অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मतदान : राष्ट्रीय कर्तव्य

मतदान : राष्ट्रीय कर्तव्य

प्रस्तावना

शास्त्रज्ञ मंडळी आयुष्यभर अविश्रांत मेहनत घेऊन संशोधनाद्वारे मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत असतात. देशातील युवक-युवती सैन्यात विविध पदांवर कार्यरत राहून देशसेवा करतात. संरक्षण, संशोधन, कृषी विकास, उद्योग, याच बरोबर अगदी राष्ट्रीय सेवा दलाच्या व शालेय विद्यार्थी एन.सी.सी. माध्यमातून का असेना प्रत्येकजण आप-आपल्या परीने देशसेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो. मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

मतदानाचे महत्व


मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो!!!. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया!!! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. तद्वतच मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना चेतविण्याची नितांत गरज आहे.
भारत निवडणूक आयोगामार्फत दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून साजरा केला जातो. सांगली जिल्ह्यातही या विशेष दिनानिमित्त 20 जानेवारीपासून जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर तसेच जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्रभातफेरी आयोजन, जिल्ह्यातील विविध महाविद्यालये व ज्युनियर कॉलेज मधून युवक-युवतींसाठी मतदान करणे का गरजेचे या विषयावर प्रबोधन करणारी व्याख्याने, निबंध स्पर्धा, शाहीरांच्या पोवाड्यातून जनजागरण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषत: 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक-युवतींना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे या अनुषंगाने मतदान जागृती बाबत तरूणाईला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्यावर भर दिला जाणार आहे.
यंदाच्या वर्षीच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीसाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला मतदान करण्याच्या किंवा त्यांनी मतदानाचा हक्क बजवावा या प्रक्रीयेत शंभर टक्के सहभागी करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या सर्वांना टपाल मत पत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्र यांच्या सहाय्याने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत गुंतल्यामुळे बहुतांशी अधिकारी व कर्मचारी मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहात असायचे पण आता यंदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

1 जानेवारी 2014 च्या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यात 20 लक्ष 62 हजार 836 एकूण प्रारूप मतदार आहेत. यामध्ये पुरूष 10 लक्ष 75 हजार 376 तर महिला मतदार 9 लक्ष 87 हजार 460 आहेत. यापैकी 95.89 टक्के मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यात आली आहेत. दुबार मतदार नोंदणी झालेल्यांची नावे वगळण्याची व उर्वरित मतदारांना ओळखपत्र देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीनुसार 81 हजार 326 नवीन नोंदणी झालेले तसेच तरूण मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी इंटरनेटच्या, फेसबूक व व्हॉटस्अप सारख्या सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्याचे निवडणूक विभागाचे नियोजन आहे. या निमित्त 20 जानेवारी ते 25 जानेवारी 2014 पर्यंत सांगली जिल्ह्यात मतदार जागृती सप्ताह आयोजित केला आहे. मतदारांनी भविष्य काळात येणाऱ्या निवडणूकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम शक्तीशाली लोकशाही राष्ट्र उभारण्यास आपले मतदानाच्या स्वरूपात सहकार्य लाभावे हीच छोटीशी अपेक्षा.

लेखक : मिलींद मधुसूदन बांदिवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली.

स्त्रोत :  महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate