অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाउंड, रॉस्को

पाउंड, रॉस्को

(२० ऑक्टोबर १८७०-१ जुलै १९६४). अमेरिकन विधिवेत्ता व वनस्पतिशास्त्रज्ञ. जन्म अमेरिकेतील नेब्रॅस्का राज्यातील लिंकन येथे. त्याचे वडील न्यायाधीश होते. नेब्रॅस्का विद्यापीठाचा एम्. ए. (१८८८) व हार्व्हर्ड विधी विद्यालयातून बारची परीक्षा उत्तीर्ण (१८९०). वकिलीचा व्यवसाय सांभाळून १८९७ साली त्याने वनस्पतिविज्ञानातील पीएच्.डी पदवी मिळविली. ‘रॉस्कोपाउंडिया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दगडफुलासारख्या दुर्मिळ वनस्पतीचा शोध त्याने लावला. नेब्रॅस्का सर्वोच्च न्यायालयात अपील विभागात आयुक्त म्हणून पाउंडने व्यक्त केलेली मते नंतरच्या अनेक न्यायनिवाड्यांत उद्धृत केलेली आढळतात. नेब्रॅस्का, नॉर्थवेस्टर्न आणि शिकागो या विद्यापीठात त्याने कायद्याचे अध्यापनही केले (१९०३-१०). पुढे हार्व्हर्ड विद्यापीठात दीर्घकाळ कायद्याचा प्राध्यापक (१९१०-३६) तसेच हार्व्हर्ड विधिसंस्थेचा अधिष्ठाता (१९१६-३६) म्हणून त्याने काम केले त्याच काळात त्याने विधिविषयक उच्च अभ्यासक्रमाची नीट आखणी केली. १९३६ पासूनही पुढील ११ वर्षे तो त्याच विद्यापीठाचा फिरता प्राध्यापक होता. १९४० साली अमेरिकेन बार असोसिएशनने त्यास सन्माननीय पदक देऊन कायद्याच्या क्षेत्रातील त्याच्या कार्याचा गौरव केला. चँग-कै-शेकच्या राष्ट्रीय चीनमधील न्यायखात्याचा सल्लागार म्हणूनही त्याने काम केले (१९४६-४९). १९०६ साली अमेरिकन बार असोसिएशन ‘द कॉजेस ऑफ पॉप्युलर डिस्सॅटिस्फॅक्शन वुइथ द ॲड्मिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस’ या विषयावर त्याने अत्यंत महत्त्वाचे व्याख्यान दिले. त्यातील विधाने आजही यथार्थ वाटतात.  पाउंडने मांडलेली समाजशास्त्रीय न्यायशास्त्राची संकल्पना महात्त्वाची आहे. कायद्याने प्रत्यक्ष व्यवहाराचे भान राखावे व समाजाच्या गरजांशी सुसंगत असावे, असे त्याचे मत होते. १९३० नंतरच्या आर्थिक मंदीच्या काळात राष्ट्रध्यक्ष रूझवेल्टच्या‘न्यू डील’ मधील सुरुवातीच्या उपाययोजनांना त्याने पाठिंबा दिला खरा; पण न्यायालयांनी संभाव्य हुकूमशाहीबाबत दक्ष राहिले पाहिजे, अशी भूमिका त्याने नंतर घेतली. खास अमेरिकन म्हणता येईल अशा कायद्याची उत्क्रांती १७८९ते १८६० या काळातील अमेरिकन न्यायाधीशांनी घडवून आणली, हा विचार पाउंडनेच प्रथम मांडला; घडणयुगाची (फॉर्मेटिव्ह इरा) संकल्पना म्हणून तिचा निर्देश केला जातो. जुने अभिजात वाङ्मय, अनेक भाषा, वनस्पतिविज्ञान यांसारख्या विविध विषयांत पाउंडची गती होती. त्याने अनेक ग्रंथ लिहिले असून, त्यांपैकी पाच खंडांतील ज्यूरिसप्रूडन्स (१९५९) हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा मानला जातो.

संदर्भ : 1. Sayre, P. L. The Life of Roscoe Pound, Iowa City, 1948.

2. Wigdor, David, Roscoe Pound, Westport (Conn.), 1974.

लेखक : ज. वा. संकपाळ

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate