অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विलग्नावास

विलग्नावास

सामान्यपणे जेव्हा गंभीर स्वरूपाचे साथीचे रोग संसर्गामुळे पसरतात, तेव्हा संसर्गजन्य व्यक्तींना समाजातील इतर व्यक्तींपासून काही काळ वेगळे ठेवणे, यास ‘विलग्नमवास’ असे म्हटले जाते. कायद्यातील ‘क्वॉरन्टीन’ या संज्ञेचा शब्दशः अर्थ ‘चाळीस दिवसांची मुदत’ असा आहे. विलग्नरवास पद्धतीमुळे परकीय देशातून जहाजाद्वारे वा इतर मार्गाने येणारे प्रवासी वा प्राणी यांना काही विशिष्ट मुदतीसाठी वेगळ्या जागेत ठेवून त्यांच्या संचारस्वातंत्र्यावर बंधने घालण्यात येतात. प्रवाशांवर देखरेख ठेवून तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून वातावरण शुद्ध ठेवता येते. सांसर्गिक रोगांपासून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने अनेक देशांनी विलग्नवास पद्धतीचा स्वीकार केल्याचे आढळून येते. तथापि विलग्नवास पद्धतीमुळे रोगप्रसारास पूर्णपणे प्रतिबंध होतो असे नाही, तर काही प्रमाणात तो आटोक्यात आणला जातो. रोगप्रसार आटोक्यात येण्यास किती कालावधी लागेल, यावर साधारणपणे विलग्नवासाचा कालावधी अवलंबून असतो.

मध्ययुगीन काळात यूरोपीय लोक निरनिराळ्या कारणांनी, विशेषतः जमिनीच्या शोधार्थ समुद्रप्रवास करू लागले, तेव्हापासून त्यांच्याबरोबर निरनिराळ्या रोगांचा प्रसार होऊ लागला. चौदाव्या शतकात यूरोपात ‘काळा मृत्यू’ (ब्लॅहक डेथ) नावाची महाभयंकर प्लेगाची साथ आली. या साथीत यूरोपातील एकचतुर्थांश लोक मृत्यूमुखी पडले. या साथीमुळे समाजिक, आर्थिक, आध्यात्मिक असे खोल दुष्परिणाम समाजजीवनावर घडून आले. या साथामधूनच विलग्नवासाची कल्पना व्हेनिसमध्ये (इटली) पहिल्यांदा उदयास आली. पौर्वात्य देशांकडून येणाऱ्या जहाजांचे व्हेनिस हे प्रमुख बंदर असल्यामुळे व जहाजांवरून येणारे सांसर्गिक रोगाचे प्रवासी व माल यांमुळे प्लेगाचा रोग उद्‌भवतो, हे निदर्शनास आल्यामुळे व्हेनिस शहराच्या अधिकाऱ्यांनी अशी संशयित जहाजे, त्यांवरील माणसे व माल यांसह तपासून अलग ठेवण्याची व सर्वसाधारण दळणवळणात मिसळू न देण्याची खबरदारी घेतली. १३७४ मध्ये बेरनाबो व्हीस्क्रोंती (१३२३-८५) या मिलानच्या ड्यूकने प्लेगाच्या प्रसारास आळा बसावा म्हणून एक हुकूम काढला होता. त्यानुसार प्लेगाचे रोगी गावाबाहेर शेतात नेऊन ठेवावेत तसेच त्यांची शुश्रुषा करणाऱ्या व्यक्तीही १४ दिवस विलग्नवासात ठेवाव्यात, अशा तरतुदी होत्या. त्या काळात व्हेनिस शहरालगत पहिले विलग्नवास केंद्र उभारण्यात आले (१४२३).

हळूहळू जहाजे विलग्नवासात ठेवण्याची मुदत ३० दिवसांवरून पुढे ४० दिवसांपर्यत वाढविण्यात आली. विलग्नवासाची ही आदर्श पद्धती जगात सर्वत्र विस्तार पावली. सांप्रत, अनेक संसर्गजन्य रोग लक्षात आल्यामुळे मानवजातीच्या दृष्टीने विलग्नवास पद्धती अतिशय आवश्यक ठरली आहे. बंदरे विमानतळ आणि जेथे सीमा ओलांडण्याच्या जागा आहेत, तेथे जहाजे, विमाने आणि रेल्वे यांमधून सांसर्गिक रोगाचे प्रवासी विलग्नवास पद्धतीचा वापर करून तपासण्यास येतात. पटकी (कॉलरा), बूबॉनिक प्लेग यांसारखे गंभीर सांसर्गिक रोग जहाजावर आढळून आल्यास अशा जहाजावर पिवळे निशाण लावून ते बंदरातच थांबवून ठेवण्यात येते.

एकोणिसाव्या शतकात ग्रेट ब्रिटन इतर देशांप्रमाणेच परकीय देशांतून येणाऱ्या सांसर्गिक रोगांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विलग्नवास पद्धती उपयोगात आणली. १९७९ मध्ये ब्रिटिश शासनाने कायदा करून विलग्नवासाचे नियम तयार केले. त्यांनुसार जहाजे, विमाने यांमधून येणाऱ्या पटकी, प्लेग, पीतज्वकर यांसारख्या सांसर्गिक रोगांच्या प्रवाशांना ब्रिटनमध्ये प्रवेश देण्यात येत नाही.

जगातील निरनिराळ्या देशांनी विलग्नवासाचे कायदे केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार व इतर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी विलग्न वास पद्धतीचा आवर्जून उपयोग झाला आहे, परंतु विलग्नवासाच्या कायद्यात सर्व देशांत एकवाक्यता नसल्यामुळे कधीकधी अडचणी निर्माण होतात. म्हणून या कायद्यांच्या एकत्रीकरणावर भर देण्यात आला. १८५२ पासून विलग्नवास कायद्यांच्या एकत्रीकरणाचे प्रयत्न  सुरू झाले. विसाव्या शतकाच्या आरंभी सूक्ष्मजंतुशास्त्र विकसित होऊन रोगप्रतिबंधाच्या दृष्टीने अध्ययन सुरू झाले. साहजिकच आंतरराष्ट्रीय स्तरावर विलग्नवासविषयक नियमांमध्ये एकसूत्रीपणा आणून रोगप्रतिबंधाच्या अध्ययनास गती प्राप्त झाली. वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे विलग्नवासाच्या पद्धतीतही बदल घडून आला आहे. साथीच्या काळात जहाज अधिकारी प्रवाशांना आवश्यक ती लस टोचून घेतल्याशिवाय प्रवासास परवानगी देत नाहीत. सल टोचून घेतल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या व्यक्तीसच जहाजामधून एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करू देण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आक्रमक राष्ट्राविरूद्ध आर्थिक देवाणघेवाण, वाहतूक इत्यादींबाबत बंधने घालणेही विलग्नवास पद्धतीमुळे शक्य झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्यास अनुकूलता दर्शविलेली आहे. या बाबतीत संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील कमल ४१ मध्ये तरतूद केली असून विलग्नवासाचे नियमही नमूद केलेले आहेत.

प्राण्यांना होणाऱ्या सांसर्गिक रोगांच्या बाबतीतही विलग्नवास पद्धती अवलंबिली जाते. काही देशांत पाळीव प्राणी आयात करताना त्यांच्याबरोबर पायाचे, तोंडांचे वा अलर्क रोग (रेबिज) यासारखे रोग येऊ नयेत, म्हणून विशेष दक्षता घेण्यात येते. ग्रेट ब्रिटनमध्ये बहुतेक रेबिज झालेल्या सर्व प्राण्यांवर विलग्नवासाद्वारे सहा महिने पाळत ठेवली जाते आणि प्राणी रेबिजमुक्त होईपर्यत वेगळे ठेवले जातात. ऑस्र्टेलिया, न्यूझीलंड या देशांनी, विशेषतः प्राणी व वनस्पती, यांच्या सांसर्गिक रोगांस प्रतिबंध बसावा म्हणून कडक नियम केले आहेत. या दोन देशांत गुरे वा मेंढ्या यांची आयात केली जात नाही. इतर प्राण्यांचे निरोगीपणाचे प्रमाणपत्र त्या देशांत आवश्यक केले आहे. संबंधितांकडून असे प्रमाणपत्र मिळेपर्यंत प्राण्यांना बराच काळ विलग्नवास केंद्रात ठेवण्यात येते. प्राण्यांची कातडी, केस इ. उत्पादक वस्तू आयात करतानादेखील त्यांतून सांसर्गिक रोग येऊ नयेत, म्हणून विलग्वास निरीक्षकाकरवी विशेष दक्षता घेण्यात येते. बुरशीचे पदार्थ (फंगस) वा अळंब्यासारख्या वनस्पतींमधूनही रोगप्रसार होण्याची शक्यता असते, म्हणून अशा वनस्पतींची आयात करण्यास मज्जाव आहे. या बाबतीत विलग्नवासाचे स्थानिक नियम उपयोगात आणून रोगप्रसाराला आळा घालण्यात येतो.

सार्वजनिक आरोग्य कायद्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी विशिष्ट सांसंर्गिक रोगांबद्दलचा संपूर्ण अहवाल संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवितात. त्यानुसार सांसर्गिक व्यक्ती विलग्नवासात ठेवून वातावरण शुद्ध राखले जाते. जनकल्याणाच्या दृष्टीने विचार केला, तरीही मालमत्तेच्या अधिकारापेक्षा विलग्ननवासाचे कायदे अथवा नियम अधिक महत्त्वाचे आहेत. कुटुंबातील व्यक्तींना हिवताप, देवी वगैरे साथीचे रोग झाल्यास त्यांना आपल्या घरातदेखील विशिष्ट काळ स्वतंत्र ठेवणे , म्हणजेही एक प्रकाराचा विलग्नवासच होय.

लेखक : ज. बा. संकपाळ

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate