लागते. त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे ते घरात कुठलंही काम करत नाहीत. नुसती घरात बसून राहतात. कुठं फिरायला जाऊ शकत नाही. व्यायाम करू शकत नाही. शरीराच्या हालचाली कमी झाल्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढायला लागते. असे अनेक हिजडे तू पाहिलेच असशील. त्यामुळे मग डायबेटीस, ब्लडप्रेशर, हार्ट अट्यॅकचं प्रमाणही खूप जास्त आहे या लोकांच्यात.
हिजड्याचं आयुष्य जगतानाही त्याच्याकडे चांगला पैसा नसेल तर म्हातारपणी खूप हाल होतात त्यांचे. पैसे कमावण्याकरता किती दिवस भीक मागू शकशील आणि शरीरविक्रय करू शकशील तू? जोपर्यंत तरूण आहेस तोपर्यंतच आणि त्यातून किती पैसे साठवशील? त्यापेक्षा घरात राहून अगदी हिजड्यांचा गुरू करूनही तू खूप चांगलं तुझ्या मनासारखं आयुष्य जगू शकशील हे मी तुला खात्रीने सांगू शकते. फक्त तुला जरा धीराने घेऊन आधी घरच्यांचं मन वळवायला लागेल. मी तुझ्यासमोर दोन्ही बाजू मांडल्यात आता त्याच्यावर काय अंमलबजावणी करायची हा तुझा निर्णय आहे. तुझी आई तुझी वाट पाहात आहे. तिला एक फोन तरी करू शकशील ना तू.

आठ दिवसांनी स्वानंदच्या आईचा फोन आला. स्वानंद घरी आला आहे. आणि आम्ही दोघं आधी गळ्यात गळा घालून खूप रडलो आणि नंतर अनेक विषयांवर खूप बोललो. आता मला नाही वाटत तो घर सोडून परत जाईल. त्याने गाळ्यावर काम करण्याचा निर्णय घेतला आणि घरी स्वयंपाकही तेवढ्याच हौसेने करतो. त्यामुळे मला त्याची खूपच मदत होते. तुमचे आभार कसे मानू मी.
काऊन्सेलर- आभार मानायची काही गरज नाही. उलट कधी काही वाटलं, काही प्रश्‍न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही दोघंही कधीही माझ्याशी बोलायला येऊ शकता.
----
डॉ. हेमलता पिसाळ
एफ ८/१२, हर्मेस हेरिटेज-२,
शास्त्रीनगर, येरवडा, पुणे - ६
चलभाष - ८६९१९८८८००

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate