‘फादर्स डे’च्या निमित्ताने...
आजची पिढी वर्षातून एकदा ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ साजरा करते, विशेषत: शहरांमधून. आमच्या काळी असले दिवस आम्ही दररोजच जगायचो, आजही जगतो आहोत; आई-वडील असतानाही आणि ते गेल्यावरही. त्याला कुठली नावं नसत, ना त्यात औपचारिकता असे. वर्षातला एक दिवस आईचा, एक दिवस बापाचा आणि उरलेले सारे दिवस माझे, असला प्रकार नसायचा. जेष्ठांप्रती आदर व्यक्त करणं हे दररोजचं विहित कर्तव्य असायचं. आदरयुक्त भीती मनात दडलेली असायची. कुटुंब प्रमुखांचा निर्णय महत्वाचा आणि सर्वांसाठी बंधनकारक असायचा. त्यातच कुटुंबाचे हित आहे, ही सार्यांची खात्री असायची. म्हणून त्यांनी घालून दिलेले नियम, शिस्त पाळली जायची; त्यांच्या मतांचा योग्य तो आदर राखला जायचा. आमच्या काळी बंडखोर नव्हते असे नाही, परंतु अशांना सकाळी केलेली शिक्षा संध्याकाळच्या पंक्तीपर्यंत सर्वजन विसरुन जायचे. कुणी नाही तरी आई/आजी त्याला पदराखाली घ्यायची. संयमाची, सहनशीलतेची कसोटी लागायची. या दोन गोष्टींना जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. दोन विटा जोडण्यासाठी सिमेंट लागते. संयमाच्या सिमेंटमध्ये परस्परादराचे पाणी घालून जोडलेली नाती कधीच तुटत नाहीत तर अहंकाराच्या, स्वार्थाच्या फेव्हीकॉलने जोडलेली नाती फारकाळ टिकत नाहीत.
आमची पिढी आज्ञाधारक होती, संयमी होती याचा अर्थ ती नेभळट होती, शरणागत होती असे मुळीच नाही. आदरयुक्त संयमात प्रचंड सामर्थ्य असते. आई-बापाने अपार मेहनत घेऊन ताटात वाढलेले भोजन चवीने खाणार्या लेकराचे शरीर व मनही धष्टपुष्ट होत असते. अशा व्यक्ती जेष्ठांसमोर आपोआप नतमस्तक होतात. त्यांना ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ वेगळेपणाने साजरे करायची गरज नसते. फास्टफूडचे मेनूकार्ड वाचणार्यांना त्याची गरज भासत असावी. कारण त्यांत मायेचा ओलावाच नसतो !
आई-बापाना निर्जीव शुभेच्छापत्रे कसली पाठवता ? अधूनमधून त्यांच्या कुशीत शिरा आणि त्यांच्या प्रेमात ओलेचिंब होऊन जा ! जगात सर्वात सुरक्षित आणि सुखकारक जागा म्हणजे आईची मांडी व बापाची छाती. आई-बाप लेकरांच्या सहवासाचे भूकेले असतात. त्यांना इतर काहीही नको असते. वेगवेगळ्या कारणांसाठी उडून गेलेली पाखरं क्षणभरासाठी का होईना केव्हा तरी घरट्यात परत येतील म्हणून ते तुमच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलेले असतात. लेकरांच्या क्षणिक भेटीने, त्यांच्या चार आपुलकीच्या शब्दांनी आई-बापांची थकलेली गात्रं पुन्हा ताजीतवानी होतात. जगण्यासाठी त्यांना उदंड बळ देतात. शहर आणि खेड्यातल्या अनेक आई-बापांच्या डोळ्यातले भाव मी वाचले आहेत. भौतिक सुखांना आंतरिक सुखांवर स्वार होऊ देऊ नका. जगात सर्व काही मिळेल परंतु तुमच्यावर सतत मायेचं पांघरुन घालणारे आई-बाप कुठेच मिळणार नाहीत.
अंतिम सुधारित : 7/7/2020