অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पर्यटनाच्या विकास - महाभ्रमण

पूर्वीच्या काळी केवळ देव-दर्शनापुरते असणाऱ्या पर्यटनाच्या आता कक्षा एवढ्या विस्तारल्या आहेत की, ‘पर्यटनाला गगन ठेंगणे’ असचं म्हणावे लागेल. पावसाळी, उन्हाळी व हिवाळी असे तीन मुख्य विभागात सध्याचं पर्यटन विस्तारल्याचं दिसतयं. उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी होणारी गर्दी, गिरीभ्रमंती, अभयारण्यातील फेरफटका, गिर्यारोहणाची युवक वर्गात मोठी क्रेझ निर्माण झाली. दुर्ग-किल्ले, डोंगर दऱ्यांतील धरती पांढऱ्या शुभ्र धुक्याने लपटलेली... हिवाळ्यातील शाली नयन मनोहारी पर्यटनालाही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. कृषी पर्यटन, साहसी पर्यटन आदी पर्यटनाच्या नवीन संकल्पना जनमानसात दृढ व्हाव्यात आणि या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच लाभार्थ्यांचा आर्थिक विकास व्हावा, या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ मार्फत 'महाभ्रमण' योजना राबविण्यात येत आहे याविषयी थोडेसे...
पर्यटनाची एखादी नवीन संकल्पना राबवून या दृष्टीकोनातून पर्यटकांना सर्व सुविधा पुरविणे हा महाभ्रमण योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्राच्या मातीची, संस्कृतीची व परंपरेची विविधांगी ओळख व्हावी आणि पारंपरिक पर्यटनापेक्षा वेगळी अनुभूती पर्यटकांना मिळावी, यासाठी महामंडळाने योजना सुरु केली आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर, मुळशी, मावळ याठिकाणी या योजनेचे परवानाधारक लाभार्थी आहेत. तथापि अद्यापही या महाभ्रमणसाठी नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाव आहे.
महाराष्ट्रात काही शेतकरी, खाजगी उद्योजक तसेच अशासकीय संस्था पर्यटनाच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यातून पर्यटकाला महाराष्ट्राच्या बहुरंगी अस्तित्वाची ओळख होते. मातीशी नाळ जोडलेल्या शेतकऱ्यांची जीवनशैली, डोंगर-दऱ्यातून पदभ्रमण करताना पानाफुलांची सळसळ, वाऱ्याने घातलेली शीळ, गिर्यारोहणातून अनुभवास येणारे सह्याद्रीच्या कड्या-कपारींचे साहसी आव्हान, घनदाट जंगलाच्या पाणथळ जागावर श्वापदाचा अलगद वावर, अवखळ नद्यांच्या प्रवाहाशी खेळ, समुद्र तळाच्या अनोख्या विश्वाचा शोध, आदिवासींच्या कला, हस्तकला, सण उत्सवातून दिसणारा उत्साह व रंगोत्सव ह्या सर्व बाबी पर्यटनाचा एक वेगळा अनुभव देणाऱ्या आहेत. अशा शेतकऱ्यांना, उद्योजकांना व अशासकीय संस्थांना एका छत्राखाली (महाभ्रमण) आणून त्यांच्या प्रयत्नांची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा प्रचार-प्रसार करणे व पर्यायाने महाराष्ट्रातील पर्यटनाला एक वेगळे परिमाण प्राप्त करून देणे यासाठी महाभ्रमण संकल्पना सर्वत्र रुजत आहे.

महाभ्रमण योजनेखाली नोंदणीसाठी आवश्यक बाबी

• विहित नमुन्यातील नोंदणी अर्ज
•जेथे योजना राबविली जाते त्या जागेचे मालकीपत्र अथवा वापर परवाना वा मालकाचे संमतीपत्र (आवश्यक असेल तेथे)
•योजनेची माहिती व वैशिष्ट्ये (पारंपारिक पर्यटनापेक्षा वेगळे) व रंगीत छायाचित्रे
• पर्यटकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा तपशील व सुरक्षा
• आरोग्य व अधिकृत माहिती याबद्दल थोडक्यात तपशील. 

योजनेची ठळक मार्गदर्शक तत्वे

• योजना महाराष्ट्र राज्यात राबविली असली पाहिजे
• पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणारी पॅकेजेस सेवा-सुविधा, शेती, निसर्ग, साहसी क्रीडा, ऐतिहासिक वारसा, कला, हस्तकला, पाककला, जंगले व पर्यावरण, परंपरा व जीवनशैली या विषयांवर आधारित असावीत. 
•पॅकेजस पर्यटनाच्या रूढ संकल्पनापेक्षा वेगळी अनुभूती देणारी असावीत. 
• योजनेसंबंधित अधिकृत माहिती देणारे सेवक, मार्गदर्शक प्रशिक्षित असावेत. 
• पर्यटकांची वैयक्तिक सुरक्षा तसेच त्यांच्या सामानाची काळजी घेतली जावी.
• स्वच्छता व आरोग्य यांची दक्षता व उपाययोजना असावी. 
• प्रसाधनगृह, खानपान, निवास व्यवस्था दर्जेदार असावी. 
• महाराष्ट्राच्या कला, लोककला, पाककला, परंपरा याबद्दल माहिती असावी व त्यांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रचारासाठी प्रयत्न व्हावेत. 
• महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नियुक्त अधिकाऱ्यांना प्रकल्प, योजनेला भेट देण्याचा अधिकार असेल त्या संबंधित अधिकाऱ्याने मागितलेली माहिती देणे लाभार्थ्यास बंधनकारक असेल. 
• नोंदणी केलेल्या योजनेबाबत तक्रारी आल्यास व पाहणीअंती त्या योग्य व खऱ्या आढळल्यास दिलेले नोंदणीपत्र रद्द करण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा अधिकार असेल
• तथापि तत्पूर्वी अशा तक्रारी दूर करण्याविषयी व त्याबाबत स्पष्टीकरण देण्याविषयी नोंदणीपत्रधारकाला संधी देण्यात येईल.

'महाभ्रमण' योजनेखाली नोंदणीपात्रधारकास मिळणारे फायदे

• पर्यटन महामंडळातर्फे नोंदणीकृत योजनांची राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी केली जाईल.
• त्यात जाहिरात, प्रसिद्धी साहित्य, इंटरनेट संकेतस्थळ व कालांतराने ऑनलाईन आरक्षण सुविधा यांचा समावेश असेल. 
• आर्थिक उलाढालीत वाढ-पर्यायाने आर्थिक फायद्यात वाढ व महाराष्ट्राच्या पर्यटन विकास कामाला हातभार. उद्योगांची व्याप्ती व पत वाढण्यास मदत होईल. 
• शासकीय मान्यतेमुळे पर्यटकांत विश्वासार्हता वाढेल.
• इतर शासकीय विभाग व स्थानिक प्रशासनाकडून येणाऱ्या अडचणी सोडविण्यात पर्यटन महामंडळाची मदत होईल. 
• सहसदस्यांशी संवाद (सभा, परिसंवाद, इ. द्वारे) साधून योजनेत सुधारणा तसेच नवनवीन संकल्पना स्थानिक उत्पादनास बाजारपेठ मिळू शकेल. 
• स्थानिक रोजगार निर्मिती होईल. स्थानिक कला, लोककला, पाककला यांना उत्तेजन मिळेल. 
• पर्यटनाचा आर्थिक लाभ ग्रामीण भागात व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचेल. 
• शासनमान्य असा एक प्रभावी मंच लाभल्यामुळे समान समस्यांचे निराकरण सुलभ होईल. 
• महाभ्रमण-पर्यटक समस्या निवारण यंत्रणा म्हणून विकसित होऊ शकेल.

 

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी क्षेत्रिय अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मध्यवर्ती इमारत, पुणे- ०१, दूरध्वनी क्र.- ०२०/२६१२६८६७,२६१२८१६९, फॅक्स- २०-२६११९४३४ येथे संपर्क साधावा.
लेखक- मिलिंद बांदिवडेकर,माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate