অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पहाडी रेड्डी

पहाडी रेड्डी

आंध्र प्रदेशातील एक वन्य जमात. यांची लोकसंख्या १९७१ च्या शिरगणतीप्रमाणे ४,३०६ होती. यांची वस्ती मुख्यत:  हैदराबाद, पूर्व गोदावरी, विशाखापटनम् या जिल्ह्यांत आढळते. हे लोक कोया, कोंड अगर बस्तरच्या गोंडांहून अधिक वन्य आहेत. हे वर्णाने पिंगट किंवा काळसर तपकिरी असून रुंद चेहरा, मध्यम उंची, बसके नाक, कुरळे केस, पातळ ओठ व टोकदार हनुवटी ही यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. रेड्डी बायकांचे स्तनही खुरटे असून एक अपुरे लुगडे त्या नेसतात. तरुण मुली वक्षस्थळ पदराने झाकतात; परंतु मूल झालेली स्त्री आपली छाती उघडीच ठेवते. स्त्रिया वेताच्या शंखांच्या व काचेच्या मण्यांच्या माळा घालतात व पितळेची कांकणे घालतात. लग्न झालेल्या स्त्रिया मंगळसूत्राची वाटी किंवा पुतळी तांबड्या दोऱ्यात ओवून घालतात. तिला ‘पुस्ती’ म्हणतात. नाकात सुंकले व कानात बाळ्या किंवा कुडी घालतात. पुरुष ‘गोशबता’ म्हणजे लंगोट लावतात. कमरेला दोरी बांधतात आणि त्यात सुरा, विळा वगैरे वस्तू खोचलेल्या असतात. शिंदीच्या तंतूची विणलेली एक माळ पुरुष गळ्यात घालतात. कधीकधी काळ्या मण्यांची दुहेरी माळही ते घालतात. पुरुष व स्त्रिया दोघेही लांब केस ठेवतात. पुरुष बुचडा घालतात. कोयांच्या संपर्काने त्यांच्या केशभूषेत काही फरक झालेले आढळतात. यांच्यात गोंदण्याची प्रथा फारशी आढळत नाही. स्वावलंबन व स्वातंत्र्यप्रियता हे दोन स्वभावविशेष रेड्डींत आढळतात. नाचगाण्याचे प्रमाण या जमातीत कमी आहे. त्याहूनही त्यांच्यातील लोककथांचे प्रमाण कमी आहे. डोंगरभागातले लहान पाडे व गोदावरीच्या तीरावरची मोठी खेडी, या प्रकारच्या वसाहती रेड्डी प्रदेशांत आढळतात. पूर्व घाटातल्या दाट डोंगरी रानात राहणाऱ्या रेड्डींना ‘कोंडा रेड्डी’ अगर ‘पहाडी रेड्डी’ असे नाव पडले आहे. पहाडातल्या वसाहती अगदी लहान असतात. कधीकधी अवघ्या दोन-तीन घरांचाच एक पाडा असतो, कधीकधी विखुरलेल्या पाड्यांचे मिळून एक गाव होते. पोडू पद्धतीची शेती असल्यामुळे या पहाडी वसाहती कायम स्वरूपाच्या नसतात. तेकापल्ली, तुमिले, कोंडापुडी या गावांतली घरे नदीच्या तीरावर बांधलेली आढळतात. मोठ्या गावात मधोमध चौक असतो, त्याला ‘पेद्दा दरे’ म्हणतात.

रेड्डींची घरे चौकोनी असून ती ओट्यावर बांधलेली असतात. दोन बाजू असलेल्या एका खांबावर त्याची उभारणी होते, या खांबाला ‘निद्रम’ म्हणतात. त्याच्यावर शिखरासारखे छप्पर रचतात. छप्पर बांबूच्या छिलट्यांचे असून त्यावर ताडाची पाने व गवत आच्छादतात. भिंती कुडाच्या असतात व जमीन शेणाने सावरतात. जमिनीवरच पाणी साठवण्यासाठी  ‘निल्ला कुंडा’ या नावाचे रांजण असतात. बांबूच्या परड्यांत (जिंजल बुट्टा) जंगलातली कंदमुळे गोळा करतात. धान्यही त्यातच साठवून ठेवतात. रेड्डी लोक चटया विणतात; माशांची जाळी तयार करतात. मुलांना टोपलीसारख्या विणलेल्या पाळण्यात (वियुल) निजवतात.

रेड्डी शेती करीत असले, तरीही वन्य खाद्यसंचय करण्यात ते कसूर करीत नाहीत. तुटीच्या हंगामात ते कंदमुळांवर राहतात. ‘जिरिगु चेट्‌टू’ या तालसदृश वृक्षापासून ते दारू काढतात आणि त्याच्या खोडातल्या गाभ्याचा अन्न म्हणून उपयोग करतात. एक मीटर लांबीच्या एका तुकड्यातल्या गरावर एक कुटुंब आठ दिवस काढू शकते. हा गर वाळवून, कुटून त्याचे पीठ करून त्याची भाकरी करतात किंवा कांजी करतात. या जमातीत आंबा फार महत्त्वाचा असतो, नवे आम्रफळ खाण्याचा एक विधी असतो, त्याला ‘मामिदी पांडुगा’ म्हणतात; तो मार्च-एप्रिलमध्ये करतात. हे लोक शिकार वाटेल तेव्हा आणि वाटेल तिथे करीत; पण शिकारीला बंदी झाली आहे, तरीही भूमिदेव पंडुगाच्या आराधनेसाठी शिकार करण्याची पर्वणी ते सोडीत नाहीत. हरिण, सांबर, डुक्कर वगैरेंची शिकार तर ते करतातच; परंतु उंदरांसाठीही रानात सापळे लावून ठेवतात. ते बेडूक, साप व मगर खात नाहीत; पण घोरपड खातात. मध गोळा करणे हा रेड्डी लोकांचा आवडीचा छंद आहे. मादक द्रव्याचा उपयोग करून ते मासेमारी करतात.

रेड्डी पूर्वी पोडू पद्धतीने शेती करीत. ती प्रथा कायद्यानेच काहीशी नियंत्रित झाल्यामुळे ते स्थायिक शेतीकडे वळू लागले आहेत. पेरणीच्या वेळी रेड्डी धरित्रीचे पूजन करून तिला डुकराचा बळी देतात; या विधीला ‘भूमिदेवता पंडुगा’ म्हणतात. पुजारी बळी दिलेल्या डुकराचे रक्त जमिनीवर व बियाण्यावर शिंपतो आणि मग ते पेरतात. नवे पीक हाती आल्यावर ‘चिकुरकाई पंडुगा’ म्हणून एक विधी करतात.

नांगरटीच्या शेतीत मुख्य पीक भाताचे होय, मात्र रेड्डी लोक पुष्कळदा लावणी न करता इतर पिकांसारखेच भात काढतात. शेतीसाठी बैल व रेडे यांचा उपयोग करतात. गाई-म्हशींचा दुभत्यासाठी उपयोग करणे त्यांना माहीत नाही. गोमांस ते खात नाहीत, त्यामुळे गोमांस खाणाऱ्या कोयांहून ते श्रेष्ठ समजले जातात. बकरे व डुकरांचे जतन करतात. डुकराची जोपासना व त्याचा बळी हे रेड्डींच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. बळीच्या विधीसाठी जे अन्न शिजवायचे ते पुरुषांनीच शिजविले पाहिजे, असा दंडक आहे. रेड्डींमध्ये ‘कुरा’ नावाचा रस्सा करतात. याबरोबर भात अगर मक्याचा वा जोंधळ्याचा भातासारखा शिजवलेला भरडा खातात. रेड्डींचे नित्याचे व स्वस्त अन्न म्हणजे जावा किंवा पेज. कधीकधी असेच कुठलेही पीठ घेऊन त्यात मीठ घालून भिजवतात व त्याच्या थापट्या पानांत गुंडाळून गोवऱ्यात भाजतात. सणासुदीला हे पानगे करतात.

रेड्डी लोकांत गर्भारशीच्या संदर्भात विशेष विधिनिषेध नसतात. बाळंतपण राहत्या घरीच होते. जननाशौच पाच दिवस पाळतात. रेड्डी कुटुंब छोटे असते. मुलीच्या ऋतू काळात ‘समर्त गुर्सो’ या नावाच्या वेगळ्या पानांच्या झोपडीत पाच दिवस तिला ठेवतात. त्यानंतर तिने स्नान केले की, तिची आई एक कोंबडे तीन वेळा तिच्यावरून उतरते व ‘कोरी राजा कोरकू’ असे म्हणते. त्याचा अर्थ कुणालाच माहीत नाही. लग्न आईबापच ठरवतात. वयात आल्यावरच लग्ने होतात. लग्न लावण्यासाठी वधूला वराच्या गावी जावे लागते. देज पाच ते पंधरा रुपयांपर्यंत वधूला दिला जातो. लग्नात नवरानवरीला शेजारी  पाटावर बसवतात. मग न्हावी त्यांची हातापायांची नखे साफ करतो व पाय धुतो. त्यांच्या डोक्यांना तेल लावतो, मग त्या दोघांच्या डोक्यांवर थंड पाणी ओतले, की तो त्यांच्या ओंजळीत धान्य (तांदूळ) टाकतो, ते धान्य ती दोघे एकमेकांवर टाकतात. मग हळदीच्या दोऱ्यात ओवलेली पुतळी नवरा मुलगा वधूच्या गळ्यात बांधतो.

विधवेशी लग्न करताना तिला पळवून नेण्याचा विधी करतात. त्याला ‘सिरे रईचे’ (साडी चोळीचे लग्न) म्हणतात. बहुपत्नीकत्व मान्य असले, तरी एका पुरुषाच्या दोन अगर तीन बायका क्वचितच आढळतात. कुटुंबात स्त्रीचे स्थान पुरुषाच्या बरोबरीचे समजतात.

रेड्डींत एखादा माणूस आजारी झाला, की वेजू म्हणजे देवऋषीला बोलवितात. या जमातीत मृताला पुरण्याची पद्धत जुनी असली, तरी दहनाकडे अधिक प्रवृत्ती होत चालल्याचे दिसते. मृताचे संस्कार वेजूच करतो. एकवीस दिवसांनी सुतक फिटते. त्या वेळी ‘पैद्दा दिनम’ म्हणजे श्राद्ध करतात.

रेड्डींमध्ये पंचायतीची पद्धत असून ग्रामप्रमुखाला ‘पेद्दा कापू’ म्हणतात. त्याचा अर्थ मोठा शेतकरी असा होतो. हे पद वंशपरंपरागत असते. पेद्दा कापूचे मुख्य कार्य म्हणजे तो मानव व ईश्वरी शक्ती यांना एकत्र आणतो. ज्या योगाने जमातीची भरभराट होईल, असे धर्मविधी तो पुजारी या नात्याने करतो. बाकीच्या बाबतींत तो पाटलासारखा असतो. पंचायतीच्या ज्या सभा होतात त्यांना ‘गुंती’ म्हणतात. या प्रसंगी भांडणे व अडचणी यांवर चर्चा होते. त्यांचा निवाडा पंचायत लावते.

पोगल, बोपल, वोंटला, विनेल, मुरले, बुझार, केचेल, वल, वल्ल, नरपाल, गुरगुंटा, सुंत्रे, पितला, चिंतल, सिदी, सांकेल, आंदेल, गोल्ल, मादी, बोरी, कोटला, दिपा, कडला, मतला, उपाचेटी, कानगूलू, तुमुरव चेडले या रेड्डींच्या कुळी होत. मतदार हे डोंगरात राहणाऱ्या रेड्डींमधील महत्त्वाच्या जहागीरदार असून, त्यांच्या अंमलाखालील भागात लग्न, न्यायनिवाडे, धर्मकृत्ये वगैरे सर्व बाबतींत त्यांचे अधिकार सर्वश्रेष्ठ मानले जातात. लोक व मतदार यांच्यामधला दुवा म्हणजेच पुजारी असतो. रेड्डी लोक पायी कोंडा उर्फ पांडवकोंडा या डोंगरावर वर्षातून एकदा पांडवांची पूजा करतात. त्यांच्या पाषाणासमोर वनवेवूदू म्हणून वनदेवांचा दगड असतो. तिथे ते उन्हाळ्यात पाऊस पडावा म्हणून एक उत्सव करतात. त्या प्रसंगी पूर्वी नरबळी देण्याची प्रथा होती असे म्हणतात.

संदर्भ : 1. Furer-Haimendorf, C. Von; Furer-Haimendorf, Elizabeth Von, The Aboriginal Tribes of Hyderabad, Vol. 2, London, 1947.

2. Govt. of Andhra Pradesh, Tribes in Andhra Pradesh, Hyderabad, 1963.

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate