অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कैकाडी

कैकाडी

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील एक भटकी विमुक्त जात. ते मुळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्र यांत आले असावेत. त्यांच्या भाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो. काहींच्या मते ते तमिळनाडूमधून आले असावेत. तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो. तेथे त्यांना कोरवा म्हणतात.

बोरिवाले, धुंताळे, कामाठी, कैजी, लमाण, माकडवाले, उर कैकाडी, वाईवसे व भामटे या त्यांच्यात नऊ पोट जाती आहेत. यांपैकी महाराष्ट्रात उर कैकाडी ऊर्फ गाव कैकाडी ऊर्फ कोरवा, पाल्मोर ऊर्फ धुंताळे व माकडवाले यांच्या तीन पोट जाती आढळतात.

गावात राहून आपला पूर्वापार बुरूडकामाचा धंदा करणाऱ्या कैकाड्यांना गाव कैकाडी म्हणतात. पाल्मोर गारूड्याप्रमाणे सापांचा खेळ करून उदरनिर्वाह करतात. कुंची कोरवा जातीचे लोक विक्रीसाठी कुंचले वा कुंची तयार करतात. १९६१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात त्यांची लोकसंख्या सु. ५०,००० पर्यंत होती.

त्यांच्या कुळींची नावे गायकवाड, जाधव, पवार, माने, मधवंत, मलाजू, काडे वगैरे आहेत. त्यांच्या भाषेला कैकाडी अथवा कुलूर म्हणतात.

यांच्यात आते-मामे विवाह प्रचलित आहे. मावशीच्या मुलीबरोबर विवाह होऊ शकत नाही. बहुपत्नीकत्वाची प्रथा रूढ आहे. एक भाऊ दोन बहिणींबरोबर लग्न करू शकतो. तसेच दोन भाऊ दोन बहिणींबरोबर लग्न करू शकतात. वरपित्याने ५० ते १०० रु. वधूपित्यास द्यावे लागतात. वधूची मागणी वरपित्याकडून केली जाते. विधवा-विवाह होऊ शकतो. तो अमावस्येच्या रात्री करण्याची प्रथा आहे. विधवेस दुसरा विवाह करताना पूर्वीच्या नवऱ्याकडील नातलगांस पहिल्या लग्नाचा खर्च द्यावा लागतो. बहुधा ही रक्कम तिचा दुसरा पती देतो.

बहुतेक कैकाडी हिंदू आहेत. त्यांच्या प्रमुख देवता भवानी, बहिरोबा, मरीआई, तुकाई, गणपती, यमाई या होत. तसेच त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबात जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, सोनारीचा बहिरोबा आणि मारुती यांची पूजा केली जाते. आळंदी, जेजुरी, सोनारी आणि पंढरपूर ही त्यांची तीर्थस्थाने होत. त्यांचे धार्मिक गुरू गोसावी असतात.

मृताबाबत शोक पाच, नऊ, दहा अथवा बारा दिवस करतात. मृताला वाहून नेणाऱ्यास म्हणजे खांदे देणाऱ्यास ते पाच दिवस शिवत नाहीत. ते मृतास जाळतात अथवा पुरतात. मृताबाबत टाक करून त्याची पूजा करतात. त्यांचा जादूटोणा, चेटूक, शकुन आणि अपशकून यांवर विश्वास असतो.

खानदेशातील कैकाड्यांमध्ये, मुल्हेरच्या दावल मलक या मुसलमान संताबद्दल आदर असून काही कुटुंबांत तर खंडोबाबरोबरच या साधूच्या हिरव्या काठीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांच्या प्रमुखाला ओकाम्या असे म्हणतात. कोल्हाटीशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. जाती पंचायतीच्या वेळी त्यांना ते बोलावितात.

संदर्भः 1. Enthoven, R. E. Tribes and Castes of Bombay, 3 Vols., Bombay, 1920-1922.

2. Tribal Research Institute, VimuktaJatis and Nomadic Tribes of Maharashtra State, Poona, 1966.

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate