অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाघ्या-मुरळी

खंडाबाचे उपासक

अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करतात आणि अशा पद्धतीने नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण करतात. मुलगा असल्यास तो वाघ्या बनतो वा मुलगी असेल, तर ती मुरळी बनते. या दोन्हींचा एक विवक्षित दीक्षाविधी असतो. वाघ्या बनणाऱ्या मुलाच्या संदर्भात पिता आपला संकल्प प्रथम चैत्र महिन्यांत गुरवाला कळवितो. मग गुरवाच्या आदेशानुसार तो सांगेल त्या दिवशी वाघ्या बनणाऱ्या मुलाला मिरवणुकीने खंडोबाच्या मंदिरात आणतात. तेथे गुरव त्या मुलाला भंडारा (हळद) लावतो व वाघाच्या कातड्याच्या पिशवीत भंडारा भरून ती पिशवी त्या मुलाच्या गळ्यात बांधतो. नंतर देवावर भंडारा उधळून तो त्यास मुलाचा स्वीकार करण्याची विनंती करतो. वाघ्या बनलेला मुलगा पुढे मुरळीबरोबर खंडोबाची गाणी म्हणत मल्हारीची वारी (भिक्षा) मागू लागतो. मुरळीचे लग्न खंडोबाबरोबर लावतात. हा विवाह चैत्र महिन्यातच होतो. प्रथम मुरळीला आणि देवाला हळद लावतात; मुरळीला शृंगार करतात व देवाला पोशाख चढवितात. नंतर उपाध्याय नऊ कवड्यांची माळ मुरळीच्या गळ्यात घालतो. या विधीला ‘गाठा फोडणे’ असे म्हणतात. नंतर त्या दोघांवर भंडारा उधळतात व ‘येळकोट घे’ अशी दोनदा घोषणा करतात. उपाध्यायाला याबद्दल सव्वा रुपया दक्षिणा देतात. मुरळी वयात आली, की आपल्यासाठी एखादा यजमान मिळविते.

वाघ्या व मुरळी या शब्दांच्या व्युत्पत्तीसंबंधी काही कथा-दंतकथा वाघ्या-मुरळी समाजात प्रचलित असून त्यांच्या जागरणात यांतील काही धार्मिक कथा सांगितल्याही जातात. मुरळ्यांना आपण तिलोत्तमेपासून आणि वाघ्यांना आपण चंपानगरीच्या राजापासून निर्माण झालो, असे समाधान थोडक्यात या कथांद्वारे मिळते. वाघ्या या शब्दाचे मूळ कन्नड भाषेत आढळते. त्याचे कन्नड नाव ‘ओग्गय्य’असून हा शब्द ‘उग्गु’ या धातूपासून बनला आहे. ‘उग्गु’ म्हणजे बोबडे बोलणे, अर्थशून्य किंवा अस्पष्ट ध्वनी काढणे इत्यादी. या अर्थाला अनुरूप असे वर्तन करून म्हणजे कुत्र्याप्रमाणे भुंकून, गुर् गुर् असे शब्द काढून ओग्गय्य किंवा वाघ्या आपल्या नावाची अन्वर्थकता पटवून देतो. वग्गेय (कन्नड) = कुत्रा (मराठी). देवाचे दासानुदास, कुत्र्याप्रमाणे प्रामाणिक, एकनिष्ठ भक्त ह्या मूलार्थाचे मराठी अपभ्रष्ट रूप ‘वाघा’, ‘वाघ्या’ असे झाले आहे. वाघ्ये हे स्वतःला खंडोबाचे कुत्रे समजून भुंकतात, कुत्र्याप्रमाणे दोन हात टेकून चालतात. यासंबंधीचे उल्लेख बाराव्या शतकापासून आढळतात.

मुरळी

महाराष्ट्र–शब्दकोशात मुरळीची व्युत्पत्ती दोन प्रकारांनी दिली आहे : एक, मैरालाची पत्नी मैराली–मुरळी आणि दोन, मरळी. मुरळी हा शब्द ‘मुरई’ यावरून आला असावा. मैलाराच्या उपासनेतील देवदासींना त्यांच्या अस्तित्वामुळे ‘मुरळी’ हे नाव मिळाले असावे. हेमचंद्राच्या देशीनाममालेत ‘मुरई’ असा शब्द असून त्याचा अर्थ ‘अ-सती’ असा दिला आहे. सांप्रत ‘अ-सती’ या लाक्षणिक अर्थाने ‘मुरळी’ हा शब्द वापरतात. कानडीत मरळीचा अर्थ बुद्धिशून्य, बतावणी करणारी, श्वानवत् वाघ्याचे स्त्रीपात्र हीच मुरळी. म्हणून तिचे मूळ ‘मरळी ‘ हे कन्नड रूपसुद्धा अन्वर्थक असावे. देवाच्या एकनिष्ठ सेवेपासून भ्रष्ट झालेल्या मुरळीच्या असती वर्तनाचा धिक्कार संतसाहित्यातही केलेला आहे. फक्त देवाशी निष्ठा ठेवून शुद्ध चारित्र्याने राहिलेल्या मुरळीबद्दल आदर असतो. पण दारिद्र्यामुळे बहुधा ते शक्य होत नाही. वाघ्या व मुरळ्या सर्व दक्षिण महाराष्ट्रभर आढळतात. वाघ्ये बहुधा आपल्या वडिलांच्या जातीतील मुलींशी लग्न करतात. तथापि वाघ्यांच्या मुलामुलींतही लग्ने  झालेली दिसतात. मुरळ्या वेश्यावृत्तीने व भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. काही मुरळ्या जेजुरीस कायमच्या राहतात. बाकीच्या वाघ्यांबरोबर गाणी गात व भिक्षा मागत गावोगाव भटकत असतात. वाघ्यांचे ‘घरवाघ्ये’ व ‘दारवाघ्ये’ असे दोन प्रकार आहेत. घरवाघ्ये नवसाच्या फेडीसाठी काही वेळ वाघ्याचा वेश परिधान करून वारी मागणारे असतात. खंडोबाविषयी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी हे वाघ्याचे तात्पुरते रूप धारण करतात. याउलट दारवाघ्ये हे कायमची दीक्षा घेतलेले, भिक्षेवर उदरनिर्वाह करणारे, भक्तांची क्षेत्रातील धार्मिक कृत्ये पार पाडणारे, जन्मभर वाघ्ये म्हणून राहणारे खंडोबाचे समर्पित भक्त असतात. भक्तांच्या वतीने जागरण करणे व लंगर (लोखंडी साखळी) तोडणे, ही त्यांची विशेष कामे होत. वाघ्यांचे हे जागरणाचे कार्यक्रम गोंधळाप्रमाणे असतात आणि त्यात रात्रभर एक वाघ्या तुणतुणे वाजवितो, दुसरा खंजिरी वाजवून गाणी म्हणतो व मुरळी नाचते. खंडोबाच्या यात्रेत जागोजाग वाघ्या आणि मुरळी यांचे कार्यक्रम चालतात. एका हाताने घोळ (घंटा) वाजवीत मुरळी नृत्य करीत असते. मुरळ्यांना देवसेवेत राहून अविवाहित जीवन घालवावे लागते.

कधीकधी विवाहित स्त्रियासुद्धा नवसाने खंडोबाचा पती म्हणून स्वीकार करतात व खंडोबाला आत्मसमर्पण करून मुरळ्या बनतात. वाघ्या- मुरळी ही प्रथा प्रामुख्याने कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात प्रचलित होती व कुणबी, धनगर, बलुतेदार व अस्पृश्य समाजात ती रूढ होती. हीतून पुढे वाघ्या-मुरळी असा स्वतंत्र समाज निर्माण झाला. महाराष्ट्रात वाघ्याचा विशिष्ट पोशाख नाही, मात्र कर्नाटकात त्याच्या गळ्यात व्याघ्रचर्माची भंडाऱ्याची पिशवी, कोटंबा किंवा दोती (भिक्षपात्र), गांठा (कवड्या गुंफलेली दोरी), दिवटी-बुदली, ध्वज, पोवते, घोळ, शंख, डमरू, शूल-त्रिशूल इ. वस्तू आणि अंगावर घोंगडीची कफनी असते. प्रदेशपरत्वे त्यांच्या या वस्तूंत थोडा फरक आढळतो. वाघ्या-मुरळींचा संचार खंडोबाच्या जत्रांत, विशेषतः चैत्री पौर्णिमा व सोमवती अमावस्येला अधिक आढळतो. खंडोबाची क्षेत्रे महाराष्ट्रात निमगाव, जेजुरी (पुणे जिल्हा), नेवासे, शेगुड (नगर जिल्हा), मालेगाव (नांदेड जिल्हा), सातारे (औरंगाबाद जिल्हा), मल्हारपेठ, पाली (सातारा जिल्हा), पेठ (सांगली जिल्हा) , या गावी आहेत.कर्नाटकातही मंगसूळी (बेळगाव जिल्हा), मैलारलिंग, मैलार-देवरगुडू (धारवाड जिल्हा), मण्मैलार (बेल्लारी जिल्हा), मैलापूर (बीदर जिल्हा) इ. ठिकाणी जागतीगाजती खंडोबाची क्षेत्रे आहेत. यांशिवाय मध्यप्रदेश राज्यात मल्हार (बिलासपूर जिल्हा), व बडी देवरी (सागर जिल्हा) आणि तमिळनाडू राज्यात पेनुगोंडे (अनंतपूर जिल्हा), पेदिपाडू  (नेल्लोर जिल्हा), मैलापूर (मद्रास जिल्हा) ही खंडोबाची काही क्षेत्रे आहेत. महाराष्ट्रात एका ठिकाणी देवाची हळद लागते, पालीला देवाचे लग्न लागते आणि जेजुरीला देवाची वरात निघते, म्हणून या जत्रा एकामागून एक क्रमशः भरतात.

विद्यमान वावरत असलेल्या वृद्ध वाघ्यांच्या सांगण्यावरून पूर्वी ‘जागरण’ हा प्रामुख्याने कुलाचाराचा धार्मिक विधी होता. त्याच्या जोडीला कथाकथनाद्वारे थोडे मनोरंजन-करमणूक होती. लोकही वाघ्या-मुरळ्यांना देवाची माणसे मानीत. त्यातून लोक संस्कृतीची-लोककलेची जोपासना होत असे. ते एक प्रकारचे कीर्तनच होते; परंतु पुढे या जागरणांतून लोकांनी तमाशा किंवा संगीत बारीप्रमाणे अश्लील गाण्यांची पसंती व्यक्त करण्यास सुरुवात केली. परिणामतः श्रोतृवर्ग छचोर लावण्यांची मागणी करू लागला आणि वाघ्यांच्या या संस्थेला धंदेवाईक स्वरूप प्राप्त झाले. मुरळ्याही उघडउघड वेश्याव्यवसायाच्या मागे लागल्या. मुरळ्या बनण्यावर शासनाने कायदा करून बंदी घातली; तथापि अद्यापिही काही स्त्रिया अवैध मार्गांनी मुरळ्या झालेल्या दिसतात. वाघ्यांवर मात्र बंदी नाही. वाघ्या-मुरळ्या हा समूह हे समाजशास्त्रज्ञांना आज एक आव्हान आहे. त्यांचे अनेकविध प्रश्न व समस्या आहेत आणि त्यांच्या विविध मागण्या आहेत. वाघ्या-मुरळींची प्रथा कधी पूर्णपणे बंद पडेल आणि त्यांना समाजाच्या प्रवाहात बरोबरीचे स्थान केव्हा मिळेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अलिकडे मुरळ्यांच्या मुलांना सोयरीक मिळत नाही, म्हणून ते नाईलाजाने जात विसरून परजातीच्या मुलीशी लग्न करताना दिसतात. असे आंतरजातीय विवाह इतर समाजांपेक्षा सर्रासपणे यांच्यांत होतात. साहजिकच यांतून मुरळ्यांच्या मुलांचा सामाजिक प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.

वाघ्या-मुरळी यांची, विशेषतः मुरळ्यांची, अनिष्ट प्रथा बंद व्हावी, म्हणून महर्षी शिंदे वगैरे समाजसुधारकांनी पूर्वी अथक प्रयत्न केले होते; परंतु त्यांना फारसे यश आले नाही. अलीकडे बाबा आढाव, अनिल अवचट, अंधश्रद्धा निर्मूलन संस्था वगैरे वाघ्या-मुरळी समाजास विद्यमान प्रगत जीवन-प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्यांत शिक्षणाचा प्रसार-प्रचार व्हावा, त्यांना शैक्षणिक सुविधा-सवलती मिळाव्यात आणि त्यांनी संघटित रीत्या आपले प्रश्नद सोडवावेत म्हणून त्यांच्या परिषदा-संमेलने भरवीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना अंशतः यश आले असून काही सुशिक्षित वाघ्यांनी स्वतंत्र धंदा-व्यवसायही सुरू केले आहेत आणि त्यांना आपल्या समाजातील उणीवांची जाणीव होऊ लागली आहे.

संदर्भ : 1. Sontheimer, Gunther Dietz; Trans. Fieldhouse, Anne, Pastoral Deitles in Western India, Oxford, 1989.

२. अवचट, अनिल, वाघ्या-मुरळी, पुणे, १९८३.

३. ढेरे, रा. चिं. खंडोबा, पुणे, १९६१.

४. ढेरे, रा. चिं. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

लेखक: सु. र. देशपांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate