অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक विज्ञाने

सामाजिक विज्ञाने

सामाजिक विज्ञाने

( सोशल सायन्सिस ). मानवाच्या सामाजिक-सांस्कृतिक वर्तनाशी संबद्घ असलेल्या समग विज्ञानांचा निर्देश करणारी एक प्रणाली वा संकल्पना. ही संज्ञा ढोबळमानाने माणूस आणि समाज यांमधील संबंधांबाबत अभ्यास करणाऱ्या कोणत्याही विशिष्ट प्रणालीला लावली जाते. शालेय स्तरावरील सामाजिक विज्ञानांच्या अध्ययनास सामाजिक मनन वा अभ्यास (सोशल स्टडीज) म्हणतात; तर विद्यापीठीय स्तरावरील मानवी वर्तनाशी सुसंबद्घ असलेल्या विषयांच्या उच्च दर्जाच्या संशोधनात्मक अध्ययन व अध्यापनास सामाजिक विज्ञाने ही संज्ञा देतात.

सामाजिक विज्ञानांचा प्राथमिक उद्देश मनुष्यातील भयगंड, पूर्वग्र ह आणि मनोविकार (भावना) जाणून घेऊन त्या नियंत्रित करण्यास साहाय्य करणे हा होय. सामाजिक विज्ञानात सामान्यतः मानवशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीचा अभ्यास हे विषय प्रामुख्याने अंतर्भूत होतात.

शिवाय सामाजिक आणि आर्थिक भूगोल, शिक्षण, तुलनात्मक विधीचा अभ्यास आदींचाही समावेश त्यात करतात. १९५० नंतर वर्तनशास्त्र ही संज्ञा प्रचारात आली असून तिचाही अंतर्भाव या विज्ञानात करतात; कारण या संज्ञेचा संबंध शारीरिक मानवशास्त्र आणि शरीरक्रिया मानसशास्त्र यांच्याशी येतो आणि ती विज्ञाने मानवी वर्तनाशी घनिष्ट संबंधित आहेत. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते वर्तनशास्त्र ही संकल्पना कदाचित पुढील काळात सामाजिक विज्ञानांची जागा घेईल; कारण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सामाजिक विज्ञानांऐवजी वर्तनशास्त्र ही संज्ञा अधिकतर प्रचारात आली असून, या दोनही संकल्पना कदाचित समानार्थीच वापरल्या जातील.

सामाजिक विज्ञानांपैकी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, तुलनात्मक विधी वगैरे काही विषय मुख्यत्वे मानवी जीवनाशी अधिक संबंधित आहेत. किंबहुना मनुष्याच्या दैनंदिन जीवनाशी ते निगडित आहेत; कारण अर्थशास्त्रात मुख्यत्वे उत्पादन ( निर्मिती ), वितरण आणि उपभोग (सेवन ) या संदर्भांत होणारे वस्तुविनिमय आणि सेवा यांचे विश्लेषण व वर्णन असते. त्याची एक प्रमुख शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र (मायको इकॉनॉमिक्स) असून तिच्याद्वारे शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांच्या व्यक्तिगत वर्तनाविषयी चर्चा होते.

दुसरी अर्थशास्त्राची शाखा साकलिक अर्थशास्त्र (मॅको इकॉनॉमिक्स) होय. तीत अर्थशास्त्राच्या सर्व प्रणालींविषयी (सर्व पद्घतींविषयी), विशेषतः उत्पादाचा (प्रतिलाभाचा) सामान्य समतोल व उत्पन्न आणि अर्थव्यवस्थेतील विविध दलांतील परस्परसंबंधांचा ऊहापोह केलेला असतो; तर राज्यशास्त्र हे शासकीय प्रक्रियांचे, विश्लेषणाच्या वैज्ञानिक पद्घतींचे उपयोजन करून पद्घतशीर रीत्या विवेचन-अभ्यास करणारे एक शास्त्र होय.

थोडक्यात परंपरागत कार्यरत असलेल्या राज्यसंस्थेचा, तिच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांच्या कार्यपद्घतीचा अंतर्भाव राज्यशास्त्राच्या अभ्यासात होतो. आंतरराष्ट्रीय संबंध ही राज्यशास्त्राची एक उपशाखा असून ती भिन्न देशांतील परस्परसंबंध आणि परराष्ट्रीय धोरण यांविषयी अभ्यास करते. समाजाचा, सामाजिक संस्थांचा आणि सामाजिक संबंधांचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारे समाजशास्त्र हे एक शास्त्र आहे.

समाजाचा विकास, त्याची रचना, त्यातील आंतरक्रिया आणि संघटित मानवी समूहांचे सामुदायिक वर्तन यांचा क्रमबद्घ अभ्यास हे निस्संदिग्धपणे समाजशास्त्राचे क्षेत्र होय. सामाजिक मानसशास्त्र हे समाजशास्त्राचे आनुषंगिक क्षेत्र असून त्यात व्यक्तिमत्त्व अभिवृत्ती, प्रेरणा आणि व्यक्तीचे वर्तन यांवर सामाजिक समूहांचा कितपत प्रभाव पडतो, या रीतींशी संबंधित विशेषांचा अभ्यास केला जातो. सामाजिक मानवशास्त्र मानवी संस्कृतीशी–विशेषतः सामाजिक रचनाबंध, भाषा, विधी, राज्यशास्त्र, धर्म, जादूटोणा, कला आणि तंत्रज्ञान यांच्याशी संबद्घ असते.

सामाजिक मानवशास्त्र मुख्यत्वे मानवी वर्तनातील आकृतिबंधाच्या सामान्यीकरणाशी आणि सामाजिक व सांस्कृतिक दृश्यघटनांशी संबंधित असते. तुलनात्मक विधी हीसुद्घा सामाजिक विज्ञानाचीच एक शाखा वा उपविभाग असून ह्या क्षेत्रांतर्गत कायदेशीर तत्त्वे, तत्संबंधित संस्था आणि विविध राष्ट्रांची कार्यविधी प्रक्रिया आणि संस्कृती यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. सामाजिक विज्ञानांची व्याप्ती पिढीनुसार विस्तारत असून त्यांत वरील विषयांबरोबरच इतिहास, भूगोल, शिक्षणशास्त्र,दोषचिकित्सा, धर्मशास्त्र, गुन्हेशास्त्र, लोकसंख्याशास्त्र आदी वर्तनवादाशी संबंधित शास्त्रांचा अंतर्भाव करावा, असा काही आधुनिक समाजशास्त्रज्ञांचा आग्र ह आहे; कारण ही शास्त्रेसुद्घा मानवी वर्तनाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या जवळीक दर्शवितात.

 

पहा : अर्थशास्त्र; मानवशास्त्र; राज्यशास्त्र; समाजशास्त्र.

संदर्भ : 1. Bell, Daniel, The Social Sciences Since the Second World War London, 1981. 2. Perry, John A.; Erna, K. Contemporary Harper, 1984.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate