অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जिप्सी

जिप्सी

विविध प्रदेशांत विखुरलेले भटके लोक. जिप्सींना प्रदीर्घ इतिहास असून त्यांचा वावर जगातील बहुतेक लहानमोठ्या देशांत, विशेषतः यूरोपखंडात अधिक आढळतो. त्यांची लोकसंख्या ५०,००,००० (अंदाज १९६१) होती. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने ज्यूंप्रमाणेच त्यांची कत्तल केली आणि सु. ५ लाख जिप्सींना बंधनागारांत डांबून मारले. त्यांची संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असून भ्रमणशील लोकांचे अग्रणी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. जिप्सी हा सर्वसाधारण मध्यम उंचीचा, कृष्णवर्णीय, आकर्षक असून बळकट, सडपातळ बांधा व काळेनिळसर केस ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्रिया केस लांब वाढवितात व वेणी घालतात आणि तंग व झगझगीत बहुरंगी लांब झगे वापरतात. पुरुष व स्त्रिया यांना जडजवाहीर व फुले यांची आवड असून सोन्याची नाणी ते दागिन्यांत वापरतात. जिप्सींना सुसंबद्ध नियमित जीवनाचे वावडे आहे. मनमानेल तसे वागणे, हे त्यांचे वैशिष्ट्य. जेव्हा भूक लागेल, तेव्हा ते खातात व थकल्यावर झोपतात.

जिप्सींची पारंपरिक गाडी व जिप्सी वृद्धा.जिप्सींची पारंपरिक गाडी व जिप्सी वृद्धा.जिप्सी हे निश्चितपणे केव्हा ज्ञात झाले, याविषयी तज्ञांत एकमत नाही. तथापि त्यांचे मूलस्थान भारताच्या वायव्येकडील हिंदुकुश पर्वताचा पायथा असावा, असे मानले जाते. इ. स. १००० च्या सुमारास ते इराणमध्ये टोळ्याटोळ्यांनी गेले असावेत. तिथे त्यांच्या बेन व फेन अशा दोन शाखा झाल्या. बेन जिप्सी सिरिया, ईजिप्तमार्गे उ. आफ्रिकेत गेले; तर फेन जिप्सी आर्मेनिया, ग्रीस या मार्गे यूरोपभर पसरले. पंधराव्या शतकापासून जिप्सींचा वावर यूरोपखंडभर झालेला दिसतो. विसाव्या शतकात ते जवळजवळ मेक्सिको, ऑस्ट्रेलिया येथे पोहोचले होते. ते काफिल्याने घोड्यांच्या गाडीतून गावोगाव भटकतात व तात्पुरते तंबू ठोकून राहतात. एखाद्या स्थळी फार दिवस वास्तव्य ते करीत नाहीत. स्थलपरत्वे जिप्सींना विविध नावे प्राप्त झाली आहेत; त्यांपैकी एकाही नावामध्ये त्यांच्या मूलस्थानविषयी वा देशाविषयी उल्लेख नाही. जिप्सी हा इंग्रजी शब्द ईजिप्शियन या शब्दापासून बहुतेक आला असावा. फ्रेंच लोक जिप्सींना बोहेमियन म्हणतात, तर स्पॅनिश लोक त्यांना फ्लेमिश म्हणतात. स्वीडिश लोक त्यांना तातार म्हणतात आणि जर्मन लोक हिधन म्हणतात. रोमानी ही त्यांची भाषा. ती इंडो-इराणी भाषासमूहातील आहे. भारतीय भाषांतील अनेक शब्द तीत आढळतात. तथापि ज्या देशांत जिप्सी राहतात तेथील शब्दही तिच्यात मिसळतात. मौखिक परंपरा व वांशिक जागरूकता त्यांच्यात अद्यापि टिकून आहे. त्यांच्यात पुराणकथा नाहीत किंवा वीरगाथाही नाहीत. आपल्या भटकेपणाचे समर्थन ते शक्य तो करीत नाहीत. पूर्वी अनेक लेखकांनी जिप्सींचा स्थलपरत्वे अगर देशपरत्वे उल्लेख केला आहे. जिप्सी हे सतत भ्रमण करणारे लोक असले, तरी अलीकडे त्यांपैकी काही स्थायिक किंवा अर्थस्थायिक झालेले दिसतात. उदा., स्पेनचे गितानो, इंग्‍लंडमधील जिप्सी, फ्रान्स व जर्मनी यांतील मानुश वा सिंटी, मध्य यूरोपातील काल्डेरश, हंगेरीतील वादक (म्युझिशियन) इत्यादी. यांपैकी बहुतेकजण आता भटक्या जीवनातून बाहेर पडले असून आपल्या परिसरातील संस्कृतीशी समरस झाले आहेत.

जिप्सींसमवेत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, नवी दिल्ली, १९७६.जिप्सींसमवेत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, नवी दिल्ली, १९७६.जिप्सी आपला उल्लेख रोम या जातिपदाने करतात. त्याचा अर्थ मनुष्य किंवा मानवप्राणी असा आहे. इतरांना ते गाद्‌ज म्हणजे अपरिचित किंवा रानटी म्हणतात. जिप्सींचे अनेक व्यवसाय आहेत. त्यांपैकी धातुकाम, घोड्यांचा व्यापार, टोपल्या विणणे इ. सोडता जिप्सी हे मुख्यतः संगीतकार, गायक व नर्तक म्हणून प्रसिद्ध आहेत. या कलांतून ते लोकांची करमणूक करून उपजीविका करतात. अनेक जिप्सी नृत्यांगना प्रसिद्ध आहेत. काही जिप्सी पारध करतात. पारधीचे सगळे हक्क ते भोगतात. चोऱ्या करणे, पीक लुबाडणे, जंतरमंतर करून भोळ्या लोकांना फसविणे हेही उद्योग त्यांतील काही जण करतात. आपल्या सुस्वरूप बायकांकडून भोळ्या लोकांना फसविणे यामध्येही काही जिप्सी तरबेज आहेत. आपल्याला अज्ञात असलेल्या आप्तांना भेटण्यासाठी ते भटकतात, असे म्हटले जाते. आपल्या मुलामुलींना वधूवर शोधण्यासाठी ते भटकतात. लग्‍न जातीबाहेर होऊ नये व तेही जवळच्या आप्तांत होऊ नये, हा हेतू त्यात असतो. रोम-जिप्सींच्या धर्मावर ख्रिस्ती व इस्लाम धर्मांची छाप दिसली, तरी त्यांचा पितृपूजेवर आधारलेला मूळ धर्म कायम आहे. त्यांची कायदापद्धती ऊर्फ कृष ( Kris’ ) पूर्वजपूजेच्या कल्पनेवर आधारित आहे. ही रोमानी-कृष संस्था त्यांच्या सामाजिक संबंधांचे रक्षण करते. तिच्या द्वारे कायद्याबरोबरच न्याय, धार्मिक विधी, परंपरा यांची जोपासना केली जाते. व्हायीव्होदे या नावाने ओळखला जाणारा मुखिया वडिलधाऱ्या व्यक्तींच्या सल्‍ल्याने व फुरिदाई म्हणजे ज्येष्ठ स्त्रीच्या सल्‍ल्याने सर्व निर्णय देतो. जिप्सींचा वित्स हा सर्वांत मोठा सांस्कृतिक समूह असून त्यात सु. दोनशे कुटुंबे असतात. वित्स मोठा असल्यास त्याचे मंडळ व मुखिया असतो. अमेरिकेत जिप्सींनी भविष्यकथन हा एक धंदाच केलेला आहे. त्यांच्या चोरटेपणाबद्दलही अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

अलीकडे यूरोपातील अनेक देशांनी त्यांच्या या भटक्या वृत्तीस पायबंद घालण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांची नावे नोंदविली जातात. त्यांच्या मुलामुलींस शाळेत धाडण्यात येते, शिवाय त्यांना धंदेशिक्षणही देण्यात येते. १९५६ मध्ये रशियाने एका कायद्यान्‍वये जिप्सींना असे कळविले, की तुम्हाला आवडेल त्या स्थळी तुम्ही वस्ती करा; पण भटकेपणा यापुढे चालणार नाही. इतर काहीं देशांनी फिरत्या शाळा सुरू केल्या असून त्यांच्यासाठी खास शैक्षणिक सवलती दिल्या आहेत. तथापि जिप्सी समाजात लक्षवेधक बदल झालेला नाही; पण स्थायिक होण्याची त्यांची प्रवृती वाढत आहे.

संदर्भ : 1. Block, Martin, The Gypsies : Their Life and Their Customs, London, 1939.

2. Yoors, Jan, The Gypsies, New York, 1967.

लेखक  : सु. र.देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate