অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाखेर

लाखेर

ईशान्य भारतातील एक अनुसूचित वन्य जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने मिझोरामच्या लुंगलेई जिल्ह्यात व लुशाई पर्वतश्रेणीत आढळते. आसाम, हिमाचल प्रदेश या राज्यांतूनही लाखेर काही प्रमाणात आढळतात. म्यान्मातील (ब्रम्हदेशातील) भारतीय सरहद्दीजवळील चीन टेकड्यांत हाकगावाच्या परिसरात काही लाखेर राहतात. यांचे खरे नाव मरा असे आहे, पण लुशाई त्यांना लाखेर म्हणतात. व तेच पुढे रूढ झाले. त्यांची लोकसंख्या १९६१ च्या जनगणनेनुसार ८,७९१ होती.

कलदन नदीच्या परिसरात वळणावर आणि कलदन नदी व लुंगलेई नदी यांच्या दुआबात यांची खेडी वसली आहेत. त्यांची घरे मीटर-दीडमीटर उंचीवर लाकूड व बांबू यांनी बांधलेली असून जमातप्रमुखाचे घर खेड्याच्या मधोमध असते. भाषा, सभ्यता आदींबाबत त्यांचे कुकी जमातीशी साम्य आहे, असे जे. एच. हटन म्हणतात. टलाँगसई, झिडहूनंग, सबेऊ, हवथाई, लिअलई व हैमा या त्यांच्या प्रमुख कुळी आहेत. त्यांतही आणखी काही पोटकुळे आहेत. त्यांच्या कुळांत राजकुळे, खानदानी कुळे, सामान्य कुळे अशी वर्गवारी आहे. लाखेरांचा मूळ धंदा शेती असून झूमपद्धतीची स्थानांतरित शेती ते करतात. भात, मका, आळू (कोचू), आल, कडधान्ये, तंबाखू इ. पिके ते घेतात. दाओ व कुऱ्हाड या दोनच साधनांनी ते शेती करतात. भात हे त्यांचे प्रमुख अन्न आहे. याशिवाय कलदन नदीत मच्छीमारी आणि जंगलात लाकूडतोड व शिकार हे प्रमुख व्यवसाय ते करतात. वेतकाम, बांबूच्या टोपल्या व अनेक प्रकारच्या वस्तू विणणे हा व्यवसाय प्रामुख्याने पुरूष करतात. स्त्रिया कापड-विणकाम आणि ते रंगविणे हे उद्योग करतात. स्त्री-पुरूष दोघेही धूम्रपान करतात आणि तांदळापासून तयार केलेली सहम नावाची दारू पितात.

सुदृढ बांधा, तपकिरी पिंगट वर्ण, पसरट नाक, गालांची हाडे वर आलेली आणि मंगोलॉइड डोळे ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून बहुतेक मुलींना अकालिक ऋतुप्राप्ती होते. लग्‍नानंतर स्त्रिया वयस्क व लठ्ठ दिसतात. स्त्रिया पुरूषांपेक्षा अधिक कपडे घालतात आणि त्यातही समारंभप्रसंगी आणि ऐपतीप्रमाणे वैविध्य आढळते. स्त्रियांचा निळ्या रंगाचा लांब घागरा असून त्याच्या खालच्या भागावर रेशीम कशिदा असतो. घागऱ्यावर आखूड झगा व त्यावर जाकिट असते व कमरेला धातूचा घट्ट पट्टा बांधतात. त्यांना कवड्या, शंखशिंपले यांच्या दागिन्यांचा छंद असून विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा त्या गळ्यात घालतात. परमटेकचा हार आणि थंग्राहेऊ कर्णभूषणे हे त्यांचे आवडते अलंकार होत. मानेवर केसांचा अंबाडा असतो. समारंभाव्यतिरिक्त पुरूषांचा नेहमीचा पोशाख साधा असतो. एक मोठे कापड ते धोतरासारखे सर्वांगावर वापरतात. त्यांच्या पगड्याही दोन प्रकारच्या असतात : ठेवणीतल्या व रोजच्या. शिखांप्रमाणे टाचणीने पगडी ते टाचून बसवितात.

समान कुळीत त्यांच्यात विवाह होतात. त्याप्रमाणे एका स्त्रीला दोन नवऱ्यांपासून झालेल्या सावत्र भावंडांतही विवाह होतो. वधू-मूल्याची पद्धत रूढ असून पूर्वी यांच्यात गुलामगिरी पद्धत फार मोठ्या प्रमाणावर होती. ते युद्धकैद्यांना गुलाम बनवीत, लग्‍नात वधू-मूल्य म्हणूनही गुलाम देण्याची प्रथा होती. बालविवाह रूढ आहेत. लग्‍नापूर्वी मुलामुलींच्या लैंगिक संबंधांवर विशेष बंधन नाही. त्यामुळे प्रेमविवाहांचे प्रमाण जास्त आहे. मामेबहिणीच्या विवाहाला अधिमान्यता आहे. विवाहविधीत टिपणीविधी, मद्यपान, मेजवानी आणि वरात यांना महत्त्व असते. लग्‍नानंतर एक महिना नवदांपत्यास एकांत उपभोगता येत नाही. पुनर्विवाह आणि घटस्फोट यांना मान्यता असून वयस्क विधवेला तरूण मुलाबरोबर आणि तरूण विधवेला वयस्क पुरूषाबरोबर लग्‍न करण्याचा प्रसंग उद्‌भवतो. बापाने आपल्या मुलाच्या निधनानंतर त्याच्या बायकोशी म्हणजे आपल्या विधवा सुनेशी पुनर्विवाह करावा, असा जमातीचा दंडक आहे. दीर व विधवा भावजय यांचा पुनर्विवाह हा सर्वपरिचित आहे. लाखेरांमध्ये पितृसत्ताक पद्धती रूढ असून पित्याच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती वारसाहक्काने मुलाकडे जाते. तरीसुद्धा स्त्रियांना समाजात स्वातंत्र्य असून पुरूषांबरोबर काही हक्क उपभोगण्याचा अधिकार आहे.

लाखेरांच्या खेड्यात जात पंचायत असते. तिचा मुख्याधिकारी जमातप्रमुख असून त्यात राजकुळे, खानदानी कुळे व सामान्य कुळे यांतून सभासद निवडतात. या सभासदांना माचा म्हणतात. विवाह, जन्म, मृत्यू, बळी आदी समारंभांच्या वेळी तसेच भांडणतंटे व अन्य वाद या मंडळातर्फे निकालात काढतात. जातिबहिष्कृत ही सर्वांत कडक व मोठी शिक्षा असते. जमातप्रमुखाला सर्व बाबतींत मान असतो आणि प्रथेनुसार शिकार, धान्य इत्यादींत त्यास वाटा मिळतो.

खझंगपा म्हणजे पिता हा त्यांचा प्रमुख देव असून त्यालाच पछपा म्हणतात. झंग व ल्युराऱ्हिपा असे आणखी त्यांचे देव असून झंग संतती, संपत्ती व दीर्घायुष्य देतो आणि कोपला, तर संकटे आणतो, अशी त्यांची समजूत आहे. तर ल्युराऱ्हिपा कोपिष्ट असून त्याला संतुष्ट करण्यासाठी बळी द्यावा लागतो. याशिवाय निसर्ग देवांना ते भजतात. मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे अलीकडे त्यांच्यातील बहुसंख्य लोक ख्रिस्ती धर्मी झाले आहेत; तथापि अद्यापि त्यांच्यात काही प्रमाणात निसर्गपूजा रूढ आहे.

लाखेर मृत व्यक्तीला पुरतात. पुरण्यापूर्वी गरम पाण्याने तेल लावून स्‍नान घालतात. नंतर कपडे घालून प्रेत दोन–तीन दिवस तिरडीवर बांधून ती भिंतीला टेकून उभी ठेवतात आणि मृताच्या तोंडात दारू, मांस, भात वगैरे घालतात. रात्रभर इष्टमित्रांसह जागर करतात व तिसरे दिवशी घरासमोरच खड्डा खणून गडद निळ्या रंगाच्या कापडात गुंडाळून पुरतात. खड्ड्याच्या जागी स्मृतिस्तंभ उभा करतात. त्यावेळी मेजवानी होते आणि मिथुन प्राणी किंवा डुक्कर मारतात व दारू पितात.

लाखेर ही लढाऊ जमात होती. इंग्रजांशी त्यांचा पहिला संबंध बंडखोर म्हणून आला. इंग्रज त्यांना शेंडू म्हणू ओळखीत असत. १८९१ मध्ये कॅप्टन शेक्सपीअरने हा प्रदेश पादाक्रांत करून तेथे ब्रिटिश शासनाचे पाय पक्के रोवले.

संदर्भ :1. Barkataki, S. Comp. Tribes of Assam, New Delhi,1969.

2. Chattopadhyay, Kamala Devi, Tribalism in India, New Delhi, 1978.

3. Parry, N. E. The Lakhers, London, 1932.

४. संगवे, विलास, आदिवासींचे सामाजिक जीवन, मुंबई, १९७२.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate