অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पारधी

पारधी

महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती विशेषतः खानदेशात आढळते. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांतही यांची थोडीशी वस्ती आहे. लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार २७,३६३ होती. या जमातीचे ‘गाव पारधी’ व ‘फासे पारधी’ असे प्रमुख दोन पोटभेद असून त्यांतही अनेक पोटभेद आहेत. पारध करणारे ते पारधी अशी व्युत्पत्ती झाली आहे. मध्य प्रदेशात पारधी बहेलिया, मीरशिकार, मोघिया, शिकारी, टाकणकार इ. नावाने ओळखले जातात. पारध्यांचे मूलस्थान ज्ञात नाही. ते स्वतःला राजपूत समजतात. ते उत्तरेकडून प्रथम गुजरातेत आले व तेथून पुढे महाराष्ट्रात आले असावेत. त्यांची देवी अंबिका असून त्यांच्यापैकी काहीजण गुजराती भाषा बोलतात, तर इतर मराठी, कन्नड व अहिराणी बोलतात. शिक्षण व साक्षरता यांचे प्रमाण त्यांच्यात फारच कमी आहे. पारधी हे वर्णाने काळे असून चपळ आणि सोशिक आहेत. ते शिकार करतात. शिकारी व्यतिरिक्त काही मोलमजुरी, पाथरवटाचे काम व शेतीही करतात. यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्तीही आढळते. फिरते पारधी अस्वच्छ व अर्धनग्न असतात. ते केस वाढवितात व विंचरत नाहीत. स्त्रिया लुगडे, चोळी अथवा घागरा नेसतात. स्त्रियांना अलंकारांची हौस असून कथिल व पितळेचे अलंकार त्या वापरतात. गळ्यात मण्यांच्या माळा घालतात. पुरूष कमरेला लंगोटी किंवा अपुरे धोतर नेसतो व क्वचित पागोटे घालतो. त्यांची मातीच्या धाब्याची घरे एकमेकाला लागून असतात. त्यांना ‘पाळ’ म्हणतात. त्यांच्या वस्तीला पारधवाडा म्हणतात.

रसेल आणि हिरालाल यांच्या मते, पारध्यांत अनेक अंतर्विवाही गट आहेत : फासे पारधी, लंगोटी पारधी आणि टाकणकार. त्यांच्यात गोत्र किंवा देवक आढळत नाही. राठोड, चव्हाण, सोळंकी, पवार इ. कुळी आहेत. या जमातीत पितृसत्ताक कुटुंबपद्धती असून लग्नात वधूमूल्याची प्रथा आहे. मुलेमुली वयात आल्यानंतर विवाह होतात. जर एखाद्या नवर्यायमुलास वधूमूल्य देण्याची ऐपत नसेल, तर त्याने आपल्या भावी सासर्याजकडे काम करावे, असा रिवाज आहे. विवाहातील प्रथा व चाली हिंदूंप्रमाणेच आहेत. मामेभावाशी विवाह संमत असून आतेभाऊ व मावसभावाशी निषिद्ध मानण्यात येतो. दुसर्या जमातीशी रोटीबेटी व्यवहार केल्यास त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येतो. बहुपत्नीत्वाची चाल आहे. घटस्फोट विशिष्ट परिस्थितीत दोघांनाही घेता येतो आणि विधवेस पुनर्विवाह करता येतो. मात्र विधवा आपल्या आतेभावाशी लग्न करू शकते; परंतु मावसभाऊ किंवा मामेभाऊ यांच्याशी लग्न करू शकत नाही. मृत पतीच्या धाकट्या भावाशीही ती लग्न करू शकते; परंतु थोरल्या दिराशी लग्न करू शकत नाही. विधवाविवाह कृष्णपक्षात साजरा केला जातो.

पारधी जमातीने हिंदूचे बहुतेक देव आणि उत्सव स्वीकारले आहेत. या उत्सवांत ते नृत्य करतात. नृत्य हा त्यांचा आवडता छंद आहे. मारुती, महादेव, विठोबा, भैरव, देवी यांची ते पूजा करतात. गुढी पाडवा, अक्षय तृतीया, पोळा, नवरात्र, दिवाळी, होळी इ. सण ते साजरे करतात. भगताला त्यांच्या पंचायतीत व एकूण जमातीत प्राधान्य असते.

पारधी मृतांना पुरतात; बाळंतीण स्त्री किंवा यात्रेहून आलेली व्यक्ती मृत झाली, तर मात्र तिला जाळतात.

संदर्भ : 1. Russell, R. V.; HiraLal, Tribes and Castes of the Central Provinces of India, Vol. 1, Delhi, 1975.

2. The Maharashtra Census Office, Census of India, 1961, Vol. X, Part V- B Scheduled Tribes in Maharashtra, Ethnographic Notes, Bombay, 1972.

लेखक : नरेश परळीकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate