অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माओरी

माओरी

न्यूझीलंडमधील मूळ रहिवासी जमात. हे मुळचे पॉलिनीशियातील असून इ. स. आठव्या शतकापासून ते न्यूझीलंडच्या उत्तर किनाऱ्यावर टोळीटोळीने येऊ लागले आणि चौदाव्या शतकापर्यंत न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. काही तज्ञांच्या मते हे पॉलिनिशियन माओरी मुख्यतः उत्तर बेटाच्या किनारपट्टीतच स्थायिक झाले असावेत.

तत्पूर्वी माओरींचे पॅसिफिक महासागरातील इतर बेटांतील लोकांशी संबध होते. मात्र माओ शिकारी किंवा माओ पक्षी यांवरून त्यांना माओरी हे नाव मिळाले असावे. त्यांची वस्ती मुख्यत्वे उत्तर न्यूझीलंड मध्ये आढळते. त्यांची लोक संख्या २,५२,७०० (१९७५) होती. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या आठ टक्के ती आहे.

सफलताद्योतक मानवाकृती-हरितमणी सफलताद्योतक मानवाकृती-हरितमणी न्यूझीलंडमध्ये यूरोपियानांचा चंचूप्रवेश एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस झाला आणि हळूहळू मिशनरी कार्यकर्त्यांसोबत ब्रिटिशांनी व्यापारानिमित्त वसाहतीस प्रारंभ केला. त्या वेळी माओरींनी त्यांच्या विस्तारास प्रतिकार केला. पुढे ब्रिटिश वसाहत वाल्यांनी माओरींबरोबर वाइटांगीचा तह केला (१८४०).त्यानुसार ब्रिटिशांनी माओरींचे सांपत्तिक हक्क मान्य करून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि मगच १८४१ मध्ये न्यूझीलंड ही स्वतंत्र वसाहत स्थापन झाली. त्या नंतर माओरींनी ब्रिटिश राजसत्तेस अधिकृत मान्यता दिली. वसाहत वाल्यांनी माओरींकडून अनेक जमिनी खरेदिल्या. त्यांना हे गोरे बेकायदेशीररीत्या जमिनी लुबाडतात असे वाटून ब्रिटिश व माओरी यांत संघर्ष निर्माण झाला आणि त्याची परिणती बंड, युद्धे यांत झाली. १८७० पर्यंत या चकमकी चालू होत्या. त्यानंतर माओरींनी गोऱ्यांचे वर्चस्व पूर्णतः मान्य केले.

माओरी हे सर्वसाधारणतः इतर पॉलिनीशियनांप्रमाणे कॉकेशियन वंशातील लोकांप्रमाणेच उंचेपुरे, तांबूस-तपकिरी वर्णाचे, धडधाकट असून काळे कुरळे केस, बारीक पिंगट डोळे, रुंद चेहरा, पसरट नाक ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. टेको टेको : गणचिन्हात्मक गृहशोभनाचा एक प्रकार.टेको टेको : गणचिन्हात्मक गृहशोभनाचा एक प्रकार.बहुतेक स्त्री-पुरुष अर्धनग्न असतात. कमरेपर्यंतचा भाग ते जाड्याभरड्या कापडाने विशेषतः तागाच्या कापडाने झाकतात. यूरोपियनांच्या संपर्कामुळे विसाव्या शतकांत त्यांच्या राहणीमानात व पोशाखात अनेक बदल झाले असून शिक्षणाचा प्रसारही झपाट्याने होत आहे. स्त्री-पुरुष दोघेही गोंदून घेतात. विशेषतः तोंडावर गोंदून घेण्याची जुनी चाल आता नष्ट होत असूनही गोंदण्याची हौस आढळते. मलायोपॉलिनीशियन भाषा कुटुंबातील माओरी ही त्यांची भाषा असून ते लिहिण्यासाठी रोमन लिपीचा वापर करतात.

माओरी प्रथम न्यूझीलंडमध्ये आले, तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर टॅपिओका, रताळी, भाकरीचे झाड, सुरण, केळी, नारळ, केवडा इ. विविध वनस्पती व फळझाडे आणली; परंतु त्यांपैकी कुमरा (गोड बटाटा), याम, तारो, भोपळा अशी निवडक पिकेच थंड हवामानामध्ये टिकून राहिली. मच्छीमारी व शेती हे त्यांचे प्रमुख व्यवसाय असले, तरी मेंढपाळ, चटया विणणे इत्यादी व्यवसायही ते करतात. मासेमारीतील त्यांचे ज्ञान चांगले असून समुद्रात संचार करण्यासाठी ते लहान मोठे पाडाव व होड्या वापरतात. त्यांवर कलाकुसर केलेली असते. मासे पकडण्याचे गरी हे अर्धवर्तुळाकृती साधन वैशिष्ट्यपूर्ण आहे.

यांची वस्ती मुख्यत्वे डोंगर-उतारावर संरक्षणात्मक बांधलेल्या बालेकिल्ल्याच्या आसपास खेड्यात (पा) असते. घरे लहान असून लाकडाचा जास्तीतजास्त उपयोग करून ती बांधलेली असतात. काही ठिकाणी दगडी पायावर घरांची बांधणी करतात. घरामध्ये क्वचित ओसरी, बैठकीची खोली आणि स्वयंपाक घर एवढ्याच खोल्या असतात. मंदिरे व सार्वजनिक वास्तू मोठ्या असून त्यांच्या बांधकामात गुळगुळीत व रेखीव दगडांचा वापर करतात. घराच्या दर्शनी भागावर तसेच गणेशपट्टीवर कोरीव काम करतात. त्यात कीर्तिमुख सदृश भव्य पौराणिक आकृती काढतात.

माओरींची सामाजिक संघटना चौदाव्या शतकात आलेल्या काही आप्तसंबंधांवर आधारित आहे. वाक (कॅनो) यात अनेक इवी (जमाती) पूर्वी समाविष्ट केलेल्या असून त्या भिन्न कुळीत (हापू) विभागलेल्या आहेत. त्या कुळी अनेक पितृसत्ताक कुटुंबात (व्हानाऊ) पुन्हा विभागलेल्या असून वारसा हक्क मोठ्या मुलाकडे जातो. विवाह नातेसंबंधात होतात. वयात आल्यानंतरच मुलामुलींचे विवाह ठरतात. रजस्वला मुलींच्या बाबतीत काही धार्मिक संस्कार रूढ असून कुमारींना लैंगिक स्वातंत्र्य व स्त्रियांना समाजात मानाचे स्थान आणि अनेक बाबतीत स्वातंत्र्य आहे.

माओरी जडप्राणवादी असून निसर्गपूजा व पूर्वजपूजा त्यांत रूढ होती. त्यांचा धर्म मुख्यत्वे ‘माना’ व तापू (ताबू) या दोन संकल्पनांभोवती केंद्रित झालेला होता. आपल्या पूर्वजांचा जन्म पृथ्वी (माता) व आकाशदेव (पिता) यांच्या पोटी झाला, अशी त्यांची समजूत होती. या दोन देवतांशिवाय समुद्रदेव, प्रकाश देवता (सूर्य) इ. देवतांनाही ते भजत; परंतु ब्रिटिशांच्या सत्ता स्थिरतेनंतर त्यांपैकी बहुतेक माओरींनी ख्रिस्ती धर्माचा अंगीकार केला असून त्यांची अनेक स्वतंत्र चर्चे आहेत व सु. ३०,००० त्याचे सभासद होते (१९८०). प्रमुख माओरी चर्चमध्ये युनायटेड माओरी मिशन, रिंगाटून, रतन वगैरेंचा समावेश होतो.

न्यूझीलंडच्या आधुनिक कलाविष्कारात माओरींच्या मूलभूत कलांची छटा आढळते. माओरींनी काष्ठशिल्पात प्रावीण्य मिळविलेले असून त्यांची ही कला जगप्रसिद्ध झाली आहे. या कलेचे प्रदर्शन त्यांच्या लहान होड्यांवर तसेच शस्त्रास्त्रे, घरे व चर्चे यांच्या प्रवेशद्वारांवर पाहावयास सापडते. माओरी विणकामातही तरबेज असून ते तागाच्या दोऱ्याने विणकाम करतात व कपड्यावर विविध भौमितिक आकृत्या व मोहक आकृतिबंध भरतात.

माओरींची मूळ संस्कृती यूरोपियनांच्या आगमनानंतर हळहळू अस्तंगत होत चालली असून आधुनिकीकरणाबरोबर ते न्यूझीलंडच्या राजकारणात सहभागी होत आहेत. संसदेत त्यांच्यासाठी काही खास जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांची मुले समान तत्त्वांवर यूरोपियनांबरोबर अध्ययन करीत आहेत; तथापि पूर्णतः माओरी गोऱ्यांमध्ये एकरूप झाले आहेत असे म्हणता येत नाही.

संदर्भ : 1. Best, Elsdon, The Maori, New York, 1979.

2. Buddle, Thomas, The Maori King Movement in New Zealand, New York, 1979.

3. Sorrenson, M. P. K. Maori Origins and Migrations, Wellington, 1979.

4. Wingert, P. S. Primitive Art, New York, 1962.

लेखक : सु. र.देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate