অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नरभक्षिता (कॅनिबलिझम)

नरभक्षिता (कॅनिबलिझम)

कॅनिबलिझम

माणसाने माणसाचे मांससेवन करणे म्हणजे नरभक्षिता होय. इंग्रजीतील ‘कॅनिबलिझम’ ही संज्ञा वेस्ट इंडीजमधील नरभक्षक असलेल्या कॅरिब जमातीच्या नावावरून स्पॅनिश भाषेद्वार आलेली आहे. ‘अँथ्रोपोफॅगी’ ही मूळ ग्रीक संज्ञा नरभक्षितावाचक असून तिच्यावरून प्राचीन ग्रीक काळातही नरमांसभक्षणाची प्रथा परिचित असावी, असे दिसते. हीरॉडोटस आदींच्या प्राचीन ग्रीक साहित्यात या रूढीचे वर्णन आढळत असले, तरी ते अतिशयोक्तीच्या स्वरूपाचे मानले जाते. सरसकट सर्वच आदिम जमातींत नरभक्षिता रूढ होती, हे म्हणणेही खरे नाही. त्याचप्रमाणे नरमांस हे मुख्य किंवा नियमित अन्न म्हणून सेवन केले जाई, असेही नाही. सामान्यपणे ते प्रसंगोपात्त स्वरूपाचे असून नरबळीच्या विधीशी किंवा पकडलेल्या शत्रुजनांच्या हत्येशी किंवा मंत्रतंत्रादी कर्मकांडाशी निगडित असावे, असे अभ्यासक मानतात. द. अमेरिकेतील उत्तरेकडील प्रदेश, आफ्रिकेतील काँगो नदीचे ईशान्य खोरे व न्यू गिनीचा भाग, सुमात्रा बेट, पॅसिफिक महासागरातील फिजी व इतर बेटे इ. प्रदेशातील काही आदिम जमातींत नरमांसभक्षणाची प्रथा विशेषत्वे रूढ होती, असे अभ्यासकांचे मत आहे.

अगदी आदिम काळी केवळ एक प्राकृतिक गरज म्हणून प्रसंगपरत्वे नरमांससेवन करण्याची शक्यता होती, असे म्हटले जाते. प्राचीन कालीन गुहांतून प्राण्यांच्या हाडांचे जे ढीग सापडतात, त्यावरून आदिमानव हा मांसभक्षक होता हे उघडच दिसते. पीकिंग-मानव (सिनॅनथ्रोपस पीकिनेन्सिस) हा जो मानवाचा एक आदिम अवतार, त्याच्या पीकिंगजवळच्या गुहेत मानवी कवट्या आढळलेल्या आहेत. ऑरिग्नेशियन कालखंडात आणि नंतरच्या सु. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकापर्यंत मानवी अस्थींचे जे पुरावशेष आढळून येतात, त्यावरून कुठल्यातरी स्वरूपात मध्य यूरोपात तसेच स्वित्झर्लंड व बोहीमिया येथे नरभक्षिता ही रूढ असावी, असे दिसते.

कारण

नरमांसभक्षणामागे अन्नधान्यांचे दुर्भिक्ष्य हे कारण असावे, असे काहीजण म्हणतात; पण ते पटण्यासारखे नाही. काँगोच्या खोऱ्यात खाद्य पदार्थ विपुल असूनही तेथील काही जमातींत नरभक्षितेची प्रथा आढळते; उलट, एस्किमोंच्या ध्रुव प्रदेशात अन्नाचे दुर्भिक्ष्य असूनही नरभक्षिता आढळत नाही. नरमांसभक्षणाचा उगम केव्हा आणि कसा झाला हे नक्की सांगणे कठीण आहे. मनुष्याच्या मांसाचा चवदारपणा, आहारातील रुचिवैचित्र्याची आवड, आदिम जमातींच्या जादूटोणादी व इतर धर्मविषयक कल्पना, शत्रूबद्दलची चीड किंवा शत्रूचे सामर्थ्य आत्मसात करण्याची काहीएक सांकेतिक रीती इ. विविध कारणांनी नरमांसभक्षणाची प्रथा उदयास आल्याचे दिसते. नरबळी वा नरमेधाच्या कल्पनेशी आणि विधीशी नरमांसभक्षणाचा जवळचा संबंध असावा.

प्रथा

नरमांसभक्षणाच्या विविध प्रथा आढळतात. शत्रूचे शारीरिक अवयव तोडणे व खाणे हा एक प्रतीकात्मक असा विधी असे. जिंकलेल्या शत्रूंना बळी देणे व या बळीचे रक्त व मांसखंड भक्षण करणे अशीही प्रथा काही जमातींत असल्याचे दिसते. नरमांस शिजविण्याची खास वेगळी अशी भांडीही काही ठिकाणी ठेवली जात. शत्रूच्या देहाचा अल्पसा भाग ग्रहण करण्याने त्याचे सामर्थ्य त्याचप्रमाणे मंत्रसामर्थ्य प्राप्त होते, अशीही समजूत रूढ असल्याचे दिसते. पूर्व आफ्रिकेतील काही आदिम जमातींत आप्तवर्गांपैकी मृताच्या देहाचा मांसखंड त्याची स्मृती जतन करण्याच्या हेतूने ग्रहण करण्यात येई. नरबळीच्या विधीचा एक भाग म्हणूनही बळीचे मांसभक्षण केले जाई.

ब्राझीलच्या समुद्रकिनाऱ्यावरील जमातीत नरबळीला काही महिने पोसत, त्याचे स्थानिक मुलीशी लग्न लावीत, त्याला त्याची हत्या करणाऱ्याबरोबर लढवीत व शेवटी त्याचा वध झाल्यावर त्याच्या रक्तात सर्वजण बोटे बुडवीत.

दक्षिण पॅसिफिक बेटे, विशेषतः पॉलिनीशिया, ईस्टर बेट, न्यूझीलंड, सामोआ, टाँगा इ. प्रदेशांत नरमांसभक्षणाची प्रथा रूढ होती. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत नरबळी व नरमांसभक्षण या प्रथा होत्या. मेलानीशियामध्ये, विशेषतः फिजी बेटांत, ही प्रथा विशेष प्रभावी होती. शत्रू, जहाज बुडाल्याने निराश्रित झालेले प्रवासी आणि इतर परके लोक हे सर्व या जमातीच्या भक्ष्यस्थानी पडत असत. ऑस्ट्रेलिया, मॅले द्वीपकल्प व विशेषतः त्यातील न्यू गिनी बेट, सुमात्रा, आफ्रिकेतील विषुववृत्तीय प्रदेश, गिनीचा समुद्रकिनारा, द. अमेरिकेतील उत्तरेकडील गियाना, कोलंबिया, व्हेनेझुएला इ. देश आणि वेस्ट इंडीज इ. प्रदेशातील काही आदिम जमातींत नरमांसभक्षणाची रूढी होती. आधुनिक काळात ही प्रथा जवळजवळ नष्ट झाली आहे.

संदर्भ : Hogg, Garry, Cannibalism and Human Sacrifice, New York, 1966.

लेखक : रा. ग. जाधव

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate