स्वयंपाकासाठी महिलांचे चुलीवर असलेले अवलंबित्व कमी करुन त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे 2016 पासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. चुलीवर स्वयंपाक करतांना चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना डोळ्याचे विकार होतात. स्वयंपाक करतांना महिलांना होणारा त्रास आता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे कमी झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील 35 हजार 401 महिलांच्या घरातील गॅस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे पेटण्यास मदत झाल्यामुळे त्यांना स्वयंपाकासाठी मोठा आधार झाला आहे.
काबाडकष्ट करणाऱ्या दारिद्रय रेषेखालील महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकातील महिलांना या योजनेचा जिल्ह्यात प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा 18 वर्ष पूर्ण केलेल्या विवाहीत महिलेच्या कुटूंबाला या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन देण्यात येत आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेणाऱ्या कुटूंबाला सिलेंडरचे 1250 रुपये, रेग्युलेटरची सुरक्षा ठेव राशी 150 रुपये, 100 रुपये सुरक्षा होज, गॅस पासबुकचे 25 रुपये आणि तपासणी शुल्क, इस्टॉलेशन व प्रशासनीक शुल्क 75 रुपये असे एकूण 1600 रुपये भरावे लागतात. हे पैसे केंद्र सरकारकडून लाभार्थ्याला कर्ज स्वरुपात दिल्या जाते. 2 बर्नर असलेली शेगडी 990 रुपयांमध्ये दिली जात आहे. रिफील गॅस हा कंपनीकडून ग्राहकाला कर्ज स्वरुपात दिला जात आहे. गॅसमुळे जर अपघात होवून व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती 6 लाख रुपयाचा विमा सुध्दा काढण्यात येत आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 5 लाख 89 हजार 83 कुटूंबांनी तर शहरी भागातील 14 हजार 85 कुटूंबांनी नोंदणी केली आहे. 1 लाख 42 हजार 219 कुटूंबाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले असून या योजनेसाठी 71 हजार 140 कुटूंब पात्र ठरले आहे. त्यापैकी 35 हजार 570 कुटूंबाकडे पूर्वीचेच गॅस कनेक्शन असल्यामुळे उर्वरीत 35 हजार 401 कुटूंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.
ग्रामीण महिलांना शेतीची कामे करावी लागतात. जंगल व शेत परिसरातून आणलेल्या सरपणावर दोन्ही वेळचा स्वयंपाक करावा लागत असल्यामुळे त्यांना धुराचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांना डोळ्यांच्या विकारांचा सामना देखील करावा लागत होता. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून आता त्यांना गॅस कनेक्शन मिळाल्यामुळे स्वच्छ इंधन प्राप्त झाले. हजारो घरी उज्जवला योजनेतून गॅस पेटला आणि चुली व धुरापासून महिलांना मुक्तता मिळाली आहे.
लेखक - जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया
माहिती स्रोत: महान्यूज
अंतिम सुधारित : 4/15/2020