অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राजमाता जिजाऊ आरोग्य अभियान

बाल्यावस्था हा मानवाच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे. गरोदरपणामध्ये स्त्रियांस व जन्मानंतर बालकांस पहिल्या दोन वर्षात योग्य आहार न मिळाल्यास त्याचे दूरगामी परिणाम हे शारिरीक, मानसिक व बौध्दिक विकासावर होत असतात. लहान वयात (दोन वर्षाच्या आतील) कुपोषणामुळे कमी प्रतिकारशक्ती, कमी बुध्यांक, कमी शैक्षणिक कामगिरी, कमी एकाग्रता, कमी उंची, कमी शारिरीक वाढ, कमजोरपणा, कमी उत्पादकता, कमी उत्पन्न, संवाद कौशल्याची कमतरता, कमी समज, अडचणींना समजण्याची कमी क्षमता, स्नायुंची कमजोरी असे विपरित परिणाम होतात. भारतातील बऱ्याच भागात कित्येक ठिकाणी पिढ्यानपिढ्या उपयुक्त वेळेस मुलांना योग्य आहार न मिळाल्यामुळे अशाच प्रकारचे परिणाम सर्वसाधारण लोकांमध्ये दिसतात. उदा. सर्वसाधारण उंची पांच फुटापेक्षा कमी असणे, गरोदर मातांची उंची कमी असल्यामुळे धोकादायक बाळंतपणे होणे, मोठ्या संख्येने कमी वजनाची मुले जन्माला येणे, शाळेत शिकण्यास अडचणी इत्यादी.
महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुध्दीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासन विविध मार्गानी प्रयत्न करत आहे. कुपोषण मुख्यत: पहिल्या दोन वर्षातच निर्माण होते. परंतु अजूनही लोकांना पहिल्‌या दोन वर्षातील आहाराचे महत्व कळलेले नाही. यामुळे कुपोषणाची समस्या अजूनही कायम आहे. यासाठी महाराष्ट्र कुपोषणमुक्त करण्यासाठी राज्यभरात राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान शासनातर्फे राबविण्यांत येत आहे.

अभियानाची उद्दिष्टे

1) राज्यात पिढ्यानपिढ्या होणाऱ्या कुपोषणाच्या दुष्टचक्रावर मात करणे व यासाठी Life Cycle Approach वापरणे.

2) -9 ते 24 महिने या कालावधीवर लक्ष केंद्रीत करुन सर्व बालके साधारण श्रेणीत आणणे आणि आयुष्याची सुरुवात चांगली करणे.
3) बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे म्हणजे दीर्घकालिन कुपोषणावर मात करणे जेणेकरुन दोन वर्षात मुलांची उंची योग्य प्रमाणात वाढेल.
4) वरील बाबींचा विचार करतांना सर्व ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग घेणे, लोकसहभाग घेणे, जनजागृती करणे व लोकचळवळ उभी करणे.

अभियान कालावधीत विविध उपक्रम

1) 0 ते 6 वर्षे वयोगटातील सर्व बालकांचे सर्व ग्रामस्थांसमोर वजन व दंडघेर घेणे, बालकांची वर्गवारी करणे (SUW,MUW,SAM,MAM, Noemal) या कामी आशाचा सहभाग घेणे.

2) नवजात बालकांचे वजन घेणे, नोंदी ठेवणे पुर्वी जन्मलेल्या बालकांचे जन्माचे वेळचे वजनाचे रेकॉर्ड बघणे.
3) किशोरवयीन मुलींचे वजन, उंची BMI (उंचीप्रमाणे वजन) व हिमोग्लोबीन (HB) मोजणे.
4) गरोदर मातांचे वजन व हिमोग्लोबीन मोजणे व त्यांचे सनियंत्रण करणे.
5) Community Growth Chart वापरुन मुलांचे वर्गीकरण करणे व पालकांमध्ये जनजागृती करणे.
6) गरोदर महिलांना लोहयुक्त गोळ्या नियमितपणे घेण्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच आहाराविषयी मार्गदर्शनल करणे. 
7) सर्व कुपोषित मुलांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करणे व यासाठी जास्तीत जास्त ग्राम बाल विकास केंद्र व बाल उपचार केंद्र सुरु करणे.
8) लहान मुलांची काळजी व Growth Monitoring करण्याबाबत आशाचा सहभाग घेणे व त्यांना प्रशिक्षण देणे.
9) बालकांचे दंडघेर कसे घ्यावेत याबद्दल अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देणे.
10) दोन वर्षाच्या आतील मुले असणाऱ्या माता व इतर मातांना निमंत्रित करुन पाककृती प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करणे.
11) ग्राम आरोग्य व पोषण दिवस साजरा करणे व त्याअनुषंगाने माता बैठका आयोजित करणे व जनजागृतीसाठी विविध उपलक्रम राबविणे.
12) तीन वर्षापेक्षा कमी वयातील बालकांची काळजी घेण्यासाठी पाळणाघर सुरु करणे.
13) विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, युवक मंडळे, महिला मंडळे, स्वयंसहाय्यता बचत गट, अशासकीय संस्था, कृषी विद्यापिठेृ वैद्यकीय महाविद्यालये, MSW महाविद्यालये, गृहविज्ञान महाविद्यालये, लोकप्रतिनिधी, सहकारी संस्था यांचा सक्रीय सहभाग घेणे.
14) ज्या अंगणवाडीत वजनकाटे उपलबध नाहीत तेथे तीन प्रकारचे वजनकाटे VHNC मधून उपलब्ध करुन देणे. तयामध्ये झोळीचा (Salter Scale) नवजात मुलांसाठी Baby Tray वजन काटे व किशोरवयीन मुली व मातांसाठी Adult Scales.
15) गरोदर मातांना कमीत कमी एक वेळचा अतिरिक्त हाजार देणे.
16) मिल्क बँकच्या संकल्पनेबद्दल प्रसिध्दी देणे, जेणेकरुन कामावर जाणाऱ्या माता तयांचे दूध काढून लहान मुलांसाठी ठेवू शकतात.
17) कामाच्या ठिकाणी `हिरकणी कक्षाची` स्थापना करणे, जेथे माता बाळाला स्तनपान करु शकतील किंवा दूध काढू शकतील.
18) लोककला, पथके, भजनी मंडळे, किर्तनकार, चित्ररथ इ. पारंपारिक माध्यमांचा वापर करणे. तसेच यात्रा, जत्रा, आठवडे बाजार येथे प्रदर्शने भरविणे.
19) गृहभेटीद्वारे वैयक्तिक मार्फत समुदपदेशन करणे.
20) प्रचार प्रसिध्दीसाठी LCD,TV, DVD,CD Player इत्यादीचा वापर करणे.
21) गावात विविध ठिकाणी परसबाग विकसित करणे. उदा. शाळा, अंगणवाडी, आश्रमशाळा, घराच्या मागे इ.
22) नवविवाहित जोडप्यांबरोबर सासू, आई व कुटुंबाचे समुपदेशन करणे.
23) विविध ठिकाणी व्हिडीओ फिल्मस् व ऑडिओ संदेशाद्वारे प्रचार प्रसिध्दी करणे, वृततपत्रांमध्ये लेख छापणे.
24) स्त्रीरोगतज्ज्ञ व बाल रोगतज्ज्ञांमार्फत वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करणे. 
25) शासकीय रुग्णालयांमध्ये विशेषत: प्रसुतीकक्षामध्ये, प्रतिक्षा कक्षामध्ये व्हिडीओ फिल्म दाखविणे व ऑडिओ संदेश प्रसारित करणे.
26) विविध प्रकारच्या प्रसिध्दी माध्यमांचा IEC वापर करणे, व्हिडीओ/ऑडीओ/ संदेश विकसीत करणे.

माता व कुटुंब सक्षमीकरण

लोक सहभागाचा विचार करतांना सर्वप्रथम बालकांचे माता व कुटुंब यांचा वक्रीय सहभाग महत्वाचा ठरतो. कुपोषणमुक्तीच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपायांनी मातेला व संपूर्ण कुटुंबाला सक्षम करणे आवश्यक ठरते. तयासाठी प्रतयेक गावात, शहरी भागात, अंगणवाडी कार्यक्षेत्रात किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व कमी वजनाच्या बालकांच्या माता यांचे संघ स्थापन करुन त्यांना माता बैठकांच्या माध्यमातून सांघिक पध्दतीने व गृहभेटीच्या माध्यमातून वैयक्तिक पध्दतीने आहार आरोग्याबदबत समुपदेशन करण्यात यावे.

खाजगी रुग्णालय व नर्सिंग होममध्ये होणाऱ्या प्रसुतीवर सनियंत्रण

आतापर्यंत विविध शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या प्रसुतीवर सनियंत्रण ठेवण्यात येत आहे. गरोदर मातांचे वजनवाढ व आरोग्य तपासणी, बाळंतपणानंतर स्तनपान या बाबींवरही सनियंत्रण ठेवण्यात येत आहे. परंतु अजूनही मोठ्या प्रमाणावर (अंदाजे 70 टक्के) खाजगी रुग्णालयात व नर्सिंग होममध्ये प्रसुती होतात. अशाठिकाणी जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरु करणे, सहा महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान इ. बाबींकडे दुर्लक्ष होते. काही नर्सिंग होममध्ये नवजात शिशुंना आईचे चिक दुध अजूनही पाजले जात नाही. तीन दिवसापर्यंत स्तनपान सुरु करण्यात येत नाही. निव्वळ स्तनपानाबद्दल योग्य प्रकारे समुपदेशन दिले जात नाही. उलट खाजगी कंपन्यांचे विविध पोडक्ट्स, मिल्क पावडर किंवा वरचे दूध देण्याबद्दल चुकीचे मार्गदर्शन करण्यांत येते. या अभियादाद्वारे खाजगी नर्सिंग होममध्ये पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष जबाबदारी आहे.

अंगणवाडी, बीट, प्राथमिक आरोग्य केंद्र व बाल विकास प्रकल्प यांना पुरस्कार

अंगणवाडी, बीट, प्राथमिक आरोग्य केंद्र व बाल विकास प्रकल्प यांना पुरस्कार देण्यात येणार असून या अभियानासाठी होणारा खर्च सन 2013-14 या वित्तीय वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीतून भागविण्यांत येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी गांव, तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावरील संबंधितांनी त्या त्या ठिकाणच्या आरोग्य विभागाशी संपर्क करावा.

महाराष्ट्र राज्यात राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी तसेच महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी बुध्दीवान आणि सर्व गुणसंपन्न होण्यासाठी सर्वांनीच सक्रीय सहभाग घेणे अत्यावश्यक आहे. 

लेखक -रवींद्र घोगे, नाशिक.

स्रोत : महान्यूज

 

अंतिम सुधारित : 11/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate