सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे 'लोकशाही दिन' होय. हा 'लोकशाही दिन' जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. जिल्ह्याचा लोकशाही दिन हा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होत असतो. कार्यपद्धती सुलभ व्हावी यासाठी तालुकास्तरावरही लोकशाही दिन राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयस्तर तसेच जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्तस्तर, दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्तस्तर व तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिन होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी लोकशाही दिनासाठी
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस आयुक्तालय असल्यास पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
विभागीय आयुक्त लोकशाही दिनी
विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील विभागप्रमुख उपस्थित असतात.
मंत्रालय लोकशाही दिनी
मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभागाचे सचिव उपस्थित राहतील.
महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनी
महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यावतीने अपर जिल्हाधिकारी वा निवासी उपजिल्हाधिकारी, वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी व महानगरपालिकेच्या विभागांचे प्रमुख उपस्थित राहतील.
लोकशाही दिन कार्यक्रम अध्यक्ष
तालुकास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार असतील. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, महानगरपालिका लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष महानगरपालिका आयुक्त व विभागीयस्तरावरील लोकशाही दिनाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असतील. तसेच मंत्रालय लोकशाही दिनाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील.
कार्यक्रमाचे स्थळ व वेळ
लोकशाही दिनाचा कार्यक्रम संबंधित स्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात येईल.
अर्ज स्वीकृतीचे निकष
अर्ज विहित नमुन्यात म्हणजे नमुना प्रपत्र १ अ ते १ ड मध्ये असावा. अर्जदाराची तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे व चारही स्तरांवरील लोकशाही दिनाकरिता अर्ज १५ दिवस आधी २ प्रतींमध्ये पाठविणे आवश्यक आहे. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हास्तरीय/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्जदाराला अर्ज करता येईल. या लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त यांच्या व त्यानंतर दोन महिन्यांनी मंत्रालयस्तरीय लोकशाही दिनात अर्जदारास अर्ज करता येईल.
या विषयावरील अर्ज स्वीकारले जात नाहीत
लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवा व आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर. यानुसार जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येवू शकणार नाहीत ते संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसात पाठविण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थित अधिकारी
तालुका लोकशाही दिनासाठी
उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे, कृषि, सहकार, बांधकाम, पाणीपुरवठा या विभागांचे तालुका स्तरावरील प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
लोकशाही दिन केव्हा होणार नाही
ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही.
लोकशाही दिनातील पोचपावती लोकशाही दिनी प्राप्त निवेदनावर करावयाची कार्यवाही
जनतेच्या अर्जाची पोचपावती व कार्यवाही जनतेकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोचपावती प्रपत्र दोन प्रमाणे देण्यात येईल. सर्व स्तरावरील लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभागाच्या विभाग प्रमुखांकडे सदर अर्ज पाठविण्यात येईल व विभागप्रमुख या अर्जातील विनंतीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील. सदर अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भूमिका, तरतुदी या बाबींचा विचार करुन लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील.
अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याचा आत देण्यात येणार आहे. जनतेने द्यावयाच्या अर्जाच्या नमुना प्रती त्यांना विनासायास विनामूल्य उपलब्ध आहेत, सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकशाही दिन हे विना खर्च हक्काचे व जलद न्याय मिळण्याचे व्यासपीठ मिळाले असून लोकशाही दिनाच्या माध्यमातून आपल्या तक्रार/निवेदनांचे सामोपचाराने निराकरण करावे.
लेखक: विलास माळी
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/8/2020