অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गड्डी

गड्डी

मुख्यतः हिमाचल प्रदेशातील एक अनुसूचित जमात. त्यांची वस्ती विशेषतः डोंगराळ प्रदेशात आढळते. पंजाबातही त्यांची वस्ती आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ५१,३६९ होती. काही गड्डी लोक आसाममधील हिंदूंत मिसळून गेले आहेत. ही भटकी जमात हिवाळ्यात स्थलांतर करून डोंगराखालच्या सपाट प्रदेशात उतरते. त्यांपैकी काही धनगर आहेत. वर्षभर ते शेळ्या-मेंढ्या घेऊन भटकत असतात. काही कळप तर थेट काश्मीरपर्यंत पोहोचतात; परंतु मेंढरे असोत वा नसोत, गड्डी हिवाळ्यात स्थलांतर करतातच. अलीकडे त्यांच्यापैकी काही लोक शेती करू लागले आहेत.

गड्डी हे मूळचे हिंदू; त्यांच्या चालीरीती हिंदूंप्रमाणेच आहेत. ब्राह्मण पुरोहिताला त्यांच्यात फार महत्त्व असते. लग्न, पूजा-अर्चा, मर्तिक वगैरे सर्व विधींत त्याला फार महत्त्व असते. शिव ही त्यांची मुख्य देवता असून इतर अनेक देव-देवतांत भुतेखेते, डाकिणी यांवरही त्यांची श्रद्धा आहे. हे पूजा करीत नाहीत. फक्त लोकर वा लोकरीची वस्त्रे देवांना वाहतात आणि बकरा बळी देतात. त्यांच्या दैवतकथांत त्रिलोकनाथ, मणिमहेश, बुद्लनद्ल, रावी नदी, नागांच्या कहाण्या वगैरे आढळतात. त्यांच्या प्रदेशात त्यांची मंदिरेही आहेत. त्यांच्या भाषेला भरमौरी म्हणतात. तिची स्वतंत्र लिपी नाही. ही भाषा लोकगीते व म्हणी यांनी समृद्ध आहे.

गड्डींचा पोशाख मुख्यत्वे लोकरीच्या कपड्यांचा व बहुरंगी असतो. पुरुष लांब कोट, पायजमा व गोल टोपी घालतात, तर स्त्रिया चोला (लांब कोट), चोळी, कुरता, लेहँगा व ओढणी वापरतात. गळ्यात मण्यांच्या माळा व अंगावर चांदीचे दागिने घालतात. सर्वजण कमरेला लांब दोरी बांधतात. हे लोक धष्टपुष्ट, सुडौल व सुंदर दिसतात.

त्यांच्यात वयात आल्यानंतर मुलामुलींची लग्ने होतात. देज देण्याची पद्धत रूढ असून कधी म्हातारा पुरुष व तरुण स्त्री असेही विजोड विवाह होतात. झंझराडा नावाचा विवाह लोकप्रिय आहे. तो प्रेमविवाहाचाच एक प्रकार आहे. विवाहास यांच्यात फार महत्त्व दिले जाते. अविवाहित मरणे म्हणजे कुत्र्याचे मरण, असे ते समजतात.

गड्डींना नृत्यगायनाची फार आवड आहे. ते लुगडी नावाचे मद्य पिऊन बेहोषपणे नाचतात.

मृतांना शक्य तो जाळतात, क्वचित पुरतातही. मृतांची लाकडी स्मारके बांधतात. त्यांना बंगलोड म्हणतात. पंचायतीची सभा भरविण्यासाठी किंवा गप्पागोष्टी करण्याकरिता त्यांचा उपयोग करतात.

संदर्भ : Newell, H. W. A Study of Gaddi Scheduled Tribes and Affiliated Castes, Census of India, 1961, 20, (Part VB), Himachal Pradesh, Simla, 1967.

लेखिका  : दुर्गा भागवत

माहिती  स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate