भारतातील काही वन्य जमातींमध्ये ठराविक वयानंतरची गावातील सर्व अविवाहित मुले - मुली एका विशिष्ट घरात रात्री वास्तव्याला जातात, त्या घरांना युवागृहे असे म्हणतात. या जमातींच्या डोंगराळ भागातील लहान लहान खेडेगावांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या तीन सामाजिक संस्था. त्या म्हणजे : (१) आखाडा, (२) पंचायत घर आणि (३) युवागृह. आखाडा म्हणजे गावच्या मध्यभागी विशालवृक्षाखाली पसरलेले पटांगण होय. युवागृहाचे स्थान आखाड्यालगतच बहुधा असते.
अनुसूचित जमातींमध्ये युवागृहाला निरनिराळी नावे आहेत. त्यांचा तक्ता पुढे दिला आहे :
जमातीचे नाव |
युवागृहाचे त्या जमातीतील नाव |
१ मुंडाआणिहो |
गिटिओरा |
२.ओराओं |
जोंख - एर्पा |
धुमकुरिया (हिंदीशब्द) |
|
३.भुईया |
धनगरबासा |
४.गोंड |
गोटुल (घोटुल) |
५.आओआणिसेमानागा |
मोरुंग |
ओराओं, मुंडा आणि हो ह्या जमाती ओरिसा, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या आहेत. गोंड हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशामधील वन्य भागांत बहुतकरून आहेत. मंडला जिल्ह्यातील (मध्य प्रदेश) गोंडांमध्ये युवागृह अदमासे पन्नास वर्षांपूर्वीही अस्तित्वात नव्हते, चंद्रपूर जिल्ह्यातील आणि बस्तर भागातील मुडिया गोंड यांच्यामध्ये गोटुल ही युवागृहाची संस्था प्रचलित आहे. नागा जमाती ह्या भारताच्या ईशान्य भागात पसरलेल्या आहेत.
काही जमातींमध्ये मुलांना आणि मुलींना स्वतंत्र गृहे आहेत, तर काही जमातींमध्ये एकाच युवागृहात मुले आणि मुली एकत्र राहतात. परंतु कोणत्याही जमातीत मुलांकरिता अगर मुलींकरिता स्वतंत्र युवागृहे असायला हवीत असे बंधन नाही. वयोगटानुसार युवागृहाचे सदस्यत्व मिळते आणि त्यानुसार त्याच्या अंतर्गत व्यवस्थेतील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या सदस्यांकडे सोपविल्या जातात. ओराओं जमातीच्या धुमकुरियामध्ये वयानुसार तीन गट आहेत, तर मुडिया गोंडांनी असे वयानुसार गट पाडणे सोडून दिले आहे. परंतु त्यांच्यात ज्येष्ठ - कनिष्ठ हा भेद आहे. सदस्यत्व हे किमान वयोमर्यादेवरच अवलंबून असल्यामुळे ज्येष्ठ - कनिष्ठ म्हणजे सदस्यत्व मिळून काही काळ लोटलेले आणि नवखे हाच अर्थ अभिप्रेत असून वयोगटानुसारच सदस्यांची वर्गवारी अजूनही चालू आहे असेच म्हणावे लागेल. कनिष्ठ सदस्य हे अर्थातच ज्येष्ठ सदस्यांच्या आज्ञेत राहतात. सदस्य वयाने मोठे होत जातील तसे ते वरच्या वर्गात अगर स्तरावर जातात. त्याप्रमाणे त्यांच्या अंतर्गत स्थानामध्ये फरक पडतो आणि त्यांच्या जबाबदाऱ्याही बदलतात. अदमासे वयाच्या अकरा - बाराव्या वर्षापासून कुमार - कुमारिकांना युवागृहात प्रवेश मिळतो आणि त्यांचा विवाह होईपर्यंत उच्च स्तरापर्यंत जाऊन ते तेथेच राहतात. युवागृहाचे नेतृत्व किंवा त्यावर देखरेख ठेवण्याचे काम ज्येष्ठ सदस्यांकडे असते. एखाद्या विधुरास अगर विधवेस ज्येष्ठ सदस्य म्हणून युवागृहांमध्ये पुन्हा प्रवेश मिळू शकतो. नेतेपदाकरिता सर्व सदस्यांमधून एकाची निवड करतात. ओराओंमध्ये नेतेपदी असलेल्या कुमाराला ‘माहतो’ आणि कुमारिकेला ‘बोरका धांगरीन’ म्हणतात. मुडिया गोंडांमध्ये यांनाच अनुक्रमे ‘सरदार’ व ‘बेलसा’ असे म्हणतात.
ओराओं मुलींकरिता स्वतंत्र युवागृह आहे व त्याला ‘पेल - एर्पा’ असे म्हणतात. परंतु अदमासे ७० वर्षांपूर्वी जेव्हा ओराओं जमातीचा अभ्यास झाला तेव्हा मुलींचे युवागृह स्वतंत्र असले, तरी इमारत मात्र स्वतंत्र अशी नव्हती.‘पेल - एर्पा’ ही सार्वजनिक इमारतही नव्हती. यामुळे गावात मुलींचे युवागृह कोठे आहे हे सहसा कुणाला, विशेषत: बाहेरच्यांना, कळत नसे. पेल - एर्पामधील मुलींना आणि ‘जोंख - एर्पा’-मधील मुलांनाच फक्त ह्या इमारतीचे ठिकाण माहीत असे. पेली कोतवार नावाचा एक वयस्कर ओराओं पुरुष पेल - एर्पाचा प्रमुख म्हणून काम करीत असे. त्याच्या हाताखाली बोरका धांगरीन नावाची युवागृहातील ज्येष्ठ कुमारी मुलींना मार्गदर्शन करण्याचे आणि नियंत्रण ठेवण्याचे काम करीत असे. मुलांच्या युवागृहाप्रमाणेच मुलींच्या पेल - एर्पा नावाच्या युवागृहामध्येही सदस्यांचे तीन स्तर होते. जोंख - एर्पा या मुलांच्या युवागृहामध्ये दर तीन वर्षांनी नव्या सदस्यांना प्रवेश दिला जात असे. ज्येष्ठ मुले कुणाला प्रवेश द्यावा हे ठरवीत असत. दर तीन वर्षांनी माघ महिन्यातील अमावस्येला नवीन सदस्यांना प्रवेश देण्यात येत असे.
अदमासे २५ वर्षांपूर्वी मुडिया गोंडांच्या एका गावात गोटुल या युवागृहाची पाहणी केली होती तेव्हा त्यांतील सदस्यांचे सरासरी वय १४·९ वर्षांचे होते आणि मुले आणि मुली मिळून एकूण ३९ सदस्य होते. वयानुसार तीन आणि मुलांचा आणि मुलींचा असे दोन वेगळे स्तर धरून त्यांच्यात एकूण पाच स्तर होते. मुले आणि मुली एकत्रच राहत असत. त्यांच्या गप्पागोष्टी एकत्रच होत असत. परंतु मुलामुलींच्या जोड्या अशा लावलेल्या नव्हत्या. मुलांच्या अंगाला मालिश करावयाचे काम मुलींकडे येत असे. एका वेळेला तीन - तीन मुली एकाच मुलाच्या अंगाला मालिश करत असत, असे या पाहणीत दिसून आले आहे. गोटुलकरिता अगर गावाकरिता गोटुलमधील मुलामुलींना काही काम करावे लागल्यास ते त्यांच्या वयोमानानुसारच दिले जात असे. खास करून काही मजुरीचे काम असल्यास गावाकडून गोटुलाच्या प्रमुखाकडे तशी मागणी येत असे आणि गरजेनुसार गोटुलमधली त्या त्या कामाकरिता योग्य अशा वयाच्या मुलांकडून काम करून घेत असत.
वन्य जमातीतील युवागृह म्हणजे त्यांच्या प्रौढ जीवनातील विविध कर्तव्ये पार पाडण्याकरिता आवश्यक असलेले ज्ञान त्यांना आगाऊ प्राप्त करून देणारी एक महत्त्वाची शाळा आहे. विशेषत: लैंगिक जीवनाची व नेतृत्वाची कला शिकविणारी ती शाळा आहे. या दृष्टीने या वन्य जमातींचे जीवन संकोचविरहित असे असते. प्रौढ माणसे जे जे करतात ते ते शारीरिक क्षमता येईल तसे मुलांनाही ते करू देतात. बहुतेक वन्य जमातींमध्ये मुलींचा विवाह खूपच उशिरा होण्याची परंपरा होती. वयात आलेल्या मुलीच्या संमतीनुसार तिचा जोडीदार निवडला जात असे. किंबहुना स्वत:चा वैवाहिक जोडीदार ती स्वत:च निवडत असे. याला समाजाची मान्यता होती. पुष्कळ वेळा घरच्यांचा विरोध असला, तर प्रेमात पडलेली जोडी पळून जाऊन चोरून विवाह लावत असे. म्हणजे लैंगिक संबंध ठेवीत असे. यालाही समाजाची मान्यता होती. प्रेयसीला पळवून नेऊन लग्न लावण्याच्या या पद्धतीला हिंदू धर्माच्या आठ विवाहप्रकारांपैकी राक्षसविवाह म्हणून गौण स्थान असले, तरी वैध म्हणून मान्यता दिलेली आहे. वन्य जमातींना हिंदू धर्मछत्राखाली सामावून घेण्याकरिताच राक्षसविवाह प्रकाराला मान्यता दिली असावी, असा काहींचा तर्क आहे.
अदमासे तीस वर्षांपूर्वीच्या ओराओं जमातीच्या धुमकुरिया या युवागृहाच्या पाहणीत त्याच्या तीन प्रमुख कार्यांची नोंद झालेली आहे. युवागृहाचा उपयोग (१) शयनागार, (२) संगीत - नृत्यांची पाठशाळा आणि (३) गावातील गरजूंना विनंतीवरून, सहकारी तत्त्वावर मजूर पुरविण्याचे केंद्र म्हणून होत असल्याची नोंद आहे.
चाळीस वर्षांपूर्वी केलेल्या मुडिया गोंडांच्या गोटुल अभ्यासावरून युवागृहाचे दोन प्रकार दिसून आले आहेत. पैकी पहिल्या प्रकारात युवागृह हे केवळ मुलांकरिता वेगळे केलेले असते आणि त्याची रचना सैनिकी लोकांच्या बराकीसारखी असते. यातील मुलांना युद्धात लागणारी शस्त्रे चालविण्याची कला, शिकार किंवा जादूची कला शिकविली जाते. दुसऱ्या प्रकारात मुलांना मुलींबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास प्रोत्साहन दिले जाते. किंबहुना विवाहपूर्व लैंगिक भूक भागविणे हा या प्रकाराचा प्रमुख उद्देशच असतो. असे असूनही लैंगिक संबंध स्वैर असे नसतात. त्यांच्यावर काही बंधनेही लादलेली आढळून येतात. मुडिया गोंडांच्या गोटुलापैकीच ‘जोडदार’ गोटुलमध्ये मुलामुलींच्या जोड्या लावल्या जातात. म्हणजे एका मुलाने एकाच मुलीशी लैंगिक संबंध ठेवावेत अशी सक्ती असते आणि शेवटी त्यांचा विवाह होतो. विवाह होईपर्यंत ‘चेलिक’ (मुलगा) आणि ‘मोतीआरी’ (मुलगी) यांची जोडी परस्परनिष्ठेने टिकून राहते. दुसऱ्या प्रकारच्या गोटुलामध्ये नेमकी याच्या उलट परिस्थिती असते. तेथे चेलिक आणि मोतीआरी यांच्या जोड्या सारख्या बदलावयास लावतात. एका चेलिकने एका मोतीआरीशी तीन रात्रीपेक्षा अधिक काळ शय्यासोबत केली तर त्याला शिक्षा केली जाते. बहुधा काही दिवस गोटुलमध्ये त्याला प्रवेश नाकारणे ही शिक्षा असावी. गोटुलकडे काही सामाजिक जबाबदाऱ्या असतात. त्यांच्यातील दैनंदिन वागण्यातील शिस्त कडक असते. काही धार्मिक उत्सवामध्ये गोटुलच्या सदस्यांना सामील व्हावे लागते. त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या मागणीनुसार श्रमदानही करावे लागते. या दोन्ही बाबतींत दोन्ही प्रकारच्या गोटुलमध्ये साम्य असते.
ही शिस्त आता कोलमडून पडली आहे. बाह्य जगाशी अतीव संर्पक आल्यामुळे पैशाचे महत्त्व वाढलेले आहे. अन्य ग्रामीण जीवनात दिसून येणारे परिवर्तन ह्या वन्य जमातीच्या युवागृहाच्या बाबतीतही दिसून येते. मुलींच्या धुमकुरियाची जागा गुप्त ठेवण्याची परंपरा पूर्वी होती. रूढीप्रमाणे मुलाला मुलींच्या युवागृहात आणि मुलीला मुलांच्या युवागृहात जाण्यास बंदी होती; परंतु हा नियम आजकाल काटेकोरपणे पाळला जात नाही.
अलीकडच्या परिवर्तनाने युवागृह ही सामाजिक संस्था ढासळत चालली आहे असे जरी दिसून आले, तरी वन्य जमातींच्या जीवनात ही संस्था एक महत्त्वाची भूमिका बजावीत होती. जमात जीवनाला आवश्यक असलेल्या सर्व सामाजिक आणि वैयक्तिक गुणांची जोपासना करणारी, अचूक सामाजीकरणाची ही एक प्रशाला होती असे निश्चितपणे म्हणता येईल.
संदर्भ : 1. Ghurye, G. S. The Scheduled Tribes, Bombay, 1963.
2. Vidyarthi. L. P. The Tribal Culture of India, Delhi, 1977.
लेखक: मा. गु. कुलकर्णी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/21/2023
गृह म्हणजे निवासासाठी बांधलेली वास्तू.
या विभागात आच्छादन गृहाचे उपयोग आणि त्यांची रचना क...
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल...
प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृ...