जव्हार हा ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भाग. येथील महिलांना प्रक्रियायुक्त पदार्थ व अन्य उद्योगांचे प्रशिक्षण देऊन त्यात त्यांना कुशल व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न झाला. आपल्याच भागात पिकणाऱ्या शेतमालापासून विविध पदार्थ तयार करणे व त्याला बाजारपेठ मिळवणे, त्यांना शक्य झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार हा तसा आदिवासी पट्टा. येथील आदिवासी महिलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या समाजसेविका म्हणून लक्ष्मीताई भोये व श्रीमती विमलताई पटेकर यांची ओळख आहे. श्रीमती भोये या जव्हारचे माजी आमदार कै. रामचंद्र भोये यांच्या पत्नी आहेत. कोसबाड येथील सर्वांना परिचित नाव असलेल्या समाजसेविका कै. अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने त्यांनी समाजकार्यास वाहून घेतले. त्यांचे वय सध्या 64 वर्षे आहे.
श्रीमती पटेकर यादेखील पहिल्यापासून लक्ष्मीताई यांच्या खांद्याला खांदा लावून जनसेवा करण्यात आघाडीवर राहिल्या. त्यांच्यासोबत सुनीता लांडे यांचेही काम उल्लेखनीय राहिले आहे. आदिवासी भागात महिला सबलीकरणाचे काम चालू ठेवण्यासाठी नेहमी त्यांची धडपड सुरू असते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेची स्थापना या यशकथेच्या जडणघडणीपूर्वी डहाणू भागातील सन 1983 च्या सुमाराची पार्श्वभूमी सांगावी लागेल. या भागात काही पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्याचा त्रास त्यांच्याच घरातील महिलांना भोगावा लागे. महिलांना स्वतःचे असे काही अस्तित्वच नव्हते. अशा वेळी श्रीमती भोये, श्रीमती पटेकर यांनी तालुक्यातील महिलांचे प्रबोधन करून 18 मार्च, 1983 मध्ये संस्था उभी केली. जव्हार तालुका आदिवासी भगिनी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, असे संस्थेचे नामकरण झाले. आज संस्थेने पुढील वाटचाल यशस्वी केल्याने, महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला. आज संस्थेची सभासद संख्या 260 पर्यंत पोचली आहे.
संस्थेने सुरवातीला दारूबंदीपासून सुरवात केली. त्यानंतर शिवणकामाचे वर्ग घेऊन महिलांना प्रशिक्षण दिले. कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांच्याकडून नाचणी धान्यापासून पापड, नाचणीचे सत्त्व, इडली आदी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षणही दिले. त्यापुढे जाऊन महिला पळस, कामिनी झाडांच्या पानांपासून पत्रावळी बनवू लागल्या. एवढेच नव्हे, तर तालुक्यात अन्य महिलांना या प्रशिक्षित महिलांद्वारा प्रशिक्षित करून तंत्रज्ञानाचा प्रसार केला. प्रकल्प अधिकाऱ्यांद्वारा शिलाई यंत्राचे मोफत वाटप करून त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. शिवणकामाच्या प्रशिक्षणामुळे संस्थेतील महिला जिल्हा परिषदेच्या शाळा, तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून देऊ लागल्या. बचत गटाच्या महिला आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळांना पोषणआहार देऊ लागल्या. संस्थेने निधीची तरतूद करीत मसाले निर्मितीसाठी कांडप यंत्र व चक्की विकत घेतली. आपल्याच भागातील धान्यांपासून पदार्थनिर्मिती सन 2000 मध्ये संस्थेच्या अंतर्गत वेगवेगळ्या 30 बचत गटांची स्थापना झाली. त्यातील 10 बचत गट आज चांगल्या कार्यक्षमतेने सुरू आहेत. या भागात पिकणारे मुख्य पीक म्हणजे नाचणी, उडीद, भात व वरई. या धान्यांपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. यात नाचणीपासून पापड, शेव, सत्त्व, ढोकळा, उपमा, उडली, चकली, लाडू, बिस्किट, अनारसे आदी पदार्थ, तर उडदापासून पापड, डाळ, भुजा वडे, पीठ, इडली आदी पदार्थ बनवले जात आहेत. तुरीपासून डाळ, खुरासणीपासून चटणी, वरईची भगर, उपवासाचे लाडू, उपमा, खांडवे, गोड शिरा, चटपटीत खीर आदी पदार्थांची विविधताही ठेवण्यात आली आहे.
प्रक्रियायुक्त पदार्थ बनविण्याचा कालावधी म्हणजे डिसेंबर ते मेपर्यंत. गटातील महिला सामूहिकरीत्या हे पदार्थ बनवितात. प्रत्येक महिला एका दिवसात पाच किलो नागलीपासून सुमारे 500 पापड बनविते. उन्हाळ्याच्या हंगामात 25 ते 30 हजार पापड प्रतिमहिलेकडून बनविले जातात. याशिवाय शेवया, नागली सत्त्व आदी पदार्थही बनविले जातात. मसाला तयार करण्यासाठी संस्थेमार्फत मिरची, हळद आदी कच्च्या पदार्थांसाठी टेंडर भरले जाते. काही माल घोटी येथील बाजारातून स्वस्त दरात आणला जातो व बचत गटातील महिलांना पुरविला जातो. विक्री व्यवस्था - बचत गटातील महिलांनी बनविलेले पदार्थ संस्थेमार्फतच विकले जातात. यामध्ये जव्हार, ठाणे, मुंबई, पुणे तसेच कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड आदी ठिकाणी ठराविक विक्रेत्यांमार्फत मालाची विक्री केली जाते. याशिवाय ठिकठिकाणी प्रदर्शने किंवा जत्रांचाही वापर त्यासाठी केला जातो. अशा वेळी संस्थेतील महिला स्टॉलवरून स्वतःच माल विक्री करतात. यातील काही मालांचे दर असे- (प्रति किलो)
नागली सत्त्व 100 रु.
नागली पीठ 80 रु.
आवळा सुपारी-80 रु.
मसाला 400 रु.
हळकुंड 120 रु.
खुरासणी चटणी 120 रु.
नागली पापड 150 रु. प्रति 100 नग
माल विक्रीतून आलेला फायदा सर्व जणी मिळून वाटून घेतात. प्रत्येक महिलेला वर्षाकाठी साधारण 50 ते 60 हजार रुपयांचा फायदा होतो. संस्थेमार्फत प्रशिक्षण -
संस्थेमार्फत तालुक्यात किंवा इतरत्र ठिकाणी खाद्य पदार्थ प्रशिक्षणही दिले जाते. संस्थेतील सुनीता लांडे यांनी नाचणी धान्यावर वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यापासून जवळपास 20 ते 25 खाद्य पदार्थ त्या बनवू शकतात. यात नाचणीचा शिरा, उपमा, ढोकळा, नाचणीची उसळ आदींचा समावेश आहे. हे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी सुनीताताईंना विविध ठिकाणी प्रशिक्षक म्हणूनही बोलाविले जाते. आजपर्यंत त्यांनी सुमारे 60 ठिकाणी जाऊन महिला बचत गटांना नाचणीपासून खाद्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
महिलांच्या प्रयत्नांची पुरस्काराने दखल
संस्थेतील महिलांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यात श्रीमती विमलताई पटेकर यांना आदिवासी सेवक पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार आदी, तर श्रीमती लक्ष्मीताई भोये यांना समाजप्रबोधन संस्था पुणे पुरस्कार आदींचा समावेश आहे.
पूर्वी नाचणीची केवळ भाकरी करून ती खाल्ली जायची. तसेच वरई पिकवून ती व्यापाऱ्यांना विकली जायची. भात तयार करण्यापुरताच त्याचा उपयोग केला जायचा. आज नाचणीच्या पापडासारखे अन्य 18 ते 20 खाद्य पदार्थ बनविण्याची कला आम्हा महिलांना जमू लागली. वरई, खुरासणी, उडीद, तूर अशा स्थानिक पिकांपासून पदार्थनिर्मिती होत असल्याने, या पिकांचे बाजारमूल्य वाढण्यास नक्कीच फायदा होईल.
सुनीता लांडे, अध्यक्ष, सदाफुली बचत गट, जव्हार
संस्थेमार्फत आदिवासी महिलांच्या हाताला चांगले काम मिळाले. आमच्या महिलांच्या हातात पैसा आला. आम्ही स्वावलंबी झालो. आदिवासी आणि अशिक्षित महिला बॅंकेत जाऊन स्वतःच्या कमाईचे पैसे आपल्या खात्यातून काढू लागल्या. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला.
लक्ष्मीताई भोये, उपाध्यक्ष,
जव्हार तालुका आदिवासी भगिनी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, जव्हार
संस्थेमार्फत दारूबंदीसारखी चांगली कामे करता आली. उन्हाळ्याच्या दिवसांत येथील महिलांना रोजगार देण्याचा संस्थेने प्रयत्न केला. त्यामुळे या महिलांना उत्पन्न मिळू लागले. आज प्रक्रिया उद्योगामुळे आमच्या महिला स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहेत. यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील प्रशिक्षणही उपयोगी ठरत आहे.
विमलताई पटेकर, संस्था अध्यक्ष
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे विषय विशेषज्ञ आहेत.)
संपर्क -
-विमलताई पटेकर - 9503702386
-लक्ष्मीताई भोये - 9270703175
-सुनीता लांडे - 7798618967
-उत्तम सहाणे- ८०८७९८५८९०
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020