অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बनावट दस्तऐवज

बनावट दस्तऐवज

कायद्याच्या दृष्टीने अग्राह्य असे खोटे कागदपत्र (फोर्ज्‌ड‌‌‌ डॉक्युमेंट्स). कायद्याच्या परिभाषेत बनावट दस्तऐवजाचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगता येईल : ‘अ’ ने स्वतः अगर दुसऱ्यामार्फत एखादा कागद केला नाही अथवा त्यावर सही केली नाही किंवा काही निशाणी अगर शिक्कामोर्तब केले नाही, हे माहीत असूनही; अ ने तसे स्वतः अगर दुसऱ्यामार्फत केले आहे, असे दाखविण्यासाठी तसे कागदपत्र ब ने तयार केले अगर त्यासाठी सही, निशाणी अथवा शिक्कामोर्तब केले, तर ब ने बनावट दस्तऐवज तयार करण्याचा गुन्हा केला असे समजले जाते. अशा गुन्ह्याकरिता भारतीय दंडसंहितेत (कलम ४६५) दोन वर्षांची सजा अगर दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.  एखादा दस्तऐवज स्वतः अगर दुसऱ्याने अगोदरच केला असता, अनधिकाराने, लबाडीने अथवा अप्रामाणिकपणे तो रद्द करणे, अथवा त्यात फेरफार करणे म्हणजेही बनावट दस्तऐवज करणे होय. त्याचप्रमाणे ज्याला दस्तऐवजातील मजकुराची काहीही माहिती नाही, अशा वेड्या इसमाकडून अगर नशेत असलेल्या व्यक्तीकडून एखादा दस्तऐवज फसवणुकीने, लबाडीने अगर अप्रामाणिकपणे तयार करून घेणेअगर सही घेणे अथवा फेरफार करून घेणे म्हणजेही बनावट दस्तऐवज तयार करणे होय. एकाद्याचे नुकसान करावे म्हणून अथवा आपल्या हक्काचा पुरावा म्हणून अथवा दुसऱ्याने आपली मालमत्ता सोडावी म्हणून अथवा काही करार करावा म्हणून किंवा कोणतीही लबाडी करावी म्हणून अप्रामाणिकपणे अथवा लबाडीने बनावट दस्तऐवज करणे हा गुन्हा होय. स्वतःची सही करणे आणि त्याच नावाच्या दुसऱ्या इसमाने सही केली असे भासविणे. हासुद्धा बनावट दस्तऐवजाचा प्रकार होय. न्यायालयातील कागदपत्राची बनावटगिरी तसेच इतर काही नोंदींची बनावटगिरी, मृत्युपत्र किंवा ऋणपत्राची बनावटगिरी वगैरे गुन्हे जास्त गंभीर स्वरूपाचे आहेत. बनावट दस्तऐवजाचा फसवेगिरीसाठी उपयोग व्हावा, या हेतूने बनावट दस्तऐवज तयार करणे, हाही गुन्हाच होय. दुसऱ्याची बेअब्रू करण्यासाठी खोटा दस्तऐवज तयार करणे, तो जवळ बाळगणे किंवा बनावटगिरीने तो उपयोगात आणणे या व अशासारख्या इतरही गंभीर गुन्ह्यांस जास्तीत जास्त आजन्म कारावासाची सजा आहे. भारतीय दंडसंहितेत ४६३ ते ४७७ ए या कलमांखाली बनावट दस्तऐवजांसंबंधीची कायदेशीर तरतूद आहे.

लेखक : सुशील कवळेकर

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate