অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ज्यूविरोधवाद (अँटी-सेमिटिझम)

अँटी-सेमिटिझम

ज्यू (यहुदी) लोकांना उच्च सामाजिक स्थान मिळू नये आणि त्यांचे आर्थिक, राजकीय व सामाजिक हक्क हे मर्यादित व खालच्या पातळीवर राहावेत, म्हणून समाजातील बहुसंख्यांकांकडून संघटित रीत्या अगर व्यक्तिशः प्रयत्न केले जात. काल्पनिक मानववंशभिन्नतेवर आधारलेले पूर्वग्रह, ज्यू लोकांकडे येशू ख्रिस्ताचे मारेकरी म्हणून पाहण्याचा ख्रिस्ती लोकांचा दृष्टिकोन आणि प्रचलित राजकीय - सामाजिक - आर्थिक परिस्थिती या कारणांमुळे वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या काळात या वादाने प्रखर रूप धारण केले आहे. ‘अँटी-सेमिटिझम’ ही संज्ञा १८७३ साली व्हिल्हेल्म मार या जर्मन वृत्तपत्रकाराने प्रथम वापरली असली, तरी या विरोधवादाचा इतिहास तसा फार जुना आहे. ज्यू लोक हे मानववंशाच्या दृष्टीने कॉकेशियन वंशाच्या सेमाइट या उपशाखेचे आहेत, ही कल्पना त्यांना होणाऱ्या विरोधाच्या बुडाशी आहे, म्हणून ज्यू विरोधवादाला 'अँटी-सेमिटिझम' असे म्हणण्यात आले; परंतु या कल्पनेला वस्तुस्थितीचा आधार नाही. असे संशोधनान्ती सिद्ध झाले आहे. मानववंशापेक्षा सांस्कृतिक दृष्ट्या ज्यू लोक हे सर्व समाजांत सर्व काळी अलग, अभेद्य व वैशिष्ट्यपूर्ण राहिले आहेत, ही मात्र वस्तुस्थिती आहे. ज्यू लोकांचा धर्म त्यांची सामाजिक-राजकीय व्यवस्था आणि संस्कृती यांना पूर्णपणे व्यापून राहिलेला आहे. त्यांच्या सांस्कृतिक अलिप्ततेचे व सामाजिक एकोप्याचे हे एक प्रमुख कारण म्हणून सांगितले जाते. याच कारणामुळे कोणत्याही समाजात ते सांस्कृतिक दृष्ट्या समरस होऊ शकले नाहीत. एकेश्वरवाद, आपल्या धर्मनिष्ठेनेच पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल ही श्रद्धा व ही किमया साधण्याकरिता देवानेच ज्यू लोकांची निवड केली आहे, ही कल्पना आणि कर्मकांड यांच्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा ज्यू लोकांचा एकोपा व आत्मविश्वास टिकून राहिला, असे म्हटले जाते; परंतु याच कारणांमुळे ते विरोधाचे व द्वेषाचे लक्ष्य बनले, असेही म्हटले जाते.

इ. स. पू. सहाव्या शतकापासून ज्यू लोक हे यूरोपीय देशांत पसरू लागले होते. विशेषतः इसवी सनाच्या पहिल्या शतकातील रोमन परचक्रांमुळे ज्यू लोकांची खूपच वाताहत झाली. रोमन लोकांच्या मागोमाग ते इटली, फ्रान्स, स्पेन या देशांत गेले. बरेचसे लोक ऱ्हाईन नदीच्या परिसरात–आजच्या जर्मनीमध्ये–स्थायिक झाले. ख्रिस्तपूर्व काळात रोमन आणि ग्रीक लोकांचा ज्यू लोकांना जरी उपद्रव झाला, तरी त्याचे स्वरूप बव्हंशी राजकीय होते. ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर, विशेषतः चौथ्या शतकाच्या सुरूवातीस, ख्रिस्ती धर्म हा रोमचा अधिकृत धर्म बनल्यापासून ज्यू लोकांना दुय्यम दर्जांचे लेखण्यात येऊन सर्वसामान्य नागरिकांचे हक्क त्यांना नाकारण्यात येऊ लागले. ज्यू लोकांना धर्मप्रसाराचा हक्क नाकारण्यात आला. ज्यू धर्म स्वीकारणे व ज्यू लोकांशी विवाहसंबंध ठेवणे, हा गुन्हा समजण्यात आला. ज्यू माणसाने हाताखाली नोकर ठेवू नये, वैद्यकीय व्यवसाय करु नये, तसेच ज्यू कारागीर असल्यास त्याने हाताखाली ख्रिस्ती उमेदवारास शिकाऊ म्हणून ठेवू नये, अशी बंधने त्यांच्यावर घालण्यात आली. त्यामुळे ज्यू लोक अधिकाधिक आत्मकेंद्रित बनले. बाह्य अत्याचारास धैर्याने तोंड देण्याकरिता धर्म हा त्यांचा एकमेव आधार होता, त्यामुळे ते धर्माला अधिकच चिकटून राहिले. ज्यू लोकांवर अत्याचार करणे, त्याचे समर्थन करण्याकरिता त्यांच्यावर कसलातरी खरा-खोटा दोषारोप करणे, अशा रीतीने पुन्हा होणाऱ्या अत्याचारास वाट करुन देणे व परिणामतः ज्यू लोकांची सामाजिक-सांस्कृतिक अलिप्तता, त्यांची एकजूट व कठोर मनाने जगण्याची जिद्द ही वाढीस लागणे, हा क्रम चालूच राहिला. तेराव्या शतकात बर्लिनजवळ आणि पंधराव्या शतकात व्हिएन्ना येथे क्षुल्लक कारणांवरून ज्यू लोकांची मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात आली.

इतिहास

साधारणतः दहाव्या किंवा अकराव्या शतकापासून खेडोपाडी समान नागरिकांचे हक्क नाकारण्यात आल्यामुळे बरेच ज्यू लोक शहरात येऊन बिगरशेती व्यवसाय करू लागले. शहरांच्या उदयामुळे ते अधिकाधिक व्यापार व सावकारी या व्यवसायांत शिरले. सांस्कृतिक अलिप्ततेमुळे शहरातील त्यांच्या वस्त्याही अलग पडल्या. अशा वस्त्या 'घेटो' म्हणून ओळखल्या जात. व्यापार आणि सावकारी हे त्यांचे प्रमुख व्यवसाय बनल्यामुळे साहजिकच सावकारीशी निगडीत असलेल्या स्वार्थ, कृपणता इ. दुर्गुणांचा आरोप त्यांच्यावर करण्यात येऊ लागला.

तेराव्या शतकात इंग्लंडमधून, चौदाव्या शतकात फ्रान्समधून तसेच चौदाव्या व पंधराव्या शतकांत जर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशांतून ज्यू लोकांची हकालपट्टी करण्यात आली. धार्मिक कारणाकरिता त्यांनी कोणाचा तरी बळी दिला, या आरोपाखाली १४६ ज्यू लोकांच्या समुदायाचा जर्मनीमध्ये १२९८साली नाश करण्यात आला. चौदाव्या शतकात प्लेगच्या साथीने (ब्लॅक डेथ) यूरोपमधील बहुसंख्य लोक मृत्युमुखी पडले. धर्मविहित आहार आणि स्वच्छता या कारणांमुळे ज्यू लोकांना त्याचा फारसा उपद्रव झाला नाही. यामुळे लोक चिडले व त्यांनी ज्यूंवर जादूटोण्याचा आरोप करून हल्ला चढविला. पुढील दोन वर्षांत ३५० ज्यू लोकांचा समूळ नाश करण्यात आला. या जाचाला कंटाळून ज्यू लोक पूर्व यूरोपकडे सरकत होते. सोळाव्या ते अठराव्या शतकांत पोलंडमध्ये जगातील बहुसंख्य ज्यू लोकांची वस्ती होती; परंतु याच काळात लाखो ज्यू लोक तेथे मारले गेले. रशियामध्ये ज्यूविरोधवाद हे झारशाहीचे अधिकृत धोरण होते. मार्क्सवादाच्या व साम्यवादाच्या संदर्भात तर ज्यू लोक कोंडीत सापडले. कार्ल मार्क्स हा ज्यू होता, म्हणून झार हे ज्यू लोकांकडे संशयाने पाहत होते. त्याचबरोबर व्यापार-सावकारीच्या त्यांच्या पेशामुळे बोल्शेविक पक्षही त्यांच्याकडे भांडवलशाहीचे उपासक आणि हस्तक म्हणून पाहत होता. १९१९-२० च्या क्रांतिकाळात चुकीच्या समजुतीमुळे अनेक धार्मिक वृत्तीच्या ज्यू लोकांची झार पक्षाकडून हत्या करण्यात आली.

१९१४–१८ च्या पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये ज्यूद्वेषाने कळस गाठला. युद्धात हरल्यामुळे व तहाच्या अपमानास्पद अटींमुळे जर्मन लोकांची मने खचली होती. या पराभूत मनोवृत्तीतून त्यांना वर काढण्याकरिता पराजयाचे स्पष्टीकरण करणे आणि कोणाचा तरी बळी देणे आवश्यक होते. समाजाच्या सर्व क्षेत्रांत यशस्वीपणे तळपणाऱ्या ज्यू लोकांवर राष्ट्रघातकी कृत्यांचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर युद्धानंतर जर्मनी राष्ट्राचा प्रमुख बनलेल्या हिटलरने व त्याच्या नाझी पक्षाने वंशद्वेषाचा प्रचारही सुरू केला. जर्मन लोक हे आर्य वंशाचे आहेत, आर्य हे उच्च संस्कृतीचे प्रवर्तक आहेत आणि ज्यू हे संस्कृतीचे विध्वंसक आहेत, असा नवा सिद्धांत त्यांनी मांडला. ज्यू लोक हे भ्याड परंतु घातकी आहेत, ते अतीव स्वार्थी व समाजद्रोही आहेत, अशी त्यांची साचेबंद प्रतिमा लोकांपुढे उभी करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध अनेक कायदे करण्यात आले. आर्थिक क्षेत्रात त्यांची कोंडी करण्यात आली. १९३३ मधील एका कायद्याने सर्व 'अनार्थ' लोकांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्यात आले. ज्यू लोकांची मालमत्ता नष्ट करणे, त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांना कैदेत टाकणे हे सत्र चालू झाले. १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरु झाल्यानंतर जर्मनीमध्ये व जर्मनीने बळकावलेल्या इतर देशांमध्ये अनेक ज्यू लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली. न्यूरेम्बर्ग खटल्यातून उघडकीस आल्याप्रमाणे १९४५ पर्यंत साठ लक्ष ज्यू लोक मारले गेले असावेत, असा अंदाज आहे. युद्धापूर्वी पोलंडमध्ये तीस लक्ष ज्यू होते. आज फक्त अदमासे तीस हजार उरले आहेत.

जर्मनीमध्ये ज्यूद्वेष

ज्यूद्वेष हा जर्मनीमध्ये पराकोटीला गेला असला, तरी अमेरिकेसहित इतर देशांमध्येही त्याचे धागेदोरे अजूनही सापडतात. साम्यवादी व भांडवलशाही अशा दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांमधील सामान्य जनता ही या विद्वेषापासून संपूर्णपणे मुक्त नाही, असे दिसून येते. ज्यू लोकांची सामाजिक-सांस्कृतिक अलिप्तता आणि समाजातील सर्व क्षेत्रांत ते आघाडीवर असल्याची वस्तुस्थिती यांमुळे तसेच ते आपल्यापेक्षा हीन दर्जाचे आहेत म्हणून नव्हे, तर स्पर्धात्मक अशा सर्वच क्षेत्रांत ते आपल्यापेक्षा सरस ठरतात, म्हणूनही इतर लोक त्यांचा द्वेष करतात, असेही काहींचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शतकांपासून भारतात आश्रयाला आलेल्या ज्यू लोकांबद्दल जनमानसात कोणतीही प्रतिकूल प्रतिक्रिया उमटलेली नाही, हे उल्लेखनीय आहे. विशेषतः महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेक ज्यू कुटुंबांनी मराठी ही मातृभाषा म्हणून स्वीकारलेली आहे.

ज्यू लोकांचे इझ्राएल  हे स्वतंत्र राष्ट्र १९४८ साली अस्तित्वात आले. तेव्हापासून भोवतालची अरब राष्ट्रे आणि इझ्राएल यांच्यात सतत संघर्ष चालू आहेत.

संदर्भ : 1. Clock, Charies Y.; Stark, Rodney, Christian Beliefs and Anti-Semitism, New York,

1966

2. Parkes, James, The Emergence of the Jewish Problem. 1878–1939, Oxford, 1946.

3. Simmel, Ernst, Ed. Anti-Semitism : A Social Disease, New York, 1946.

4. Simpson, G. E.; Yinger, J. M. Racial and Cultural Minorities, New York, 1965.

लेखक: मा. गु. कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate