অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाज प्रबोधनातून रोखली जाईल स्त्री – भृणहत्या ….

समाज प्रबोधनातून रोखली जाईल स्त्री – भृणहत्या ….

(स्त्री -भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते.)

प्रगतीकडे वाटचाल करणार्‍या महाराष्ट्रात आज मुलींचे प्रमाण दिवसें दिवस कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे. राज्यात 1991 मध्ये दर हजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण 946 इतके होते. सन 2001 च्या जनगणनेनुसार मुलींचे प्रमाण 33 ने कमी होऊन ते 913 झाले आणि 2011 च्या जनगणनेनुसार ते प्रमाण आणखी 30 ने कमी होऊन 883 एवढे झाले. आज मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करुन उमलण्याआधीच या कळ्या खुडल्या जात आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर आहे. खरतर 1988 साली देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने लिंगनिवडीस प्रतिबंध करणारा कायदा केला होता. त्यानंतर केंद्र शासनाने 1994 साली हा कायदा केला. 2003 मध्ये या कायद्यात सुधारणा होऊन गर्भलिंग निदान करण्यावर प्रतिबंध करण्यात आला. पण केवळ कायदे करुन हा प्रश्न सुटणार नाहीये. कायद्याची कठोर अंमलबजावणी तर झालीच पाहिजे परंतु समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्वाचे आहे.

आज मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. चाकोरीच्या बाहेर जाऊन आपले क्षितिज धुंडाळणारी स्त्री आज खर्‍या अर्थाने सक्षम आहे. पण आजही समाजात स्त्री-भृणहत्या सर्रास होत आहेत. वंशाला दिवा हवा, मेल्यानंतर आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच हवा या हव्यासापोटी अनेक स्त्रियांना वारंवार गर्भलिंगनिदान चाचणीस सामोरे जावे लागते. बीड सारख्या ठिकाणी जिथे स्त्री- भृणहत्येचे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे तिथे नुकताच घृणास्पद प्रकार उघडकीस आला. डॉ. सुदाम मुंडेंनी आतापर्यंत असंख्य कोवळे जीव गर्भातच निर्दयपणे मारले. राज्यात ठिकठिकाणी अशी प्रकरणे आता उघडकीस येत आहे. स्त्री-भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते. मुलगा असेल तर त्याला जास्तीतजास्त सोई-सुविधा पुरवल्या जातात. मुलगा वंश पुढे चालवितो, आई – वडिलांच्या म्हातारपणी काठी बनतो यासारख्या कल्पनांमुळे मुलगी नको ही भावना वाढते. मुलीला 20-25 वर्ष सांभाळा, शिक्षण द्या नंतर तीच लग्न करा. त्यानंतरही तिला त्रास झाला, सासरहून छळ झाला तर आयुष्यभर तिची जबाबदारी उचला असे सगळे प्रश्न पालकांना पडतात. परक्याच धन आपल्या काय उपयोगाच अशी मानसिकता बनत जाते जी एका मुलीला जगण्याचा हक्कच नाकारते.

तंत्रज्ञानाचा वाढता गैरवापर स्त्री-भृण हत्येच्या केसेसमध्ये होतोय. सोनोग्राफीद्वारे गर्भातल्या अर्भकाची स्थिती कशी आहे हे समजले जावे म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन आई आणि बाळ यांची तपासणी केली जाते. अशा सेंटरवर गर्भ मुलाचा की मुलीचा हे समजण्यासाठी हजारो रुपये मोजण्यास पालक तयार असतात. गर्भवती महिलेवर प्रसंगी दबाव टाकून तिला भृण हत्येसाठी भरीस पाडले जाते. घरच्यांचा, समाजाच्या दबावास बळी पडून महिलांना गर्भपातास सामोरे जावे लागते. यादरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास आईलाही आपला जीव गमवावा लागतो.बीडमध्ये घडलेल्या त्या दुर्देवी घटनेत विजयमाला पेटकर या गर्भवतीस तिचा जीव गमवावा लागला. स्त्री-भृण हत्येत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीस कडक शिक्षा व्हावी अशी तरतूद कायद्यात असली तरी अनेक आरोपी सहीसलामत सुटतात. पूर्वी धर्माच्या नावाखाली तर आता विज्ञानाचा फायदा घेऊन मुलींच्या जगण्याचा मुलभूत अधिकारही आज नाकारला जातोय. फक्त ग्रामीण भागातच हा प्रश्न आहे असे काहींना वाटू शकते पण वस्तुस्थिती मात्र धक्कादायक आहे. आज शहरी भागात अधिक या स्त्री – भृणहत्या होतात. शिक्षणाने समज आली पण एकच मूल हवं या हट्टापोटी अनेक पालक फक्त मुलगा व्हावा यासाठी गर्भलिंगनिदान करतात. सुबत्ता असलेल्या भागात स्त्री-भृणहत्या अधिक आहेत. फुले -शाहू, आंबेडकर, कर्वे, सावित्रीबाई यांचा वारसा सांगणार्‍या महाराष्ट्रात आपण लिंगसमभावाच्या गप्पा मारतो पण वस्तुस्थिती मात्र वेगळच काहीतरी सांगते.

इतके दिवस स्त्री – भृणहत्या या फक्त पंजाब – हरियाना किंवा उत्तरेकडच्या राज्यात आहेत असा समज होता. पण ही समस्या आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. मी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करते त्या बारामतीतही मागच्या वर्षी एक स्त्री अर्भक कालव्यात टाकून दिलेले आढळले होते. त्या घटनेतील आरोपी नंतर शोधला जाऊन त्यावर कारवाईही झाली. जनगणनेच्या आकडेवारीने महाराष्ट्रातील स्त्री-पुरुष गुणोत्तरातील वस्तुस्थिती स्पष्ट झाली. अशा एका मागोमाग एक घटनांनी मन अस्वस्थ झाले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मी व माझे सहकारी विविध प्रश्नांवर काम करीत आहोत. तेव्हा माझ्या मनात आले की या प्रश्नावर चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून काहीतरी करायला पाहिजे. त्या क्षणी मनात पडलेल्या विचारांच्या ठिणगीतून जागर हा जाणीवांचा, तुमच्या माझ्या लेकीचा या उपक्रमाचा प्रवास सुरु झाला.

(स्त्री-भृणहत्या रोखण्यासाठी, स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी केवळ कडक कायदे करुन न थांबता या प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. एका दिवसात समाजाची मानसिकता बदलणार नाही.)

स्त्री – भृण हत्येचे वाढत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे व्यस्त होत जाणारे स्त्री – पुरुष गुणोत्तराने येणार्‍या काळात मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. केवळ कायदे करुन किंवा सोनोग्राफी सेंटरवर धाडी टाकून हा प्रश्न सुटणार नाही तर समाजात प्रबोधन करणे हे गरजेचे असल्याचे मला जाणवले. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करणार्‍या चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्यात स्त्री-भृणहत्या विरोधी जागर करावा लागतो ही खरतर खेदाची बाब आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात नायगाव ते पुणे अशी जागरची पदयात्रा आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केली होती. स्त्री जन्माचा हा जागर आज संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेला दिसून येतोय. अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, संघटनाही या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहेत व यावर काम करीत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्या प्रतिक्रीया मला फोन, मेल्सच्या माध्यमातून मिळतात याचा अर्थ आमच्या विधायक कामाची दखल समाजाकडून घेतली जात आहे.

जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकीचा या अभियानांतर्गत मी आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाण्याचा प्रयत्न करत आहे. विदर्भ, मराठवाडा, पशिचम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे जागरच्या रॅलीत अनेक मुली मला भेटल्या त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मला मिळाली. परिवर्तनशील महाराष्ट्रात मुलीची घटती संख्या चिंताजनक असल्याचे समजल्यावर खडबडून जागे झालेला समाज या प्रश्नाकडे गांभीर्याने बघतोय ही जमेची बाजू आहे. आजच्या मुली सक्षम आहेत. आजूबाजूला काय चाललय याचं व्यवस्थित भान त्यांना आहे. मी स्त्री-भृणहत्या करणार नाही. होऊही देणार नाही अशी शपथ घेतात. निर्धार करतात तेव्हा आगामी काळात महाराष्ट्राच चित्र निशिचतच आशादायी असेल असा मला विश्वास वाटतो. स्त्री-भृणहत्या रोखण्यासाठी, स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी केवळ कडक कायदे करुन न थांबता या प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. एका दिवसात समाजाची मानसिकता बदलणार नाही पण हातावर हात ठेऊन न बसता आपल्याला काय करता येईल याचा विचार करुन जागर च्या माध्यमातून आम्ही दीर्घकालीन लढ्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यानिमित्ताने सामाजिक अभिसरण घडून आले तर एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे समाधान आम्हाला निशिचतच मिळेल असे मला मनापासून वाटते.

लेखक - सुप्रिया सुळे

माहिती संकलन: प्राची तुंगार

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate