অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तोडा

तोडा

एक आदिवासी जमात. द. भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वताच्या उंच पठारावर यांची वस्ती आहे. प्रामुख्याने तोडा कुन्नूर व ऊटकमंड तालुक्यांत आढळतात. त्यांची लोकसंख्या ७१६ होती (१९६१). अलीकडे त्यांची लोकसंख्या हळूहळू घटत आहे. केंद्र सरकारने ही जमात नष्ट होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असून त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हशी पाळणारी जमात म्हणून त्यांची ख्याती आहे. तोडा लोकांची ऐहिक श्रीमंती त्यांच्या जवळच्या म्हशींच्या खिल्लारांवरून ओळखतात. अर्थात त्यांचे जीवन हे मुख्यतः खिल्लारी ऊर्फ चरवाही स्वरूपाचे असते. म्हशी पाळणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असून शेती करणे ते कमीपणाचे मानतात.

तोडांच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा आहेत. काही तज्ञ तोडांचा संबंध प्राचीन ज्यू व सुमेरियन संस्कृतींशी लावतात. अद्यापि त्यांच्या उत्पत्तीसंबंधी निश्चित पुरावा उपलब्ध झाला नाही; तथापि १११७ च्या एका कोरीव लेखात होयसळांचा सेनापती तोडा लोकांना धाकदपटशा करीत असल्याचा उल्लेख आढळतो. त्यावरून तोडांची संस्कृती प्राचीन असावी, याबद्दल दुमत नाही.

सर्वसाधारण तोडा पुरुष मध्यम उंचीचा, बांधेसूद, नाकेला आणि सुदृढ असतो. त्याच्या डोकीवर दाट कुरळे केस असतात व ते मानेपर्यंत लोंबत असतात. पुष्कळ दूध प्याल्यामुळे ते केसाळ झाले आहेत, असा एक प्रवाद आहे. तोडांच्या शरीराची ठेवण बरीचशी नंबुद्री ब्राह्मणांप्रमाणे दिसते. तोडांच्या स्त्रिया सुंदर असून त्यांचा वर्ण तांबूस गोरा असतो. तोडा स्त्री–पुरुष दोघेही आपले अंग निळ्या व तांबड्या रेषा असलेल्या पुटकुळी नावाच्या वस्त्राने झाकून घेतात. याशिवाय पुरुष कमरेला लंगोटी लावतात. स्त्रिया केसांना लोणी लावून ते विंचरतात आणि त्याच्या बटा वळवून त्या पाठीवर व खाद्यांवर सोडतात. गळ्यात अर्काट नावाच्या नाण्यांच्या माळा व दंडांत आणि हातांत चांदीची वलये वापरतात. यांशिवाय काचेच्या व पितळेच्या बांगड्याही त्या घालतात. वयात आल्यानंतर स्त्रिया गोंदून घेतात. दिव्याच्या काजळीने त्या डाव्या हातावर, खांद्यांवर व गळ्याखाली गोंदून घेतात. स्वयंपाक करणे, मुलांना सांभाळणे, पाणी भरणे व भात सडणे ही त्यांची नित्याची कामे होत. तोडांचा नित्याचा आहार म्हणजे ताकाच्या निवळीत शिजविलेला भात, गूळभात व भाज्या. कळकांचे कोवळे कोंब ते पातळ भाजीत घालतात. विविध प्रकारची रानफळे ते खातात आणि विकत घेऊन दारू मनमुराद पितात. मांसाहार सणाच्या दिवशी किंवा इतर विशिष्ट प्रसंगी असतो.

तोडांच्या वसाहतीला माड किंवा मांड म्हणतात. प्रत्येक मांडात पाच–सहा झोपड्या असतात. त्यांतील तीन राहण्याकरिता, एक गोठ्यासाठी (दुग्धालयाकरिता) व एक रेडकांना ठेवण्यासाठी असते. वसाहतीच्या एका झोपडीत गावाचे दुग्धालय असते. झोपड्या बांबूंच्या असून त्यांवर गवताचे छप्पर असते. झोपड्यांचा आकार बोगद्यासारखा लांबट व अर्धवर्तुळाकृती असतो. त्या सर्वसाधारणतः तीन मी. रुंद व सहा मी. लांब असतात. झोपडीला खिडक्या नसतात. प्रवेशद्वार ठेंगणे असून मजबूत फळीने बंद केलेले असते. ही फळी सरकती असते. दूधघर ऊर्फ गोठा–देऊळ हे दोन असून त्यास बोवा व पाळछी म्हणतात. ते राहात्या घरापेक्षा मोठे असून त्यातील पवित्र म्हशींच्या दुग्धालयाला ‘टीʼ म्हणतात. दुग्धालयात दोन दालने असतात. एका दालनात दूधदुभते व दुसऱ्यात पाला हा त्यांचा पुजारी राहतो. पाला हा ब्रम्हचारी असून हे व्रत तो अठरा वर्षे पाळतो. त्याच्या मदतीस एक मुलगा असतो. त्याला काल्टमोख म्हणतात. याशिवाय चार उपाध्याय असतात : वरझाल, कोकवली, कुरपुली व पालीकार फाल. स्त्रियांना दुग्धालयात फिरण्याची बंदी असते. त्या फक्त ताक नेण्यासाठी आणि ठराविक वेळीच तेथे येतात. याशिवाय तोडा लोकांची दुग्धमंदिरे वेगळी आहेत. निलगिरीत अशी एकूण चार मंदिरे आहेत. या दुग्धमंदिराच्या पुजाऱ्याला वरझाल ऊर्फ वूरसोल म्हणतात.

तोडा लोकांची तार्थारोल व ताइव्हलिओल (देवालयाल) या दोन कुलांत विभागणी झाली असून प्रत्येक कुल अंतर्विवाही समूह मानले जाते. तार्थारोल स्वतःला ताइव्हलिओलांपेक्षा उच्च समजतात. आपल्याजवळ सर्वोच्च दुग्धालय व पवित्र म्हशी आहेत असे ते समजतात. या दोन्ही पोटजातीची काही गोत्रे आहेत. एकाच पोटजातीत पण भिन्न गोत्रांत विवाहसंबंध होतो. आते–मामे भावंडविवाह संमत आहे. यांचा विवाहविधी साधा असून लग्न लहानपणीच होते. तरी वयात येईपर्यंत मुलगी बापाच्या घरी राहते. मुलगी वयात आली, की अन्य गोत्रातील एखाद्या सदृढ तरुणाशी तिचा समागम घडवून आणतात. मुलीला पुढे जन्मभर दांपत्य सुख लाभावे, म्हणून हा संस्कार करतात. भ्रातृ बहुभार्तृत्वासाठी तोडा हे विशेष प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मुलीचे लग्न एका पुरुषाशी झाले, तरी त्याचे इतर भाऊ तिचे पती मानले जातात. काही वेळा पतीचे दूरचे भाईबंदही तिचे पती होतात. जेव्हा सर्व पती एकत्र राहत असतील, तेव्हा जो पुरुष पत्नीबरोबर एकांतात असेल, तो घराबाहेर एक लाकूड व पुटकुळीनामक वस्त्र ठेवतो. त्यावरून कोणता तरी पती घरात पत्नीबरोबर आहे हे समजते. मात्र पती वेगवेगळ्या घरांत रहात असतील, तर पत्नी आळीपाळीने त्यांच्या घरी जाते. पितृसत्ताक कुटुंबपद्धती तोडांत रूढ आहे. ‘धनुष्य व बाणʼ (पुरसुतपिमी) या विशिष्ट विधीच्या आधारे मुलाचे पितृत्व निश्चित केले जात असल्याने जैविक पितृत्वापेक्षा सामाजिक पितृत्वाला तोडांत विशेष प्राधान्य दिले जाते. तोडा स्त्री–पुरुषांचे लैंगिकसंबंध विवाहासंबंधापुरतेच मर्यादित नाहीत. बहुपत्नीत्वही रूढ आहे. एवढेच नव्हे, तर एखाद्या प्रियकराला आपल्या प्रेयसीच्या पतीची अनुमती मिळवून तिच्याशी संबंध ठेवता येतो. पत्नीच्या विवाहपूर्व संततीलाही पती आपली संतती मानतो. स्त्रीला पाहिजे तितक्या पुरुषांशी संबंध ठेवता येतो. असा संबंध अनैतिक मानला जात नाही. प्रसूतीच्या वेळी पतीच्या छातीवर डोके ठेवून स्त्री बसते. प्रसूतीगृहात कुणासही प्रवेश असतो. पूर्वी तोडा लोक मुलगी झाली असता तिला ठार मारीत; पण ही प्रथा आता बंद झाली आहे.

तोडांची पाचजणांची पंचायत असते. तिला नाइम म्हणतात. विवाह व दुग्धव्यवसाय यासंबंधीचे विधी केव्हा आणि कसे करावे हे ठरविणे, हे पंचायतीचे काम असते.

वर्षातून एकदा गावातल्या ‘टी’ दुग्धालयातील म्हशींना दूर कुठेतरी चरावयाला नेतात. याच वेळी तोडा लोक काही धार्मिक स्थळांची यात्रा करतात. तोडांच्या देवांबद्दलच्या कल्पना अगदी साध्या आहेत. तियाकिर्जी आणि ओन या त्यांच्या प्रमुख देवता होत. तियाकिर्जी ही स्त्री असून ती इहलोकावर आधिपत्य गाजविते, तर ओन हा पुरुष देव असून तो मृतांच्या लोकावर सत्ता चालवितो. यांशिवाय तोडा बेट्टकरस्वामी, रंगस्वामी, करमदाई, मरिअम्म, श्री कंठेश्वर, पार्वती इ. देवतांनाही भजतात. हे लोक कोनशास्त्र नावाचा एक होम करतात व रेड्यांना बळी देतात.

तोडा मृतांना जाळतात. स्त्री व पुरुष यांकरिता वेगळी स्मशाने आहेत. त्यांचा अंत्यसंस्कार कित्येक दिवस चालतो. त्याच्यात हिरवे व वाळके उत्तरकार्य असे दोन विधी असतात. मेल्यानंतर लगेच जाळतात त्याला पहिला संस्कार म्हणतात. त्यानंतर काही दिवसांनी दुसरा दाहसंस्कार करतात. अविवाहित मृत स्त्री–पुरुषांच्या बाबतीत वेगळे अंत्यसंस्कार असतात. विवाहित मृत स्त्रीच्या अंगावर चार वस्त्रे घालतात. गुह्यांगावर काळे वस्त्र, त्यावर पुटकुळी, त्यावर पांढरे व सर्वांत वर लाल वस्त्र असते. अंत्यसंस्कारात रेडे बळी देणे, हे एक आवश्यक कर्म समजले जाते. बलिदानानंतर पुरुष नृत्य करतात. मृताबरोबर काठ्या, बांबूंची भांडी, धनुष्यबाण, सुरी, ताडपत्री, छत्री तसेच तांदूळ व गूळ या वस्तू जाळतात. मृताचे केस दुसऱ्या दाहसंस्कारासाठी काढून ठेवतात. दाहसंस्काराच्या वेळी केस, कवटीचा भाग, अस्थी वगैरे अवशेष जाळतात. या वेळीही रेडे बळी देतात आणि भोजन व नृत्य करतात. यानंतर येणाऱ्या पौर्णिमेस शुद्धिसंस्कार करतात.

तोडा एक स्वतंत्र बोली बोलतात. तीत कन्नड व तमिळ भाषांतील अनेक शब्द असून त्या भाषांशी तिचे साधर्म्य दिसते.

अलीकडे तोडांमध्ये अनेक सुधारणा झाल्या असून बहुपतित्वही कमी प्रमाणात आढळते व काही तोडा आपला म्हशींचा धंदा सोडून नोकरीही करू लागले आहेत.

संदर्भ : 1. Aiyappan, A. Ed. Bulletin of the Madras Government Museum, Madras, 1951.

2. Bhattacharya, H. Ed. The cultural Heritage of India, Vol. IV, Calcutta, 1956.

3. Rivers, W. H. R. The Todas, London, 1906.

4. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India, Vol. VII, Madras, 1965.

लेखक : सु. र.देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate