"मिळून साऱ्याजणी' हा आदर्श जपत भर जहांगीर (जि. वाशीम) येथील महिलांनी एकत्रित येत ग्रामीण रोजगाराची पायाभरणी केली आहे. या माध्यमातून महिलांमध्ये उद्यमशीलतेचे बीज रुजविण्याचे काम या महिलांनी केले आहे. ग्राहकांनी कच्चा माल द्यायचा व मागणीनुसार त्यांना पापड, शेवया तयार करून द्यायच्या, अशा या व्यवसायातून या महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत आहेत.
वाशीम जिल्ह्यातील भर जहांगीर शिवारात गीते कुटुंबीयांची सात एकर शेती होती. मोरगव्हाण लघू सिंचन प्रकल्पाकरिता या संपूर्ण जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यामुळे हे कुटुंब भूमिहीन झाले. 2006 मध्ये आठ लाख रुपयांची भरपाई त्यांना मिळाली. परंतु, कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम होणे गरजेचे होते. दैनंदिन उपजीविकेचे साधन शोधावे लागणार होते. कुटुंबातील चंद्रकलाताई यांचे आपल्या मामांकडे लोणार (जि. बुलडाणा) येथे सतत येणे-जाणे व्हायचे. मामा राहतात त्या शेजारी एका व्यक्तीने पापड व शेवयानिर्मितीचा गृहउद्योग चालवला होता. तेथील कामकाजाविषयी चंद्रकलाताई उत्सुकतेने माहिती घ्यायच्या.
पै-पै जोडली
चंद्रकलाताई या अंगणवाडी मदतनीस असून, त्यासोबत अर्थार्जनासाठी शिवणकामाचे वर्गही चालवितात. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी यात सातत्य ठेवले आहे. त्यातून मिळालेले पैसे जोडत त्यांनी एका व्यावसायिकाकडून पापड तयार करण्याचे जुने यंत्र एक लाख दहा हजार रुपयांना खरेदी केले. पुरेसा प्रतिसाद नसल्याने त्या व्यावसायिकाने आपला व्यवसाय थांबवला होता. मात्र, चंद्रकलाताईंनी त्या यंत्रात उद्योजकतेची संधी शोधली. शेवयाचे जुने यंत्रदेखील 60 हजार रुपयांना खरेदी केले.
साथी हाथ बढाना...
यंत्र खरेदीनंतर चंद्रकलाताईंच्या नेतृत्वाखाली महिलांचा समूह कार्यरत झाला. रिसोड तालुक्यातील कुऱ्हा, मांडवा, मोहजा, मोरगव्हाण, चाकोली, रिसोड, वाडी या गावांतील ग्राहक पापड व आता शेवयानिर्मितीचा कच्चा माल घेऊन या महिलांना पुरवितात. त्याआधारे ग्राहकांच्या मागणीनुसार शेवया किंवा पापड तयार केले जातात.
असे असतात दर
-पापड तयार करून घेण्यासाठी 30 रुपये प्रतिकिलो
-जाड शेवया- दहा रुपये, तर त्यापेक्षा कमी जाड 20 रुपये प्रतिकिलो.
-बाजरीपासून तयार होणाऱ्या खारोड्या हा पदार्थ तयार करून देण्यासाठी वीस रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर आकारला जातो.
दवंडीमार्फत केला प्रचार
आपल्या उद्योगाचा अधिकाधिक प्रसार व्हावा, यासाठी चंद्रकलाताई व त्यांच्या सहकारी महिलांनी आगळावेगळा "फंडा' वापरला. परिसरातील दोन ते पंधरा किलोमीटर परिसरातील गावांत जाऊन दवंडी दिली. त्यातून पापड तयार करून मिळतील असा प्रचार करण्यात आला. त्यानंतर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.
दसऱ्यापासून सुरू केलेल्या या उद्योगाने आता उभारी घेतली आहे. व्यवसायातून गावातील सुमारे दहा महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सद्यःस्थितीत वीजभार नियमनाच्या काळात वीज असण्याच्या चार तासांच्या काळातच काम होते. यंत्राच्या माध्यमातून एका तासात सुमारे पाच ते आठ किलोपर्यंत पापड तयार होतात, तर शेवयाच्या यंत्राची क्षमता दीड तासात दहा किलो अशी आहे.
व्यवसायाचा ताळेबंद
1) वीज उपलब्ध असलेले असे दिवसातील चार तासच उपलब्ध होतात. तेवढ्या कालावधीत सुमारे 30 किलो पापड तयार होतात. त्यातून दररोज सुमारे 960 रुपयांचे उत्पन्न जोडले जाते. याकामी सात मजूर लागतात. प्रतिमहिला 50 रुपये मजुरी द्यावी लागते. वीज व अन्य खर्च वजा उर्वरित रक्कम हा नफा असतो.
2) पापड वेचणी, वाळवणी व अन्य कामांसाठी मजुरांची गरज अधिक भासते. शेवया तयार करण्याकामी मात्र केवळ एक ते तीन मजूर पुरेसे होऊ शकतात. चार तासांच्या कामाचा हिशेब धरला तर सरासरी 25 किलो शेवया दररोज तयार होतात. प्रतिकिलो वीस रुपये दर अपेक्षित धरल्यास दररोज 625 रुपयांचे उत्पन्न मिळते. वीज बिल व मजुरी खर्च 150 रुपये अपेक्षित धरता 475 रुपयांपर्यंत नफा मिळतो.
चंद्रकलाताई म्हणाल्या, की सुरवातीला नफ्याचे प्रमाण कमी होते. जसजशी ग्राहकांची संख्या वाढू लागली तसतसे त्याचे प्रमाण वाढत गेले. महिन्याला सुमारे सात क्विंटल पापडनिर्मिती होते. शेवयांचे उत्पादन नुकतेच सुरू केले आहे. मागील महिन्याला सुमारे वीस हजार रुपयांपर्यंत नफा मिळाला. आता या व्यवसायातून चांगला आत्मविश्वास येत आहे.
मसाला उद्योगाची उभारणी करणार
भर जहांगीरच्या या महिलांद्वारे लवकरच मसाला उद्योगाची उभारणी होणार आहे. या कामी लागणाऱ्या यंत्रांची खरेदी रिसोड व लोणार येथून करण्यात आली आहे. मसाला उत्पादनांची विक्री गावोगावी करण्याचा विचार असल्याचे चंद्रकलाताईंनी सांगितले. भारनियमनामुळे केवळ चार तासच काम होत असल्याने पर्याय म्हणून जनरेटर खरेदीची मानसिकता ठेवली आहे.
स्वामिनी ब्रॅण्डने होणार विक्री
करडा कृषी विज्ञान केंद्राने या महिलांना "मार्केटिंग' व "ब्रॅण्ड'चे बळ दिले आहे. बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या उत्पादनांची स्वामिनी ब्रॅण्डने विक्री केली जाईल. त्यासाठी तालुकास्तरावर रिसोड येथे विक्री केंद्र (आऊटलेट) उभारणीसाठी केंद्र मदत करणार आहे. केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. रवींद्र काळे, गृहविज्ञान विभागाच्या शुभांगी वाटाणे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. भर जहांगीर या आडवळणावरील गावाला उद्योजक महिलांचे गाव अशी नवी ओळखही आता मिळू लागली आहे.
संपर्क चंद्रकला प्रल्हाद गीते- 9765489648
डॉ. रवींद्र काळे-9370184954
कार्यक्रम समन्वयक, करडा कृषी विज्ञान केंद्र,
रिसोड, जि. वाशीम
लेखक : विनोद इंगोले
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात गरोदरपणात महिलांनी कोणती कामे करावीत आण...
लोकसहभाग, इच्छाशक्ती आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोर...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार व्दारा व ...