অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेड

वेड

‘वेड’ या शब्दाचा निश्चित अर्थ वा व्याख्या कायद्यात दिलेली नाही. तथापि न्यायालयांनी वेळोवेळी आपल्या न्यायनिर्णयांमधून वेड या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्यतः वेड ही एक मनाची स्थिती आहे, असे समजतात. असल्या स्थितीत मनुष्य जरी स्वेच्छेने व्यवहार करीत असला, तरी त्याची ही इच्छाशक्ती दूषित असते. अशा वेळी त्याच्या मनावर इतर काही गोष्टींचा प्रभाव असतो व त्यामुळे तो सारासार विवेक करू शकत नाही. ज्या व्यक्तीस वेड लागलेले असते, ती व्यक्ती कायद्याच्या दृष्टीने अपात्र समजली जाते. वेड लागलेला मनुष्य व मूर्ख मनुष्य (इडिअट) या दोहोंमध्ये पाश्चिमात्य कायदेकानूंत फरक करण्यात येतो. मूर्खपणा (इडिअसी) म्हणजे जन्मतःच सारासार विवेक नसणे किंवा मनाचा समतोलपणा नसणे. भारतात मात्र १९१२ साली इंडियन लूनसी अॅक्ट संमत करण्यात येऊन त्यात वेडपट (लूनटिक) आणि मूर्ख (इडिअट) हे दोन शब्द एकाच अर्थाने वापरलेले आहेत; कारण लूनटिक शब्दाचा अर्थ देताना ती व्यक्ती इडिअट किंवा मनोदौर्बल्ययुक्त असते, असे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. १९१२ च्या अधिनियमाप्रमाणे कोणत्याही व्यक्तीस वेडपट म्हणून मनोरुग्णालयात पाठवावयाचे असेल, तर प्रथमतः अशा व्यक्तीस दंडाधिकाऱ्यापुढे उभे करुन तिची सर्व चौकशी व्हावी लागते. त्यानंतर दंडाधिकाऱ्याने आदेश दिला, तरच संबंधित व्यक्तीस मनोरुग्णालयात पाठविले जाते. मुंबईसारख्या महानगरात दंडाधिकाऱ्याचे या संदर्भातील अधिकार पोलीस आयुक्ताला दिलेले आहेत.

कायद्याने वेडया माणसांचे पुढीलप्रमाणे प्रकार कल्पिलेले आहेत :

(१) पूर्ण वेडा मनुष्य,

(२) मानसिक रोग अगर शारीरिक इजा यांसारख्या धक्क्याने बिघडलेल्या मनःस्थितीचा मनुष्य,

(३) वेडाचे मधूनमधून झटके येत असलेला मनुष्य आणि

(४) मादक पदार्थसेवनाने नशेत असलेला मनुष्य.

वेडया मनुष्याने केलेले कृत्य कायद्याने गुन्हा अगर ⇨अपकृत्य ठरत नाही. तसेच त्याने केलेला करारही शून्य ठरतो [→ संविदा कायदे]. वेडामुळे बिघडलेल्या मनःस्थितीत आपण काय करतो, त्याचा परिणाम काय होईल अगर आपण करतो ते कृत्य बरे की वाईट, हे जाणण्याची क्षमता वेडया मनुष्यास नसते. अशा वेळेस त्याने केलेला गुन्हा कायद्यात माफ असतो. भारतीय दंडसंहितेनुसार वेडया मनुष्यास आपण काय करतो हे माहीत असले, आणि ते कृत्य वाईट अगर गैरकायदा आहे याची त्याला जाणीव नसली, तर त्याचे कृत्य दोषास्पद ठरत नाही.

काही वेळा वेडा मनुष्य वेडाच्या भ्रमात असतो व इतर वेळी चांगल्या मनःस्थितीत असतो असा पुरावा असल्यास, ज्यावेळी त्याच्या हातून एखादे कृत्य घडले असेल, त्यावेळी न्यायालय त्याच्या मनःस्थितीचा अवश्य विचार करुन निर्णय घेते. ज्यावेळी वेडाच्या भरात गुन्हा केला म्हणून आरोपी निर्दोषी ठरतो; त्यावेळी न्यायालयास त्याचे बाहेर राहणे धोकादायक आहे, असे वाटल्यास न्यायालय नियमानुसार अशा वेडया मनुष्यास योग्य ठिकाणी स्थानबध्द करण्याचा आदेश देऊ शकते. त्यासंबंधीचे हुकूम व इतर तरतुदी भारतीय कायद्यांत नमूद केलेल्या आहेत.

कोणत्याही मनुष्यास त्याच्या इच्छेविरुध्द इतर माणसांनी मद्य पाजून त्याला नशा आणवली व त्यामुळे त्याची विवेकबुध्दी नष्ट झाली, तर त्यावेळचे त्याच्याकडून होणारे कृत्य दोषास्पद ठरत नाही; पण त्याने स्वतः मद्यप्राशन करुन नशेत केलेले कृत्य मात्र दोषास्पद मानले जाते. सर्वसाधारणपणे ज्या अपकृत्यात हेतू अगर समज हा भाग विचारात घेतला जातो, त्याबद्दल वेडया मनुष्यास जबाबदार धरले जात नाही.

वेडया मनुष्यास न्यायालयात दावा लावावयाचा असेल, त्यावेळी कोणत्याही सज्ञान व्यक्तीने त्याच्यामार्फत दावा लावला पाहिजे. ज्यावेळी न्यायालयात वेडया मनुष्याच्या विरुध्द दावा असतो, त्यावेळी त्याचा बचाव करण्यासाठी न्यायालय कोणत्याही सज्ञान व्यक्तीची नेमणूक करु शकते. वेडया मनुष्यावर तो मानसिक दृष्टया असमर्थ असेपर्यंत खटला चालविला जात नाही.

जुन्या हिंदू कायद्यानुसार वेडया व्यक्तीस वारसाहक्क मिळत नसे. वेडी व्यक्ती कायद्यानुसार संपत्ती धारण करण्यास अपात्र समजली जात असे. अशी वेडी व्यक्ती अस्तित्वात नाही असे समजून संपत्तीचे वाटप होई; परंतु हिंदू वारसाहक्क कायदा (१९५६) यातीक कलम २८ अन्वये वारसाहक्काच्या बाबतीत वेडया व्यक्तीची ही अपात्रता रद्द ठरविली आहे. त्यामुळे वेडया व्यक्तीसह वारसाहक्क मिळतो; मात्र संपत्तीची विल्हेवाट लावण्यास अशी व्यक्ती कायदेशीर दृष्टया असमर्थ वा अपात्र समजली जाते. वेडी व्यक्ती मृत्युपत्र करू शकत नाही किंवा बक्षिसपत्र करू शकत नाही. वेडया व्यक्तीक्या संपत्तीचा पालक (नैसर्गिक किंवा न्यायालयाने नेमलेला) त्याच्या स्थावर तसेच जंगम मालमत्तेचे व्यवहार पाहण्यास सक्षम असतो.

विविध धर्मांच्या ⇨विवाहविषयक कायद्यांत वेडपट व मूर्ख व्यक्तीसंबंधी विशेष तरतुदी केल्या आहेत. इंडियन डिव्होर्स अॅक्ट (१८६९) व फॉरिन मॅरेज अॅक्ट (१८६९) या कायद्यांतील तरतुदींनुसार वधू किंवा वर यांपैकी कोणीही वेडपट किंवा मूर्ख असता कामा नये. असे जर असेल, तर तो विवाह रद्दबातल करता येतो.

विशिष्ट विवाह कायदा (१९५४) व हिंदू विवाह कायदा (१९५५) यांमध्ये विवाहविघटनाच्या कारणांमध्ये मनोदौर्बल्य (मेंटल डिस्‌ऑर्डर) या कारणाचा अंतर्भाव केला आहे. विवाहाच्या समयी वधूवरांपैकी कोणीही मनोदौर्बल्यामुळे विवाहास संमती देण्यास असमर्थ असता कामा नये अथवा त्याला किंवा तिला वारंवार बुध्दिभ्रमाचे किंवा अपस्माराचे झटके येता कामा नयेत, अशा तरतुदी केलेल्या आहेत. उपरोक्त कायद्यांन्वये पतिपत्नींपैकी कोणीही बरे न होण्याइतपत वेडा/वेडी आहे असे आढळल्यास त्यांना घटस्फोट घेता येतो. मुस्लिम विवाहविघटन अधिनियमामध्ये (१९३९) अनेक कारणांपैकी वेड वा बुध्दिभ्रष्टता (इन्सॅनिटी) हे एक कारण दिलेले असून मुस्लिम स्त्रीस पती वेडा असल्यास घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे. [→ मुसलमानी विधि]. पारशी विवाह अधिनियम १९३६ तसेच पारशी विवाह व घटस्फोट अधिनियम १९८८ यांमध्ये मनोदौर्बल्यामुळे (अन्‌साउंडनेस ऑफ माइंड) विवाह रद्दबातल होऊ शकतो. तसेच पतिपत्नींना घटस्फोटही मागता येतो. ख्रिस्ती धर्माप्रमाणे पतिपत्नी यांपैकी कोणीही एक वेडा/वेडी असल्यास न्यायालयाकडून विवाह रद्दबातल ठरविण्याचा हुकूमनामा मिळविता येतो. निरनिराळ्या कायद्यांत वेड शब्दाला अनुलक्षून भिन्नभिन्न शब्दप्रयोग हेतूतः वापरले आहेत; पण सामान्यतः असे विधान करता येईल, की वेड लागलेली व्यक्ती व उपरिनिर्दिष्ट दोषान्वित व्यक्ती या एकाच प्रकारच्या आहेत.  पाश्चिमात्य राष्ट्रांतसुध्दा एखाद्या व्यक्तीस वेड लागले आहे असे ठरवावयाचे असेल, तर न्यायालयीन प्रक्रियेचाच अवलंब करावा लागतो. इंग्लिश व अमेरिकन विधींत वेडया मनुष्यासंबंधी कायदा असून क्षणिक वेडाच्या भावनेला महत्त्व दिले जाते. याला ‘टेंपररी इन्सॅनिटी' असे म्हणतात. न्यायालयात गुन्ह्याच्या वेळी आरोपीस आपल्या कृत्याचे स्वरुप माहीत होते काय, हे न्यायालयात पाहिले जाते. संबंधित वेडया व्यक्तीस न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली जाते. संविधानान्वये उपलब्ध असलेल्या सर्व संरक्षणात्मक बाबी त्या व्यक्तीस उपलब्ध असतात.

लेखक : त्र्यं. कृ टोपे.; सुशील कवळेकर

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate