অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आलंय ते घ्यायला हवं!

आलंय ते घ्यायला हवं!

अपंग व्यक्तींचं जगणं
त्यांच्या कुटुंबियांच्या उमेदीमुळे,
सकारात्मक पाठिंब्यामुळे
किती फुलू शकतं याची
प्रचिती देणारे
हे काही अनुभव.
एवढ्यातेवढ्या
कारणावरूनही निराश
होणार्‍या अनेकांना
एक धडा देणारे...

‘आलंय ते घ्यायला हवं’ हे माझ्या एका आठ ठिकाणी वेड्यावाकड्या असलेल्या विद्यार्थ्याचे वाक्य. हा आठवीतला १२-१३ वर्षांचा मुलगा. शहाण्या माणसांसारखा बोलायचा. ह्याचं नाव श्रीपाद. त्याच्या घरातील माणसं त्याला प्रेमाने वागवायचीच; पण आमच्या शाळेतील लहान मुलं- त्यांचं नि शिरप्याचं सहजीवन गमतीचं, प्रेमाचं नि सहानुभूतीचं होतं. शिरप्याचा पाय जन्मापासूनच अर्धा होता. तो काठी टेकून कसाबसा चार पावलं चालायचा. त्याची आज्जी त्याला शाळेत आणून सोडायची. कधी आजोबा यायचे. आधी पंधरा मिनिटं येऊन बसायचे. एखाद्या वेळेस शाळा अर्ध्यावरच सुटली तर मात्र शिरप्याचे मित्र त्याला पालखी करून घरी न्यायचे. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणून त्याला हसवायचे. एकदा आठवीचा वर्ग वरच्या मजल्यावर नेला. मुलं रोज त्याला उचलून बाकावर नेऊन बसवायची. पी.टी. च्या तासाला शिरप्या आशाळभुतासारखा वर्गातच बसून मैदानातले व्यायाम प्रकार बघायचा. खेळ चालू झाला की मुलांना ‘बक अप’ करायचा. मुलं सरांना म्हणायची, ‘सर आता गोल बसून ङ्गडकं टाकण्याचा खेळ खेळूया. म्हणजे शिरप्याला खेळता येईल.’ त्याचे हात चांगले होते. त्यामुळे टाळ्या वाजवणं, नाक, कान खाजवणं हे त्याला करता येई. ‘‘शिरप्या, तुझं मित्रमंडळ जबर आहे बाबा. मुलं किती प्रेम करतात नाही तुझ्यावर?’’ एकदा त्याला म्हटलं, तर लगेच म्हणाला, ‘‘मित्र हायेत म्हनल्यावर येवढं करायला पायजेल.’’ त्या दिवशी शाळा सुटतांना आजी त्याला न्यायला आली. मी त्यांना म्हटलं, ‘आजी, तुमचा नातू आता मोठा होत जाणार, तुम्ही थकत चाललाय. नेणं जमतय का? वाईट वाटतं ना त्याची ही परिस्थिती बघून?’’

‘‘मला झेपत न्हाय वं. पर त्याचे आय-बा कामाला जातात, ह्याला आमच्या शिवाय कोन हाय? मी रोज येकलीच रडते घरी. पर त्याच्या म्होरं न्हाय रडत. माझ्या डोळ्यातलं पानी बघून परवा म्हनला, ‘‘आज्ये रडू नको. मी धावीपातुर शिकतो. मग मला टेलिफोन  बूथ काढायचा हाय. म्या काय वाया जानार न्हाई.’’
‘‘व्हय बाबा. तू येकदा सोताच्या पायावर हुबा र्‍हायलास की मी मरायला मोकळी.’’

‘‘मरू नकोस. माजं लगीन, पणतू बघायचा हाय न्हवं?’’ आजीने त्या दोघांतलं संभाषण मला सांगितलं. तेव्हा मी थक्क झाले. आजीला लहानग्या शिरप्याने धीर दिला होता. त्याच्यासाठी कष्ट करणं, त्याच्यावर माया करणं; जेवढं करता येईल तेवढं करून त्याला त्याच्या पंगूपणातून बाहेर काढणं हे सगळं आजी नि घरची सगळीच करीत होती. म्हणून तर शिरप्या एवढा बिनधास्त झाला होता. त्याचा भविष्यकाळ कसा असेल माहीत नाही.
***
इचरकरंजीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात अध्यक्ष पु.ल. देशपांडेंनी ज्यांना गौरवलं ते आमच्या सांगलीचे प्रतिभावंत कवी राम गोसावी. पुलं त्यावेळी म्हणाले होते, ‘‘जळगावच्या साहित्य संमेलनांने महाराष्ट्राला ‘बालकवी’ दिले; या संमेलनात आम्ही महाराष्ट्राला हे कवीराज देत आहोत.’’ जीवनाच्या अनेकानेक पैलूंचा रसरशीतपणे अनुभव घेणार्‍या ह्या कवीवर वयाच्या चाळीसाव्या वर्षी दारूण दु:खाचा पहाड कोसळला. डिटॅचमेंट ऑङ्ग रेटिना’’ ह्या डोळ्यांच्या दुर्धर विकाराने त्यांची दृष्टी गेली. अंधारात चाचपडण्याची वेळ आली. चांगली सरकारी नोकरी सोडावी लागली. मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी प्रिय पत्नीच्या साथीने दोन मुलांसह तन्मयतेने केलेल्या संसाराची झुळझुळती हिरवी वाट रखरखीत वाळवंटात लुप्त झाली नि अंधाराच्या निबिड अरण्यात बद्ध होऊन रहावं लागलं. निराशा, वैङ्गल्य, परावलंबन अशा घोर शापांनी मनातले कोवळे काव्यांकुर करपून जाऊ लागले. तिमिराची खडतर वाट हे दाहक सत्य स्वीकारून वेदना सोसत रहायची की असल्या भयंकर पर्वाचा कायमचा अंत करायचा अशा विचाराने मन कावरंबावरं झालं. अशा वेळी रामभाऊंची पत्नी नलिनी हिच्या खंबीर नि प्रेमळ आधाराने ते सावरले थोडेसे. ‘मावळतीचे रंग’ हा कवितासंग्रह त्यांनी आपल्या पत्नीलाच अर्पण केलाय. अर्पणपत्रिकेत ते म्हणतात ‘तिच्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद, प्रेम, प्रकाश यांची बरसात झाली. तिच्यामुळे माझी काव्यवेल पुन्हा बहरली. माझं अंधारातलं जगणं कृतार्थ झालं.’’ कविवर्य शंकर वैद्य यांनी सातार्‍याच्या कविसंमेलनात उत्स्फूर्तपणे चार ओळीतच नलिनीबाईंची करुणामूर्ती साकार केली होती. ती अशी.....
दैव कोपले तरीही, दु:ख घालुनिया पाठी|
पतीसाठी ती जहाली, डोळे असलेली काठी॥

राम गोसावीना अंधत्व आलं तेव्हा नलिनीबाई ‘गांधारी’ नाही झाल्या. खरं तर त्या स्वत: कलावंत होत्या. शिवण, भरतकाम, संगीत, अभिनय यासाठी धडपडणार्‍या होत्या. ८-९ वर्षांच्या असताना ‘सुखाचा शोध’ या सिनेमात मीनाक्षीबरोबर बागेत बागडण्याचा अभिनय त्यांनी केलेला. कान्होपात्रा नाटकात त्या नायिका झालेल्या. सुखभावी, सुगृहिणी म्हणून त्या घरोघरी प्रिय होत्याच. पण रामभाऊंना जेव्हा निष्क्रिय होऊन घरात बसावं लागलं तेव्हा त्या घराबाहेर पडल्या. आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून अनेक खटपटी करून शिक्षिकेची नोकरी मिळवली नि आपल्या दोन्ही मुलांचा नि पतीचा संसाररथ चालवण्यासाठी त्या धीरोदात्तपणे सिद्ध झाल्या. पण एवढंच करून त्या थांबल्या नाहीत. आपल्या पतीला अंधत्वामुळे आलेल्या मानसिक धक्क्यातून सावरायचं असेल तर त्यांच्या प्रतिभेची ज्योत जपायला हवी. त्या तेवढ्या विरंगुळ्याने का होईना, त्यांच्या आयुष्याला प्रकाशाचं वरदान मिळेल अशा समजूतदारपणाने त्या ‘लोपामुद्रा’ झाल्या. आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून पतीच्या कवितेची त्या ‘सखी’ झाल्या. उत्तमोत्तम पुस्तक त्यांना वाचून दाखवणे, त्यांना रात्री अपरात्री सुचलेल्यासुद्धा कविता उतरून घेणे, त्या पुन्हा वाचून दाखवणे, त्यांची उत्तम प्रत तयार करून निरनिराळ्या मासिकांकडे पाठवणे अशी कामे त्या न कंटाळता करू लागल्या. संसार नोकरी नि हे काम हसतमुखाने करून त्या पतीला उत्साह देत; प्रेरणा देत. रामभाऊंना जिथे जिथे काव्यवाचनासाठी निमंत्रण येई तिथे त्या त्यांच्याबरोबर जात. त्यांना आवडणारी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम यापासून ते वंचित राहू नयेत म्हणून नलिनीबाई त्यांना घेऊन जात. काव्यवाचनाच्या वेळी त्यांच्या शेजारी बसून त्यांना माईकपर्यंत पोचवण्याचं काम त्या करीत. २००२ सालापर्यंत म्हणजे वयाच्या ७२ व्या वर्षापर्यंत नलिनीबाईंनी रामभाऊंना अशी साथ दिली. २००२ साली हार्टऍटॅकने त्या वारल्या, तेव्हा पुन्हा एकदा राम गोसावींवर आभाळ कोसळलं. पण मुलगा, सून, आप्त, मित्र यांच्या सहकार्याने त्यांनी सकारात्मक विचार केला. कवितेचा विचार हीच आता त्यांची प्रेरणा नि आधार.
‘मावळतीचे रंग’ या कवितासंग्रहात आपल्या पत्नी विरहानंतर लिहिलेल्या वीस कवितांचा स्वतंत्र विभागच त्यांनी केला आहे. त्या सर्व कवनातून त्या दोघांचं सहजीवन मूर्तीमंतपणे प्रतीत होतं.
***
अपंग आणि त्यांचे कुटुंबीय सर्वांनीच घेण्याचे हे असिधारा व्रत. अशा काही कुटुंबांना जवळून पाहताना आपल्याही मनाला पाझर फुटतात. जीव कातरतो, थोडा थोडा होतो. बरीच वर्षे झाली, त्यावेळी पोलिओची लस निघाली नव्हती. खूप मुलं पोलिओग्रस्त व्हायची. मिस्टरांची बदली वेंगुर्ल्याला झाली. चांगल्या घराच्या शोधात आम्ही होतो. एक चार खोल्यांचं चांगलं घर मिळालं. भरपूर झाडे, पुढे मागे अंगण, मुलांना खेळायला प्रशस्त जागा. एकच गोष्ट खटकत होती. लागूनच्या चार खोल्यात एक कुटुंब रहात होतं. त्यांची तरुण मुलगी पोलिओमुळे पूर्ण अपंग झालेली होती. कमरेखालचा भाग लुळा, कमरेच्या वरचा भाग तेवढा बरा. चेहरा सतेज होता. केस भरदार होते, पण एकूण मूर्ती व्यंगचित्रासारखी होती. मला वाटलं, नको हे घर घ्यायला. सतत ही मुलगी डोळ्यासमोर राहणार. आपली मुलं लहान, त्यांनी आताच जीवनाची काळी बाजू कशाला बघावी! हो ना करता करता गेलो तिथेच रहायला. अपंग मुलीचं नाव होतं सुमन. शरीर विद्रूप असलं तरी तिचं मन खरंच ‘सु’ होतं. तिच्याहून लहान भाऊ सुधीर नि त्याहून लहान बहीण चित्रा. सुंदर, शेलाटी कॉलेज कुमारी. वडील कुठेतरी लांब नोकरीला होते. असा संसार आई प्रेमाने करीत होती. सुमनवर सर्वांचं खूप प्रेम होतं. तिला समज चांगली होती. बुद्धी तेज होती. गाण्याचा आवाज चांगला होता. धाकटा भाऊ बहीण तिला मान द्यायचे. आई घर चालवताना तिचा सल्ला घ्यायची, वडिलांची पगाराची मनीऑर्डर तिच्या नावावर यायची. तिचं अपंगत्व कोणीही अधोरेखित करीत नसत. सर्वांनी ते अपरिहार्यपणे स्वीकारलं होतं. बारीक, दुबळ्या पायांना दुमडून घरभर घसटत ङ्गिरायची. परड्यातल्या संडासलाही ती रानागवतातून घसटत जायची. तिघांपैकी कुणीतरी टमरेल न्यायचं. पुढचं ती कसं करायची आम्हांला कळायचं नाही. ते सर्व होताना आपल्या सरकत जाण्याबद्दल किंवा परावलंबनाबद्दल कोणतंही दु:ख किंवा संकोच तिच्या चेहर्‍यावर दिसायचा नाही. जणू काही ती सर्वांसारखी नॉर्मलच होती. तिचं मालवणीतलं बोलणं आठवतं - ‘माका दोन वेळेला परसाकडे जावचां लागता. कमी पावडरीचो च्या माका आवडत नाय. आमची चित्री अजून अल्लड असा. तिला ङ्गॅशन कशी करूची कळनां नाय. कशावरबी काय बी घालता. आता तरण्याताट्या चेडवान मॅचिंग करूक नको? नि ह्यो घोडो, आब्यास करताना दिसता तुमका वयनी? भटकत र्‍हवता. आता बाबांका कळवलंय. तुमी नाय तर घराचो गोठो केल्यानी. आमची माय म्हंजी गरीब गाय. पोरांवर वचक नाय तिचो. नुसता रांदून घालूचा येवड्याच तिका येता.’ अशा सुमनच्या प्रेमळ तक्रारी चालायच्या. जेमतेम अर्ध्यामुर्ध्या शरीराची ती कुटुंबप्रमुख असल्यासारखी सगळ्यांना खुळ्यात काढायची. सगळी तिचं म्हणणं मान्यच असल्यासारखं वागायची. त्या कुटुंबाने तिला जपलं होतं. तिचा ङ्ग्रॉक शिवायला शिंपी घरी आला की ही आपल्या गळ्याची, बाहीची कशी ङ्गॅशन हवी हे चित्र काढून दाखवायची. तिच्या ङ्ग्रॉकमधलं तेवढंच तर लोकांना दिसण्यासारखं; पण तिला स्वत:लाच ङ्गॅशनेबल ङ्ग्रॉक हवा असायचा. तिला गाण्याची ङ्गार आवड होती. त्यातलं कळायचंही तिला. रेडिओ तिचा कायमचा मित्र. त्याकाळी टी.व्ही. नव्हता. ‘‘लताची सर कोण्याकच नाय. आशा मेली खट्याळ हा. गाणी म्हणताना किती ते नखरे. तिका किशोरच सोबता. लताक मुकेश, रङ्गी... कोनीबी. भीमसेन म्हंजी काय ऋषीतुल्य तो’’ अशी तिची शेरेबाजी चालायची. आई म्हणायची, ‘‘आमच्या सुमग्याक इचारा. समदी म्हायती असा तिका.’’ ‘‘ताई, गॅदरिंगात कोनचा गाना म्हनु?’’ चित्रा विचारायची. सुमनचे हात निर्व्यंग होते. ती पेटी वाजवायची. गाणं शिकवायला मास्तर येत. ते यायच्या वेळी सुमन वेणीङ्गणी, पावडर, कुंकू करून बसायची. कुब्जेने कृष्णावर करावं तसं प्रेम ती मास्तरांवर करीत होती असं वाटायचं. गावात नाटक यायची. ओपन एअरमध्ये असायची. सगळी नाटकाला जायची. भाऊ सुमीला सायकलवरून न्यायचा. मधूनमधून वडील सुट्टी घेऊन यायचे. घरात आनंदीआनंद असायचा. बारीक सारीक कारणाने दु:खी होणारी आम्ही, त्या घराचं असामान्यत्व आम्हांला नवलाचं वाटायचं. अपंगांना सर्वसामान्यांसारखं वागवावं, असं समुपदेशन नेहमी केलं जातं. शेजारचं कुटुंब म्हणजे एक आदर्श समुपदेशन केंद्रच होतं. जे घर आम्हांला नको वाटत होतं ते सोडताना पोटात तुटत होतं. सुमीचं पुढे काय झालं कळलं नाही. तेवढाच होता त्यांचा आमचा अनुबंध. एक धडा मात्र मिळाला आम्हांला- आलंय ते घ्यायला हवं!
अपंगांच्या सहजीवनाची अशी ही काही चित्रं. ज्यांच्यावर नियतीने कठोरपणे अन्याय केला, त्यांना सावरण्यासाठी झटणारी काही कुटुंब नि माणसं!
----
मीनाक्षी सरदेसाई
सांगली
चलभाष : ९५६१५८२३७२

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate