অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खडिया

खडिया

खडिया किंवा खाडिया ही मुख्यत: ओरिसात आढळणारी एक वन्य जमात. याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेश यांतही ती आढळते. यांना करिया, कारिया वगैरे नावेही दिलेली आहेत. लोकसंख्या २,२४,७८१ (१९६१). फक्त ओरिसातली तिची लोकसंख्या ९७,७८१ होती (१९६१). खडिया हे मुंडावंशीय लोक आहेत. मध्य प्रदेशात छत्तीसगढच्या सीमेवर, तसेच आसाम व बंगाल येथेही हे काही प्रमाणात आढळतात. ओरिसात यांच्या तीन पोटजाती आहेत. (१) पहाडी खडिया ऊर्फ एरेंगा खडिया, (२) धेलकी खडिया, (३) दूध खडिया. पहाडी खडिया मयुरभंज सीमेवरील सिमिलपाल डोंगरात राहतात. त्याशिवाय ते बलसोर, मयुरभंज, केओंझार, बोनाई व धेनकानाल या भागांतही आढळतात. धेलकी खडिया सुंदरगढ जिल्ह्यात आढळतात. दूध खडियांची मूळ भूमी छोटा नागपूरातील रांची ही असली, तरी ते ओरिसात धेलकी खडियांबरोबर पसरले आहेत. या तीन पोट जातींखेरीज आणखी काही वर्ग या जमातीत आहेत: मुंडा खडिया, ओराओं खडिया, बेरगा खडिया आणि सतेरा खडिया हे आंतरजमाती-विवाहामुळे निर्माण झाले असून दुर्लक्षित आहेत. पहाडी खडिया हे मयुरभंजचे मूळ निवासी. प्रथम धेलकी ओरिसात आले आणि नंतर दूध खडिया त्यांच्या मागोमाग आले. प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ डाल्टन आणि रिझ्ली यांनी खडियांची मोजमापे घेऊन त्यांचे मुंडा लोकांशी बरेच साम्य असल्याचे दाखविले आहे. वर्ण काळा, केस कुरळे, नाक रुंद, चपटे व वरचा भाग खोलगट अशी त्यांची शारीरिक ठेवण आहे. खडियांच्या या तीन पोटजाती त्यांच्या सांस्कृतिक अवस्थांच्या द्योतक आहेत. पहाडी खडिया अद्याप वन्य आहारद्रव्यांवरच निर्वाह करतात. यांचा पारंपरिक धंदा भोयांचा. काही लोक चहाच्या मळ्यावर मजूरकाम करतात, तर काही मध गोळा करतात, रेशमी कोश गोळा करतात व लाख मिळवतात. त्याशिवाय जंगलातील कंदमुळेही ते गोळा करतात. त्यांचा धर्मही इतर वन्य जमातींसारखाच आहे. धेलकी खडियांनी आता स्थिर पद्धतीची नांगरटीची शेती सुरू केलेली असून तिच्यात ते रुळले आहेत. शिकार व मासेमारी हीदेखील स्थानपरत्वे त्यांच्या उपजीविकेची साधने आहेत. खडिया हे सर्वांत सुधारलेले व पुढारलेले लोक. त्यांचा दर्जा या दोघांपैकी अधिक श्रेष्ठ समजला जाते.

पहाडी खडिया डोंगर-उतरणीवर राहतात. त्यांची गावे नेटकी असतात. एका गावात सु. पाच ते बारा घरे विखुरलेली असतात. धेलकी व दूध खडियांची गावे खऱ्या अर्थाने गावे असून त्यांत इतर लोकांचीही वस्ती असते. त्यांच्या गावांत आखारा (आखाडा) असतो. हा आखारा म्हणजे त्यांची नृत्याची व एकत्र येण्याची जागा असते. तिथेच त्यांची देवळे आणि स्मशानही असते.

पहाडी खडियांचे घर चौकोनी असते व त्यांच्या भिंती शालवृक्षांच्या लाकडाच्या केलेल्या असतात. छप्पर पारंब्यांचे व उतरते असून ते गवताने शाकारलेले असते. घरात बहुधा एकच खोली असते. दूध खडिया व धेलकी खडियांची घरे पहाडी खडियांच्या घरांपेक्षा अधिक मजबूत असतात. त्यांच्या घराच्या भिंती कुडाच्या असून त्यांना एक ओवरी असते व बाजूला गोठा असतो. खडियांच्या घरातील वस्तू म्हणजे शिंदीच्या पात्यांच्या चटया, सुंभाच्या दोन तीन खाटा, काही मडकी, तुंबे, बांबूच्या दुरड्या आणि काही पितळी व अ‌ॅल्युमिनियमची भांडी या होत. यांशिवाय धनुष्यबाण, मासेमारीची साधने, मादल म्हणजे मृदंग, नागेरा ऊर्फ नगारा आणि रुतु म्हणजे बासरी या वस्तू ते जवळ बाळगतात.

पहाडी खडियांची समाजव्यवस्था दूध व धेलकी खडियांच्याहून भिन्न आहे. पहाडी खडियांत कुळीची पद्धत नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. कधीकधी आपले गोत्र नाग किंवा असेच काही आहे, असे ते म्हणतात. त्यांच्यात देवक पद्धतीवर आधारलेली आडनावे आहेत. त्यांना संग्या (संज्ञा) म्हणतात. परंतु एकाच आडनावाच्या कुटुंबात अंतर्विवाह होत नाहीत, असे नाही. याउलट धेलकी आणि दूध खडियांमध्ये विवाहावर आधारलेल्या कुळी आहेत. धेलकींच्या नऊ कुळी आहेत, तर दूध खडियांच्यात आठ मूळ कुळी मानतात. खडिया इतर जमातींबरोबर सलोख्याने राहतात. त्यांचा सामाजिक दर्जा मुंडा ओराओं व किसान यांच्याबरोबरचा समजला जातो. खडियांची वस्ती मिश्र गावात अगदी कडेला असते.

कमरेला गुंडाळलेले फडके एवढाच खडिया पुरुषाचा पोशाख असतो. कंगाल खडिया केवळ लंगोटी नेसून असतात. सुस्थितीतील पुरुष मात्र अंगावर उपरण्यासारखा कपडा घेतात. स्त्रिया एक साडी कमरेला गुंडाळून तिचाच अर्धाभाग अंगाभोवती लपेटून घेतात. काचेच्या किंवा शंखाच्या बांगड्या हाच त्यांचा मुख्य अलंकार होय.

खडियांच्या गावात सर्वांत वृद्ध व आदरणीय माणूस पुजारी म्हणून निवडला जातो. त्याला देहेरी ऊर्फ दिहुरी असे पहाडी खडियांत म्हणतात, तरी धेलकी खडियांत त्याला कालो म्हणतात. दूध खडियांत त्याला काला, बैगा किंवा परधान म्हणतात. परंतु या दिहुरीस सामाजिक व्यवहारात प्राधान्य नसते. गावातील पंचायत सर्व निवाडे करते. एवढेच नव्हे, तर सार्वजनिक पूजे-अर्चेसाठी वर्गणी गोळा करणे, साथीच्या वेळी बळी देण्याच्या विधीची तयारी करणे इ. काम गावचे पंच करतात. नवजात अपत्याच्या सहाव्या दिवशी षष्ठिपूजनाचा विधी पाहण्यास पंच स्वत: साक्षी म्हणून हजर असतात. पंचायतीमार्फत निवाडा झाला नाही, तर कुटुंबसभा म्हणजे पऱ्हा पंचायत नावाची वेगळी समिती नेमून गावाचा व्यवहार चालवतात. अनेक गावांची मिळून एक आंतर-ग्रामीण पंचायत असते. तिला भिरा म्हणतात. या पंचायतीचा प्रमुख म्हणून जो सर्वांत हुशार दिहुरी असतो, त्याला नेमतात. धेलकी खडियांत मुरू कुळीचा माणूस सर्व धार्मिक विधी करतो. त्याला पैनदिहा म्हणतात. त्याचप्रमाणे समद कुळीतील माणूस भंडारी होतो. हा भंडारी जातिबाह्य झालेल्या माणसाला जातीत घेताना जी मेजवानी देतात, तिच्यावर देखरेख ठेवतो. भंडारी ज्याप्रमाणे जातिबहिष्कृताचा दोष घालवून त्याला शुद्ध करतो; त्याचप्रमाणे तो जननाशौच व मरणाशौच यांचा विटाळही धुऊन काढतो.

दूध खडियांमध्ये परबा नावाची एक संघटना असते. परबा संघटनेचे मुख्य कार्य जातिबहिष्कृताला जातीत सामील करून घेण्याचे आहे. वाळीत पडलेल्यांना ठराविक दिवशी विधिपूर्वक जातीत घेतात. त्या दिवशी त्यांना उपोषण करावयाला लावतात. मग सूर्यदेवाला पांढरा बोकड अगर पांढरा कोंबडा बळी देतात. धेलकी खडियांत हा विधी करणाऱ्या पुरोहिताला पानीदिहा म्हणतात. दूध खडियांत कर्तहा ऊर्फ दांडिया म्हणतात आणि पहाडी खडियांत दांडिया म्हणतात. हा पुरोहित बळी दिलेल्या प्राण्याचे थोडेसे रक्त घेऊन त्यात हळद मिसळतो आणि ते द्रोणात घालून तो द्रोण वाळीत पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबप्रमुखाला देतो. वाळीत पडलेला माणूस तो रक्त पितो व मग स्वत: भात शिजवून सर्व ज्ञातिबांधवांना देतो. यानंतर तो व त्याचे कुटुंब शुद्ध झाले, असे समजतात.

पहाडी खडियांत सोयर नऊ दिवसांचे असते. परंतु काही ठिकाणी ते एकवीस दिवसांचे पाळतात. दूध व धेलकी खडियांत सात दिवसांनी बाळ-बाळंतिणीला आंघोळ घालून शिवाशिव मिटवतात. परंतु नामकरणाचा विधी दोन किंवा तीन आठवड्यांनी किंवा एक महिन्यानंतरही जेव्हाकेव्हा सवड होईल, तेव्हा करतात. कान टोचण्याचा विधी महत्त्वाचा असतो. मूल पाच ते सहा वर्षांचे झाले, की त्याचे कान टोचतात. पहाडी, दूध व धेलकी या तीन उपजातींत परस्परविवाह होत नाहीत. मुलगी वयात आल्यावर लग्न करतात. मुलीचे देज वराला द्यावे लागते. लग्न वराच्या घरी असते. पहाडींच्यापेक्षा दूध आणि धेलकींचे लग्नसमारंभ अधिक विस्तृत असतात. रोज सायंकाळी आखाऱ्यात नाचून व गाऊन ते दिवसभरचा शीण घालवतात. स्त्री-पुरुष एकत्रच नाचतात.

खडियांचा मुख्य देव सूर्य आहे. त्याला ते धर्म म्हणतात. पूर्वजपूजा हा त्यांच्या धर्माचा महत्त्वाचा भाग आहे. कर्मा-पूजा, फाग, नुआ खिया (नवान्न-भक्षण) हे त्यांचे मुख्य सण आहेत. त्यांची भाषा मुंडा समुहातली आहे. मयुरभंजमधले खडिया ओडिया भाषाच बोलतात.

प्रेताचे सर्व कपडे त्याच्यावर आच्छादितात. मृताला ते उत्तरेकडे डोके करून पुरतात. आता काही खडिया अग्निसंस्कारही करू लागले आहेत. मृताचे प्रेत शक्य तर त्याच्या मूळ कुटुंबाच्या गावाच्या स्मशानात पुरण्याची चाल अद्यापही कुठे कुठे आढळते.

संदर्भ : Roy, S. C.; Roy, R.C. The Kharias, Ranchi, 1937.

लेखिका  : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate