অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामाजिक नियंत्रण

सामाजिक नियंत्रण

सामाजिकनियंत्रण(सोशल कंट्रोल). समाजावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अंकुश ठेवणारी व्यवस्था. सामाजिक नियंत्रण या संकल्पनेचा अभ्यास हा समाजशास्त्र या संज्ञेच्या उगमापासूनच त्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. समाज सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था प्रस्थापित करतो.सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक नियंत्रण या दोन संकल्पना काही प्रमाणात अप्रभेद्य आहेत;तथापि आधुनिक समाजशास्त्रज्ञांना त्यांतील भेद वा फरक दृष्टोत्पत्तीस आला असून तो मूलतः अंतर्गत नियंत्रणाच्या आणि बाह्य नियंत्रणाच्या प्रक्रियांमधून दृग्गोचर होतो. अंतर्गत नियंत्रणाच्या प्रक्रियेत लोक सामाजिक चालीरीती, रुढी, धार्मिक परंपरा यांवर विश्वास ठेवून त्या प्रभावाखाली वर्तन करतात. या प्रक्रियेला सामाजीकरण ही संज्ञा रू ढ झाली आहे. बाह्य नियंत्रणाच्या सामाजिक प्रक्रियेत प्रमाणित नियमांशी किंवा कायदेकानूंशी जुळवून घेऊन लोक त्याच्या चौकटीत वर्तन करतात. तिचे पालन केले नाही, तर दंडात्मक कारवाई किंवा शिक्षा होते. या प्रक्रियेला बहिःस्थ किंवा नुसते सामाजिक नियंत्रण ह्या संज्ञा समाजशास्त्रज्ञ देतात.

समाजशास्त्रज्ञ बॉटमोर यांनी ‘सामाजिक नियंत्रण’ या संकल्पनेची व्याख्या अचूक दिली आहे. ‘जी मूल्ये आणि नियमने यांच्या योगाने व्यक्तिव्यक्तींमधील आणि समूहांमधील ताण आणि संघर्ष विघटित करून अगर प्रशमित करून एखाद्या मोठ्या समूहाची ऐक्यभावना टिकविली जाते, त्या मूल्यांच्या व नियमनांच्या समुच्च्याला सामाजिक नियंत्रण ही संज्ञा दिली जाते’. समाजातील बहुसंख्य लोक समाजातील प्रमाणित नियम व मूल्यांना अनुरूप वर्तन करतात; तर काही व्यक्ती हे नियम आणि प्रमाणित मूल्ये झिडकारतात. या अपमार्गी (मार्गच्युत) वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात जी यंत्रणा कार्यतत्पर असते, तिला सामाजिक नियंत्रण म्हणतात. सामाजिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी सामाजिक नियंत्रणाची अपरिहार्यता नाकारता येत नाही.

बहुविध प्रकारचे सामाजिक संबंध असणाऱ्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवले, तरच त्यांच्यातील परस्परसंबंधांमध्ये एकसूत्रता येते;व्यक्तींमधील भेद कमी होतात, यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनौपचारिक व औपचारिक नियमने आवश्यक असतात. सामाजिक स्वास्थ्य, स्वार्थी वृत्तीचे निराकरण, सामाजिक सुरक्षितता, विषमता दूर करणे आणि लोकांत सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करणे हे सामाजिक नियंत्रणाचे महत्त्वाचे उद्देश होत. सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक व औपचारिक हे दोन प्रमुख प्रकार होत. अनौपचारिक सामाजिक नियंत्रणात अधिकतर धार्मिक परंपरा व रीतिरिवाज, रुढी, लोकाचार आणि लोकनीती ही साधने प्रभावी ठरतात. या साधनांमध्ये धर्म हा सामाजिक नियंत्रणाचा सर्वांत प्रभावी प्रकार होय. समाजात धर्माचे महत्त्व विलक्षण आहे. धर्माने मानवी जीवनात कायमस्वरुपी स्थान पटकाविले आहे. सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांच्या मते गेल्या दीडशे–दोनशे वर्षांत पृथ्वीवरील आदिम समाजांपासून ते औद्योगिक आणि वैज्ञानिक कांती पूर्ण झालेल्या समाजापर्यंत धर्मसंस्था नाही,असा एकही समाज आढळत नाही. समाजात धर्म न मानणाऱ्या नास्तिक व्यक्ती व संघटना अपवादादाखलच सापडतात. जेथे निसर्गनियमांचे पूर्णतः आकलन होत नाही, तिथे मानवी मन निसर्गातील अलौकिक शक्तीची संकल्पना करते. ईश्वरोपासनेची फलिते किंवा तज्जन्य चमत्कार निसर्गनियमाला अपवाद असले, तरी निसर्गनियम आणि धर्मनियम हे एकमेकांत गुंतलेले असतात, त्यांचा संबंध गृहीत धरलेला असतो. निसर्गनियमांचा आधार घेऊन अलौकिक शक्ती कार्यरत असतात, निसर्गाचे नियंत्रण त्या करीत असतात, म्हणून त्या श्रेष्ठ मानल्या आहेत. या सर्व श्रेष्ठ शक्तींच्या नियामकतेचा सामाजिक नियमबद्घतेशीधर्मसंस्थेने संबंध जोडलेला आहे.

सामाजिक जीवनाला व्यापक नियमबद्घतेची आवश्यकता असते. व्यापक सामाजिक नियम माणसेच बनवितात. माणसांचेपरस्परावलंबित्व व परस्परांवरील क्रिया–प्रतिक्रिया अशा नियमांच्या पालनानुरोधाने घडत असतात. या नियमांच्या पाठीशीदैवी संकेतांचे बळ आवश्यक ठरते. आपले सामाजिक हितसंबंध नियमनाच्या अभावी बिघडतात, म्हणून माणसापेक्षा वरिष्ठ अशीनिसर्गनियामक अलौकिक शक्ती माणसांनी संकल्पिलेली असते. तीच धर्म या संकल्पनेत अनुस्यूत असून त्याच संकल्पनेच्याआधारावर सामाजिक जीवनाचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. रुढी, लोकाचार, लोकनीती, परंपरागत चालीरीती यासर्व संकल्पना धर्माच्या आधीन असून त्या अनौपचारिक सामाजिक नियंत्रणातील महत्त्वाची साधने होत. या अनौपचारिकसाधनांपैकी नैतिकता किंवा नीती यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मानवी समाजाच्या नीतिविषयीच्या काही कल्पना असतात.नीती आणि धर्म यांच्यात फरक असतो. इंद्रियजन्य सुखदुःखांच्या, अर्थात वैषयिक सुखदुःखांच्या, बंधनातून मुक्त आत्मस्थितीम्हणजे परमशांती वा स्थितप्रज्ञता. सुख, मोक्ष, निर्वाण किंवा आत्मानंद हे भारतीय नीतिशास्त्राचे मुख्य उद्दिष्ट होय. योग्य कृत्यकिंवा विहित कृत्य ही नैतिकतेतील मूलभूत संकल्पना असून कित्येक कृत्ये किंवा कित्येक प्रकारची कृत्ये स्वरूपतःचमाणसावर बंधनकारक असतात. नैतिक नियमांना अनुसरून माणसाने वागावे व जगावे. मानवाचे इतर मानवांशी संबंध कसेअसावेत–माणुसकीचे, प्रेमाचे, सचोटीचे, सरळ आणि निर्भेळ–याचा विचार नैतिकतेत केलेला असतो. हे संबंध मानवीमूल्यांवर–समता, मानवता, सामाजिक न्याय– किंवा योग्य काय, अयोग्य काय यांवर अवलंबून असतात. मानवाच्याएकमेकांविषयी असलेल्या व्यवहारांचा सारासार विचार करून त्यावर आधारलेल्या कल्पनांना नीतिकल्पना म्हणतात. दैनंदिनसामाजिक जीवनातील माणसांच्या वर्तनावर नैतिक संहिता नियंत्रण ठेवते. त्यामुळे सदाचार आणि मानवता यांचे भान ठेवलेजाते. व्यक्तींनी स्वतःवरच बंधने घालून घेतलेली असतात. त्यामुळे त्याविरुद्घ वर्तन केले, तर ‘अनैतिक’ असा शिक्का बसतोआणि सामाजिक जीवनातून ती व्यक्ती उतरते. हेगेलच्या मते, नीतीची आत्मजाणीव असलेली व्यक्ती ही एका समाजाची, एकासंस्कृतीची घटक असते. कुटुंब, राज्यसंस्था, व्यवसाय इ. सामाजिक संस्था, प्रचलित रुढी, संकेत या सर्वांद्वारा सामाजिकजीवन मूर्त झालेले असते आणि त्याच्यातून सामाजिक कल्याण साधले जाते.

औपचारिक समाजनियंत्रणात कायद्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजिक नियंत्रणाचा प्रकार पूर्वीच्या काळी मर्यादित स्वरुपात होता. त्यावेळी लोकरूढी, परंपरा, नीती आणि धर्म यांचा प्रभाव होता. प्राचीन भारतात धर्मसत्ता, दंडसत्ता व राजसत्ता(राजधर्म) अशी शासनऐसंस्थेची तीन अंगे अस्तित्वात होती. या तिन्ही सत्ता विद्यमान भारतीय संविधानाच्या अनुकमे उद्देशिका,अधिनियम आणि मार्गदर्शक तत्त्वे यांत आढळतात.

समाज ही एक व्यवस्था मानून त्या व्यवस्थेत व्यक्तिवर्तनाच्या नियमनासाठी केलेले नियम म्हणजे कायदा होय. प्रदेशपरत्वे व देशपरत्वे कायद्याचे स्वरूप भिन्न असते. समाजातील सदस्यांच्या बाह्य वर्तनाला व क्रियांना नियंत्रित करण्यासाठी सामर्थ्यसंपन्न अशा राजकीय सत्तेने अंमलात आणलेले नियम यांत प्रविष्ट असतात. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि स्वास्थ्य रहावे, म्हणून प्रत्येक समाजात शासनसंस्था कायदे करते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाते. कायद्याचेपालन करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, हा सैद्घांतिक सदसद्‌विवेक होय. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर दंडात्मककारवाई किंवा तुरुंगवासाची शिक्षा करण्याची तरतूद प्रस्तुत कायद्यात करण्यात आलेली असते. खेड्यातील माणसांच्यामूलभूत अधिकारांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील माणसांच्या विविध व्यवहारांबाबत कायदे आहेत. समाजातील विषमतानष्ट व्हावी, समतेची निर्मिती व्हावी, जनतेच्या हिताची आणि गरजांची पूर्ती व्हावी, लोकांना सामाजिक न्याय मिळावा, त्यांच्यामूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे इ. समाजहितकारक गोष्टींचा विचार कायदानिर्मितीच्या मुळाशी असतो. कायदा सर्वांना स्पर्शकरणारा, धाक दाखविणारा, गुन्ह्याची दखल घेऊन गुन्हेगाराला न्यायालयासमोर दाखल करणारा आणि गुन्हा सिद्घ झाल्यासशिक्षेची तजवीज असणाऱ्या कारागृह व्यवस्थेपर्यंतची कारवाई करण्यापर्यंत नियंत्रण ठेवणारा सामाजिक नियंत्रणाचा आधुनिकप्रकार आहे. कायद्याची दोन महत्त्वाची कार्ये आहेत : पहिले कार्य म्हणजे ‘मनुष्याला स्थैर्य व विकासाची समान संधी देणाऱ्यामूलभूत समाजव्यवस्थेचे रक्षण करणे’ आणि दुसरे कार्य म्हणजे ‘विविध समूहांच्या हितसंबंधांचे समायोजन साधणे व संघर्ष कमीकरणे’. सामाजिक नियंत्रणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असले, तरी त्याचे स्वरूप मात्र गुंतागुंतीचे होत चालले आहे.

 

संदर्भ : 1. Foucault, M. Madness and Civilization, New York, 1965.

2. Hirschi, Travis, Causes of Delinquency, Berkely, 1969.

3. Korn-hauser, Ruth, Social Sources of Delinquency, Chicago, 1979.

4. Steadman, Hank J. Beating a Rap, Chicago, 1979. काळदाते, सुधा

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate