অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लॅप

लॅप

उत्तर यूरोपातील नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि रशिया (एस्.एफ्.एस्.आर्.) यांत वास्तव्य करणारे भटके आदिम लोक. त्यांनी व्यापलेल्या भूप्रदेशास फेनोस्कँडिया (उत्तर यूरोपचा भाग) म्हणतात त्यांची लोकसंख्या १,१८,८१९ (१९८४ अंदाजे) असून त्यांपैकी निम्म्याहून अधिक लोक नॉर्वेत राहतात आणि त्यांचा समुद्रकिनाऱ्यावर मच्छीमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. फिन, गॉथ, स्लाव्ह या रानटी टोळ्यांच्या आक्रमणामुळे ते हळूहळू उत्तरेला सरकले.

लॅप या शब्दाचा अर्थ भटके लोक असा आहे. लॅप लोकांचा इतिहास व मूलस्थानाविषयी फारशी माहिती ज्ञान नाही. काही मानवशास्त्रज्ञ त्यांची पुरासायबीरियन लोकांत गणना करतात; तर काहीजण त्यांना अल्पाइनमध्ये अंतर्भूत करून मध्य आशियातून काही हजार वर्षांपूर्वी ते इथे आले असे मानतात; तर काही तज्ञ ते रशियातील लेक ओनेगा या भागातून दहा हजार वर्षांपूर्वी आले असावेत, असे मत व्यक्त करतात; पण त्यांच्यात साधर्म्य दर्शविणारे कोणतेच शारीरिक विशेष नाहीत. लॅप हे नाव स्वीड लोकांनी त्यांना दिले. ते स्वतःला सॅम किंवा फिन म्हणवून घेतात. पिवळसर वर्ण, बुटकेपणा (सरासरी उंची १५० सेंमी.), लहान डोके, मांसल अवयव, काळे केस व बांधेसूद शरीरयष्टी ही त्यांची काही शारीरिक  वैशिष्ट्ये  असून चिनी वा जपानी लोकांसारखी त्यांची काहीशी चेहरेपट्टी आढळते. ते उरल-अल्ताइक भाषा समूहातील फिनो-उग्रिक शाखेतील लॅपिश भाषा बोलतात. बव्हंशी लॅप द्विभाषी आहेत. सुमारे पन्नास प्रकारच्या बोलीभाषाही सांप्रत प्रचारात आहेत. उद्योगधंद्यांवरून त्यांचे चार भाग पडतात: जंगली लॅप, नदी काठचे लॅप, किनारपट्टीतील लॅप आणि पर्वतश्रेणीतील लॅप, त्यांपैकी डोंगरातले लॅप हे मूळ लोकांपैकी असावेत. ते रेनडियर नावाच्या पशूंचे कळप पाळतात. तेच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. समुद्री लॅप हे दरिद्री असून मच्छीमारी करतात आणि ते झोपड्यात राहतात. जंगली वा वन्य आणि नदीकाठचे लॅप हे शिकार, मच्छीमारी व पशुपालन करतात. ते वर्षभर राहुटीतच राहतात. हे नदीकाठचे लॅप काही प्रमाणात शेती करू लागले आहेत. त्यांची वस्ती स्थिर असून इतर लॅपपेक्षा ते सुधारलेले आहेत. रेनडियर हे जनावर त्यांच्या सर्व गरजा भागवते. त्याचे मांस ते खातात व दुधाचा व्यवसाय करतात तसेच कातडे कमावून त्याचे कपडे ते घालतात व लोकरीचा धंदा करतात. त्याला ते ओझ्यासाठीही वापरतात. नऊ महिने हिवाळा आणि थंडी यांमुळे हे लोक फार अस्वच्छ राहतात. बहुसंख्य लॅप लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला असला, तरी सुरुवातीस त्यांनी ख्रिस्तीकरणास विरोध दर्शविला होता; परंतु रशियन आणि स्कँडिनेव्हियन मिशनऱ्यांमुळे अठराव्या शतकात ख्रिस्ती धर्माचा झपाट्याने प्रसार झाला; तथापि दहा टक्के लोकांत आदिम धर्माचे काही अंश अद्यापि आढळतात आणि शामानचे महत्त्वही आहे. फिनलंडचे स्कोल्ट लॅप हे रशियन ऑर्थडॉक्स चर्चचे अनुयायी आहेत, तर उर्वरित ल्यूथरन चर्चचे आहेत. त्यांच्यात पितृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित असून लॅप लोकांच्या आप्तसंबंधांत भाऊ, बहीण आणि वैवाहिक जोडीदार यांनाच महत्त्व असते.

आंतरजातीय विवाह व औद्यागिकीकरण यांमुळे जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल घडत आहेत. अनेकांनी स्थिर जीवन अंगीकारले असून मत्स्योद्योग, होडी बांधणे व शेती हे व्यवसाय सुरू केले आहेत.

बर्फाळ प्रदेशातील लोकांत बर्फावरील घसरखेळ (स्केटिंग) लोकप्रिय असून कथाकथन व विशिष्ट तालावर गाणे हेही करमणुकीचे खेळ त्यांच्यात प्रचलित आहेत. लाकूड व हाडांवरील कोरीव कामात ते तरबेज आहेत. वरील प्रत्येक देशांत स्वतंत्र लॅप समाज असून त्यांची लॅपिश दैनिके प्रसिद्ध होतात आणि आकाशवाणीवर काही कार्यक्रमही होतात.

संदर्भ : 1. Bacon, Walter, Highway to the Wilderness, London, 1962.

2. Bosi, Roberto, The Lapps, Westport, 1976.

3. Vorren, Ornulr, Lapp Life and Customs, Oxford, 1962.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate