অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )

सर्वंकष राज्य ( टोटॅलिटॅरियन स्टेट )

जनजीवनाच्या सर्व क्षेत्रांवर अनियंत्रित अधिसत्ता प्रस्थापित करणारी शासनपद्धती. ती प्रामुख्याने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात यूरोप खंडात विकसित झाली.  तिच्यात एकच एक राजकीय पक्ष आणि त्याचा नेता ( सर्वेसर्वा ) यांच्या हुकूमशाहीची लक्षणे अनुस्यूत असून, ती एका विशिष्ट उद्दिष्टाचा पाठपुरावा करताना दिसते. नेता आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी व आपल्या मतप्रणालीच्या प्रसार-प्रचारार्थ कोणतीही साधने, मार्ग व तंत्र वापरतो.

इटलीतील फॅसिस्ट पक्षाचा नेता व हुकूमशाह बेनीतो मुसोलिनी याने आपल्या फॅसिस्ट राज्य पद्धतीचे वर्णन करताना ‘ टोटॅलिटॅरिओ ’ (Totalitario) हा इटालियन भाषिक शब्द १९२० च्या दशकात वापरला आणि या संज्ञेचे वा विशेषणाचे वर्णन त्याने ‘ सर्व काही राज्याच्या अंतर्भागात आहे, काहीही राज्याबाहेर नाही आणि काहीही राज्याविरूद्ध नाही ’ अशा शब्दात केले. या संज्ञेचा अर्थ एकपक्षीय हुकूमशाही असून अन्य सर्व संस्था, प्रजा गौण होत. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीस  सर्वंकष राज्य ही संज्ञा, निरपेक्ष आणि जुलमी एकपक्षीय शासनपद्धतीची दयोतक-समानार्थदर्शक म्हणून वापरात होती.

सर्वंकष राज्याचे स्वरूप व गुणविशेष प्राचीन काळातही आढळतात; मात्र ही संकल्पना विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रकर्षाने कार्यरत होती. भारतातील प्राचीन मौर्यकाळात ( इ. स. पू. ३२१-१८५) ती आढळते. तत्संबंधीची माहिती कौटिलीय अर्थशास्त्रा त मिळते. ग्रीसमधील स्पार्टा हे नगरराज्य व चीनमधील चिनी वंशाच्या ( इ. स. पू. २२१-२०६) राजवटीत काही अंशी ते दृग्गोचर होतात.

झुलू नेता शाकॅ ( कार. १८१६-२८) याची कारकीर्द ही सर्वंकष राज्यपद्धतीची दयोतक होती. अ‍ॅडॉल्फ हिटलर (कार.१९३३-४५), बेनीतो मुसोलिनी ( कार. १९२२-४३), जोझेफ स्टालिन ( कार. १९२४-५२), माओ-त्से-तुंग ( कार. १९५०-७२) ही सर्वंकष राज्यपद्धती राबविणारी विसाव्या शतकातील प्रमुख उदाहरणे होत. त्यांच्या नेतृत्वाला सर्व स्तरांतून सकृतदर्शनी तरी लोकप्रियता व पाठिंबा लाभला होता.

हा पाठिंबा उत्स्फूर्त नव्हता. त्याची उत्पत्ती नेत्याच्या वैभूतिक व्यक्तिमत्वावर अवलंबून होती आणि ती संदेशवहन व वाहतूक (परिवहन ) या क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान व वैज्ञानिक प्रगती यांच्यामुळे शक्य झाली. हिटलरने नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी ( नाझी ) या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या उभारणीत आर्यन वंशश्रेष्ठतेच्या मुदयाबरोबरच पहिल्या महायुद्धातील पराभवाचा बदला घेऊन जर्मनीची पुनर्बांधणी एक बलवान राष्ट्र म्हणून करण्याचा हिटलरचा उद्देश होता. त्यासाठी त्याने औदयोगिकीकरणावर, विशेषत: शस्त्रास्त्रांच्या निर्मितीवर भर दिला आणि त्या उत्पादनाच्या बाजारपेठेसाठी वसाहतवादाचा राज्यविस्ताराचा पाठपुरावा केला.

बेनीतो मुसोलिनीने इटलीला पूर्वीचे ( रोमन साम्राज्य) वैभव प्राप्त करून देण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली आणि तिच्या पूर्ततेसाठी फॅसिस्ट पक्षाची स्थापना करून साम्राज्य विस्ताराची कल्पना उचलून धरली. जोझेफ स्टालिन आणि माओ-त्से-तुंग या साम्यवादी नेत्यांनी अनुकमे सामूहिक शेतीचा प्रसार-प्रचार आणि शेतकरी-श्रमिक वर्गाचे आंदोलन करून खासगी मालमत्ता आणि श्रीमंत जमीनदार-शेतकरी यांच्या जमिनी काढून घेतल्या. त्यांनी मार्क्सवाद, लेनिनवाद यांचे अन्वयार्थ आपल्या सोयीनुसार केले.

हिटलर आणि स्टालिन यांनी अनुकमे विरोधक व ज्यूंची हत्या, तर रशियात कुलकांची विल्हेवाट लावली. हिटलरने वायमार प्रजासत्ताकाचे संविधान कधीच रद्द केले नव्हते; परंतु रायश्टॅगने ( जर्मन संसद ) १९३३ मध्ये त्यास घटना दुरूस्तीने सर्वाधिकार प्रदान केले. त्यामुळे कायदे करण्याचा अधिकार त्यास आपातत: प्राप्त झाला. याउलट स्टालिनने आपल्या सोयीनुसार १९३६ मध्ये सोव्हिएट युनियनसाठी घटना बनविली; परंतु ती कृतीत आणली नाही. त्याने फक्त मार्क्सवाद-लेनिनवाद यांचे सोयीस्कर अन्वयार्थ लावले आणि दडपशाहीचे धोरण अंगीकारले.

हिटलर, मुसोलिनी, स्टालिन, माओ-त्से-तुंग आदी हुकूमशाहांनी  सर्वंकष राज्याच्या प्रशासन-शासनासाठी नाझीवाद, फॅसिझम, साम्यवाद वगैरे राजकीय तत्त्वप्रणालींचा अवलंब केला आणि आपापल्या देशांतील प्रजेवर, त्यांच्या दैनंदिन जीवनावर-व्यवहारांवर पूर्णत: हुकमत गाजविली. तत्कालीन समाज, विदयालये ( सर्व शैक्षणिक संस्था ), त्यांचे अभ्यासक्रम, दूरदर्शन, रेडिओ, वृत्तपत्रे इ. प्रसार-माध्यमे, अर्थव्यवस्था, कामगार संघटना व संस्था, अन्य राजकीय, सामाजिक, आर्थिक ( बँका, पतपेढया ) संघटना/संस्था यांवर सर्वंकष राज्यसंस्थेचे वर्चस्व व नियंत्रण होते.कला आणि वाङ्‌मय यांचा उपयोग राज्यसंस्थेचेउदात्तीकरण ( स्तुती ) करण्यासाठी साधन म्हणून केले जाई. धार्मिक वास्तू ( चर्च, मंदिर, मशीद इ. ) आणि धर्मगुरू यांवर प्रत्यक्ष बंदी नसली, तरी त्यांना नगण्य स्थान होते. शासनविरोधी कोणतेही कृत्य घडल्यास त्यांना जाब विचारला जाई व प्रसंगोपात्त शिक्षाही होत असे.

सर्वंकष शासनपद्धतीत नेता (हुकूमशाह), सत्ताधारी पक्ष आणि त्यांनी स्वीकारलेली मतप्रणाली यांचाच सतत व सर्वत्र प्रचार-प्रसार करावा, अशी अपेक्षा असे. सातत्याने सर्वंकष शासनकर्त्यांचा ( हुकूमशाह ) महिमा एक देवतासदृश श्रेष्ठतम विभूती म्हणून प्रसृत करण्यात येई. या पद्धतीत स्वतंत्र व्यक्तींचे हितसंबंध व मूलभूत हक्क यांना किंमत नसते. लोकांनी व्यक्तिगत लाभाचा त्याग करून  देशासाठी झगडावे आणि पक्षाने विहित केलेली जीवनशैली अनुसरली पाहिजे, असा दंडक असतो. शासन देईल त्या पद्धतीचे शिक्षण, ठरवील ती पत्नी वा पती आणि मुले असे बंधन होते. सर्वंकष राज्याची सामूहिक उद्दिष्टे ही व्यक्तिगत आशा-आकांक्षा आणि सुखापेक्षा महत्त्वाची व श्रेष्ठ गणली जात.

अर्थात ही मतप्रणाली व विचारसरणी सर्वच नागरिक स्वखुशीने अंगीकारतील, याविषयी शासनकर्त्यास शंका असल्याने त्यांचे हृदय वा मत परिवर्तन करण्याचे प्रयत्नही झाले. त्यात अपयश आल्यानंतर काहींना बहिष्कृत करण्यात आले. या सर्व गोष्टींसाठी प्रचार व दहशतीचा सर्रास वापर करावा, म्हणून तत्कालीन सर्वंकष राज्यात प्रचारयंत्रणेसाठी स्वतंत्र खाते होते आणि दहशतीसाठी गुप्तचर पोलीस खाते होते. या खात्यांतर्फे प्रचारतंत्रात नेता, पक्ष आणि शासन ज्या गोष्टी करीत आहे, त्या सर्व तुमच्या आणि देशाच्या कल्याणार्थ आहेत, असा दावा केला जाई. प्रचारयंत्रणेत भित्तिपत्रके, फळे, ध्वनिक्षेपक, झेंडे, पताका, जाहिराती यांच्या वापराबरोबरच प्रसार-माध्यमे आणि नाटय्कलेचाही वापर केला जात असे. सततच्या प्रचारामुळे लोकमत आपल्या बाजुने झुकेल, यांवर शासनकर्त्याचा ( नेत्याचा ) दृढविश्वास होता.

सर्वंकष शासनपद्धतीत व्यापक कार्यक्षम गुप्तचर संघटनेस फार महत्त्व होते. तिला हिंसक कारवायांव्दारे समाजात दहशत निर्माण करून अत्युत्साही व्यक्तींना नाउमेद करणे ही जबाबदारी दिली होती, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये, म्हणून पद्धतशीर हिंसक कारवाया या संघटना घडवीत. या कार्यात लष्करी व निमलष्करी दले, तसेच गणवेषधारी संघटना त्यांना मदत करीत. गेस्टापी ही तत्कालीन गुप्तचर संघटना जगप्रसिद्ध आहे. ती मनमानी अटक सत्राचा वापर करून तसेच वेठबिगारी वा छलगृहात तथाकथित गुन्हेगारांना डांबून शासनाचे धोरण कृतीत आणीत असे. अनेकदा नेत्यांविरूद्ध चळवळ करणाऱ्या नागरिकांची मनोरूग्णालयात रवानगी केली जाई. ज्या व्यक्ती शासनाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करून शत्रूत्व पत्करीत, त्यांना मृत्युदंड किंवा उपाशी ठेवून भूकेले मारण्यात येई. वंशविच्छेदाच्या नावाखाली नाझी राजवटीत सु. पंचावन्न लाख ज्यूंची हत्या करण्यात आली होती.

सर्वंकषवादी राज्यात अर्थव्यवस्थेवर सत्ताधारी पक्षाचे पूर्ण नियंत्रण असते. साम्यवादी रशिया-चीन या देशांत खाजगी उदयोगधंदयांना मनाई होती आणि सामूहिक सहकारी तत्त्वावर शेती हा व्यवसाय चाले. युद्धपूर्व काळात जर्मनी-इटलीने आपली सारी अर्थव्यवस्था युद्धाची तयारी करण्यासाठी व लष्करी दृष्टया देश बलिष्ठ करण्यासाठी पणाला लावली होती. हे सर्व देश विचार व उच्चर स्वातंत्र्य मानीत नव्हते. त्यामुळे स्वतंत्र विचाराच्या वृत्तपत्रांना तेथे बंदी होती. वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट आदी सर्व प्रसार-माध्यमे सर्वस्वी शासनाच्या नियंत्रणाखाली होती. सर्वंकष राज्य ही संकल्पना, निरंकुशतावाद किंवा निरंकुश शासन यांपेक्षा वेगळी आहे; तीत सर्व जुन्या व प्रचलित सामाजिक, राजकीय व वैधानिक संस्था मोडीत काढून त्यांच्या जागी नवीन संस्था स्थापन करण्यात येतात. सर्वंकष राज्य औदयोगिकीकरणाबरोबरच राज्यविस्ताराचे धोरण राबविते.

जागतिक इतिहासात अनेक एकतंत्री व लहरी सुलतान होऊन गेले आणि आजही पाकिस्तान-इराण आदी देशांतून ते आढळतात, त्यांनी आपल्या हाती असलेल्या सर्व साधनांचा व सत्तेचा दुरूपयोग करून जनतेवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. या शासनकर्त्यांत निरंकुश राज्यातील नेत्यांची कारकीर्द अत्यंत कौर्याने व दहशतीनी भरलेली होती; मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात, विशेषत: विसाव्या शतकाच्या अखेरीस आधुनिक तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत गेले, तसे शासनाचे समाजजीवनावरील नियंत्रण अधिक सर्वसमावेशक व लोकसत्ताक बनले आहे. प्रचार-माध्यमे आणि नि:शस्त्रीकरण यांचा वाढता प्रसार, शस्त्रनिर्मितीवरील नियंत्रण व संयुक्त संस्थाने या संघटनेची शांतता व मूलभूत हक्कांच्या जपणुकीविषयीची भूमिका यांमुळे भविष्यात निरंकुशवादी राज्य ही संकल्पना धूसर झाली आहे.

निरंकुशवादी राज्याच्या यशापयश, गुण-अवगुण यांविषयी विचारवंतांत मतभिन्नता आढळते. बहुसंख्य विचारवंतांच्या मते ही राज्यप्रणाली व्यक्तिस्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी  आहे; तर सुरूवातीच्या उपयुक्ततावादी विचारवंतांनी, विशेषत: जेरेमी बेंथॅम आणि जेम्स मिल, यांनी सर्वंकष राज्यपद्धती ही जर बहुसंख्यांक लोकांना सुखकारक ठरत असेल, तर ती अग्राह्य नाही, असे स्पष्ट मत मांडले आहे.

संदर्भ :1. Arendt, Hannah, The Origins of Totalitarianism, London, 1983.

2. Friedrich, Carl J.; Zbigniew, K. Brzezinski, Totalitarian Dictatorship and Autocracy, New York, 1965.

3. Hitler, Adolf, Mein Kampf, London, 1969.

4. Orwell, George, १९८४: A Novel, New York,

5.Soper, Steven P.Totalitarianism, a  ConceptualApproach, 1985.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate