অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सहरिया

सहरिया

उत्तर भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे राजस्थान व मध्य प्रदेश राज्यांत आढळते. मध्य प्रदेशात त्यांची वस्ती अधिक आहे; मात्र बहुतेक सहरियांमध्ये चालीरीती, धार्मिक विधी, रूढी, राहणीमान इत्यादींबाबतींत साम्य आहे; मात्र प्रदेशपरत्वे काही किरकोळ फरक आढळतात. त्यांची लोकसंख्या ३,०२,७६६ (१९८१) होती. राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील पर्वतश्रेणी आणि जंगलांमधून त्यांची वस्ती आढळते; तर मध्य प्रदेश राज्यात भोपाळ, विदिशा, शिवपुरी, गुना, दतिया आणि ग्वाल्हेर या जिल्ह्यांतून ती आढळते. सहरिया म्हणजे वाघाचा सहकारी. एका दंतकथेनुसार ते शिवाच्या आशीर्वादामुळे वाघाप्रमाणे जंगलात वावरू लागले. म्हणून ते वाघाचे सहकारी बनले. सहरिया, सेऱ्हीआ, साहरिया वगैरे भिन्न नावांनी त्यांचा उल्लेख प्रदेशपरत्वे आढळतो. सहरियांची बहिर्विवाही विविध कुलनामे ( गोत्रे ) असून त्यांपैकी बद्रलिया, बरलिया, भोरोरिया, दबोरिया, सिरौसिया, कोटोरिया, येगोतिया, गैरचिना, दोसना, डायगोरिया, हारोनी, नोलानी, निमरिया, सोमानी इ. प्रमुख होत. ही कुलनामे वा गोत्रनामे कशी पडली, यांविषयी त्यांना काहीच माहिती नाही.

सहरियांना मूलतः स्वतःच्या मालकीचा जमीनजुमला नाही. पूर्वी जंगलातील लाकूडफाटा, कंदमुळे, मध, औषधी वनस्पती वगैरे गोळा करून ते विकण्याचा परंपरागत व्यवसाय करीत. काही शिकारीवर गुजराण करीत. अव्वल इंगजी अंमलात जमीनदारांच्या वेठबिगारीत ते अडकले. पुढे १९७५ मध्ये वेठबिगारी रद्द झाल्यानंतर स्त्रीपुरूष दोघेही मोलमजुरी व प्रामुख्याने शेतमजूर म्हणून काम करू लागले. तरीसुद्धा त्यांच्यातील काही स्त्रिया टोपल्या विणण्याचा धंदा करतात. त्यांच्यात विवाहाविषयी फारशी बंधने नाहीत. लग्नसमारंभ अगदी साधा असतो. वर-मुलगा वधूघरी जातो. वधूवरांनी मांडवाला पाच प्रदक्षिणा घातल्या की लग्न झाले, असे मानतात. तत्पूर्वी वधूवर पितरांची पूजा करतात. देज क्वचित दिले जाते. हे विवाह वडिलधाऱ्यांच्या वाटाघाटींतून जुळतात. जमातीत एकपत्नीकत्व असून मुलगी लग्नानंतर पितृगृही राहते. व्यभिचार, वेडेपणा, दुर्व्यसन या कारणांसाठीच घटस्फोट दिला जातो. पतीचे अकाली निधन झाल्यास, त्याच्या धाकटया भावाबरोबर त्याच्या पत्नीचा विवाह करण्याची प्रथा आहे. त्यांच्यात जननाशौच दहा दिवस पाळतात. दहाव्या दिवशी किंवा क्वचित बाराव्या दिवशी हरभऱ्याच्या घुगऱ्या शिजवून नामकरण विधी करतात.

ते हिंदू धर्मीय असून हिंदूंचेच सर्व सण व देवतांना भजतात; तथापि भवानीला त्यांच्यात अधिक महत्त्व आहे. याशिवाय गोनबाबा, नरसिंह, सानवार, गोरैया, कतिया, थोलिया, सोमिया, अह्यपाल वगैरे अनेक स्थानिक दैवतेही त्यांच्यात आहेत. यांतील बहुतेक दैवते या जमातीचे पूर्वज होत. त्यांचे मुख्य अन्न भात व रोटी असून ते मांस खातात. डुकराचे मांसही ते खातात. चहा आणि मदयपान स्त्रीपुरूष करतात. पूर्वी ते दारू गाळीत असत. त्यांचे अंत्यसंस्कार हिंदूंप्रमाणेच असून बाराव्या दिवशी श्राद्ध करून सर्वांना भोजन देतात.

प्रत्येक गावाची ( खेडे ) पंचायत, अकरा खेडयांची अकदशिया नामक पंचायत आणि सर्व जमातीची पंचायत, अशी त्यांच्यात त्रिस्तरीय पंचायत पद्धती असून अंतर्गत वाद, तंटे, घटस्फोट वगैरे प्रश्न तीत निकालात काढतात. पंचायतीचा निकाल न मानल्यास बहिष्कृत करतात. राजस्थानातील सहरिया इंडो-आर्यन भाषासमूहातील हाराऊती (व्हरोती ) ह्या बुंदेली भाषेतील बोलीभाषा जमाती अंतर्गत व्यवहारात वापरतात; तर मध्य प्रदेशातील सहरिया हिंदी भाषा बोलतात. दोन्हींची लिपी देवनागरी आहे. सहरिया विकास समितीव्दारे शासन आरोग्य, पिण्याचे पाणी, निवारा वगैरे सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सहरियांची मुले शाळेत जाऊ लागली आहेत, मात्र मुलींना ते घरीच ठेवतात.

संदर्भ : 1. Naik, T. B. The Saharia, Ahmadabad, 1984.

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate