অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धर्मादाय

धार्मिक किंवा नैतिक उद्देशाने दान करण्याकरिता निर्माण झालेला निधी किंवा आर्थिक उपयुक्त साधन म्हणजे धर्मादाय. त्याचप्रमाणे निधी किंवा आर्थिक मूल्य असलेले साधन यातून केलेले दान किंवा आर्थिक साधनांचा गरजूंस करून दिलेला उपयोग म्हणजेही धर्मादायच होय. उदा., धर्मादायमधून निर्माण केलेला विश्वस्त निधी, रुग्णालय आणि औषधालय, पाणपोई, धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृह, अनाथालय, अपंगसेवा केंद्र इ. गोष्टी धर्मादाय म्हटल्या जातात व त्याद्वारे दिलेले अनुदान किंवा त्यांचा करू दिलेला उपयोग हाही धर्मादायच होय.

दानाचाच एक प्रकार

धर्मादाय हा दानाचाच एक प्रकार आहे. अन्नदान, विद्यादान, द्रव्यदान, प्राणदान, कन्यादान, भूमिदान, वस्त्रदान इ. स्वरूपात व्यक्तीने किंवा समूहाने धार्मिक किंवा नैतिक बुद्धिने केलेला परोपकार म्हणजे दान होय. दान हे पुण्यकारक व पापनाशक कर्म आहे, असे जगातील सर्व धर्मशास्त्रे मानतात. भिक्षेकऱ्यास घातलेली भिक्षा किंवा धार्मिक कार्यासाठी महसुलातून प्रत्येक वर्षी काढून ठेवलेली रक्कम किंवा धर्मशील व्यक्ती किंवा धार्मिक कार्य यांच्या खर्चासाठी नेमून दिलेली रक्कम हेही धर्मादायात मोडते. सारांश मानवजातीसंबंधी सद्‍भावना व प्रेम या भावना धर्मादाय संकल्पनेशी निगडीत आहेत. ‘धर्मादाय’ यातील ‘धर्म’ हे पहिले पद त्यामुळेच आले आहे.

मदत करणे हा दानधर्मापाठीमागील मुख्य उद्देश आहे. कौटुंबिक जीवनाशी संबंधीत भावना व अनुभव यातून धर्मादायाची प्रतिनिधिक तत्त्वे उगम पावली आहेत. ग्रीक समाजात अतिथिधर्म ही धर्मादायामधील मुख्य कल्पना होती, तर रोमन समाजात दारिद्र्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना चरितार्थासाठी अन्नपुरवठा करण्याच्या कल्पनेतून दानधर्म व्यक्त होई. ख्रिस्ती धर्मी धर्मादाय हे प्रेमाशी समानार्थी मानतात. त्याचे श्रेष्ठतम स्वरूप ईश्वराचे मानवावरील प्रेम व मानवाचे ईश्वरावरील प्रेम आहे. मानवाचे ईश्वरावरील प्रेम त्याच्या मानवजातीवरील प्रेमातूनच व्यक्त होते. सेंट ऑगस्टीनच्या मते धर्मादाय हा एक सद्‍गुण आहे, ज्यायोगे आपण ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. मुसलमानांच्या पाच मुख्य तत्त्वांपैकी दान हे एक मुख्य तत्त्व मानण्यात येते.

दानाचा धर्माशी घनिष्ठ संबंध

बहुतेक समाजामध्ये दानाचा धर्माशी घनिष्ठ संबंध जोडण्यात आलेला आहे. ख्रिस्ती समाजात दानधर्माचे कार्य बहुतांशी चर्चकडे सोपविण्यात आले होते, तर हिंदू समाजात देवस्थाने ह्यात अग्रेसर होती. आजही परिस्थिती थोडीफार अशीच असली, तरी धर्मांबाबत तटस्थ धोरण स्वीकारणाऱ्या राज्यसंस्थेने हे कार्य चर्चकडून व देवस्थानांकडून स्वतःकडे घेण्यास सुरुवात केली आहे. अनियंत्रित दान धर्माच्या परोपजीवी वृत्तीची तसेच आळशीपणाची वाढ यांसारख्या दृष्ट परिणामांमुळे दानधर्माची परंपरागत संघटना बदलणे अपरिहार्य झाले. दानधर्म निधीच्या योग्य विनियोगासाठी इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या कायद्यामधूनच ब्रिटिश धर्मादाय प्रशासनाचा विकास झाला. १६६८ च्या सुमारास धर्मादाय कार्यक्रम संघटित करण्याची चळवळ इंग्लंडमध्ये सुरू झाली. थोड्याच अवधीत अमेरिकादी देशांमध्ये तिचा प्रसार झाला. ह्या चळवळीच्या नेत्यांनी गरजूंना स्वतःचे असे एक व्यक्तिमत्व असते व प्रत्येकाला स्वतःविषयी विशिष्ट अभिमान असतो, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. धर्मादायात वैयक्तिक स्वार्थास स्थान नाही व गरजांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करूनच गरजूंना मदत करावयास हवी ह्यांवर त्यांनी भर दिला. ह्याच वेळी अमेरिकन स्टेट बोर्ड ऑफ चॅरिटी अँड करेक्शननी गरजूंचे शोषणापासून व दुर्लक्षापासून संरक्षण करण्याचे कार्य हाती घेतले. प्रतिबंध, निर्मूलन आणि पुनर्वसन ह्या तत्त्वत्रयीवर त्या बोर्डाचा कार्यक्रम आधारित होता. ह्याचाच परिणाम धर्मादायासंबंधी नवीन व शास्त्राधिष्ठित दृष्टीकोन निर्माण होण्यात झाला आणि त्यांमुळे आधुनिक समाजकार्याचा पाया घातला गेला. १९०९ मध्ये ब्रिटीश पुअर लॉ कमिशनने एक अशी शिफारस केली, की गरजूंना त्यांच्या गरजांप्रमाणे निःस्वार्थभावनेने व सहानुभूतीने मदत देण्यात यावी. इंग्लंडमध्ये १८३५ ते १९३९ च्या दरम्यान धर्मादाय संस्थांबद्दलचे कायदे होत गेले. १९६० साली धर्मादायबद्दल नवीन कायदा होऊन त्या अन्वये अद्यावत सुधारणा करण्यात आल्या.

भारतात फार पूर्वीपासूनच दानविषयक धार्मिक कल्पनांना अनुसरून परोपकारी भावनेने अनेक धर्मशाळा, धर्मार्थ दवाखाने, पाठशाळा इ. सार्वजनिक न्यास स्थापण्यात आले. ह्या काळातील धर्मादाय संघटना बहूश: संप्रदायवादी किंवा जातिवादी स्वरूपाच्या होत्या. सामाजिक स्थित्यंतरामुळे ह्यांपैकी बऱ्याच निधींच्या उद्दिष्टांना अर्थ राहिला नाही. त्यामुळे काही निधींमध्ये नुसता पैसाच साठत गेला आणि राज्याने हस्तक्षेप करणे अनिवार्य झाले. प्रथम मुंबई राज्याने सार्वजनिक निधीबाबत कायदा करून निधीची उद्दीष्टे ठरवून दिली. अनाथ, अपंगांना मदत, शिक्षण, वैद्यकीय मदत आणि सार्वजनिक हिताच्या कोणत्याही कार्यास मदत, ही ह्या कायद्यानुसार निधींची मुख्य उद्दिष्टे होत.

धर्मादायाचा हेतू

पुण्यप्राप्ती हा धर्मादायाचा हेतू आहे. देवळे व देवता, धर्मशाळा, मठ, सार्वजनिक उत्सव, समाजोपयोगी पुण्यकृत्ये इ. धर्मादायसंबंधी केलेल्या कायद्याचे विवेचन, वाढ व संगोपन झालेले आहे. केवळ धार्मिक व केवळ समाजोपयोगी धर्मादाय असा भेद इंग्रजी कायद्यामध्ये असला, तरी तो मूलभूत हिंदू कायद्यात अभिप्रेत नाही.

कोणत्याही हिंदूला आपल्या संपत्तीचे हस्तांतर देणगीने अगर मृत्यूपत्राने धर्मादायासाठी करता येते. उदा., मूर्ती स्थापन करून तिची पूजाअर्चा करण्यासाठी, ब्राह्मणभोजनासाठी अगर गरिबांस अन्नदान करण्यासाठी, श्राद्ध वगैरे विधी करण्यासाठी, दुर्गापूजेसाठी, लक्ष्मीपूजेसाठी, विश्वविद्यालयासाठी, दवाखान्यासाठी वगैरे अशी ही पुण्यकारक धर्मादायाची यादी संपूर्णपणे देणे कठीण आहे. कोणताही पुण्यदायी धर्मादाय वैध म्हणून ग्राह्य होण्यासाठी तो सार्वजनिक उपयोगाचा नसला, तरी त्याला शास्त्राधार असलाच पाहिजे. शास्त्रविहित पुण्यकारक गोष्टींची यादी सार्वजनिक धोरण व चालू समाजाची गरज यांकडे लक्ष देऊन वाढविणे हिंदू कायद्यास मान्य होणार नाही. मूर्तिपूजेसाठी केलेला धर्मादाय हा इंग्रजी कायद्याप्रमाणे ‘अंधविश्वासावर’ आधारित धर्मादाय असल्यामुळे इंग्रजी कायदा त्यास ग्राह्य व कायदेशीर मानत नसला, तरी हिंदू कायदा त्यास वैद्य मानतो. मठ, देवळे, देवस्थाने अशा बऱ्याच संस्था पू्र्वीपासून चालत आलेल्या आहेत. या सर्व धर्मादाय संस्था सार्वजनिक न्यास आहेत, असे समजण्यात येऊ लागले. त्याप्रमाणे लेखी आधार नसलेल्या धर्मादाय संस्थाही रूढ प्रलक्षित न्यास आहेत, असे कायदा मानू लागला व त्याही सार्वजनिक न्यास या संज्ञेत बसविल्या जाऊ लागल्या. उदा., मुंबई सार्वजनिक न्यास कायदा १९५० यातील सार्वजनिक न्यास ही व्याख्या आणि मॅनेजर, मठ, हितसंबंधी व्यक्ती ह्या व्याख्या तसेच वक्फची व्याख्या यांवरून हे लक्षात येईल की सर्व प्रकारच्या सार्वजनिक धर्मादायाचा समावेश या कायद्यात आणून त्या सर्वांचे व्यवहार या कायद्यात सांगितल्याप्रमाणे चालावे, यासाठी या कायद्याच्या सर्व तरतुदी आहेत. अशा तऱ्हेचे कायदे भारतात अनेक राज्यांत झाले आहेत.

केंद्रसरकारने केलेले कायदे प्रामुख्याने विश्वस्तांच्या अधिकारांबाबत आहेत. काही राज्यांनी केलेल्या कायद्यामुळे विश्वस्तांचे अधिकार मर्यादित झालेले असून ह्या कायद्यांनी निधीबाबत पूर्ण तपशील देणे विश्वस्तांना भाग पाडले आहे. विश्वस्तांची नावे, जमाखर्चाचा अहवाल, निधींची मुख्य उद्दिष्टे व निधींच्या गुंतवणुकीमध्ये अथवा विश्वस्तांच्या बाबतीत झालेल्या कोणत्याही स्थित्यंतराची माहिती राज्यसरकारला देणे हे विश्वस्तांचे अनिवार्य कार्य आहे. असा पवित्रा बऱ्याच राज्यसरकारांनी घेतला आहे. विश्वस्तांनी जर कायद्याने घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन केले, तर त्यांना शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. कायद्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याकरिता चॅरिटी कमिशनरची नियुक्ती करण्यात येते.

धर्मादायाचे कायदेशीर अर्थाने केलेले चार विभाग

पाश्चात्य न्यायालयात मान्य झालेले धर्मादायाचे कायदेशीर अर्थाने केलेले चार विभाग आहेत : (१) दारिद्र्य विमोचन, (२) शिक्षण प्रसार, (३) धर्मप्रसार, (४) उपरोक्तविरहित असे सार्वजनिक हिताचे कार्य. पाश्चात्य देशांत या सर्व प्रकारचे धर्मादाय न्यास पद्धतीने चालतात. सार्वजनिक न्यासासंबंधी कायदे आहेत व अशा सर्व संस्थावर कायद्याचे हिशोब ठेवण्याचे वगैरे अनेक निर्बंध आहेत. तसेच याच्यावर देखरेख व अंमल चालविण्यासाठी धर्मादाय शाखेचे अधिकारीही आहेत.

हिंदू कायद्याप्रमाणे धर्मादाय प्रस्थापनेसाठी लेखांची व धार्मिक विधीची जरूरी नाही. विशिष्ट धर्मादायासाठी दिलेल्या दानविषयाचे समर्पण दात्याने केले आहे व आपला समर्पणाचा मनोदय स्पष्ट केला आहे, असे सिध्द झाले पाहिजे व समर्पित विषय इच्छित कार्यासाठी अलग काढून ठेविला पाहिजे व त्याचा उपयोग संकल्पित धर्मादायाकरिता पृथकपणे चालू केला पाहिजे. मृत्यूपत्राप्रमाणे जर एखाद्या मूर्तीची स्थापना करण्याची आज्ञा असेल व अशा स्थापन करावयाच्या मूर्तीसाठी अगर तिच्या पूजेसाठी जर व्यवस्था करण्याविषयी लिहिले असेल, तरीही असा धर्मादाय वैध असतो.

एकदा धर्मादाय म्हणून दिलेला विषय अगर त्याची मालकी दात्याकडे केव्हाही परत येऊ शकत नाही.

देवापुढे ठेवलेले द्रव्य, दागदागिने, अगर इतर वस्तू त्या त्या देवस्थानाच्या वस्तू असतात असा साधारण नियम. परंतु अशा वस्तू गुरव, पुजारी अगर बडवे यांस रूढीने वा वंशपरंपरा घेण्याचा अधिकार कित्येक ठिकाणी मान्य झालेला आहे आणि त्या हक्कांच्या सालवार वाटण्याही म्हणजे पाळ्याही होतात व हिस्सेही पडू शकतात.

पारशी पंचायतीमार्फत चाललेल्या धर्मादायाचे तीन प्रकार आहेत : (१) ज्यांची वहीवाट खुद्द पंचांमार्फत केली जात असे. (२) ज्यांची वहिवाट स्वतंत्र व्यवस्थापकाकडून होते असे.(३) खाजगी लोकांच्या नावाने चालविले जातात असे पारशी पंचायतीची स्थावर व जंगम मिळकतही कोट्यावधी रुपयांची आहे. या मिळकती खुद्द मुंबई आणि १९४७ पूर्वीचा मुंबई इलाखा यात आहे. पूर्वी पारशी धर्मादायास पारशी सार्वजनिक न्यास नोंदणीचा अधिनियम (मुंबई १९३६) लागू होता. त्याचे निरसन होऊन हल्ली मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियम (१९५०) लागू होतो. प्रेतवाहन व्यवस्था, धर्मशाळा, कुलीन परंतु अडचणीत असलेल्या लोकांस मदत, आंधळ्या-पांगळ्यांना मदत, गरिबांना अन्न, वस्त्र व औषधपाणी, बालसंरक्षण, अनायास फुकट धान्य, सॅनिटोरिअम, इस्पितळे असे अनेक प्रकारचे धर्मादाय चालू आहेत. मुसलमान धर्माप्रमाणे कायमच्या धर्मादायास वक्फ असे म्हणतात.

आजपर्यंत पुण्यप्राप्ती हाच प्रामुख्याने धर्मादायाचा उद्देश राहिलेला असला, तरी बदलत्या काळाची पाऊले पाहून आज मानवतावादी व भूतदयावादी दृष्टीकोनातूनच धर्मादायाची प्रस्थापना व व्यवस्थापन करणे समाजाच्या दृष्टीने अधिक हिताचे ठरणार आहे. माणसा-माणसांच्या मध्ये असणारा सामाजिक, सांस्कृतिक व अर्थिक असमतोल नष्ट करण्याचे एक प्रभावी साधन म्हणून धर्मादायाकडे पाहण्यास आता हरकत नाही.

लेखक: वि. भा. पटवर्धन ; पु. ल. भांडारकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate