समतावादी संस्कृतीचा महानायक - बळीराजा
दिवाळीतील महत्वपूर्ण दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. शेतकऱ्यांचा राजा बळीराजा. या दिवशी बळीराजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो, अशी भावना आहे. या दिवशी ग्रामीण भागात बहिणी भावाला ओवाळतांना, ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असे म्हणतात. बळीराजाचे महत्व मांडणारा लेख.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा, असे मानतात. त्यामुळेच आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी बळीराजाला कपटाने मारण्यात आले. वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. प्रजा हताश झाली. अशा वेळी बळीच्या शूर मुलाने बाणासुराने प्रजेला धीर देतांना सांगितले की, ‘आपला राजा मेला नाही. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे.’ दसऱ्यानंतर २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा. या दिवशी बळीराजा आपल्या दु:खी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दु:ख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नवे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. घराघरात बलिपूजन केले जाते.
ग्रामीण भागात बलिप्रतिपदेला माता-बहिणी ‘इडा पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ म्हणून घरातील पुरूषांना ओवाळतात. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मरतड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम मंत्री होते, असे मानतात. बळीराजाचे राज्य नऊ खंडी होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला ‘खंडोबा’ म्हटले जात असे. आज जसे भारतातील प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे (जिल्हे) असायचे. अनेक सुभ्यांचा मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख महासुभेदार म्हणजे म्हसोबा होय. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा प्रमुख जोतीबा, मल्हार व मरतड हे सुरक्षा अधिकारी होत, अशी भावना आहे. बलिप्रतिपदेला केवळ बळीराजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीच्या राज्यात प्रजा किती सुखी व संपन्न होती, हे लक्षात येईल. अशा सुखी व संपन्न राज्यावर नेहमीच परकीय आक्रमक वाईट नजर ठेवत असत.
बाहेरून आलेल्या परकीयांनी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकाविले. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्याचा सेनापती असलेल्या वामनाने बळीराजाला कपटाने मारले, असे म्हटले जाते. वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही कथा आपणास पुराणांमधून सांगितली जाते. परंतु बहुजनांच्या हिताची प्रत्येक गोष्ट गाडून टाकण्यात आली आहे. बहुजनांच्या फायद्याचे आयोग आजही दडपून टाकण्यात येत आहेत. बळीराजा असलेल्या शेतकऱ्याला आज आत्महत्या करावी लागत आहे. देशात पसरलेले जातीभेद, स्त्री-पुरूष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. म्हणून बलिप्रतिपदेच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करण्याची गरज आहे.
इतिहासातील बळीराजा हा आक्रमकांविरोधात लढता लढता मेला. आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणेच पसंत करत आहे. लढाई सुरू होण्याआधीच तो पराभव मान्य करत आहे. त्याची लढण्याची प्रेरणा हरवली आहे. कारण त्याचा क्रांतिकारक लढय़ाचा इतिहास हरवला आहे. त्याची लढाऊ ‘आयडेंटी’च हरवली आहे. म्हणून आज बहुजन बुद्धिजीवींनी खरा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे. हा इतिहास बहुजनांच्या रुढी व परंपरांमध्ये शोधला पाहिजे. त्यावरील अंधश्रद्धांची पुटे खरवडून काढलीत तर अस्सल इतिहास आपल्याला सापडल्याशिवाय राहाणार नाही. बहुजनांच्या डोक्यातून अंधश्रद्धा नष्ट करावयाच्या असतील तर त्यांच्या देवांचा अभ्यास करून त्यामागील क्रािंतकारक इतिहास शोधून काढला पाहिजे.
प्राचीन काळापासूनच्या सर्व रुढी, परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची आज नितांत गरज आहे.
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी बळीराजाचे जे प्रतिक दिले आहे, त्याच्या मुळाशी सांस्कृतिक संघर्षांची पाश्र्वभूमी आहे. परंतु या दृष्टीकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हावयाचा आहे. सर्व माहिती ताटात ठेवलेली असतानाही बहुजन बुद्धिजीवींना बळीराजाचे सांस्कृतिक संघर्षांतील महत्व कधीच लक्षात आले नाही. ग्रामीण भागातील बहुजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते, म्हणूनच पाच हजार वर्षांपासून ठराविक गटाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला आहे. या लढय़ात अग्रभागी आहेत अडाणी ग्रामीण स्त्रिया. ज्या आजही इडा पीडा घालवण्यासाठी बळीच्या राज्याची आस जिवंत ठेवत आहेत.
या बलिप्रतिपदेच्या पाश्र्वभूमीवर समाजातील जाती-वर्ण व्यवस्था आणि स्त्री-पुरूष विषमतेविरूध्द लढण्याची गरज आहे
स्रोत - समतावादी संस्कृतीचा महानायक - बळीराजा
-प्रा. श्रावण देवरे, नाशिक
लोकसत्ता : दि-३० /१० /२०१
अंतिम सुधारित : 7/13/2020